भाजपसोबत गेल्यावर 'या' नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकारणासाठी गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

संजय राऊत म्हणाले, "भाजपमध्ये प्रवेश करा, अन्यथा ईडीच्या कारवाईला सामोरं जा, अशी विचारणा भाजपच्या दोन नेत्यांकडून मला करण्यात आली."

भाजप विरोधकांना संपवण्यासाठी ईडीचा वापर करत असल्याचा आरोप यापूर्वीही विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी केला आहे.

या आरोपात किती तथ्य आहे? भाजपमधील किती नेत्यांवर ईडीकडून चौकशी सुरू आहे? आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किती नेत्यांवर ईडीची कारवाई झाली? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

'भाजप नेत्यावर ईडीची कारवाई दाखवा आणि 1 लाख जिंका'

औरंगबादमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी लावलेलं पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'भाजप नेत्यावर ईडी, सीबीआय, आयकर विभागाची चौकशी झाल्याचं दाखवा किंवा भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याची चौकशी पुढे चालू राहिली,' असं दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा' असं या पोस्टरवर म्हटलं आहे.

अक्षय पाटील यांनी त्यांच्या नावाचा आणि संपर्क क्रमांचाही उल्लेख पोस्टरवर केला आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना अक्षय पाटील म्हणाले, "राज्यातल्या एकतरी भाजप नेत्यावर ईडीची कारवाई झाल्याचं मला दाखवा. तसंच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यावर पुढे ही चौकशी सुरू राहिली असा एकतरी नेता दाखवा. हे जो दाखवेल त्याला मी 1 लाख रुपये बक्षीस म्हणून देणार असल्याचं जाहीर केलं आहे."

अक्षय पाटील यांनी सोमवारी (1 ऑगस्ट 2022) हे पोस्टर औरंगाबाद शहरात लावलं. अद्याप त्यांना असा दावा कोणीही केला नसल्याचंही त्यांनी बोलताना स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, "या देशात इंदिरा गांधी यांना जेवढं बहुमत मिळालं नव्हतं तेवढ्या बहुमताने मोदी निवडून आले. तरीही विरोधकांना संपवण्याचा घाट आहे. भाजपच्या आमदार, खासदारांवर कारवाई होत नाही. म्हणून मी हे आवाहन केलं आहे."

'...म्हणून ईडी माझी चौकशी करणार नाही'

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याचीही चर्चा आहे. ते म्हणाले, "जालन्यातील साखर कारखान्याविरोधात सुरू असलेली ईडीची कारवाई थांबेल की नाही माहिती नाही पण शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना सुरू रहावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे."

"मी सच्चा शिवसैनिक आहे. घरी आलो की परिवार दिसतो. त्यामुळे काही निर्णय करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी पक्ष प्रमुखांकडे परवानगी मागितली. त्यामुळे मी सर्वांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन जाहीर करतो,"

यापूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांचं ऑक्टोबर 2021 मधलं एक वक्तव्य चर्चेत आलं होतं. ते म्हणाले होते, "भाजपमध्ये गेल्यावर सर्व मस्त, निवांत आहे. भाजपमध्ये आल्याने शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतं."

मला आमदार साहेब म्हणाले, मी आहे तिथे सुखी आहे, तम्ही दिल्या घरी सुखी राहा. मला विचारणा झाली की तुम्ही भाजपमध्ये का गेला? त्यावर मी त्यांना म्हटले ते तुमच्या नेत्यालाच विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेले. पण मी सांगतो, येथे मस्त निवांत आहे. भाजपमध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटत असल्याचे हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.

हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर भाजपचे खासदार संजय पाटील यांनी तर थेट आपण भाजपचे खासदार असल्याने ईडीचा ससेमिरा मागे लागत नाही असं वक्तव्य केलं होतं.

तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी यावरून टोला लगावला होता. "शाहरूख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर कोकेन नाही पीठ सापडलं म्हणून सांगतील."असं भुजबळ म्हणाले होते.

ईडीची चौकशी आणि भाजप प्रवेश

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप आणि मविआ नेत्यांमध्ये संघर्ष सुरू झाल्याचं दिसलं. दोन्ही बाजूंच्या नेत्यांवर राज्य आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून नेत्यांच्या चौकशा सुरू होत्या.

राज्यातील तब्बल 21 नेत्यांविरोधात कारवाई सुरू होती. परंतु केंद्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई सुरू झाल्यानंतर किंवा आरोप झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले अनेक नेते आहेत.

या नेत्यांच्या चौकशीचं पुढे काय झालं? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भातील काही प्रकरणांचा आढावा आपण थोडक्यात घेऊया,

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मनी लाँड्रींगचे आरोप केले होते. ईडीने याप्रकरणी चौकशी करावी अशीही मागणी सोमय्या यांनी केली होती. परंतु भाजपमध्ये प्रवेशानंतर नारायण राणे केंद्रात मंत्री बनले.

काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नेते कृपाशंकर सिंह यांनी 7 जुलै 2021 रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडे महानगरपालिकेची जबाबदारीही देण्यात आल्याची माहिती आहे. बेहिशेबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह अडचणीत आले होते.

तसंच विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, प्रवीण दरेकर, विजयसिंह मोहीते पाटील यांच्यावरही गंभीर आरोपांनंतर भाजपमध्ये प्रवेश केला अशी टीका केली जाते.

अलिकडचे उदाहरण द्यायचे झाल्यास ठाकरे सरकार पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या शिंदे गटातील आमदारांवरही भाजपने गंभीर आरोप केले होते. अनेक आमदारांवर ईडीची चौकशी सुरू होती.

प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अर्जुन खोतकर अशा अनेक नेत्यांवर आता ईडीकडून कारवाई होणार का? असा पश्न उपस्थित केला जात आहे.

आरोपांमध्ये किती तथ्य?

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, 2018 पासून अंमलबजावणी संचलानालयाचा (ED) 50 टक्क्यांनी विस्तार झाला आहे. संचालनालयाकडे आता नऊ संचालक, 3 अतिरिक्त संचालक, 18 उप-संचालक आहे. तसंच ईडीमध्ये बदली पदभार (डेप्यूटेशन) करताना आयकर विभाग, जीएसटी विभाग आणि इतर आर्थिक व्यवहारसंबंधी विभागातील अधिकाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं.

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "भाजपमध्ये गेल्यानंतर तपास बंद होत नसला तरी चौकशीवर त्याचा परिणाम झाल्याचं निश्चित आहे. चौकशा बंद झालेल्या नाहीत परंतु कारवाईची गती मंदावल्याचं दिसतं. यात योगायोगाचा भाग असू शकत नाही. संजय राऊतच नाही तर इतर अगदी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापासून चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणा त्यांचं काम करणारच पण चौकशी आणि कारवाई केवळ एकाच बाजूने होताना दिसतेय. हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य हे यासंबंधी सर्वात मोठं उदाहरण आहे."

भाजपमध्ये जवळपास 90 नेते पक्षांतर करून आले आहेत. विस्ताराचा मंत्र राजकीय पक्ष अंमलात आणतात तसं त्यांनीही आणला आहे, असं ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानीवडेकर सांगतात.

त्या म्हणाल्या, "भाजप राजकारणात साम, दाम, दंड, भेद वापरला जातोय हे दिसून येतं. पण याचा अर्थ ईडीकडून ज्यांची चौकशी सुरू आहे किंवा ज्यांच्यावर कारवाई केली जात आहे ते 100 टक्के निर्दोष आहेत असं नाही. त्यामुळे याचाही विचार आपण केला पाहिजे. भाजपकडे नेत्यांची ओढा आहे तो केवळ ब्लॅकमेल केलं जात आहे म्हणून आहे असं 100 टक्के म्हणता येणार नाही. त्यानिमित्ताने राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार समोर येतोय."

"महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनीही आर्थिक गुन्हे शाखेचा राजकीय वापर केल्याचं दिसून आलं. चौकशी सुरू असलेले नेते भाजपमध्ये आले की पुण्यवान धरले जातील अशी परिस्थिती नक्कीच आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हाही संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केले होते. ईडी जशी केंद्र सरकारच्या हातात आहे तसं आर्थिक गुन्हे शाखा राज्य सरकारकडे आहे,"

त्या पुढे सांगतात, "विरोधक सत्तेत नसले तरी भाजपच्या नेत्यांची अशी काही प्रकरणं असतील तर ते उघड करू शकतात. माहितीचा अधिकार नागरिकांकडे आहे."

दरम्यान, भाजपने वेळोवेळी हे आरोप फेटाळले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)