नितीश कुमार : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी फक्त दीड वर्ष बाकी, विरोधकांची किती तयारी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, चंदन कुमार जजवाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालू प्रसाद यादव 25 सप्टेंबरला दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या नेत्यांमध्ये रविवारी (25 सप्टेंबर) संध्याकाळी बैठक होईल, अशी बातमी आहे.
याआधी 2015 मध्ये नितीश आणि सोनिया गांधी यांच्यात भेट झाली होती. त्याचवेळी महाआघाडीचा पहिला प्रयोग बिहारमध्ये सुरू झाला होता.
2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही शिष्टाचार बैठक असल्याचं राजदनं म्हटलं आहे. तर, विरोधी पक्षांची एकजूट वाढवण्यासाठी तिन्ही नेते लवकरच भेटणार असल्याचं वक्तव्य लालूप्रसाद यादव यांनी केलं आहे.
काँग्रेसच्या राजकारणात मोठा बदल दिसून येत असतानाच्या काळातच नितीश कुमार आणि सोनिया गांधींची भेट होत आहे. सध्या काँग्रेसमध्ये दोन गट पडलेले दिसत आहेत. लवकरच काँग्रेसला गांधी घराण्याच्या बाहेरचा व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
25 सप्टेंबरला होणारी तिन्ही नेत्यांची भेट अनेक अर्थानं खास असणार आहे. नितीश कुमार या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत आले होते. त्यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि डाव्या पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली होती.
त्यावेळी नितीश कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. मात्र सोनिया गांधी तेव्हा देशात नव्हत्या. त्यामुळे मग नितीश कुमार यांनी यावेळच्या दिल्ली दौऱ्यात सोनिया गांधींकडे भेटीसाठी वेळ मागितला होता.
ही भेट का महत्त्वाची?
काँग्रेस, राजद आणि जनता दल यूनायटेडच्या (जदयू) बड्या नेत्यांच्या भेटीतून काय साध्य होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सीएसडीएसचे संजय कुमार सांगतात, "या बैठकीचा एकच उद्देश आहे की, 2024 मध्ये नरेंद्र मोदींना सत्तेतून बाहेर काढायचे असेल, तर विरोधकांना एकत्र यावं लागेल. नितीश कुमार महिनाभरापासून यासाठी प्रयत्न करत आहेत."
या बैठकीत 2020च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजद आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेले मतभेद मिटवण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा पराभव काँग्रेसमुळे झाला, असा आरोप राजदनं केला होता.
त्यावेळी काँग्रेसला महाआघाडीत 70 जागा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसला केवळ 19 जागा जिंकता आल्या होत्या.
दुसरीकडे जदयू सातत्यानं नितीश कुमार यांना पंतप्रधानपदासाठी प्रोजेक्ट करत असला, तरी नितीश सातत्यानं यासाठी नकार देत आहेत. पण अशा कोणत्याही प्रयत्नात काँग्रेस नितीश यांच्या पाठीशी उभी असल्याचं दिसत नाही.
पण, हेही खरं आहे की नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर ते 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत.
अशी एकजूट किती टिकणार?
सीएसडीएसचे संजय कुमार यांच्या मते, "सध्या तरी अशा बैठकीत तुम्हाला सर्व काही व्यवस्थितच दिसेल. कारण या बैठकींमध्ये फक्त सगळ्यांनी एकत्र येण्याचा मुद्दा असेल. या बैठकीत विरोधकांचा नेता कोण असेल, कोणता पक्ष किती जागा लढवेल? आणि कोणता नेता कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार? अशा मुद्द्यांवर सध्या कोणतीही चर्चा होणार नाही."
विरोधकांच्या एकजुटीमध्ये सध्याच्या घडीला सगळं काही सुरळीत होताना दिसत असलं, तरी निवडणुका जवळ आल्या की त्याल तडा जाऊ शकतो, असं संजय कुमार पुढे सांगतात.
प्रादेशिक पक्षांचं राजकारण
सध्याच्या घडीचा विचार केल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव काँग्रेसला कोणत्याही परिस्थिती अधिक भाव न देण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसत आहे. 25 सप्टेंबर रोजी हरियाणातील फतेहाबाद इथं माजी उप-पंतप्रधान चौधरी देवीलाल यांची जयंती साजरी केली जाणार आहे.
या रॅलीच्या माध्यमातून विरोधकांना एका व्यासपीठावर आणण्याचा इंडियन नॅशनल लोकदलचे नेते ओमप्रकाश चौटाला यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
त्यांचे वडील चौधरी देवीलाल हे 1977 मध्ये आणीबाणीनंतर एक दशकाहून अधिक काळ विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते.
ओमप्रकाश चौटाला यांनी अखिलेश यादव, एच.डी. देवेगौडा, प्रकाश सिंह बादल, फारुख अब्दुल्ला, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव आणि शरद पवार यांसारख्या विरोधी नेत्यांना आमंत्रित केलं आहे. मात्र काँग्रेसकडून कोणालाही बोलावण्यात आलेलं नाही.

फोटो स्रोत, @NitishKumar
पटना येथील ए.एन सिन्हा इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक डी.एम. दिवाकर यांच्या मते, प्रादेशिक पक्षांचा जन्मच काँग्रेसच्या विरोधात झाला आहे. अशा स्थितीत ममता बॅनर्जी, के.सी.आर किंवा अन्य कोणत्याही पक्षानं काँग्रेसला विरोध केला तर त्यात नवल वाटण्यासारखं नाही.
डी.एम. दिवाकर पुढे सांगतात, "नितीश कुमारांच्या राजकारणाकडं बारकाईनं पाहिलं तर लक्षात येईल की, ते संवाद कायम ठेवतात. त्यांनी यापूर्वीही काँग्रेसवर कोणताही जोरदार हल्ला केलेला नाहीये. सध्याच्या राजकारणात विरोधी पक्षात जी पोकळी आहे, ती आपण भरून काढू शकतो, हे त्यांना माहिती आहे."
यावेळी राजदही नितीश यांना साथ देऊ शकते. कारण सध्या राजदचं एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे नितीश यांना केंद्राच्या राजकारणात पाठवायचं आणि बिहारचं राजकारण राजदसाठी मोकळं करुन घ्यायचं, असंही ते सांगतात.
या भेटीवर जदयूचं म्हणणं काय?
जदयूचे नेते के.सी. त्यागी सांगतात की, हरियाणात काँग्रेस आणि लोकदल यांच्यातील संघर्षामुळे काँग्रेसला रॅलीच्या आमंत्रणातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. पण याप्रकरणाशी आम्हाला फार घेणंदेणं नाहीये. आम्ही तिथं देवीलालजींची जयंती साजरी करणार आहोत.
सोनिया गांधी आणि नितीश कुमार यांच्यातील बैठक ही शिष्टाचाराच्या नात्यानं होत आहे, असं जदयूचं म्हणणं आहे.
के.सी. त्यागी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "नितीश कुमार यांनी आधीच सांगितलं आहे की त्यांना पंतप्रधानपदाचा दावेदार बनायचं नाहीये. त्यांना फक्त विरोधी पक्षांना एका झेंड्याखाली आणायचं आहे. यामुळेच बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व 7 पक्षांच्या नेत्यांची त्यांनी आधी भेट घेतली. त्यावेळी सोनिया गांधी देशात नव्हत्या, त्यामुळे नितीश आता त्यांची भेट घेत आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
असं असलं तरी या बैठकीत राजकीय चर्चा होईल. कारण 2024 च्या लोकसभा निवडणुकीला आता फारसा वेळ नाहीये आणि ही निवडणूक आमच्या अजेंड्यावर आहे, असंही के.सी.त्यागी सांगतात.
अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये भाजपनं ज्याप्रकारे जदयूला संपवलं आहे, त्यामुळे नितीश नाराज असल्याचं डी.एम. दिवाकर यांचं मत आहे.
नुकताच अरुणाचल आणि मणिपूरमधील जदयूच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे बिहारमध्ये आपला पक्ष वाचवण्यासाठी नितीश कुमार राजद आणि काँग्रेस पक्षाला सोडू शकत नाहीत.
नितीश यांच्यावर भाजपचा हल्लाबोल
सीमांचलमध्ये शुक्रवारी (23 सप्टेंबर) एका जाहीर सभेत भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नितीश कुमार यांनी पंतप्रधान होण्यासाठी भाजपचा विश्वासघात केल्याचा आरोप अमित शहा यांनी केला आहे.
सीएसडीएसचे संजय कुमार सांगतात, "आपण त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा करू शकत नाही. अमित शहा नितीश कुमारांवर टीका करणं हे साहजिकच आहे."

फोटो स्रोत, @AmitShah
पूर्णियाच्या जाहीर सभेत अमित शहा यांनी नितीश कुमारांना आक्रमकपणे घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय कुमार यांच्या मते, "बिहारमध्ये भाजपकडे दुसरा कोणताच मार्ग उरलेला नाही. ते आता आक्रमकपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. तिथं त्यांना एखादा छोटासा पक्ष साथ देईल, पण तरीही बिहारमध्ये भाजपला एकट्यानंच पुढं जावं लागणार आहे."
दुसरीकडे अमित शहांच्या रॅलीवर जदयूनं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
अमित शहा सीमांचलला का गेले?
जदयूचे नेते के.सी. त्यागी म्हणतात, "नितीश कुमार यांनी सीमांचलमध्ये जातीयवादासाठी रॅली काढली आहे. सीमांचल त्यांच्या अजेंड्यासाठी सुपीक जमीन आहे."
के.सी. त्यागी यांनी प्रश्न उपस्थित केलाय की, "अमित शहा लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या भूमीत का गेले नाहीत? त्यांनी जननायक कर्पुरी ठाकूर यांचे जन्मस्थान असलेल्या समस्तीपूरला जायचं होतं. ते भगवान बुद्धांची भूमी 'गया' इथं गेले असते किंवा पूरग्रस्त सहरसा आणि मधेपुराला गेले असते. पण त्यांनी सीमांचल निवडले, कारण ते त्यांच्या अजेंड्यावर एकदम फिट बसतं."
भाजपबद्दल बोलायचं तर सीमांचल त्यांच्यासाठी अनेक अर्थानं खास आहे. सीमांचलमधील कटिहार, अररिया, पूर्णिया आणि किशनगंज या लोकसभेच्या चार जागांपैकी फक्त अररियाची जागा भाजपकडे आहे.
2019 मध्ये या भागातील किशनजंगची जागा काँग्रेसनं जिंकली होती. बिहारमध्ये काँग्रेसकडे ही एकमेव जागा आहे. तर उर्वरित 2 जागा जदयूच्या ताब्यात आहेत.

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA
विशेष म्हणजे सीमांचलच्या जागांवर मुस्लिम मतदारांचा मोठा प्रभाव आहे. अशा परिस्थितीत हिंदू व्होटबँकेला आकर्षित करून या भागात आपला जनाधार वाढवण्यात भाजपला यश आलं, तर बिहारमधील अनेक जागांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
पण, नितीश कुमार हे त्यांच्या जिद्दी स्वभावासाठी ओळखले जातात. या जिद्दीच्या जोरावर त्यांना आपल्या उद्दिष्टात थोडसंही यश आलं, तर बिहारपासून दिल्लीपर्यंत भाजपची वाट खडतर करण्याचा ते प्रयत्न करतील.
बिहारमधील अमित शहांच्या रॅलीनंतर जदयूचे अध्यक्ष ललन सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दावा केलाय की, "बिहार भाजपमुक्त भारताचं केंद्र बनेल."
(सोनिया गांधी, नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या भेटीवर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








