कृपाशंकर सिंह यांच्या प्रवेशामुळे भाजपला फायदा होणार की तोटा?

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री मंत्री कृपाशंकर सिंह यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

2019 मध्ये त्यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अनेक आरोप झाले होते. त्यानंतर बरेच दिवस ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती.

आज अखेर त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कृपाशंकर सिंह म्हणाले, "मी कॉंग्रेस पक्षाच्या राजीनामा दिल्यानंतर कुठल्या पक्षात जाईन असा विचार केला नव्हता. पण मी राजकारणी आहे. मी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो तेव्हा असं वाटलं की, राजकारण हे यांच्याबरोबरच केलं पाहिजे. यापुढे पक्ष जो आदेश देईन त्याचं मी पालन करेन. मुंबई महापालिकेची निवडणूक असेल किंवा अजून काही, मुंबईतला उत्तर भारतीय समाज पूर्णपणे भाजपसोबत उभा राहिल अशी ग्वाही मी देतो."

भाजपला फायदा की तोटा?

कृपाशंकर सिंह हे कॉंग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा होते. ते मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्षही राहिलेले आहेत. 2022 साली मुंबई महानगर पालिकेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर सिंह यांचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जातोय. पण त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचे गंभीर आरोपही आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच भाजपला कृपाशंकर सिंह यांचा फायदा होईल का?

याबाबत लोकमतचे सहायक संपादक संदिप प्रधान सांगतात, "कृपाशंकर सिंह हे कॉंग्रेसचे उत्तर भारतीय यांचे नेते मानले जात होते. पण ते लोकनेते नाहीत. कृपाशंकर सिंह यांची प्रतिमा कायम मोठ्या राजकीय नेतृत्वाच्या गटातील नेते अशी राहिली आहे. त्यांच्यामागे फार मोठा जनधार नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचा भाजपला खूप फायदा होईल असं वाटत नाही."

"याउलट सध्या राज्यातल्या अनेक नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआयच्या चौकशी सुरू आहे. कृपाशंकर सिंह यांच्यावर कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भ्रष्टाचाराचे इतके मोठे आरोप असलेला नेता भाजपमध्ये प्रवेश करणं हा 'पार्टी विथ डिफरन्स' चा नारा देणार्‍या भाजप पक्षावर ओरखडा असेल," असं प्रधान सांगतात.

मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेस हे तीन पक्ष स्वतंत्रपणे लढविणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेबरोबर जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असं चित्र उभं राहू शकतं.

उत्तर भारतीय मतदार हा कॉंग्रेसच्या मागे असल्याचं मागील काही निवडणुकीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेसला कृपाशंकर सिंह यांच्या भाजप प्रवेशाचा काही प्रमाणात तोटा होऊ शकतो असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात.

गांधी घराण्याच्या जवळचे?

कृपाशंकर सिंह यांचा वडील जौनपूरमधले स्वातंत्र्यसैनिक होते. 1971 साली कृपाशंकर सिंह हे मुंबईत आले. त्यांनी काही काळ औषध कंपनीत नोकरी केली. त्यानंतर ते रहिवाशांच्या तक्रारींबाबत आवाज उठवू लागले. कालांतराने ते राजकारणात सक्रिय झाले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाल्याचं कृपाशंकर सिंह यांनी अनेकदा सांगितलं आहे. सकाळच्या राजकीय संपादक मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "एकेकाळी कृपाशंकर सिंह हे गांधी परिवाराच्या अत्यंत जवळचे होते."

नानिवडेकर पुढे सांगतात, "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गांधी परिवाराशी चांगले संबंध ठेवण्यासाठी कृपाशंकर सिंह यांचा उपयोग करून घेतला. त्यामुळे गांधी परिवारासंदर्भातील अंतर्गत माहितीसाठी कृपाशंकर सिंह यांचा फायदा भाजपला होऊ शकतो. याचबरोबर एकनाथ खडसे यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात जो माणूस समोर आला. त्याचे कृपाशंकर सिंह यांच्याशी संबंध असल्याचं समोर आलं होतं.

"त्यामुळे अशा पद्धतीच्या कामांसाठीही कृपाशंकर सिंह यांचा फायदा भाजपला होऊ शकतो. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही त्यांचा फायदा होऊ शकतो. पण कृपाशंकर सिंह यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप असताना त्यांना पक्षात कसं घ्यायचं? हा विचार असताना मुंबई महापालिका निवडणूकीसाठी केलेला यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या प्रतिमेला धक्का आहे हे निश्चित आहे," असं नानिवडेकर सांगतात.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आरोप?

कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचा आरोप होता. या आरोपानुसार 1999 मध्ये ते आमदार बनले तेव्हा त्यांचं उत्पन्न 45 हजार प्रति महिना होतं. पण 1999 ते 2014 पर्यंत त्यांची संपत्ती 320 कोटींपर्यंत गेली.

त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर ही संपत्ती आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण फेब्रुवारी 2018 मध्ये विशेष न्यायालयाने कृपाशंकर सिंह यांच्या बाजूने निकाल दिला.

त्याचबरोबर हे प्रकरण पुढे चालवू नये असंही म्हटले. कृपाशंकर सिंह यांच्यावरच्या आरोपांपासून वाचण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना कृपाशंकर सिंह म्हणाले, "याबाबत न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. माझ्यावर जे आरोप झाले त्याबाबत मला काहीही भाष्य करायचं नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)