'मला गोमांस खायला आवडतं' रणबीर कपूरच्या जुन्या वक्तव्यावरून नवा वाद #5मोठ्याबातम्या

रणबीर कपूर, ब्रह्मास्त्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रणबीर कपूर

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. मला गोमांस खायला आवडतं - रणबीर

"मला मटन, पाया, बीफ आवडतं. रेड मीटही आवडतं," हे अभिनेता रणबीर कपूरचं जुनं वक्तव्य ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आलं आहे.

'रॉकस्टार' या चित्रपटामध्ये रणबीर मुख्य भूमिकेत होता. त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर हे बोलला होता. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये 'बॉयकॉट' हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे. आमिर खान आणि अक्षय कुमारसारख्या सुपरस्टारचे चित्रपट लोकांनी बॉयकॉट केले.

आता नेटकरी येणाऱ्या इतरही मोठ्या स्टार्सच्या आणि स्टारकिड्सच्या चित्रपटांना बॉयकॉट करताना दिसत आहेत. शाहरुख खानचा 'पठाण', हृतिक रोशनचा 'विक्रम वेधा', सलमान खानचा 'टायगर ३' या चित्रपटांना बॉयकॉट करायची मागणी होऊ लागली आहे. अशातच आता 'बॉयकॉट ब्रह्मास्त्र' हा ट्रेंड काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

9 सप्टेंबरला 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. पण त्याचपूर्वी चित्रपटाची होणारी नकारत्मक चर्चा 'ब्रह्मास्त्र'साठी नुकसानदायी ठरणार का? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

2.'सावरकर बुलबुलवर स्वार होऊन घ्यायचे मातृभूमीचे दर्शन'

कर्नाटक सरकारने हायस्कूलच्या पाठ्यपुस्तकांमध्ये विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत एक अध्यायाचा समावेश केला आहे. वादग्रस्त अशा मजकुरामुळे वाद निर्माण झाला आहे. 'आजतक'ने याबाबत बातमी दिली आहे.

या प्रकरणातील एका परिच्छेदात असं म्हटलं की 'सावरकरांना ज्या खोलीत ठेवण्यात आले होते त्या खोलीला एकही छिद्र नव्हते. पण एक बुलबूल त्यांच्या खोलीत यायचे, त्यानतंर सावरकर त्या बुलबूलच्या पंखावर स्वार होऊन मातृभूमीचे दर्शन घेण्यासाठी रोज तुरुंगातून बाहेर पडायचे.'

3. एक वेळ जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही- गडकरी

"विहिरीत उडी मारून जीव देईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, कारण मला काँग्रेस पक्षाची विचारधारा आवडत नाही", असं वक्तव्य केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

नितीन गडकरी, भाजप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नितीन गडकरी

नागपुरात उद्योजकांच्या एका समिटला संबोधित करताना नितीन गडकरी यांनी एक जुना किस्सा सांगितला. यावेळी त्यांनी आपण कधीच काँग्रेसमध्ये जाणार नाही, असं स्पष्ट केलं. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

विद्यार्थीदशेत असताना काँग्रेस पक्षाचे नेते आणि मित्र असलेल्या श्रीकांत जिचकार यांनी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

भाजपच्या संसदीय मंडळातून काढून टाकल्यानंतर नितीन गडकरी चर्चेत आहेत. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जाणार काय, अशी चर्चा होती. परंतु, गडकरी यांच्या या वक्तव्याने आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

4. कोव्हिड कमी झाला तरी ठाकरे सरकारने हिंदू सणांवर निर्बंध लादले - श्रीकांत शिंदे

"कोव्हिड कमी झाल्यानंतर देखील निर्बंध होते. हिंदूंचे सण आले की निर्बंध लागायचे. बाकी सर्व सण आले की मोकळीक दिली जात होती", असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याची संख्या मोठी असते. यामुळेच कल्याण लोकसभा क्षेत्रातील कोकणवासियांना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकणातल्या प्रवाशासाठी मोफत बस सेवा देण्यात आली. या बसेसना श्रीकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

शिंदे म्हणाले, "सारथीला महत्व खूप असतं. कोणाला कुठल्या दिशेला जायचं हे सारथी ठरवत असतो. ज्याचा सारथी बरोबर असतो त्याचा प्रवास योग्य दिशेला जात असतो. काही लोकांच्या सारथी चुकीचे असल्यामुळे त्यांच्या प्रवास वेगळ्या दिशेने गेला. असं म्हणत त्यांनी महाविकास आघडीला लक्ष्य केलं आहे. पण आता पुढे महाराष्ट्राचा प्रवास योग्य दिशेने चालू झालेला आहे".

5.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणार- जयंत पाटील

"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच. आता मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे माहिती नाही पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार पडणार आणि मग मध्यावधी निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

जयंत पाटील, एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस

ते पुढे म्हणाले, "शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं, मात्र आता शिंदे गटामध्ये प्रचंड नाराजी आहे. जे मंत्री झाले त्यांना हवं ते खातं मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत, तर ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही तेही नाराज आहेत," असंही जयंत पाटील म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने तसं भाजपमध्ये देखील नाराजी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)