शिवसेनेचे बंडखोर आमदार केवळ संजय राऊत यांना खलनायक का ठरवत आहेत?

    • Author, मयुरेश कोण्णूर,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.

चित्रं असं दिसतंय की शिंदे सरकार स्थापनेनंतर त्यांच्या गटातल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी संजय राऊतांन लक्ष्य केलं आहे. जणू सगळ्या बंडाच्या काळात जे काही त्यांनी आत दाबून ठेवलं होतं ते आता बाहेर येतं आहे. राऊतांच्या शब्दांच्या बाणांनी केलेल्या जखमा किती खोलवर गेल्या होत्या हे त्यावरून स्पष्ट दिसतंय.

"संजय राऊत हे शिवसेनेचे नारदमुनी आहेत. आम्हाला रेडा म्हणून डिवचता तर मी सांगोल्याचा माजलेला रेडा आहे. खाली शिंगाट घातलं तर तुला असाच उभा करीन. आमच्या नादाला लागू नका," असं म्हणाले शहाजीबापू पाटील. हे तेच सांगोल्याचे आमदार आहेत जे 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील' या डायलॉगमुळं फेमस झाले आहेत.

राग स्पष्ट दिसतोय, जाणवतोय. एकटे शहाजी पाटीलच बोलताहेत असं नाही. तर सगळेच आमदार बोलताहेत. संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दीपक केसरकर अशी मोठी यादी आहे. कोणीच मागे नाही.

स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्यात आहेत. ते नाव घेऊन वेगळं बोलत नाहीत इतकंच. पण त्यांच्या विधानसभेतल्या पहिल्या भाषणातही झालेल्या शाब्दिक जखमांचा उल्लेख होता. गुवाहाटीवरुन निघतांनाही त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये स्पष्ट लिहिलं होतं. "एका बाजूला आपल्या पुत्राने आणि प्रवक्त्यानं वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील आणि मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी 'मविआ' सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय?" असं शिंदेंनी विचारलं होतं.

ही टीका आता सरकार स्थापनेनंतर चहुबाजूंनी वाढली आहे. पण हे आमदार बंड, उद्धव ठाकरेंचा राजीनामा, शिवसेनेचं फुटणं याला संजय राऊतांनाच जबाबदार धरताहेत का? त्यांनी राऊत यांना या स्थितीचे खलनायक ठरवणं हे एकमेव वास्तव आहे की रणनीति?

'शिवसेनाप्रमुख असते तर राऊतांना हाकलून दिलं असतं'

हा प्रश्न उरतोच, पण त्यानं संजय राऊतांवर होणारी टीका थांबत नाही आहे. या आमदारांनी राऊत यांनाच जबाबदार धरलं आहे असं चित्रं आहे. केवळ या बंडाच्या काळातच नव्हे तर त्याअगोदरही राऊत यांच्या दररोज होणा-या पत्रकार परिषदा, त्यात होणारी टीका यालाही त्यांनी बंडाची परिस्थिती तयार होण्यास कारणीभूत धरलं आहे.

संजय शिरसाट हे औरंगाबाद शिवसेनेचे आमदार आहेत आणि शिंदेंच्या गटात ते आहेत. त्यांनीही सरकार स्थापनेनंतर औरंगाबादला परत गेल्यावर राऊतांवर टीकास्त्र सोडलं. राऊतांच्या भाषेवर ते चिडले आहेत.

"मीही रिक्षाचालक होतो. आमचे मुख्यमंत्री रिक्षाचालक होते याचा आम्हाला अभिमान आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका कधी झाली नव्हती/ संजय राऊतसारखा माणूस रोज सकाळी हातवारे करून का बोलतो ते कळत नाही. बरं झालं की ते अमिताभ बच्चन नाहीत. त्यांनी जे वाक्य म्हटलं ते माझ्या मनाला छेद करुन गेलं. सत्ता गेली उडत. त्याचं मला काही घेणंदेणं नाही."

"आम्ही गुवाहाटीला होतो. ते म्हणाले की हे जे गेले आहेत ते वेश्या आहेत. आमच्यात चार महिला होत्या. त्या आमच्यापाशी रडल्या की हे असं काय म्हणताहेत असं विचारत. जर त्यांची आई, बहीण त्या ठिकाणी असते, तर त्यांना राऊत असं म्हणाले असते? शिवसेनाप्रमुख असते तर त्याला हाकलून दिलं असतं. या राजकारणाच्या पायी शिवसेनेला डुबवण्याचं काम ते करताहेत," शिरसाट माध्यमांशी बोलतांना म्हणाले.

दीपक केसरकरांनी गुवाहाटीपासून राऊतांवर सुरु असलेली टीका अद्याप थांबवली नाही आहे. ते राऊत यांना रोज प्रत्युत्तर देतात. एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यावर दीपक केसरकर माध्यमांशी बोलले. टीकेचा रोख राऊतांकडे होता.

"अनेक गोष्टी ज्या चाललेल्या असतात त्या संजय राऊतांना माहितही नसतात. ते स्वत:ला उद्धव साहेबांच्या खूप जवळचे समजतात. पण ते जवळ असतील पवार साहेबांच्या. ते उद्धव साहेबांवर किती प्रेम करत असतील ते मला माहीत नाही. त्यामुळे आम्हाला आज जाणीव झाली नाही. शिवसेना धोक्यात येते आहे असं जाणवल्यावर मी गेले चार पाच महिने प्रयत्न करत होतो साहेबांचं मन वळवण्यासाठी."

"आम्हाला माहीत होतं की महाराष्ट्र्रात काय चाललं आहे आणि आम्ही ते आमच्या नेत्यांच्या कानावर घालणार. आम्ही ते राऊतांच्या कानावर का घालावं? राऊतांच्या पायावर लोटांगण घालणा-यांपैकी मी कधीच नव्हतो. आधी जखम करायची आणि नंतर मलम लावायचं असा सल्ला देणारी जे लोक आहेत त्यांनी खरी शिवसेनेची हानी केली आहे," केसरकर म्हणाले.

'कारण काय हे ठरवायला या आमदारांची कार्यशाळा घ्यायला हवी'

बंडादरम्यानच जेव्हा राऊतांच्या भाषेवरून, उपमांवरून त्यांच्यावर टीका सुरू झाली तेव्हा जर 'मी बोलल्यानं त्यांना दुखत असेल तर मी थांबतो' अस राऊत म्हणाले होते. पण त्यानंतरही उद्धव यांचा राजीनामा टळू शकला नाही. पण आता सगळ्या आमदारांनी टीका सुरू केल्यावर ते काल 'मी या विषयावर बोलणार नाही' असं म्हणाले होते. राऊतांनी असं मौन का स्वीकारलं असा प्रश्न विचारला जात असतांनाच आज त्यांनी उतर दिलं.

"पहिल्यांदा ते असं म्हणत होते की आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. दुस-या दिवशी असं म्हणाले की राष्ट्रवादी कॉंग्रेस निधी देत नव्हतं म्हणून आम्ही बाहेर पडलो. तिस-यांदा त्यांनी सांगितलं की पक्षातले काही लोक आमच्या विभागात हस्तक्षेप करत होते म्हणून आम्ही बाहेर पडलो. आणि आता चौथ्या वेळेस माझ्यामुळे झालं असं म्हणताहेत. त्यांनी पक्ष का सोडला आणि बंडखोरी का केली याचं नेमकं कारण काय हे ठरवण्यासाठी त्यांनी सगळ्यांची एक कार्यशाळा घेतली पाहिजे. आजही ते आमचे आहेत. आजही एका नात्याने आम्ही बांधले गेलो आहोत. पण नक्की कारण ठरवा. गोंधळू नका. पण तुम्ही नक्की काय ते ठरवा."

"2014 मध्ये भारतीय जनता पक्षानं आमची हिंदुत्वाची युती तोडली होती तेव्हा यातले कोणीच काही म्हणाले नव्हते. 2019 मध्ये याच हिंदुत्ववादी भाजपानं हिंदुत्ववादी शिवसेनेला दिलेला शब्द फिरवला, मग आमच्यावर ही वेळ आली. तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? त्यामुळं कार्यशाळा घेऊन नक्की कारण कोणतं याबद्दल एकमत त्यांनी करावं," संजय राऊत म्हणाले.

राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी म्हणतात, "मला असं वाटतं की संजय राऊत हे उद्धव ठाकरेंपेक्षा काही मोठे नाही आहेत. जी काही उद्धव ठाकरेंची इच्छा आहे तीच संजय राऊत हे आपल्या अग्रलेखांद्वारे वा वक्तव्यांद्वारे मांडतात. पण सगळ्या आमदारांचा रोष संजय राऊतांवरती आहे. जे काही झालं त्याचं खापर राऊत यांच्यावर फोडून ते बंडाचा काही एक्स्कूझ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत."

"शिवसेनेनेत यापूर्वी जी बंड झाली त्यावेळीही बंड करणार्‍या काही नेत्यांनी संजय राऊत यांना दोष दिलेला आहे. नारायण राणेंनी बंड केलं तेव्हा संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. तर राज ठाकरे यांच्या बंडानंतर राज समर्थकांनी राऊतांच्या गाडीची तोडफोड केली होती," राजकीय पत्रकार दीपक भातुसे आठवण करुन देतात.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावं किंवा न जावं याबद्दल शिवसैनिकांमध्ये २०१९ पासून दोन गट होते. पण उद्धव यांनी निर्णय घेतला होता. पण संजय राऊत या निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता कॉंग्रेस - राष्ट्रवादीवर टीका करत जेव्हा सेनेतले आमदार बाहेर पडले तेव्हा टीकेचा रोख राऊतांकडे वळला.

"यावेळी एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय राऊत शिवसेना संपवत असल्याची टीका करतात. खरंतर यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंड मोडून काढण्यासाठी त्यांच्याबरोबर गेलेले काही आमदार परत कसे येतील याचे प्रयत्न शिवसेनेकडून व्हायला हवे होते. उद्धव ठाकरेंनी तसे प्रयत्न सुरू ठेवले. मात्र त्याचवेळी संजय राऊत यांची भाषा आमदारांना दुखावणारीच होती. उद्धव ठाकरेंच्या भावनिक आवाहनाचा फायदा होऊन काही आमदारांचे मत बदलण्याची शक्यता असेल तर ती शक्यता संजय राऊत यांच्या भाषेमुळे मावळली असं म्हणायला जागा आहे," असं भातुसे पुढे म्हणतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)