किंग कोब्रा : अत्यंत विषारी, 3-5 फूट फणा काढणारा साप समोर आला तरी घाबरू नका; कारण...

फोटो स्रोत, EGWS
- Author, लक्कोजू श्रीनिवास
- Role, बीबीसी तेलुगूसाठी
East Ghat Wildlife Society च्या अनाकापल्ली जिल्ह्यात ऑफिसमध्ये सतत फोन येत असतात. हा जिल्हा आंध्र प्रदेशात आहे. फोन करणारे लोक अस्वस्थ आणि घाबरलेले असतात. जेव्हा असा फोन येतो तेव्हा संघटनेच्या लोकांना लगेच कळतं की, लोकांनी सगळ्यात विषारी साप किंग कोब्रा पाहिला आहे. असं झाल्यावर वन विभागाचे लोक लगेच त्या जागेवर जातात.
किंग कोब्रा पूर्व घाटात ग्रामीण आणि आदिवासी भागात प्रामुख्याने आढळतो.
किंग कोब्रा हा सगळ्यात विषारी सापांपैकी एक आहे. किंग कोब्रा साधारण 13 ते 15 फुट लांबीचा असतो. जेव्हा किंग कोब्रा 3 ते 4 फूट उंचीचा फणा काढतो तेव्हा लोक लगेच घाबरतात. ही सगळी माहिती EGWS चे संस्थापक मूर्ती कांती महंती यांनी दिली आहे. ज्या गावातून सापांचा बचाव करण्यात आला त्या गावात आम्ही गेलो तेव्हा क्षेत्रीय वन अधिताकी चोदावरम आणि मूर्ती कांती महंती यांनी या सर्व गोष्टी सांगितल्या.
किंग कोब्रा कुठून येतो? किंग कोब्रा मानवी अधिवासात कसा येतो? त्याचा बचाव कसा केला जातो? सापडलेला किंग कोब्रा त्यांच्या अधिवासात कसा सोडला जातो? पकडलेला किंग कोब्रा परत कसा सोडला जातो?
ते म्हणतात की, असे फोन चोदावरम, चेदिकाका, देवरापल्ली मडगुळा या भागातून येतात. मूर्ती कांती महंती यांनी ही संघटना 2016 मध्ये स्थापन केली होती. मूर्ती यांनी झूलॉजी मध्ये एम.फिल केलं आहे. त्यांना वन्यजीव या विषयात अतिशय रस होता. विशेषत: सापांमध्ये.
"किंग कोब्रा नष्टप्राय प्रजाती आहे. त्याचा अजस्त्र आकार, लांबी तसंच त्याच्या उंचीच्या एक तृतीयांश उंचीचा काढणारा फणा अनेकांना घाबरवून सोडतो."
किंग कोब्रा फणा काढतो तेव्हा खरंतर त्याचा स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग आहे. मात्र ते दृश्य पाहिलं की, आपण घाबरतो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्यात तो आपल्याला चावतो. त्याच्या तुलनेत इंडियन कोब्रा, बंगाली क्रेट आमि रसेल वायपर या जातीचे साप जास्त प्रमाणात चावतात.
"मात्र किंग कोब्रा तसं करत नाही. खरंतर किंग कोब्रा अतिशय घाबरट असतो. त्यांना माणसं दिसली की ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात," असं मूर्तींनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
"ज्या परिसरात भरपूर पाण्याची उपलब्धता असते अशा ठिकाणी किंग कोब्रा राहतो. तो पाण्यात पोहू शकतो. EGWS पूर्व घाटातल्या किंग कोब्राची माहिती गोळा करत आहेत. तेथील किंग कोब्रांना वाचवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जैवविविधतचं रक्षण करण्यासाठी तो अतिशय महत्त्वाचा आहे," असं चोदावरम भागाचे वन अधिकारी रवि वर्मा म्हणाले.

फोटो स्रोत, EGWS
"किंग कोब्रा मार्च आणि एप्रिल महिन्यात प्रजनन करतात. ते जून महिन्याच्या शेवटी अंडं घालतात. मादी कोब्रा बांबूची पानं आणि डहाळ्यांच्या मदतीने अंडी घालतात. सरपटणारे इतर कोणतेही प्राणी असं करत नाही. मादी किंग कोब्राच घरटं बांधतात. त्या घरट्यात ते 30-40 अंडी घालतात.
त्या अंड्यांचं संरक्षण करण्यासाठी किंग कोब्रा एक ते दीड महिना अन्नपाण्याशिवाय राहू शकतात," असं मूर्ती कांती महंती म्हणाले.
"जेव्हा मादी किंग कोब्रा अन्नाच्या शोधात बाहेर जाते तेव्हा इतर प्राणी त्या अंड्यावर हल्ला करू शकतात. आम्ही त्यावेळी हस्तक्षेप करतो आणि त्यांचं संरक्षण करतो. काही लोकांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात EGWS ला सूचना दिली की कृष्णपालम भागात कोब्राची 30 अंडी पाहिली आहेत.
आम्ही स्थानिकांच्या मदतीने तिथे तातडीने मच्छरदाणी लावली. एका महिन्यानंतर किंग कोब्रा अंड्याच्या बाहेर आले. हे छोटे किंग कोब्रा मानवी अधिवासापासून दूर राहतील याची आम्ही काळजी घेतली," मूर्ती सांगतात
'मोठा साप पुन्हा दिसला?'
किंग कोब्राबद्दल पुन्हा बोलायचं झाल्यास आम्ही नाग्यापेट्टा गावात गेलो. तिथे नारळच्या बागेत असलेल्या एका घरात आम्ही गेलो. या घरात गेल्या महिनाभरापूर्वी 13 फूट उंचीचा कोब्रा याच घरात महिनाभरापूर्वी दिसला होता.
दिमुडू नावाची बाई या घराची मालकीण आहे. कपडे वाळत टाकून आणि कुंडीत पाणी घालून त्या घरात आल्या. जेव्हा त्या घरात आल्या तेव्हा त्यांना 13 फूट लांब किंग कोब्रा दिसला.
"हे काय सर,साप पुन्हा दिसला?" त्यांनी मूर्ती यांना विचारलं.जेव्हा या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आलं तेव्हा त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. किंग कोब्रा पाहण्याचा अनुभव कसा होता हे त्यांनी बीबीसीला सांगितलं.
" जेव्हा मला तो दिसता तेव्हा त्याचा फणा हॉलमध्ये होता आणि शेपटी किचन मध्ये होती. मी त्याला पाहताच स्तब्ध झाले. एका क्षणात मी सावरले आणि समोरचं दार लावलं. किचनचं दार आधीच लावलं होतं," असं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, EGWS
"मला वाटतं मला दुरून दिसला त्यामुळे मी नशीबवान होते..तो जरा जवळ असता तर त्याने मला चावलं असतं. आताही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. मी माझ्या आयुष्यात कधीही इतका मोठा साप पाहिला नव्हता"
"जेव्हा त्या सापाला पकडून कुठे सोडण्यात आलं याची आम्हाला कल्पना नाही. तो परत येईल की काय अशी मला भीती वाटली. या आधी जेव्हा आम्हाला साप दिसायचा तेव्हा सगळे शेजारी एकत्र येऊन आम्ही त्याला मारायचो. आता आम्ही तसं करत नाही." त्या सांगतात.
'आम्ही पकडलेल्या सापांना सोडून देतो'
आम्ही तीन चार जणांची टीम तयार करतो आणि वन विभागाच्या सहाय्याने त्यांचा बचाव करतो. हे करताना त्याला कोणताही धोका उत्पन्न होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. हूक, टॉर्च, लाईट, चांगले बूट हे आमचे शस्त्र आहेत. आम्ही या वस्तूंच्या सहाय्याने त्यांचा बचाव करतो. त्याला एका पिशवीत टाकतो आणि त्याचं वजन तपासतो असं मूर्ती यांनी सांगितलं.
"नागयपेटा येथे सापडलेल्या सापाचं वजन 11 किलो होतं. बचावकार्य पार पाडताना त्याला कोणत्या जखमा झाल्या नाहीत ना याची खातरजमा वन विभागाचे अधिकारी करतात. त्यानंतर जिथे पाणी आणि बांबूची झाडं असतात, तिथे त्याला सोडण्यात येतं," ते म्हणाले.

फोटो स्रोत, EGWS
"किंग कोब्रा ने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याच्या घटना अतिशय दुर्मिळ आहेत. इंडियन कोब्रा, बंगाली क्रेट आणि रशियन वायपर चावल्याने हजारो मृत्यू होतात. किंग कोब्रा या सापांवर पोसला जातो. त्यामुळे किंग कोब्रा अतिशय महत्त्वाचा आहे.
ही माहिती आम्ही व्हीडिओ आणि इतर माध्यमांच्या सहाय्याने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. किंग कोब्रा पाहिला की आम्ही लोकांना सांगतो की त्याला मारू नका आणि आम्हाला कळवा. आता लोकांना किंग कोब्रा दिसला की ते आम्हाला सांगतात. दिमूडू हे त्याचं ताजं उदाहरण आहे." मूर्ती सांगतात.
'किंग कोब्रा माणसांना घाबरतो'
किंग कोब्रा किंवा कोणत्याही सापाला मारणं हा वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा आहे, असं क्षेत्रीय वन अधिकारी रवि वर्मा यांनी सांगितलं आहे. The International Union for Conservation of Nature (IUCN) च्या मते किंग कोब्रा ही नष्टप्राय प्रजाती आहे अशी माहिती त्यांनी दिली.
पूर्व घाटात असलेल्या वनराईमुळे आणि हिरवळीमुळे तिथे हे साप मोठ्या प्रमाणावर आढळतात, असंही ते पुढे म्हणाले.
नष्टप्राय प्रजातींना संरक्षण देणं ही आमची जबाबदारी आहे. किंग कोब्रा इतर सापांवर पोसला जातो.

फोटो स्रोत, EGWS
किंग कोब्रा माणसांच्या दृष्टिक्षेपात राहत नाही. ते कधीतरी मानवी अधिवासात जातात. वनविभाग आणि EGWS या संघटनेने लोकांमध्ये जनजागृती पसरवली आहे असं वर्मा पुढे म्हणाले.
किंग कोब्रा जैवविविधतेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
"किंग कोब्रा बहुतांशवेळा शेतात दिसतो. त्यांच्यामुळे सापाची समस्या कमी होते. ते इतर सापांवर पोसले जातात. त्यामुळे जैवविविधतेच्या संवर्धनासाठी मदत होते." असं मूर्ती म्हणाले.
जर तुम्ही किंग कोब्रा पाहिला तर घाबरण्याऐवजी मार्ग दाखवा. त्याचवेळी तो दिसला तर त्याच्यापासून दूर पळू नका असंही ते म्हणाले.
"साधारणपणे किंग कोब्रा चावत नाही. मात्र जेव्हा तो चावतो तेव्हा त्याचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो. त्याचं विष शरीरात गेलं की माणूस लगेच बेशुद्ध पडतो. तसंच श्वास घ्यायला त्रास होतो आणि माणूस मरतो. किंग कोब्रा चावला तर कोणतंही औषध भारतात उपलब्ध नाही. ते थायलंडमध्ये उपलब्ध आहे मात्र तेही अगदी थोड्या प्रमाणात. किंग कोब्राच्या चावण्यावरचं औषधाचं उत्पादन होत आहे," असं मूर्तींनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








