इम्तियाज जलील- माझ्या डेथ सर्टिफिकेटवरही औरंगाबाद नाव हवं #5मोठ्याबातम्या

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा घेतलेला आढावा

1. माझ्या डेथ सर्टिफिकेटवरही औरंगाबाद नाव हवं- इम्तियाज जलील

'औरंगाबादच्या नामांतराच्या वेळी आपण शांत राहिलो तर येण्याऱ्या पुढ्या आपल्याला नक्कीच विचारेल की, जेव्हा या शहराचं नामांतर होत होतं, तेव्हा तुम्ही काय करत होता. त्यामुळे नामांतराला विरोध व्हायलाच हवा,' असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

'माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला असून मला मृत्यू देखील औरंगाबादमध्येच यायला हवा. माझ्या बर्थ सर्टिफिकेटवर औरंगाबाद आहे. तर डेथ सर्टिफिकेटवरही औरंगाबादच असायला हवं,' असं जलील म्हणाले.

सकाळनेही बातमी दिली आहे.

औरंगाबाद येथे इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलविली होती. नामांतराचा मुद्दा हा हिंदू-मुस्लीम मुद्दा आहे. आम्ही सर्वजण छत्रपती संभाजी महाराजांचा आदर करतो. मात्र सत्तेत बसलेल्या पक्षाच्या एका नेत्यांने 25 ते 30 वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये येऊन नामांतराची इच्छा व्यक्त केली होती. केवळ त्या नेत्याच्या इच्छेखातर आपण नामांतराचा अन्याय सहन का करायचा, असा सवाल जलील यांनी बैठकीत उपस्थित केला.

2. शिवसेना नेते आनंद अडसूळ यांचा राजीनामा

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रममुख उद्धव ठाकरे यांना राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. ईडीने केलेल्या कारवाईवेळी तसंच आजारपणात साधी विचारपूसही न केल्याची खंत आनंदराव अडसूळ यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

सिटी कोऑपरेटिव्ह बँक बँकेतल्या कथिक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांची याआधीही चौकशी करण्यात आली होती. ज्यावेळी ईडीने कारवाई केली त्यानेळी पक्षाने साधी विचारपूस देखील केली नाही. तसेच आजरपण, अडचणीच्या काळात देखील पक्ष नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ हा एकनाथ शिंदे गटासोबत अगोदरपासूनच आहे. आता अडसूळ यांनी देखील राजीनामा दिला.

3.वारकऱ्यांना टोल माफ, एकनाथ शिंदेंची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूरच्या वारकऱ्यांबाबत एक आढावा बैठक घेतली. खड्डे लक्षपूर्वक भरा, अपघात होऊन कोणी जखमी होणार नाही याची दक्षता घ्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, ही बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोकणातल्या गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी टोलमाफीची घोषणा केली आहे तसंच अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची वारीसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करावी असे आदेशही त्यांनी दिले.

4. पीटी उषा, इलाईराजा यांची राज्यसभेवर नियुक्ती

प्रख्यात धावपटू पीटी उषा, दक्षिणेतील प्रसिद्ध संगीतकार इलाईराजा, तेलुगू चित्रपट दिग्दर्शक व्ही विजयेंद्र प्रसाद, तसंच समाजसेवी वीरेंद्र हेगडे यांची राज्यसभेवर नेमणूक झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

दक्षिण भारताच्या लोकांना प्रतिनिधित्व करणाऱ्या या चारही मान्यवरांच्या नियुक्तीतून मोदी सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं सूचित केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन या सर्वांचं अभिनंदन केलं आहे. प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी ठरलेल्या उषा यांची कहाणी सर्वश्रूत आहे पण उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचं त्यांचं कार्य प्रशंसनीय आहे असं मोदी यांनी म्हटलं.

5. डोलो-650 कंपनीच्या कार्यालयांवर छापेमारी

पॅरासिटामॉल ची गोळी बनवणाऱ्या डोलो-650 कंपनीवर आणि तिच्या मालाकांच्या विविध ठिकाण्यांवर प्राप्तिकर विभागानं बुधवारी छापेमारी केली. बंगळुरूस्थित मायक्रो लॅब्स लिमिटेड या कंपनीनं डोलो-650 ही गोळी बनवलं आहे. कंपनीच्या या कार्यालयावरही छापे टाकण्यात आले आहेत.

प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी देशातील ४० ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. या कारवाईमध्ये सहभागी झालेल्या २०० अधिकाऱ्यांनी डोलो कंपनीच्या विविध ठिकाणांवर छापेमारी केली. यामध्ये बंगळुरु येथील मुख्यालय, नवी दिल्ली, सिक्कीम, पंजाब, तामिळनाडू आणि गोवा येथील कार्यालयांचा समावेश आहे. मायक्रो लॅब्सचे सीएमडी दिलीप सुराना आणि संचालक आनंद सुराना यांच्या घरांवरही छापेमारी करण्यात आली आहे.

बिझनेस स्टँडर्ड या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)