You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आंतरजातीय लग्न घरच्यांच्या विरोधामुळे लपवून ठेवलं, नंतर घटस्फोट घेतला आणि मग...
- Author, लक्ष्मी पटेल
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
अजब प्रेमाची गजब कहाणी गुजरातमधल्या सौराष्ट्र जिल्ह्यात उना या ठिकाणी समोर आली आहे.
22 वर्षीय मयुर हा पटेल समाजाचा आणि उना शहरात राहतो. मयुरची भाजीची गाडी आहे. मयुरचं प्रेम जडलं 24 वर्षीय पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या मुलीवर. ती मुलगी वेगळ्या जातीची होती. मुलगा समान जातीचा नसल्याने मुलीच्या आईवडिलांना हे नातं मान्य नव्हतं.
प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या या दोघांनी घरच्यांना कल्पना न देता नोंदणी विवाह केला. लग्न कायदेशीररीत्या झालं असली तर दोन कुटुंबीयांमधला संघर्ष संपला नाही. दोघांना एकत्र राहण्यासाठी खटाटोप करावा लागला.
सात वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी घरच्यांना विश्वासात घेतलं नाही. ते दोघं आपापल्या घरीच राहत होते.
मुलीच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. पण वर्षभरात त्यांचा घटस्फोट झाला. मूळ प्रेम ती विसरली नाही. त्या दोघांनी एकत्र येऊन पळून जाण्याचा निर्णय घेतला. एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रसंग पण यात काही अतिशयोक्ती नाही. हे असंच्या असं घडलंय.
प्रेमाची सुरुवात कशी झाली?
आठ वर्षांपूर्वी पदव्युत्तर शिक्षण घेणारी मुलगी आणि भाजी विकणारा मुलगा एकमेकांना आवडू लागले. भाजी विकणाऱ्या मुलाने धैर्य करून मुलीला मागणी घातली. तिने वर्षभर मुलाच्या प्रस्तावाला होकार दिला नाही.
वर्षभर वाट पाहिल्यानंतर मुलीने होकार दिला आणि त्या दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांनीही आपापल्या घरच्यांना विश्वासात घेतलं नाही. लग्न झाल्यावरही ते एकत्र न राहता स्वत:च्याच घरी राहत होते.
मुलीचं एका दुसऱ्याच मुलाशी लग्न झालं. पण मुलीच्या घरच्यांना तिच्या प्रेमाबद्दल कळलं. मग त्यांनी मुलीला अवघ्या वर्षभरात घटस्फोट घ्यायला लावला.
घटस्फोटानंतर महिनाभरात मूळ जोडप्याचं पुन्हा लग्न झालं. 24 वर्षीय छाया आणि 22 वर्षीय मयुर यांच्या आंतरजातीय लग्नाची कहाणी नाट्यमय अशी (दोघांचीही नावं बदललेली आहेत)
या दोघांचा प्रेमविवाह पोलीस स्थानकापर्यंत पोहोचला होता. छाया आणि मयुर यांच्या घरच्यांमध्ये कटूता होती. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्हीकडच्या घरच्यांमध्ये समेट घडवण्यासाठी प्रयत्न केला. पोलिसांनी पुरेसे प्रयत्न करूनही छायाच्या घरच्यांनी मयुरचा स्वीकार केला नाही.
पण काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाला. महिनाभरानंतर त्यांचं पुन्हा लग्नही झालं. आता हे दोघे आनंदाने एकत्र राहत आहेत. अनेक वर्षांच्या प्रेमाचं रुपांतर कायमस्वरुपी नात्यात कसं झालं याच्या आठवणीत ते रमतात.
बीबीसी गुजरातीशी बोलताना छाया सांगतात, "मयुर आणि मी 8 वर्ष प्रेमात होतो. मयुर राहतो त्याच्यासमोरच माझ्या आजोबांचं दुकान होतं. आजोबा नाश्त्यासाठी किंवा जेवायला घरी येत असत तेव्हा मी तिथे बसत असे. मयुर लपूनछपून मला पाहत असे. एकेदिवशी त्याने मला मागणी घातली. मी सुरुवातीला नकारच दिला होता. पण मयुरने हार मानली नाही. तो सतत विचारत राहिला.
एका वर्षानंतर मी मयुरला हो म्हणाले".
छाया पुढे सांगतात, "आमचं प्रेम जमलं तेव्हा माझ्याकडे मोबाईल फोन नव्हता. मी बाबांच्या, भावाच्या किंवा मित्राच्या फोनवरून मयुरला कॉल करत असे आणि मग बोलणं व्हायचं. आमची ओळख, मैत्री आणि प्रेम होऊन आठ वर्षं झाली पण आम्ही सविस्तर असं बोललोच नाही.
पण आमची घरं जवळजवळ होती, आम्ही दिवसातून चारवेळा साधारण एकाचवेळी घराबाहेर पडायचो. सकाळी 9 वाजता, दुपारी तीन वाजता, रात्री दहा आणि बारा वाजता. आम्ही भेटल्यावर एकमेकांना पाहत बसायचो आणि खुणांच्या माध्यमातून बोलायचो".
"आम्ही आमची घड्याळं एकाच वेळेची करून घेतली होती. मी डिग्रीनंतर मास्टर्सही केलं. मयुरचं शिक्षण नववीपर्यंतच झालं आहे पण त्याने नेहमी मला शिकायला प्रोत्साहन दिलं. मला आता एलएलबीचं शिक्षण घ्यायचं आहे. माझी शैक्षणिक कागदपत्रं आमच्या घरी नाहीत. आपण तुझ्या घरच्यांना प्रमाणपत्रं देण्यासाठी विचारू असं मयुर सांगतो. तुझं शिक्षण थांबू देणार नाही. तुला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिक", असं छाया सांगतात.
घरच्यांचा पाठिंबा नाही पण प्रेम कायम
"आमच्या नात्यादरम्यान अनेक कठीण क्षण अनुभवले. मयुरच्या घरचे आणि माझ्या घरचे यांच्यात बेबनाव होता. तो वाढतच गेला. मला लग्नासाठी अनेक स्थळं येत होती. आमच्यावर खूपच दबाव होता म्हणून आम्ही डिसेंबर 2021 मध्ये जुनागडला जाऊन नोंदणी विवाह केला पण आम्ही दोघे आपापल्या घरी राहिलो
"माझ्या घरच्यांनी माझं लग्न दुसऱ्याच मुलाशी लावून दिलं. तो कॉन्स्टेबल होता. मयुर आणि माझी जात वेगवेगळी आहे. त्यामुळे माझ्या घरच्यांना मयुरशी लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे घरच्यांनी खूप दडपण आणलं आणि मयुरशी घटस्फोट घ्यायला लावला. घरच्यांचा विरोध कायम राहिल्याने मी घटस्फोटाच्या कागदावर सही केली. पण मयुरवर माझं प्रेम कायम राहिलं", असं छाया सांगतात.
"घटस्फोटानंतर मयुरशी कसा संपर्क केला हे विचारलं असता छाया म्हणाली, एकेदिवशी मी बाबांच्या फोनवरून मयुरला फोन केला. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही असं सांगितलं. मला घेऊन जा असं सांगितलं. मग आम्ही भावनगरला पळून गेलो. आता आम्ही मयुरच्या घरी आहोत. आमचा संसार सुखाने सुरू आहे."
बीबीसी गुजरातीशी बोलताना मयुरने सांगितलं, "छायाच्या घरी कोणालाही नोंदणी विवाहाविषयी माहिती नाही. घटस्फोटाच्या कागदांवर सही केली नाही तर छायाला मारून टाकू अशी धमकी तिच्या घरच्यांनी दिली. दबावाखाली छायाने घटस्फोटासाठी हो म्हटलं. पण तिचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं नाही. आम्ही एकत्र आलो. आमचं प्रेम खरं होतं म्हणूनच आम्ही एकत्र आलो. छायाने मला कॉल केला. आम्ही पळून जाण्याचा निर्णय घेतला."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)