You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आईच्या दुसऱ्या लग्नाची ही गोष्ट, घटस्फोटित महिलेचं मुलांनी लावून दिलं दुसरं लग्न
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आपल्या मुलीच्या लग्नाचा जेवढा आनंद पालकांना होतो तेवढाच आनंद श्रेया आणि समीर यांना त्यांच्या आईच्या लग्नाचा झाला आहे.
सोनी सोमानी या त्यांच्या दोन मुलांसोबत मुंबईत राहतात. नुकतंच सोनी यांचा विवाह पार पडला. या विवाहाचे फोटो श्रेयाने ट्वीटरवर ट्वीट केले आणि हा विवाह चर्चेचा विषय बनला.
आईच्या लग्नाबद्दल सांगताना श्रेयाचा आनंद गगनात मावत नव्हता. एखाद्या आईला तिच्या मुलीला कसा जोडीदार मिळतो याची चिंता असते, काहीशी तशीच चिंता मला होती असं श्रेया सांगत होती.
ती म्हणाली, "माझे जे वडील आहेत त्यांना जेव्हा मी भेटले तेव्हा आम्ही खूप मजा मस्ती केली. त्यांना भेटल्यावर मला खूप छान वाटलं. एरवी एका आईला आपल्या मुलीला लग्नासाठी चांगला मुलगा मिळाल्यावर जसं वाटतं, त्यावेळी माझ्या भावनाही काहीशा तशाच होता.
"मी मनात म्हटलं माझ्या आईला चांगला मुलगा मिळाला आहे. त्यांच्यातील वयाचं अंतरही जास्त नाहीये. माझी आई माझ्या वयाच्या दुप्पट वयाची आहे आणि तिचे मिस्टर तिच्यापेक्षा एका वर्षाने मोठे आहेत."
माझ्या या लग्नाच्या निर्णयाचं माझ्या मुलांनी स्वागत केलं, त्यामुळे मी खूप आनंदी आहेत. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मला मुलांची साथ होती. अगदी संघर्षाच्या काळातही माझी मुलं माझ्यासोबत होती आणि माझ्या लग्नातही ती आनंदी होती हे पाहून मला खूप गहिवरून आलं, असं सोनी सोमाणी म्हणाल्या.
त्या सांगतात, " माझ्यासाठी हा खूपच वेगळा अनुभव आहे. या भावना मी शब्दात सांगू शकत नाहीये. माझ्या दुःखात माझ्या मुलांनी माझी साथ दिली आणि आता या आनंदाच्या प्रसंगीही ते माझ्यासोबत आहेत. खरंच असं म्हणता येईल की माझं लग्न माझ्या मुलांनी लावून दिलं आहे."
पहिल्या लग्नानंतर भोगल्या नरकयातना
प्रत्येक स्त्री आपल्या स्वप्नांच्या राजकुमाराबद्दल स्वप्न रंगवते. ती काही इच्छा अपेक्षा आपल्या पतीकडून ठेवते. त्याच्यासोबत सुखी जीवनाचे स्वप्न रंगवते. मात्र सोनी सोमाणी यांच्याबद्दल असं काहीच झालं नाही.
मूळच्या जयपूर असलेल्या सोनी यांचं पहिलं लग्न वयाच्या 17 व्या वर्षीच झालं. मात्र हे लग्न म्हणजे सोनी यांच्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा ठरलं.
याबद्दल श्रेया सांगते की, "माझ्या आईचे पहिले पती हे व्यसनी होते आणि व्यसनामुळे कौटुंबिक हिंसाचारही वाढतो. माझ्या आईचा त्यांच्याकडून खूप छळ व्हायचा. मी जेव्हा आईच्या पोटात होते तेव्हा आमच्या घरातील वातावरण हिंसाचाराने भरलेलं होतं. माझ्यावरही त्यांनी हात उचलला होता. या अशाच नरक यातना भोगत आईने दहा वर्ष संसार केला.
"मात्र हे सर्व असहाय्य झाल्यानंतर माझ्या आईने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाच्या बाजूने कोणीही उभे राहिलं नाही. मी, माझा भाऊ आणि आई आम्ही तिघांनी त्या पुढचा खडतर प्रवास धैर्याने पार केला."
तर एकदम जुन्या विचारांच्या कुटुंबात वाढलेल्या सोनी यांना कोणाचीही साथ मिळाली नाही.
त्या सांगतात, "मी ही अशाच कुटुंबातून आहे जिथे घटस्फोट नावाचा शब्दाला खूपच वाईट समजलं जातं. समाजातून मला हेच सांगण्यात आलं की, जर तुला मार खावा लागत असेल, तुझ्यावर अत्याचार होत असेल तर हेच तुझं आयुष्य आहे. तुला वेगळं होता येणार नाही. तुला मरेपर्यंत इथेच रहावं लागेल, भलेही तुझ्या नवराच तुला जीवे का मारत नाही. माझा असा अनुभव राहिला आहे.
"समाजाने मला कधीच साथ दिली नाही. माझ्या मुलांशिवाय मला कोणीच साथ दिली नाही. आमच्या तिघांच्या पाठीशी कोणीही उभं राहिलं नाही. आजवर संघर्ष करतच मी आणि माझी मुलं आम्ही पोहोचलो आहोत."
जयपूर - बंगळुरू - मुंबई
घटस्फोटानंतर सोनी यांनी बंगळूरू गाठलं. तिथेच मुलांना शाळेत घातलं आणि स्वतःही पुढचं शिक्षण घेतलं. 17व्या वर्षीच लग्न झाल्याने श्रेया पुढे शिकू शकल्या नव्हत्या.
शिक्षण पुर्ण करून त्या बंगळूरूत एका कंपनीत नोकरीला लागल्या. 4 वर्ष बंगळूरुत नोकरी केल्यानंतर त्यांना मुंबईतून नोकरीसाठी बोलवण्यात आलं. त्यांनंतर सोनी यांनी दोन्ही मुलांना घेऊन मुंबई गाठली.
मुलांसोबत बनवलं मित्रत्वाचं नातं
घटस्फोटानंतरचं आयुष्य हे सोनी यांच्यासाठी खूपच आव्हानात्मक होतं. दोन्ही मुलांचा सांभाळ करणं सोबतच कुटुंबाची जबाबदारीही एकट्याने उचलणं ही त्यांच्यासाठी तारेवरची कसरत होती.
शिवाय एकट्या बाईकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोनही चांगला नसतो. तरीही मुलांनी माझ्या या संघर्षाच्या काळात खूप मदत केल्याचं सोनी आवर्जून सांगतात.
सोनी सांगतात, "दोन मुलांना घेऊन एकट्याने राहाणं हे खूपच कठीण होतं माझ्यासाठी. मात्र माझ्या मुलांनी मला साथ दिली आणि सर्व मार्ग सोपे झाले. मी माझ्या मुलांपासून काहीही लपवत नव्हते. माझी दोन्ही मुलं खूपच समजदार आहेत. मला आता खूप आनंद होतोय की, मी माझ्या जीवनात घडलेला प्रत्येक प्रसंग माझ्या मुलांसोबत शेअर केला.
"माझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी असो की संधी सर्व काही मी मुलांना सांगत होते आणि माझी मुलंही मला समजून घेत होती. माझ्या पाठीशी उभी राहात होती. आम्ही असंच आयुष्य जगत आलोय. आम्ही कधीच दुःखी झालो नाहीत. आम्ही प्रत्येक आव्हानाला एकत्रित सामोरे गेलो आणि त्यावर मात केली."
तर आईसोबत आपलं मैत्रीचं नातं असल्याचं श्रेया सांगते. श्रेया म्हणाली, "आम्हा तिघांचं नातं खूपच छान आहे. आम्ही एकमेकांसोबत सर्व गोष्टी शेअर करतो. आम्ही सर्वजण आमच्या आयुष्यात घडणारी छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी गोष्ट एकमेकांना सांगत असतो.
"कदाचित माझ्या आयुष्यात कोणी आलं तर मी हे माझ्या आईलाच पहिले सांगेन. आम्ही त्यावर चर्चा करतो काय चांगलं काय वाईट याबद्दल. एवढचं नाही तर मोबाईलवर आलेले मेसेजेसही आम्ही एकमेकांपासून लपवून ठेवत नाही. एवढं आमचं ओपन रिलेशन आहे."
'समाजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका'
आपल्या समाजात नवऱ्याशिवाय जगणं हे स्त्रीला फार कठीण जातं. त्यात वडील नसलेली मुलं म्हटलं की त्यांच्याकडे वाईट नजरेनं पाहिलं जातं. त्यामुळे आई आम्हाला प्रत्येक गोष्ट नीट समजावून सांगते, असं श्रेया सांगते.
श्रेया म्हणाली, "माझ्या आईने आम्हाला नेहमीच हेच सांगितलं आहे की, आपल्याला नेहमी नीट आणि सावध रहायला हवं. कारण समाज म्हणेल की, यांच्या घरात तर त्यांचे वडिलच नाहीयेत यामुळे ही मुलं बिघडली आहेत. त्यामुळे आमचे संगोपन याच मानसिकतेतून झालेलं आहे, की तुम्हाला तुमच्या आईचं प्रतिनिधित्व करायचं आहे. तिचे संस्कार तुम्हाला समाजाला दाखवायचे आहेत. "
तर सोनी सांगतात, "माझा मागील संघर्ष खूप मोठा होता. पण, मी सर्वांना हेच सांगेन की, आपण स्वतःला एक संधी द्यायला हवी. मी सुद्धा तेच केलं. मी खूप आनंदी आहे हा निर्णय घेऊन. माझे मुलंही आनंदी आहेत. त्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यामुळे आज आम्ही सर्वजण आनंदी आहोत. मला वाटतं हा एक संदेश समाजाला यातून मिळायला हवा की, आयुष्य एका वाईट नात्यामुळे संपून जात नाही.
"लोकांच्या बोलण्याने काहीही होत नाही. लोक माझ्या कठीण काळातही माझ्याबद्दल बोलत होते आणि आजही बोलतील. परंतु आपल्याला थांबायचं नाहीये. आपल्याला पुढं जायचं आहे. स्वतःला एक संधी द्यायची आहे आणि आनंदी राहायचं आहे."
"लोकांचं कामच आहे बोलणं. तुम्ही ज्या दिवशी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कराल तेव्हा तुम्ही जिंकलात असं समजा. माझ्या आईने तर लग्न केलंय. तुम्ही तुम्हाला हवं तसं तुमचं आयुष्य जगा. माझ्या आईने तर तिच्या मनाप्रमाणे लग्न केलंय," असं श्रेया हसत हसत सांगते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)