You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजपचे निलंबित आमदार: पावसाळी अधिवेशनात निलंबित झालेल्या आमदारांची नावं काय?
विधानसभेतल्या भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेत असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राजभवनात भेट घेतल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही घोषणा केली आहे.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर 12 आमदारांचं निलंबन मागे घेत असल्याची घोषणा धान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
जुलै 2021मध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार खडाजंगी झाली आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं.
भाजपच्या कोणत्या आमदारांचं निलंबन झालं होतं?
- संजय कुटे
- आशिष शेलार
- जयकुमार रावल
- गिरीश महाजन
- अभिमन्यू पवार
- हरिश पिंपळे
- राम सातपुते
- जयकुमार रावल
- पराग अळवणी
- नारायणे कुचे
- बंटी बागडिया
- योगेश सागर
नेमकं काय घडलं?
5 जुलै 2021 ला विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा प्रस्ताव मांडला. परंतु विरोधकांना बोलू दिलं जात नाही असं म्हणत भाजपच्या आमदारांनी आक्षेप घेतला.
सभापती भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत धक्काबुक्की केली असं सत्ताधारी आमदारांनी म्हटलं.
याविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं, "तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की करण्यात आली. अध्यक्षांच्या चेंबरमध्ये ही घटना घडली. आमचा आग्रह राहील की ज्यांनी असं केलं त्यांच्यावर कारवाई करावी. आता धमकी, गुंडगिरीचं काम भाजप नेते करत आहेत."
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले.
ते म्हणाले, "अध्यक्षांना कुठलीही धक्काबुक्की झालेली नाही. पण काही मंत्री जाणीवपूर्वक कामकाज काढून देण्यासाठी आणि इतर कारणं देत अशा स्टोऱ्या काढत आहेत."
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळात ओबीसी आरक्षणासंदर्भातला ठराव संमत करण्यात आला आहे.
हा ठराव संमत करत असताना विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या अध्यक्षांना घेरलं आणि त्यानंतर गोंधळातच ठराव संमत करण्यात आला आहे.
'तालिबानी ठाकरे सरकार'
निलंबनाच्या कारवाईनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकार तालिबानी संस्कृतीप्रमाणे वागत असल्याची टीका केली आहे.
ते म्हणाले, "अध्यक्षांच्या दालनात शिवी देणारे सदस्य भाजपचे नव्हते. तरी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना असं वाटलं असेल तर मी सर्वांच्यावतीने क्षमा मागतो असंही म्हटलं. हा तालिबानी प्रकार आहे. माझा हरकतीचा मुद्दा केवळ ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित करण्याची भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली याबाबत नव्हता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चुकीच्या पद्धतीने कोट करण्यासंदर्भात होता."
"माझा सामना करण्याची ताकद शिवसेनेमध्ये नाही म्हणून नो बॉलमध्ये विकेट काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे," असंही ते म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)