You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ममता बॅनर्जी : नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडून गोवा जिंकू शकतील का?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्राचं राजकारण आर्यन खान, समीर वानखेडे, नवाब मलिक या नावांनी सध्या ढवळून काढलं असलं तरीही शेजारच्या गोवा राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडताहेत त्या कमालीच्या चित्तवेधक आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि 'तृणमूल कॉंग्रेस'च्या अध्यक्ष ममता बॅनर्जी गुरुवारी अडीच दिवसांच्या गोवा दौऱ्या दाखल झाल्या आणि भाजपाच्या ताब्यात असलेल्या या देशातल्या छोट्या राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे.
येत्या काही काळातल्या राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या घडामोडी इथं घडताहेत. देशाचं लक्ष आतापासूनच उत्तर प्रदेशच्या राजकारणावर लागलं आहे.
पण त्या राज्यासोबतच पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला निवडणुकीला सामोरं जाण्याऱ्या गोव्यात स्वत:ला राष्ट्रीय म्हणवणाऱ्या, पण चेहऱ्यानं आणि विस्तारानंही प्रादेशिक असणाऱ्या बाहेरच्या राज्यांतल्या पक्षांनी इथं उडी घेऊन गोव्याची निवडणूक एकदम स्पर्धात्मक आणि कर्कश करुन टाकली आहे.
त्यात सगळ्यांत जास्त चर्चा आहे ती ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसची. वास्तविक केवळ बंगाल आणि फार तर ईशान्येतल्या राज्यांतल्या काही भागांमध्ये प्रभाव असणाऱ्या तृणमूलचा गोव्याशी कधीही संबंध आला नाही. 2012 मध्ये त्यांच्या तिकिटावर काहींनी इथं निवडणूक लढवली होती, पण आज तृणमूल ते मानत नाही.
त्यांच्या मते हीच त्यांची पहिली निवडणूक आहे. पण ओडिशा, झारखंड, छत्तीसगढ, तेलंगणा आणि महाराष्ट्र या मधल्या चार राज्यांवरून उडी मारुन, पूर्व किनाऱ्यावरुन हा पक्ष थेट पश्चिम किनाऱ्यावरच्या गोव्यात का येतो आहे?
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या भाजपाला हरवून तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणाऱ्या ममतांना आता 2024 मध्ये राष्ट्रीय आकांक्षा खुणावू लागल्या आहेत म्हणून त्या बंगालमधून बाहेर पडताहेत? गोवा तुलनेनं छोटं राज्य आहे, कलकत्यासारख्या शहराच्या तुलनेत नगण्य, त्यामुळे सोपं आहे म्हणून?
गोवा हे कायम भाजपचा बाकेकिल्ला राहिला, त्यामुळे तिथं त्यांना आव्हान दिलं तर देशभर पडसाद उमटू शकतात म्हणून?
इथं मोठा काळ राज्य केलेली कॉंग्रेस, इतर छोटे काही मतदारसंघांपुरतेच मर्यादित राहिलेले स्थानिक पक्ष विखुरलेले आहेत. त्यामुळे मोकळं राजकीय अवकाश आहे असा कयास असल्यानं ममता गोव्यात आल्या आहेत?
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर बंगालसारखीच गोव्यासाठी ममतांसाठी आखणी करताहेत. गेले काही महिने ते इथं आहेत. इथल्या राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांतल्या नेत्यांशी बोलताहेत. नाराजीचा अंदाज घेऊन तृणमूलकडे ओढण्याचा प्रयत्न करताहेत. वेगवेगळी आश्वासनं दिली जाताहेत.
प्रश्न हाही आहे की, बंगाल तर तृणमूलचं जन्मस्थान होतं, पण गोव्यासारख्या नव्या राज्यात पहिल्याच निवडणुकीत प्रशांत किशोर त्यांना यश मिळवून देऊ शकतील का?
हे गोवा आहे की कोलकाता?
गोव्यात जेव्हा आम्ही प्रवेश करतो आणि शहरा-गावांतून फिरतो तेव्हा हेच समजत नाही की आपण पणजी-म्हापुसामध्ये आहोत की कोलकात्यात, एवढे ममता बॅनर्जींचे बॅनर्स सर्वत्र लावले आहेत. अक्षरश: हजारो मोठाले होर्डिंग्स प्रत्येक रस्त्यावर, गल्लींत, चौकांमध्ये लावले आहेत.
विजेचे खांब, बसथांबे, भिंती, काहीही सोडलेलं नाही. 'गोंयची नवी सकाळ' अशा घोषणेचे आणि ममतांचा फोटो असलेल्या या होर्डिंग्सच्या मागे जणू गोवा लपलेलं आहे. ममता गोव्यात येणार म्हणून निवडणुकीच्या अगोदरच या राज्यावर दावा सांगत तृणमूलनं असा माहोल गोवाभर उभा केला आहे.
अर्थात या होर्डिंग्सवरुन इथं रस्त्यारस्त्यांवर भाजप विरुद्ध तृणमूल असा संघर्ष सुरु झाला आहे. ममतांचे पोस्टर्स उभे राहिले, मग भाजपानंही आपल्याच राज्यात त्यांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग्स उभे केले.
गोवा सरकारच्या कामांची माहिती देणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा फोटो असणारे पोस्टर्स ममतांशी स्पर्धा करत उभे आहेत.
त्यातच मध्ये 'आम आदमी पक्षा'चेही मोजके होर्डिंग अरविंदे केजरीवाल यांचा चेहरा घेऊन लागले आहे. पण किमान पोस्टर्सच्या संख्येत तरी तृणमूलने तूर्तात या दोन पक्षांना मात दिली आहे, असं नजरेस जे पडतं त्यावरुन दिसतंय.
या पोस्टर्सवरुन वादही जोरात चालले आहेत. ममता इथं फार काही प्रभाव पाडू शकणार नाहीत असं भाजपचे नेते जरी इथं म्हणत असले तरीही अस्वस्थता आहे असं दिसतं आहे. मग गेल्या दोन दिवसांमध्ये ममतांचे राज्यभरातले पोस्टर्स फाडणं, त्याला काळं फासणं असे प्रकार सर्वत्र घडलेत.
तृणमूल कॉंग्रेसचा आरोप आहे की आम्हाला घाबरुन भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी हे केलं आहे. नुकत्याच झालेल्या अमित शाहांच्या दौऱ्यापासूनच तृणमूलनं हे होर्डिग्स उभारणं सुरु केलं होतं.
गोव्याच्या भूमीवर 'तृणमूल'ला आधार आहे का?
ममता बॅनर्जी त्यांच्या गोवा दौऱ्यामध्ये तृणमूलची गोव्यातली दिशा स्पष्ट करतील. जवळपास अडीच दिवस त्या इथं असतील आणि त्यादरम्यान पक्षाच्या इथल्या नवीन नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी आणि विविध क्षेत्रातल्या व्यक्तींशी भेटीगाठी करतील. पण त्यांची राजकीय रणनीति काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. गोव्याच्या भूमीवर नवे मित्र मिळवण्यात त्या यशस्वी ठरतील का?
वास्तविक ममता गोव्यात येतील तेव्हा इथल्या काही स्थानिक पक्षांबरोबर युती किंवा त्यांचं तृणमूलमध्ये विलिनीकरण अशी मोठी रणनीति आखण्यात आली होती.
तीन आमदार असलेली विजय सरदेसाई यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' ममतांच्या उपस्थितीत तृणमूलला सामील होणार अशी मोठी चर्चा होती. तृणमूलनं त्यासाठी प्रयत्न केले. पण घोडं त्याअगोदरच अडलेलं दिसतं आहे आणि सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलतांना असं कोणतंही विलिनीकरण होणार नसल्याचं म्हटलं आहे.
'पण भाजपाशी लढण्याबाबर गंभीर असलेल्या पक्षांसोबत युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत' असंही सरदेसाई यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे तृणमूल इथं पाय रोवण्यासाठी ज्यांना जवळ करु पाहते आहेत ते इथले स्थानिक पक्ष निवडणुकीच्या तोंडावर सगळे पर्याय खुले ठेवू पाहताहेत असं चित्रं आहे.
चर्चा अशीही आहे की विजय सरदेसाई हे आता कॉंग्रेसशीही बोलणी करताहेत. 30 ओक्टोबरला राहुल गांधी हेही गोव्याच्या दौऱ्यावर आहेत.
पण गोव्याचं राजकरण हे असंच राष्ट्रीय पक्षांच्या नेतृत्वाचं असलं तरीही इथल्या स्थानिक पक्षांवर पूर्णपणे अवलंबून आहे. तेच 'किंगमेकर' असतात.
2017 मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेला भाजप सरदेसाई यांचा पक्ष, 'महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष' आणि कॉंग्रेसचा फुटलेला गट यांना सोबत घेऊनच सत्तेवर आला होता.
त्यामुळे छोट्या विस्ताराच्या पक्षांना गळाला लावण्यासाठी तृणमूल प्रयत्न करतं आहे. सरदेसाई यांच्यासोबतच 'मगोप'शीही त्यांनी चर्चा केली आहे.
तृणमूलची इथली सगळी रणनीति प्रशांत किशोर पाहताहेत. ते आणि त्यांची 'आय पॅक'ची टीम गेले काही महिने इथे ठाण मांडून बसली आहे. स्थानिक पक्षांशी बोलत तृणमूलला इथे आधार शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. सर्व पक्षांतल्या अनेक मोठ्या नेत्यांना संपर्क केला गेला आहे.
गोवा फॉरवर्ड पार्टी किंवा मगोप आताच सोबत येत नाहीयेत हे पाहतांना नुकतंच त्यांनी कॉंग्रेसचे नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फलेरो यांना पक्षात घेतलं आहे. वयोवृद्ध आणि सीमित प्रभाव उरलेले फलेरो तृणमूलला गोव्यात पाय रोवायला किती मदत करतील याबद्दल प्रश्न आहेत.
नेत्यांमध्ये आधार शोधण्यासोबतच तृणमूल स्थानिक मुद्द्यांमध्येही आधार शोधतं आहे. गेल्या काही दिवसांपासून महुआ मोईत्रा, डेरेक ओ ब्रायन, सुगता रॉय, बाबुल सुप्रियो अशी तृणमूलच्या नेत्यांची बंगालमधली मोठी टीम गोव्यात बसली आहे.
रोज भेटीगाठी, सत्ताधारी भाजपविरुद्ध पत्रकार परिषदा घेऊन, स्थानिक प्रभावाच्या व्यक्तींना पक्षाकडे ओढून आवाज निर्माण करण्याचा ते प्रयत्न करताहेत.
नुकतंच गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीत गोव्याच्या भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर तृणमूलने मुख्यमंत्री सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यासाठी ते राज्यपालांनाही भेटून आले.
पण तृणमूलला हे मुद्दे आणि नेते थोडक्या काळात जनाधार मिळवून देतील का? अगदी काही दिवसांच्या पूर्वतयारीवर निवडणुकीत यश मिळेल का?
'पदार्पणातच फलंदाज शतक ठोकू शकत नाही का?'
पण तृणमूलचे राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांना हा मुद्दा गौण वाटतो. 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, "सध्या क्रिकेट वर्ल्ड कप सुरु आहे. तुम्ही मला सांगा जो फलंदाज पदार्पण करत असतो तो शतक मारू शकत नाही का? इथंही तसंच होईल आणि गोव्याची जनता आम्हाला पाठिंबा देईल."
ममतांच्या पंतप्रधानपदाच्या आकांक्षेबद्दल आणि त्यासाठी गोव्यात निवडणूक लढवण्याच्या निर्णयाबद्दल ते म्हणतात की पंतप्रधान कोण होणार की कसं होणार हे नंतर सगळे पक्ष एकत्र ठरवता येईल, पण, "मोदी आणि शाह यांच्या भाजपाला कसं हरवता येतं हे बंगालमध्ये ममतादीदींनी दाखवून दिलं आहे.
तेच त्या इथं करुन दाखवतील. आणि आम्ही इथे एक दोन महिन्यांसाठी, एका निवडणुकीसाठी आलो नाही आहोत. तृणमूल गोव्यात पाय रोवेल आणि एक दिवस इथे सत्तेत असेल."
पण तृणमूलचं लक्ष्य या निवडणुकीआडून 2024 कडे आहे हे नक्की. लोकसभा निवडणुकीत गोव्यातल्या दोन्ही लोकसभेच्या जागा हा पक्ष लढवणार आहे असं डेरेक ओ ब्रायन सांगतात. विधानसभा निवडणूक की 2024 ची पूर्वतयारी म्हणूनही तृणमूल पाहतं आहे.
गोव्यातले ज्येष्ठ पत्रकार राजू नायक यांच्या मते, "ममतांना पंतप्रधानपदाची इच्छा आहे. मोदींना सक्षमपणे टक्कर देणाऱ्या नेत्या असं त्यांना स्वत:ला प्रोजेक्ट करायचं आहे. त्यासाठी त्यांना वाटतं की गोवा छोटं आहे. ते सहज मॅनेज केलं जाऊ शकतं. पण ते तसं नाही आहे.
आज जर इथं तृणमूलकडे पाहिलं की इथल्या वृद्धापकालाकडे झुकलेल्या काही नेत्यांना त्यांनी आयात केलं आहे. पण वास्तवात तृणमूल म्हणजे कोण तर प्रशांत किशोर आणि त्यांची 200 जणांची एक टीम, तेवढेच गोव्यात काम करतात. बाकी इथे काहीही नाही. प्रबळ नेते घेतले तर कार्यकर्ते आणि मतदार आपल्याकडे येतात असं त्यांना वाटतं, पण परिस्थिती तशी नाही आहे."
40 आमदारांच्या या राज्याकडे राष्ट्रीय स्तरावरुन कायम लक्ष्य असतं. मनोहर पर्रिकरांच्या पश्चात राष्ट्रीय स्तरावर आणि राज्यातही एकसंध नेतृत्व देण्यासाठी राजकीय संधी निर्माण झाली आहे असंही काहींना वाटतं.
2017 च्या निवडणुकीत 'आप'नं इथं मुसंडी मारायचं ठरवलं, पण ते दिल्लीचं यश इथं मिळवू शकले नाहीत. या निवडणुकीअगोदर ममता तेच करु पाहताहेत. पण ते किती प्रत्यक्षात येईल याकडे गोव्यासोबत देशाचंही लक्ष आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)