You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदे : 'मला निवडून यायला कुठलं चिन्ह लागत नाही, एवढं काम केलंय मी'
"आम्ही जर गद्दार आणि बंडखोर असतो, तर महाराष्ट्रातल्या या तमाम जनतेने आम्हाला समर्थन दिलं असतं का? मला निवडून यायला कुठलंही चिन्ह लागत नाही, एवढं काम मी करून ठेवलंय," असं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे.
पुण्यातील सासवडमधील शेतकरी मेळाव्यात एकनाथ शिंदे बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, "सगळे मला येऊन भेटायचे, कारण तेव्हा भेटायला माझ्याकडेच वेळ होता. आणखी कुणाकडे होता असं मला वाटत नाही.
"काही लोक आले, सांगू लागले की माझा हा-हा प्रॉब्लेम आहे. मला कुणीतरी त्रास देतंय. माझ्याकडे लोक ओक्साबोक्शी रडायचे.
"शिवसैनिकांना गेल्या अडीच वर्षांत काय मिळालं? शिवसैनिकांना खोट्या केसेसला सामोरं जावं लागलं. सरकार आपलं, शिवसैनिक जेलमध्ये. सरकार कुणासाठी? सरकार चालवतंय कोण?"
'शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लावू देणार नाही'
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक माणसं पाठवू लागले, म्हणू लागले, की 'तुमच्या सुनावणी आम्ही गृहमंत्र्यांशी बोलून लावतो. तुमचा मोक्का, तडीपार आम्ही कॅन्सल करतो.' कुणाकडे बघायचं शिवसैनिकाने?
"मी गेंड्याच्या कातडीचा कार्यकर्ता नाहीय. मी बाळासाहेबांचा संवेदनशील शिवसैनिक आहे.
"जेव्हा अडीच वर्षांमध्ये जे काही घडलं, त्यावर मला टीका करायची नाहीय. पण पुढच्या अडीच वर्षांमध्ये एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागू देणार नाही."
'नगरपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना चार नंबरला फेकली गेली'
"देशभरातल्या इतिहासात लोक विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षांकडे जात असतात. आम्ही मंत्री होतो, पण आम्ही सत्ता सोडून दुसरीकडे गेलो. आम्ही हा निर्णय घेतला, कारण उद्याच्या निवडणुकांमध्ये हे निवडून आलेले शिवसेनेचे आमदार हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढेच निवडून आले असते. 5-10-20 कोटी निधींवर निवडून येता येत नाही. दुसऱ्यांना 50-50 कोटींचा निधी मिळत होता," असं शिंदे म्हणाले.
"शिवसेनेची सत्ता असताना नगरपंचायत निवडणुकांमध्ये चार नंबरला फेकली गेली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला संजीवनी बुटी म्हणाली. आज शिवसेनेला औषधालासुद्धा शिल्लक राहिली नसती," असंही शिंदे म्हणाले.
"काही लोकांना वाटत होतं, एकनाथ शिंदेंसह 40-50 लोकांनी राजकीय आत्महत्या केली आहे. आम्ही म्हटलं, आता केलंच आहे तर काय होतंय, पाहू. नाहीतरी एक दिवस मरायचंच आहे. पण आज वाटतं, आपण जे काही केलंय, ते पाहता, एका सिनेमामध्ये आपलं काम दाखवणं होणार नाही, दोन-तीन पार्टमध्ये लागतील," असं शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या भाषणातील आणखी काही महत्त्वाचे मुद्दे :
- गेल्या अडीच वर्षात शिवसेनेला कमकुवत करण्याचे काम या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीने केले.
- शिवसेनेचे आमदार मला कायम त्यांच्या बाबतीत होणाऱ्या अन्यायाबाबत सांगायचे, त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलावे लागले.
- आता पुन्हा एकदा युती सरकार सत्तेमध्ये आले असून सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू.
- युती सरकार हे सर्वसामान्य माणसाचे सरकार असून कष्टकरी, शेतकरी, कामगार तसेच गोरगरीब जनतेचे सरकार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)