आकाशवाणीचं मुंबई केंद्र असं उभं राहिलं

फोटो स्रोत, Mahesh Keluskar
- Author, महेश केळुस्कर
- Role, बीबीसी मराठीसाठी
23 जुलै 1927 ला देशात पहिल्या आकाशवाणी केंद्राची स्थापना मुंबईत झाली होती. 'ज्ञान, माहिती आणि मनोरंजन' या त्रिसूत्रीच्या आधारे तेव्हापासून 95 वर्षं ही सेवा अव्याहत सुरू आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आकाशवाणीसाठी जवळ जवळ 30 वर्षं काम केलेले आणि 'महानायक' या विश्वास पाटील यांच्या खंडप्राय कादंबरीचं अभिवाचन आकाशवाणीसाठी निर्माण करण्याचं शिवधनुष्य पेलणारे कार्यक्रम निर्माते महेश केळुस्कर यांच्याकडून मुंबई केंद्राच्या जडणघडणीतले महत्त्वाचे टप्पे समजून घेऊया.
आकाशवाणीवर फक्त संवाद आणि ध्वनी नेपथ्याच्या मदतीने कार्यक्रम सादर करण्याची मजा काही औरच आहे. आणि कार्यक्रम निर्माता म्हणून तुमच्यासाठी ते आव्हानात्मकही आहे. असं एक आव्हान मी 2002 मध्ये पेललं ते विश्वास पाटील यांची महानायक ही कादंबरीच्या अभिवाचनाचा कार्यक्रम करून.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यावर बेतलेली ही कादंबरी वाचत असतानाच याचं आकाशवाणी सादरीकरण शक्य आहे असं मनात आलं होतं. तेव्हा असा कायक्रम करायचा आणि त्यात मराठी सिने आणि नाट्यसृष्टीचे आघाडीचे कलाकारच घ्यायचे असा माझा हट्टच होता. आणि असा प्रस्ताव घेऊन मी तेव्हाचे उपमहासंचालक विजय दीक्षित यांच्याकडे घेऊन गेलो. तो साधारण 2001 चा काळ होता.
दीक्षित सर थोडेसे उडालेच. एकतर महानायकची व्याप्ती खूप मोठी होती. आणि दुसरं म्हणजे मी दिलेली कलाकारांची यादी बघूनही ते गांगरले. आकाशवाणीला प्रतिष्ठा होती. पण, आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून हे आघाडीचे कलाकार येतील का अशी रास्त भीती त्यांनी बोलून दाखवली. मी मात्र ठाम होतो. आणि मनातून थोडं दडपण असलं तरी सदाशिव अमरापूरकर यांच्यापासूनच फोन करायला सुरुवात केली.
नाटकात अभिनयाबरोबरच नेपथ्य, प्रकाश योजना, दिग्दर्शन यातून आवश्यक परिणाम साधता येतो. पण, अभिवाचनात हे सगळं आवाजाच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचं असतं. मला वाटतं हेच आव्हान या कलाकारांनाही खुणावत असावं. म्हणून शक्यतो कुणी नाही म्हटलं नाही.
कलाकारांचं झालं. पण, माझ्यासमोरचं आव्हान आणखी वेगळं होतं. मी निवडलेलं तयार नाटक नव्हतं. कादंबरी होती. आणि तिचं वाचन नाही तर भावगर्भ असं अभिवाचन अपेक्षित होतं. त्यासाठी कादंबरीचा वाचनीय भाग वेगळा काढणं, प्रत्येक कलाकाराचा आवाज, त्याचा पोत सांभाळून रेकॉर्डिंग करून घेणं हे मला सांभाळायचं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे मोठ्या कलाकारांच्या रेकॉर्डिंगसाठी वेळा मिळवायच्या होत्या.

फोटो स्रोत, Mahesh Keluskar
सदाशिवराव अमरापूरकर हिमाचल प्रदेशमध्ये होते. पण, एका फोनवर तयार झाले. आणि पुढच्या रविवारी स्टुडिओत हजरही झाले. सयाजी शिंदे माझा मित्रच आहे. पण, तेव्हा तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीत व्यस्त होता. मी त्याला सतत फोन करून इतका वैताग दिला की, शेवटी तो तिथल्या शूटिंगला दांडी मारून एका रविवारी रेकॉर्डिंगसाठी आला.
अमृता सुभाषचं 'ती फुलराणी' हे नाटक जोरात सुरू होतं. आणि निर्माते मोहन वाघ यांनी तिला इतर कुठे काम करायचं नाही अशी तंबीच देऊन ठेवली होती. शेवटी मी स्वत: वाघांना फोन केला. आणि एका दिवसासाठी परवानगी मिळवली. विनय आपटे यांना त्यांच्याच भाषेत सांगायचं तर 'करंगळी वर करायला वेळ नव्हता.' पण, मैत्रीच्या दबावामुळे तो तब्बल सहा वेळा रेकॉर्डिंगसाठी आला.
प्रमोद पवारला मी तीनवेळा एकच भाग रेकॉर्ड करायला लावला. पण, त्याने विरोध केला नाही. त्याने प्रत्येक वेळी सहकार्य केलं. अमोल पालेकर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात रेकॉर्डिंगसाठी येणार आहेत असं मी जाहीर केलं तेव्हा तर कुणाचा विश्वासच बसेना. ते आले त्या दिवशी केंद्रात अक्षरश: त्यांची हवा होती.
नीना कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, सुषमा सावरकर, जयंत सावरकर, गिरीश ओक, गणेश यादव या सगळ्यांनी त्या त्या वेळी खूप सहकार्य केलं. नीनाताई रेकॉर्डिंग नंतर फोन करायच्या. आणि 'काही चुकलं तर नाही ना,' असं आवर्जून विचारायच्या. विदुला मुणगेकर तशी फार प्रसिद्ध नसलेली. पण, तिचं रेकॉर्डिंग झालेलं असताना तिने स्वत: ते पुन्हा एकदा करण्याची विनंती मला केली. कारण, तिचं समाधान झालं नव्हतं.

फोटो स्रोत, Mahesh Keluskar
विनय, किशोर आणि प्रमोद यांच्या आवाजाला श्रोत्यांची पुन्हा पुन्हा मागणी होत होती. किशोर रात्री आठ वाजता रेकॉर्डिंगला यायचा. आणि मग दोन वाजेपर्यंत ट्रान्स लावून रेकॉर्डिंग करायचा. त्याला दिलेल्या स्क्रिप्टवर त्याने अभ्यास करून नोट्स लिहिलेल्या असंख्य खाणाखुणा होत्या. आपल्या कामावर तो स्वत:च खूप चिकित्सा करायचा. रेकॉर्डिंग सुरू करण्यापूर्वी दहा मिनिटं डोळे बंद करून ध्यान करायचं. आणि मग पूर्ण ताकदीनिशी रेकॉर्डिंग करायचं असा त्याचा शिरस्ता.
श्रीकांत मोघे आणि रत्नाकर मतकरी या ज्येष्ठ लोकांनी महानायक अभिवाचनात सहभागी होण्याची इच्छा स्वत:हून व्यक्त केली तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि त्यांचा अनुभव, कसब सगळं अभिवाचनात जाणवत होतं. दिनकर गावंडे, किशोर म्हात्रे या कलाकारांनीही मेहनत घेतली. तुषार दळवी, अजित भुरे यासारखे दमदार आवाज योग्य प्रसंगांना मिळाले.
किशोर सोमण, राजेंद्र पाटणकर, श्रीराम केळकर हे आमचे आकाशवाणीचे कलावंत. त्यांची या माध्यमावर पकड होतीच. चिन्मयी सुमित वेळात वेळ काढून सहभागी झाली. दुसऱ्या एका गुणी अभिनेत्रीचं रेकॉर्डिंग मात्र उच्चारण दोषांमुळे वापरता आलं नाही. आणखी एक आठवण म्हणजे एक लोकप्रिय सिनेनट माझ्यावर खूप रागावले. त्यांना स्पष्ट पण नम्र शब्दात सांगितलं, की महानायकसाठी तुमचा आवाज आणि संवादफेक योग्य नाही, असं सांगावं लागलं.
वाङमयीन वारसा असलेली एक अभिनेत्री आकाशवाणीला कमी लेखून उद्या फोन करा, नंतर फोन करा, पंधरा दिवसांनी सांगते, असं सांगत भाव खाऊ लागली. तिचा विचार आम्ही सोडून दिला. मोहन जोशी, सोनाली कुलकर्णी तसंच विक्रम गोखले यांची मात्र मनापासून इच्छा होती. पण, त्यांचा योग जुळून आला नाही.
आज कादंबरीचं अभिवाचन प्रसारित होऊन वीस वर्षं झाली. 6 एप्रिल 2002 ला पहिला भाग प्रसारित झाला होता. मुंबई सह इतरही अनेक केंद्रांनी तो प्रसारित केला. आकाशवाणीला जाहिरातींच्या माध्यमातून चांगला महसूलगही मिळाला. पण, मला समाधान या गोष्टीचं वाटतं की, 255 भागांची ही महामालिका आम्ही आकाशवाणीवर चांगल्या कलाकारांच्या आवाजात घडवून आणली. आणि आजही इतक्या मोठ्या मालिकेचा रेकॉर्ड कुणी मोडलेला नाही. श्रोत्यांच्या आग्रहावरून ही मालिका तब्बल आठ वेळा पुनर्प्रसारितही झाली. एकूण 24 मोठे कलाकार होते. आणि यात मी धरून आकाशवाणीचे आणखी तीन कर्मचारी होते.
भारतीय आकाशवाणीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात महानायकला स्वतंत्र स्थान असेल. आणि आकाशवाणीवरचा असा अभिनव प्रयोग मुंबई केंद्रावर पहिल्यांदा झाला म्हणून आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असेल.

फोटो स्रोत, Nandini Apte
हे झालं एका कार्यक्रमाचं. पण, मूळाच भारतात रेडिओला कशी सुरूवात झाली आणि मुंबई केंद्राची स्थापना कशी झाली हे वाचणंही मोठं रंजक आहे. 23 फेब्रुवारी 1920ला अमेरिकेतल्या मार्कोनी कंपनीने एका ठिकाणी सुरू असलेला कार्यक्रम तिथून दूरवर असलेल्या लोकांसाठी रेडिओ लहरींच्या माध्यमातून ऐकवण्याचा यशस्वी प्रयोग केला. त्या पाठोपाठ 1922 साली रेडिओचं नियमित प्रसारण युनायटेड किंग्डममध्येही सुरू झालं आणि यापासून स्फूर्ती घेऊन मुंबईत टाईम्स ऑफ इंडियाच्या संपादक मंडळाने पुण्यातल्या घोड्यांच्या शर्यतींचा निकाल त्याच क्षणी मुंबईत ऐकवण्याचा निर्धार केला आणि हा पहिलाच प्रयत्न पोस्ट अँड टेलिकम्युनिकेशन्स खात्याच्या तज्ज्ञांच्या मदतीने तडीस गेला. हा दिवस होता 20 ऑगस्ट 1921.
यानंतर भारतात रेडिओच्या प्रसारणाचा गांभीर्याने विचार सुरू झाला. मुंबई रेडिओच्या स्थापनेचा दिवस मुक्रर करण्यात आला तो होता 23 जुलै 1927. या कार्यक्रमासाठी मुंबईत आताच्या आझाद मैदानावर खास गोलाकृती मंच उभारण्यात आला होता. आणि तेव्हाचे व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विन सपत्निक त्या सोहळ्यासाठी आले होते.
कालांतराने मुंबई रेडिओ कंपनीला रेडिओ सेवा चालवण्याचा खर्च परवडेनासा झाला. त्यामुळे त्यांनीच सरकारला सेवा ताब्यात घेण्याची विनंती केली. ती उचलून धरत ब्रिटिश सरकारने इतरही शहरांमधल्या रेडिओ सेवा आपल्या अखत्यारीत आणल्या. आणि त्यासाठी इंडियन स्टेट ब्रॉडकास्ट कंपनी स्थापन केली. हे घडलं 1930 साली.
'ज्ञान, माहिती आणि मनोरंजन' या त्रिसुत्रीच्या आधारे भारतात रेडिओचं काम आतापर्यंत म्हणजे पुढची 95 वर्षं सुरू आहे. 1936 ला ऑल इंडिया रेडिओ, आकाशवाणी असं या संस्थेचं नामकरण झालं. 1947 पर्यंत देशात आकाशवाणीची फक्त सहा प्रसारण केंद्र होती. ती संख्या आता देशभरात मिळून चारशेच्या वर गेली आहे. म्हणजे देशाच्या 99% लोकसंख्येपर्यंत आकाशवाणी पोहोचली आहे. 23 भाषा आणि 179 बोलीभाषांमधून आकाशवाणीचं प्रसारण चालतं.
आकाशवाणी सेवा सुरू झाल्याची बातमी लोकमान्य टिळकांच्या केसरी वृत्तपत्रानेही मोठ्या दिमाखात छापली होती. रेडिओ सेवेसाठी सिग्नेचर ट्यून किंवा संकेतधून खूप महत्त्वाची असते. तिच्या निर्मितीची गोष्टही ऐकण्यासारखी आहे.
वॉल्टर कॉफमन या ज्यू संगीतकाराने ही धून बसवली. कॉफमन हे हिटलरच्या त्रासाला कंटाळून भारतात आलेले आणि इथं आश्रय घेतलेले ज्यू निर्वासित होते. चौदा वर्षं ते भारतात, मुंबईत राहिले. त्यातली दहा वर्षं ऑल इंडिया रेडिओबरोबरही काम केलं. त्यांनी तयार केलेली संकेतधून शिवरंजनी रागावर आधारित होती. तानपुरा, व्हायोलिन आणि व्हायोला अशा तीन वाद्यांचा मेळ यात होता.
आकाशवाणी मुंबईवर पहिलं प्रादेशिक बातमीपत्र सादर झालं तो दिवस होता 1 ऑक्टोबर 1939. 1927 पासून आतापर्यंत तंत्रज्ञान सुधारलं तसं रेडिओच्या कार्यक्रमात अनेक बदल झाले. एएम प्रसाराणासोबतच एफएम प्रसारण आलं. पुढे जाहिरात प्रसारणासाठी विविधभारती सुरू झालं. आणि 1993पासून मुंबई केंद्राचं जवळ जवळ सगळं काम संगणकीकृत झालं.
दुसऱ्या महायुद्धात भारतीय रेडिओनं आणखी एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. खोटी, बनावट माहिती पसरवण्याचा प्रघात तेव्हाही होता. आणि 1939मध्ये नाझी लोकांकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीला टक्कर देण्यासाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारने ऑल इंडिया रेडिओची विदेश सेवा सुरू केली. हे प्रसारण प्रामुख्याने अफगाणिस्तान आणि वायव्य आशियाई देशांसाठी होतं. पण, या उपक्रमातूनही एक मुहूर्तमेढ रोवली गेली. कारण, सध्या या विदेश प्रसारण सेवे अंतर्गत 16 परदेशी आणि 11 भारतीय भाषांमधून प्रसारण होतं.
असे अनेक प्रयोग ऑल इंडिया रेडिओनं काळाची आणि परिस्थितीची गरज बघून केले आहेत. आणि या सगळ्यात मुंबई केंद्राने देशातील आद्यकेंद्र म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
[लेखक महेश केळुस्कर हे मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि कवी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर 1991पासून त्यांनी आकाशवाणीसाठी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केलं आहे. अलीकडे कार्यक्रम उपसंचालक पदावरून ते आकाशवाणीतून निवृत्त झाले.]
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








