You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भास्कर जाधव: 'मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी व्हायला तयार'
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी व्हायला तयार आहे. मात्र त्या बदल्यात शिवसेनेने आपल्याकडचं वन मंत्रिपद सोडू नये, असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून काम बघताना भास्कर जाधव यांनी भाजपच्या बारा आमदारांना वर्षभरासाठी घरी बसवलं.
तालिका अध्यक्षांच्या दालनात भाजपच्या आमदारांनी धक्काबुक्की केली तसंच शिवीगाळ सुद्धा केली असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आणि भाजपच्या तब्बल बारा आमदारांचे निलंबन झालं.
एवढंच नाही तर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रवी राणा यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर भास्कर जाधव यांनी त्यांची हकालपट्टी केली.
भास्कर जाधव सभागृहात म्हणाले, "माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले पण मी संरक्षण घेतलेलं नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मला जाहीरपणे धमक्या देतात. सोशल मीडियावरून मला धमक्या दिल्या जात आहेत."
शिवसेना ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास करणारे भास्कर जाधव कोण आहेत? याचा आढावा आपण घेणार आहोत.
कोण आहेत भास्कर जाधव?
सभागृहात कामकाज सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीने भास्कर जाधव यांची निवड का केली? याविषयी बोलताना वरिष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "अधिवेशन दोनच दिवस घेतलं जात असताना विरोधक गदारोळ करणार हे स्पष्ट होतं. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी महाविकास आघाडीला अनुभवी, आक्रमक शैली असलेल्या अध्यक्षांची गरज होती. ही परिस्थिती हाताळण्यासाठीच भास्कर जाधव यांची निवड केली असावी असं म्हणता येईल."
भास्कर जाधव यांचा जन्म 1 ऑगस्ट 1957 रोजी झाला. 1982 पासून त्यांनी तेव्हा कोकणात तळागाळात पोहचलेल्या शिवसेनेपासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
भास्कर जाधव आपल्या आक्रमकतेमुळे राजकीय वर्तुळात ओळखले जातात. गुहागर मतदारसंघाचे ते आमदार आहेत.
1992 साली ते रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर 1995 आणि 1999 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले.
2004 मध्ये मात्र त्यांना विधानसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे 2004 मध्ये त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला.
2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून उतरले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
2004 मध्ये विधानसभेचं तिकिट न मिळाल्याने त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली होती. त्यात त्याचवेळी त्यांना 'मातोश्री'वर ताटकळत ठेवल्यानंतर अत्यंत भावनाविवश होऊन भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली.
त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. 2009 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात त्यांना विविध खात्याची मंत्रिपदं सांभाळली. राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी काही काळ सांभाळलं.
भास्कर जाधवांनी 2004 मध्ये शिवसेना सोडताना काय परिस्थिती होती याबाबत कोलाज डॉट इनचे संपादक सचिन परब यांनी माहिती दिली.
'उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली होती'
याविषयी बोलताना kolaj.in चे संपादक सचिन परब सांगतात, "2004 मध्ये शिवसेनेकडून एक सर्व्हे करण्यात आला होता. त्या सर्व्हेतून भास्कर जाधव पराभूत होतील असं शिवसेनेला सांगण्यात आलं होतं आणि त्याआधारे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मातोश्रीवर भास्कर जाधवांना त्यावेळी ताटकळत ठेवलं गेलं.
"त्यामुळे ते भावनाविवश झाले होते. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्यावर तोफ डागत शिवसेना सोडली होती. शिवसेनेची सूत्रं उद्धव ठाकरेंकडे आल्यानंतर शिवसेना सोडणारे ते पहिले महत्त्वाचे नेते होते. त्यांच्यानंतर नारायण राणे, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली," परब सांगतात.
ते पुढे सांगतात, "त्यावेळी सर्वेक्षणाचे काम नारायण राणे पहायचे. आपल्याला प्रतिस्पर्धी निर्माण होईल त्यादृष्टीनेच 2004 मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं. त्यामुळेच भास्कर जाधव यांनी नंतरच्या काळात शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला."
परब पुढे सांगतात, "कोकणामध्ये शिवसेनेत नारायण राणेंनंतरचे महत्त्वाचे नेते भास्कर जाधव होते. जाधवांकडे संघटन कौशल्य होतं, प्रभावशाली वक्तृत्व होतं तसे ते तापट सुद्धा आहेत. कोकणातील महत्त्वाचा समुदाय असलेल्या मराठा समाजातून ते होते.
"त्यामुळे नारायण राणेंसाठी ते आव्हान ठरू शकले असते. त्यामुळेच संभाव्य स्पर्धेमुळे त्यांना 2004 मध्ये उमेदवारी नाकारली गेली असावी अशीही एक शक्यता आहे. 2004 मध्ये नारायण राणेंचं शिवसेनेत बऱ्यापैकी वर्चस्वही होतं," परब सांगतात.
राष्ट्रवादी काँग्रेस का सोडली?
लोकसत्ताचे रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी सतीश कामत भास्कर जाधवांच्या राजकारणाबद्दल सांगतात की, "दोन तुल्यबळ नेत्यांचं जसं जमू शकत नाही तीच अडचण भास्कर जाधव यांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना मित्रांपेक्षा शत्रूच अधिक होते.
"शेजारच्या रायगडमधील सुनील तटकरे, रत्नागिरीतील रमेश कदम, शेखर निकम यांच्याशी त्यांचं जमलं नाही. उदय सामंत राष्ट्रवादीत होते तोपर्यंत त्यांचं आणि जाधवांचं जमलं नाही. भास्कर जाधव विरुद्ध उरलेले नेते असं चित्र राष्ट्रवादीत होतं," असं कामत सांगतात.
शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यात पूर्वीपासूनच सख्य नव्हते. यामुळे सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागत होता. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समाधानी नसल्याने अखेर त्यांनी पक्ष सोडला असंही जाणकार सांगतात.
मुलांचा लग्नसोहळा वादग्रस्त का ठरला?
आघाडीचे सरकार असताना तत्कालीन नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांनी आपल्या मुलाचा आणि मुलीचा भव्य लग्न सोहळा आयोजित केला होता.
राज्यात प्रचंड दुष्काळ असताना भास्कर जाधव यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून चिपळूण येथे मुलांचा लग्नसोहळा शाही थाटामाटात केल्याने त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली होती. सार्वजनिक जीवनात असलेल्या लोकांनी अशी उधळपट्टी करू नये असंही शरद पवार म्हणाले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता..)