पुणे रिअल इस्टेट : खऱ्या मालकाला पत्ताही न लागता, पुण्यातल्या इमारतीची अनेकदा परस्परविक्री

आपण ज्या घरात राहतोय ते आपल्याला काहीही कल्पना नसताना विकलं तर? किंवा ते बँकेत तारण ठेऊन कर्ज घेतलं तर? आणि एक दिवस हा सगळा प्रकार पोलिसांकडून आलेल्या एका फोनमुळे उघडकीला येतो..
खरंतर ही कल्पना कुणालाही नकोशी वाटेल. पण पुण्यातल्या 4 ज्येष्ठ महिलांच्या बाबतीत हा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे.
हा प्रकार घडला पुण्यातल्या कोंढवा भागातल्या 'नंदनवन' या चार मजली इमारतीच्या बाबतीत. पोलिसांच्या तपासानुसार, या प्रॉपर्टीचे एका वर्षात 4 पेक्षा जास्त वेळा व्यवहार झाले आहेत. यामध्ये खरेदी-विक्री आणि तारण ठेवणे अशा व्यवहारांचा समावेश आहे.
काही वृत्तपत्रांनी केलेल्या पडताळणीनुसार तर या इमारतीचे एका वर्षात असे जवळपास 20 व्यवहार झाले आहेत. हा सगळा प्रकार कसा घडला आणि तो उघडकीला कसा आला हे आपण जाणून घेऊ.
पुण्यातल्या कोंढवा भागात शीतल पेट्रोल पंपसमोर नंदनवन ही 4 मजल्यांची इमारत आहे. अंजली सत्यदेव गुप्ता (वय़ 75), नीरू अनिल गुप्ता (वय 65), किरण देवेंद्र चढ्ढा (वय 58)आणि सुमन अशोक खंडागळे (वय 63) यांनी कोंढवा भागात ही जमीन विकत घेतली होती. त्यावर 2005 मध्ये त्यांनी चार मजली नंदनवन नावाची इमारत बांधली.
प्रत्येक मजल्यावर एक कुटुंब राहत होतं. काही कारणांमुळे 2021 मध्ये चौघींनी काही कारणांमुळे ही प्रॉपर्टी विकण्याचं ठरवलं आणि ओळखीच्या प्रॉपर्टी एजंटला याबाबत सांगितलं.
विक्रीच्या व्यवहारासाठी एजंटसोबत त्यांनी इमारतीचे कागदपत्र, खरेदीखत, लाईट बिल, चौघींचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड, चारही फ्लॅटचे कागदपत्र यांच्या झेरॉक्स कॉपी शेअर केल्या. त्यानंतरच या प्रॉपर्टीवरच्या फसव्या आणि खोट्या व्यवहारांच्या चक्रांना सुरुवात झाली.

पोलिसांना दिलेल्या जबाबात नंदनवनची खरी मालकी असलेल्या महिलांनी सांगितलं की मे 2021 पासून ते आतापर्यंत जवळपास 100 संभाव्य ग्राहक प्रॉपर्टी बघण्यासाठी आले. बँकेचे लोक आहेत, असं सांगणारे काही लोक प्रॉपर्टी इव्हॅल्यूएशनसाठीही येऊन गेले.
या इमारतीच्या खऱ्या मालक असलेल्या महिलांनी जबाबात आणखी सांगितलं की त्यांची इमारत दाखवण्यासाठी एजंट ज्या लोकांना आणत होते, त्यांना जास्त प्रश्न विचारू नका, असं ते एजंट चौघींना सांगायचे.
शिवाय, बँकेच्या लोकांनाही जास्त प्रश्न विचारु नका, असंही त्यांना सांगितलं जायचं. यामुळे महिला त्यांच्याशी फार काही बोलायच्या नाहीत.
आजूबाजूचा परिसर चांगला नाही. त्यामुळे इमारतीच्या विक्रीला वेळ लागत आहे. त्यामुळेच जास्त लोकांना इमारत दाखवावी लागत आहे, असं ते एजंट महिलांना सांगत असत.
याचदरम्यान फसवे सौदे होऊ लागले. पोलिसांनी सांगितले की, या फसवणुकीत मालमत्तेच्या बनावट मालक म्हणून सांगणाऱ्या महिलांचा समावेश होता. त्यांची खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली.
त्यांनी सादर केलेल्या आधार कार्डमध्ये खऱ्या मालकांची नावं होती, परंतु कार्डवरचे फोटो ही बनावट मालक म्हणून फसवणूक करणाऱ्यांची होती. साधारणपणे मागच्या वर्षी जुलै महिन्यापासून खोटे व्यवहार व्हायला सुरुवात झाली.
ज्यांना ही इमारत विकली त्यांची ओळख पटवण्यात अजून पोलिसांना यश आलेलं नाहीये. पोलिसांनी सांगितलं की ही प्रॉपर्टी तारण ठेऊन कर्जही उचलण्यात आलं.
"आम्हाला जे कागदपत्र मिळाले त्यावरुन इमारतीची बनावट मालकी दाखवून 1.42 कोटींचं कर्ज एका बँकेकडून उचलण्यात आलं. ही रक्कम दोन भागांमध्ये बनावट मालकी दाखवणार्यां महिलांच्या खात्यात जमा झाली. ज्या बनावट महिला आहे त्यांनी मुळ मालकांच्या नावाने लोन काढलं आहे. अजून एका बँकेचं लोन त्यांना सँक्शन झालं होतं. पण ते पैसे बँकेकडून रिलिज झाले नाही," अशी माहिती या केसचे तपास मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक मदन कांबळे यांनी सांगितलं.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे. यामध्ये एजंट असलेला विनय पाटील आणि बनावट मालक म्हणून व्यवहार करणाऱ्या 5 महिलांचा समावेश आहे.
या व्यवहारांची मोडस ऑपरेंडी काय होती?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ मालकाच्या नावाने या 5 महिला आळीपाळीने ऊभ्या राहायच्या. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड दाखवून ते व्यवहार केले जायचे. मूळ मालक या वयस्कर आहेत. या बनावट महिलाही त्याच वयोगटातल्या आहेत.

या महिला विनय पाटीलच्या संपर्कातल्या होत्या. त्यांचे फोटो हे बनावट आधार आणि पॅनकार्डवर असल्याने त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचले. आता बँकेकडून लोन उचलणारे कोण, लोन घेणारे कोण, प्रापर्टी विकत घेणार कोण, यांना मदत करणारे अजून ब्रोकर आहेत का, याचा तपास केला जात आहे.
"प्रॉपर्टीचे बनावट कागदपत्रे बनवले. याद्वारे बँकेची आणि मूळ मालकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आम्ही हा ब्रोकर आणि ज्या बनावट व्यक्ती मालक म्हणून उभ्या राहील्या होत्या त्यांना अटक केली आहे. या साखळी मध्ये अजूनही काही लोक आहेत. ज्यांनी बँकांशी कम्युनिकेशन केलं आहे. कागदपत्रे बनवण्यासाठी कायदेशीर तज्ज्ञाची देखील गरज पडलेली आहे. अशा साखळीतल्या लोकांचा आम्ही तपास करणार आहोत," असं पोलीस उपायुक्त पाटील यांनी सांगितलं.
हे प्रकरण उघडकीला कसं आलं?
6 ऑगस्टला हवेली उपनिबंधक कार्यालयातील प्रभारी सह दुय्यम निबंधक दत्तात्रय सातभाई यांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये नंदनवन या इमारतीसंदर्भातील बनावट दस्त नोंदणीची तक्रार दिली.
या हवेली उपनिबंधक कार्यालयात इमारतीच्या मालक महिलांची बनावट कागदपत्र तयार करून फेब्रुवारी महिन्यात दस्तनोंदणी झाली होती. त्याच महिलांना घेऊन पुन्हा त्याच प्रॉपर्टीचे नवीन दस्त नोंदणीसाठी ते आले होते. या प्रकारामुळे उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शंका आली.
दत्तात्रय सातभाई यांनी सांगितलं की, शंका आल्यावर त्यांनी जाऊन फेब्रुवारी महिन्यातल्या नोंदणीचे कागदपत्र आणि त्या दिवशीच्या कागदपत्रांची पडताळणी केली.
"त्यामध्ये या प्रॉपर्टीची बनावट आधार कार्ड पॅन कार्ड तयार करुन विक्री होत असल्याचं समोर आलं. त्यामुळे तेव्हा त्या नोंदणीचं काम मी थांबवलं आणि पोलिसांना संपर्क केला," असं सातभाई यांनी सांगितलं.
या कार्यालयातल्या या प्रॉपर्टीची झालेली नोंदणीची पडताळणी केली असता, बनावट कागदपत्रांनी ज्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, भोगवटा प्रमाणपत्र यांचा वापर करुन जवळपास 3 कोटी 70 लाख रुपयांचा व्यवहार झाला.
मार्केट यार्ड पोलिस स्टेशनच्या हद्दीतले आणि त्यांच्या तपासातून नंदनवन इमारतीचे असे 4 व्यवहार उघडकीला आले आहेत. पण हा आकडा मोठा असल्याचा पोलिसांचा कयास आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने केलेल्या पडताळणीमधून या इमारतीवरचे असे 20 व्यवहार समोर आले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे आपल्या इमारतीचे असे काही सौदे होत आहेत याची मुळ मालकांना किंचितही कल्पना नव्हती. मार्केट यार्ड पोलिस स्टेशन मधून जेव्हा त्यांना फोन गेला आणि आधार आणि पॅन कार्डच्या व्हेरिफिकेशन साठी बोलवण्यात आलं तेव्हा हा गैरप्रकार त्यांच्यासमोर उघड झाला.
"हा सगळा प्रकार आमच्यासाठी फारच धक्कादायक आहे. आम्ही अजूनही या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही ज्येष्ठ महिला आहोत. असं काही समोर येईल असा आम्ही कधीही विचार केला नव्हता," असं नंदनवन इमारतीच्या मालकाने सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








