श्रीलंकेत आंदोलकांना नमवण्यासाठी शेकडो सैनिक रस्त्यावर, BBC च्या पत्रकारावरही हल्ला

फोटो स्रोत, Getty Images
श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचं आंदोलन अद्यापही सुरूच आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी शपथ घेतल्यानंतरही श्रीलंकेतील वातावरण निवळण्याची चिन्हं दिसून येत नाहीत.
श्रीलंकेतील चिघळत चाललेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी श्रीलंकन पोलीस आणि लष्कराकडून बळाचा वापर सुरू झाला आहे.
आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी शेकडो सैनिक रस्त्यावर उतरले असून सरकारविरोधी आंदोलनस्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे.
दरम्यान, बीबीसीच्या एका पत्रकारावरही सैनिकांकडून हल्ला करण्यात आला. बीबीसीच्या पत्रकाराला श्रीलंकन सैनिकांनी मारहाण तर केलीच. शिवाय त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यातील व्हीडिओ डिलीट करण्यास भाग पाडण्यात आलं.
श्रीलंकेत गेल्या कित्येक महिन्यांपासूनअस्थिरतेचं वातावरण आहे. गोटाबाया राजपक्षेंच्या राजीनाम्यानंतर विक्रमसिंघे राष्ट्रपतिपदावर आले खरे पण त्यांनाही लोकांच्या असंतोषाचा सामना करावा लागत आहे. विक्रमसिंघे यांनी आंदोलकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिल्याने प्रकरण जास्तच चिघळल्याचं दिसून येतं.

फोटो स्रोत, Getty Images
विक्रमसिंघे यांनी शपथ घेताच आंदोलकांविरुद्ध कठोर भूमिका घेतली. कोणत्याही प्रकारे सरकारी कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न हा लोकशाहीविरोधी आहे. अशा प्रकारांबाबत कायदेशीररित्या कारवाई केली जाईल.
या पार्श्वभूमीवर आता सरकार आपलं आंदोलन चिरडून टाकेल, अशी भीती श्रीलंकेतील नागरिकांना आहे.
बीबीसी पत्रकारावर हल्ला
बीबीसी न्यूजचे अनबरासन इथिराजन, मणिकंदन आणि व्हीडिओ जर्नलिस्ट जेरिन सॅम्युएल हे श्रीलंकेतील परिस्थितीचं वार्तांकन करत आहेत. सैनिकांच्या कारवाईदरम्यान बीबीसी पत्रकार जेरिन सॅम्युएल यांच्यावर सैनिकांनी हल्ला केला. याविषयी इथिराजन यांनी सविस्तर वर्णन दिलं आहे.
ते म्हणतात, "कोलंबोत पोलीस आणि लष्कर हे सरकारविरोधी आंदोलनस्थळांवर कारवाई करणार आहेत, अशी माहिती कानावर पडताच आम्ही थेट आंदोलनस्थळी गेलो. हे ठिकाण राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या अगदी समोरच्या बाजूला आहे.

फोटो स्रोत, Reuters
थोड्याच वेळात सुरक्षा बल त्यांच्या लवाजम्यासह त्याठिकाणी दाखल झालं. शेकडोंच्या संख्येने पोलीस आणि लष्करी सैनिक हे आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी तिथे आले होते. दंगलरोधक वाहनही त्यांच्यासोबत होतं.
सुरक्षा बलाचे सैनिक दोन बाजूंनी आंदोलनस्थळांकडे आले. त्यांचे चेहरे झाकलेले होते.
आंदोलनस्थळावर उपस्थित आंदोलकांनी त्यांच्या आगमनावर आक्षेप व्यक्त केला. त्यावेळी सैनिक अचानक आक्रमक झाले. त्यांनी आंदोलकांना मागे ढकलण्यास सुरू केलं. काही क्षणातच आम्ही पाहिलं की सैनिक फुटपाथच्या बाजूने लावलेले तंबू उखडून टाकत होते.
ते अत्यंत आक्रमक होते. एक-एक करून तंबू उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू होतं. सुरक्षा बलाचं एक पथक राष्ट्राध्यक्ष भवनात गेलं. हे ठिकाण 9 जुलैपासून आंदोलकांच्याच ताब्यात होतं. त्यांनीच राजपक्षे यांना पलायन करण्यास भाग पाडलं होतं.
आंदोलक शुक्रवारी स्वतःहून राष्ट्राध्यक्ष कार्यालयातून बाहेर जातील, असं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण सनिकांच्या पथकाने रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला खड्यासारखं उचलून बाजूला काढणं सुरू केलं. कार्यकर्त्यांना मागे ढकलून बॅरिकेड्स लावण्यात आले.
या सगळ्या गोष्टींचं वार्तांकन करून आम्ही परतत असताना सैनिकांनीआम्हाला अडवलं. सैनिकांच्या गराड्यात साध्या वेशात असलेल्या एका व्यक्तीने आमच्या सहकाऱ्यावर दरडावून बोलत मोबाईल मागितला. काही कळायच्या आतच त्याच्या बाजूचे सैनिक सहकाऱ्याकडे आले. त्यांनी जोरदार बुक्का मारून आमच्या सहकाऱ्याचा मोबाईल हिसकावला.
आम्ही पत्रकार आहोत. आम्ही आमचं काम करत आहोत, असं सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण त्यांनी आमचं काहीएक ऐकून घेतलं नाही. बीबीसीच्या माझ्या दुसऱ्या एका सहकाऱ्याचा माईक हिसकावून फेकून देण्यात आला.
या प्रकाराने माझे सहकारी घाबरून गेले. अखेर दुसऱ्या एका लष्करी अधिकाऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप घेतला. हॉटेल जवळच असल्याने आम्ही तिथून निघून लवकर पोहोचू शकलो.
बीबीसीने लष्कर आणि पोलिसांकडून या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्नही केला. पण आम्ही केलेल्या फोनला प्रत्युत्तर मिळालं नाही.
रनिल विक्रमसिंघेंनी घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ
राष्ट्राध्यक्ष गोटाभया राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड झाली. रानिल विक्रमसिंघे यांनी नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे.
राष्ट्राध्यक्षपदासाठी तीन नावं शर्यतीत होती. पंतप्रधान आणि काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष रनिल विक्रमासिंघे, दलस अलापेरुमा आणि डाव्या विचारसरणीच्या नॅशनल पीपुल्स पॉवर पार्टीचे अनुरा कुमार दिसानायके हे तिघे रिंगणात होते.

फोटो स्रोत, Reuters
रनिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे 8 वे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. संसदेत 223 जणांनी मतदान केले त्यातील 134 जणांनी विक्रसिंघे यांना पाठिंबा दिला.
रनिल यांना कडवी टक्कर देणारे सत्तारूढ पक्षाचेच असंतुष्ट उमेदवार दलस अलापेरुमा होते. विरोधी पक्षाने त्यांच्या नावाला पाठिंबा दिला होता.
नव्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 2024 मध्ये संपणार आहे. नवे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया यांचा उर्वरित कालावधी पूर्ण करेल.
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी ईमेलच्या माध्यमातून श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आपला राजीनामा ईमेलमार्फत संसदेच्या अध्यक्षांकडे पाठवून दिला होता.
पण, संसदेच्या अध्यक्षांनी सार्वजनिकरित्या याची घोषणा केलेली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
श्रीलंकेच्या संविधानानुसार, राष्ट्राध्यक्षांनी राजीनाम्यावर हस्ताक्षर केल्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. त्यामुळे राजपक्षे यांनी राजीनामा पाठवून दिला असला तरी अद्याप रनिल विक्रमसिंघे अंतरिम राष्ट्राध्यक्ष बनू शकणार नाहीत.
शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे संसदेचं अनुमोदन मिळवण्यासाठी 30 दिवसांची मुदत असेल. संसदेने त्यांना अनुमोदन दिलं नाही तर खासदार नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड करू शकतात.
दरम्यान, विक्रमसिंघे यांनी शपथ घेऊनसुद्धा श्रीलंकेतील आंदोलन सुरूच असल्याचं दिसून येत आहे. ते रोखण्यासाठी सैनिकांकडून मोठ्या प्रमाणात बळाचा वापर करण्यात येत आहे.
गोटाबाया राजपक्षे सिंगापूरमध्ये
आर्थिक अडचणींतून निर्माण झालेल्या संकटांमुळे श्रीलंकेत अराजकासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा द्यावी ही मागणी तीव्र झाली आहे. आंदोलकांनी घेतलेल्या पावित्र्यामुळे राजपक्षे हे काही दिवस अज्ञातवासात होते, नंतर ते मालदीवला पोहोचले आणि आता ते सिंगापूरला पोहोचल्याचे समोर आले आहे.
आंदोलकांच्या वाढत्या दबावामुळे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे देश सोडून पळून गेले होते. मंगळवारी म्हणजे 12 जुलै रोजी राष्ट्राध्यक्ष राजपक्षे सैन्याच्या मदतीने श्रीलंकेतून पळाले आणि मालदीवला पोहोचले. तिथून ते सिंगापूरला पोहोचले आहेत.
त्यांनी सिंगापूर येथे आश्रय घेतला, अशी देखील चर्चा सुरू होती. त्यावर सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे खासगी दौऱ्यावर आहेत. त्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी राजकीय आश्रय घेतलेला नाही. सिंगापूर कुणाला राजकीय आश्रय देत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








