महाराष्ट्रात दारू पिण्यासाठी तुमच्याकडे लायसन्स लागतं, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

दारू

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, तेजाली शहासने
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्रात दारू पिण्यासाठी तुमच्याकडे लायसन्स लागतं, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

महाराष्ट्रात मद्यउत्पादन, मद्यविक्री आणि मद्यसेवन यासाठी बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट लागू आहे. याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क खाते करते. यासंदर्भातील तरतुदी खालील प्रमाणे आहेत.

परवाना प्रत्येकासाठी आवश्यक

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. अशा परिस्थिती संबंधित व्यक्तीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले जाते. त्या व्यक्तीस शिक्षा किंवा जामीन देण्याचा निर्णय न्यायाधीश घेतात.

दारूचे ग्लास

फोटो स्रोत, David Silverman/getty

महाराष्ट्रात परमिट रूम, रेस्टॉरंट, क्लब इ. ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा परवाना घेण्याची गरज असते. यासाठीची वयोमर्यादा ही 21 वर्षे आहेत. (म्हणजे वीस वर्षापर्यंतचे तरुण कायद्याने मद्यपान करू शकत नाहीत.) हा परवाना 1 दिवस, 1 वर्ष किंवा आजीवन मिळू शकतो.

परमिट रूम, वाईन शॉप किंवा जेथून मद्यविक्री होते अशा ठिकाणी 1 दिवसाचा परवाना मिळू शकतो. यासाठी पाच रुपये शुल्क आकारले जाते. सध्याची लॉकडाऊनची परिस्थिती पाहता हा परवाना आता ऑनलाइन मिळण्याचीही सोय आहे. त्यासाठी www.stateexcise.maharashtra.gov.in किंवा www.exciseservices.mahaonline.gov.in या विभागांच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडणं आवश्यक आहे.

एक वर्ष किंवा आजीवन परवाना मिळवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो. या अर्जासोबत वय व रहिवास सिद्ध करणारी कागदपत्रे (पॅन किंवा आधार) जोडावी लागतात. एका वर्षाची फी रू.100 तर आजीवन परवान्याची फी रू. 1000 इतकी आहे.

खाजगी समारंभात मद्य देण्यासाठीही परवाना घ्यावा लागतो. यासाठी अर्जासोबत त्या जागेचा आराखडा, जागेचे इतर तपशील व वीस हजार रुपये फी भरावी लागते. हा परवाना एका दिवसासाठी असतो.

हातात वाईनचा ग्लास असलेली महिला

फोटो स्रोत, Getty Images

परवाना नसलेल्या व्यक्तीस मद्यविक्री करणे हाही गुन्हा असून त्यासाठी 25 हजार ते 30 हजार रुपये दंड होऊ शकतो.

ग्राहकाकडे परवाना आहे की नाही हे पाहण्याची आणि त्यासाठी योग्य ती सोय उपलब्ध करून जबाबदारी विक्रेत्यांवर टाकलेली आहे. यासाठी एक दिवसाचा परवाना मद्यविक्रीच्या ठिकाणीही देण्याची सोयही उत्पादन शुल्क विभागाने केलेली आहे.

एका परवान्यावर मद्याच्या दोन बाटल्या (750 मिली प्रत्येकी) विकत घेण्याची व बाळगण्याची परवानगी आहे. परवाना नसताना मद्य बाळगणे तसेच परवाना नसलेल्यांना मद्यविक्री करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे मद्य विक्रेत्यांनी यासंदर्भात योग्य ती खबरदारी घ्यावी असं कायदा सांगतो.

दारू पिऊन गाडी चालवल्यास...

Motor Vehicle Act 2019 नुसार मद्यपान करून वाहन चालवणे बेकायदेशीर असून हा फौजदारी गुन्हा आहे. ब्रेथ अॅनलायझरवर अल्कोहोलचे प्रमाण 30 ते 60 मिलीग्राम / 100 मिली पेक्षा जास्त दिसल्यास 'drunk driving' समजले जाते.

यासाठी सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि/ अथवा 10,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. दुसऱ्यांदा हा गुन्हा घडल्यास ही शिक्षा 2 वर्षे तुरुंगवास आणि/ अथवा 10,000 रुपयांपर्यंतचा दंड अशी आहे.

पोलीस

फोटो स्रोत, Getty Images

ट्राफिक पोलिसांना संशय आल्यास ते अद्ययावत यंत्रांवर तुमची चाचणी करू शकतात. तुम्ही ड्रिंक्स घेतल्यानंतर सुमारे 24 तासांपर्यंत तुमच्या रक्तात अल्कोहोल आढळू शकतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटलं म्हणून तुम्ही गाडी चालवायला गेलात, तरी तुम्ही सहज पडकले जाऊ शकतात. दारू प्यायल्यानंतरच्या दुसऱ्या रात्रीही तुम्ही पकडले जाऊ शकतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)