सोनाली फोगाट यांना देण्यात आलेलं 'मेथॅम्फेटामाईन ड्रग' नेमकं काय असतं?

फोटो स्रोत, Ani
भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी शनिवारी गोवा पोलिसांनी नवा खुलासा केला आहे. फोगाट यांच्या मृत्यूपूर्वी काही तास आधी त्यांना 'मेथाम्फेटामाइन' नावाचं ड्रग देण्यात आलं होतं. हे ड्रग सुधीर सागंवान आणि सुखविंदर सिंग या दोन सहकाऱ्यांनी दिलं असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. पीटीआयच्या वृत्तात म्हटल्याप्रमाणे, सुधीर सागंवान याने सोनाली फोगट यांच्या ग्लासमध्ये हे ड्रग्स मिसळलं. हे पाणी प्यायल्याने फोगाट यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं गोवा पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या या माहितीनंतर मेथॅम्फेटामाइन नावाच्या या ड्रग्सबद्दल बरीच चर्चा सुरू झाली आहे. लोकांच्या मनात या ड्रग्सविषयी नाना तऱ्हेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. जसं की, हे ड्रग्स नेमका काय प्रकार आहे? याचा वापर कधी होतो? हे खरंच इतकं सहज उपलब्ध होतं का? आणि ते धोकादायक असतं का?
या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसीने अमेरिकेतील हेल्थ डिपार्टमेंटच्या, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग अॅब्युजच्या वेबसाईटला भेट दिली. आणि त्या वेबसाईटवरून काही प्रमाणात माहिती गोळा केली.
'मेथॅम्फेटामाइन' नेमका प्रकार काय?
मेथॅम्फेटामाइन हा एक उत्तेजक आणि मादक पदार्थ आहे. याच्या सेवनाने तुमच्या सेंट्रल नर्व्हस सिस्टीमवर (मज्जासंस्था) थेट परिणाम होतो.
तसंच क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन नावाचंसुद्धा एक ड्रग्स आहे. हे एखाद्या काचेच्या तुकड्यासारखं चमकदार, निळ्या पांढऱ्या रंगांच्या दगडासारखं दिसतं.

फोटो स्रोत, Getty Images
अॅम्फेटामाइन (ड्रग्स) ज्याप्रमाणे काम करत अगदी त्याच पद्धतीने मेथॅम्फेटामाइनचा शरीरावर परिणाम होतो. अॅम्फेटामाइनचा वापर अटेन्शन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) आणि नार्कोलेप्सी सारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.
मेथॅम्फेटामाइनचा मेंदूवर परिणाम होतो का?
मेथॅम्फेटामाइनचं सेवन केल्यास तुमच्या मेंदूमध्ये असणारं डोपामाइन (नैसर्गिक रसायन) सिक्रीशन वाढतं. अर्थात हे रसायन मेंदूत स्त्रवतं. डोपामाइनच्या सिक्रीशनमुळे तुमच्या मनात समाधान आणि आनंदाची भावना निर्माण होते. पण जेव्हा ते मोठ्या प्रमाणावर स्त्रवतं तेव्हा सेवन करणाऱ्या व्यक्तीत एनर्जी वाढते आणि तुम्हाला जास्त उत्साही झाल्यासारखं वाटतं.
स्वतःला आनंदी आणि उत्साही ठेवण्याच्या नादात लोक मेथॅम्फेटामाइनचा वापर करतात. पुढे ही सवय व्यसनात बदलते. पण याच्या अतिवापरामुळे मृत्यू ओढावू शकतो.
अमेरिकेतील तरुणांमध्ये या ड्रगची नशा सर्रास केली जाते. 2017 ची आकडेवारी बघता अमेरिकेच्या संपूर्ण लोकसंख्येपैकी 5.4 टक्के लोकांनी किमान एकदा तरी या ड्रग्सच सेवन केलं आहे.
ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे जे मृत्यू होतात त्यापैकी 15 टक्के मृत्यू हे मेथॅम्फेटामाइनच्या ओव्हरडोजमुळे झाल्याचं दिसतं.
मेथॅम्फेटामाइनचं सेवन कसं करतात?
मेथॅम्फेटामाइन सिगारेट सारखं पेटवून, औषधाच्या गोळी सारखं गिळून, नाकावाटे ओढून, इंजेक्शनद्वारे घेतलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
सोनाली फोगाट यांच्या केसमध्ये त्यांच्या साथीदारांनी पाण्यात मेथॅम्फेटामाइन मिसळल्याचा दावा केला जातोय.
याचा शरीरावर काय परिणाम होतो?
या ड्रग्जच्या सेवनाने तुमच्यात भरपूर ऊर्जा संचारते.
भूक मंदावते. श्वासोच्छवास आणि हृदयाची धडधड वाढते.
ब्लडप्रेशर आणि शरीराचं तापमान वाढतं.
मेथॅम्फेटामाइनमुळे हृदयविकार होतो असं नाही मात्र याच्या अत्याधिक सेवनाने कार्डियक अरेस्ट येऊ शकतो.
इंजेक्शनद्वारे या ड्रग्जचं सेवन केलं तर एचआयव्ही किंवा हेपेटायटीस B आणि C चा धोका उद्भवू शकतो.
सोनाली फोगाट यांचा मृत्यू
23 ऑगस्टच्या दिवशी संशयास्पद स्थितीत सोनाली फोगाट यांचा मृत्यू झाला.
त्यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातं होत. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची हत्या झाल्याची तक्रार दिली. सरतेशेवटी गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तपास सुरू केला.

फोटो स्रोत, facebook
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक केली आहे.
मुख्य आरोपी असलेल्या सुधीर सागवान आणि सुखविंदर सिंगवर खुनाचा आरोप आहे. तर एडविन नून्स आणि दत्तप्रसाद गावकर यांच्यावर नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी शनिवारी या प्रकरणातील पाचव्या व्यक्तीलाही अटक केली. या पाचव्या व्यक्तीने ड्रग्ज तस्कर दत्तप्रसाद गावकर याला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. रामदास मांदरेकर असं या व्यक्तीचं नाव असून तो स्वतः देखील एक ड्रग्ज तस्कर असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
प्रकरण सीबीआयकडे वर्ग होणार का?
या प्रकरणात सोनाली फोगाट यांच्या कुटुंबीयांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली आहे. तसंच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी याप्रकरणी गोवा सरकारला पत्र लिहिण्याचं आश्वासन फोगाट कुटुंबियांना दिलं आहे. असं सोनाली यांची बहीण रुपेश फोगट यांनी चंदीगडमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
यावर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, लवकरच आवश्यक ती औपचारिकता पूर्ण करून सोनाली फोगाट प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात येईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








