स्टॅलिन स्वतःच्याच लघवीत बेशुद्ध पडलेला, पण कोणी तातडीने डॉक्टरांना बोलावलं नाही

स्टॅलिन

फोटो स्रोत, Getty Images

सोव्हिएत युनियनचे शासक जोसेफ स्टॅलिन यांची एक सवय होती- सकाळी उठल्यावर ते लिंबाच्या फोडीसोबत चहा मागवायचे. पण 1 मार्च 1953 चा दिवस वेगळा होता.

त्या दिवसभरात स्टॅलिनने चहा मागवला नाही. जेवणही मागवलं नाही. कोणत्याही सूचना दिल्या नाहीत.

संध्याकाळी साडे सहा वाजता स्टॅलिनच्या खोलीतले दिवे लागले, पण ते काही खोलीबाहेर पडले नाहीत.

रात्री दहा वाजता मॉस्कोहून पक्षाच्या सेंट्रल कमिटीच्या ऑफिसमधून स्टॅलिनसाठी एक पाकीट आलं. सुरक्षारक्षकांनी सल्लामसलत केली आणि पॉवेल लोजगाचेव्ह पाकीट घेऊन स्टॅलिनकडे जाईल असं ठरवलं.

पॉवेल जेव्हा स्टॅलिनच्या खोलीत गेला तेव्हा त्याला जे पाहायला मिळालं त्यामुळे तो जागीच थिजून गेला.

स्टॅलिनचे चरित्रकार एडवर्ड रादजिंस्कींनी त्या दृश्याचं वर्णन केलं आहे- स्टॅलिन जमिनीवर पडले होते. ते पूर्णपणे बेशुद्ध नव्हते, पण त्यांना काही बोलता येत नव्हतं. स्टॅलिननं आपल्या पायजम्यातच मूत्र विसर्जन केलं होतं. शेजारीच 'प्रावदा' वर्तमानपत्र आणि मिनरल वॉटरची बाटली पडली होती. जेव्हा स्टॅलिन लाइट लावायला गेले, तेव्हाच ते कोसळले असावेत असा अंदाज त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी लावला.

पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्टॅलिनला या अवस्थेत पाहूनही कोणी तातडीने डॉक्टरांना बोलावण्याची तसदी घेतली नाही.

उलट त्या रात्रीनंतर पुढचे तीन दिवस रशियात एक वेगळंच नाट्य रंगायला लागलं...त्या नाटकाचा एक अंक 5 मार्च 1953 ला स्टॅलिनच्या निधनानं संपला. रशियावरची स्टॅलिनची पोलादी पकड सुटली आणि सत्तांतराची चक्रं फिरली...

पण या सगळ्या झाल्या पुढच्या गोष्टी. पण मुळात स्टॅलिनची रशियाच्या राजकारणावर पकड कशी बसली हे थोडक्यात समजून घेऊ आणि स्टॅलिनच्या त्या शेवटच्या चार दिवसांत सोव्हिएत संघामध्ये काय घडलं होतं, ते जाणून घेऊ.

Presentational grey line

स्टॅलिन या नावाचा अर्थ होतो लोह पुरूष. आपण ज्यापद्धतीने आयुष्य जगलो, ते पाहता आपलं नाव सार्थ ठरवलं, असं स्टॅलिनना वाटायचं.

कम्युनिस्ट ज्याला आदर्श मानायचे असा शासक, दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या जर्मन सेनेला मात देणारा 'हिरो' की आपली सत्ता टिकविण्यासाठी नरसंहार करणारा क्रूर हुकूमशहा... स्टॅलिन नेमके कसे होते?

एकेकाळी केवळ रशियातीलच नाही तर जगातील शक्तिशाली नेतृत्व असलेल्या स्टॅलिनची कौटुंबिक पार्श्वभूमी ही अतिशय सामान्य होती.

स्टॅलिनचा जन्म 18 डिसेंबर 1879 साली सध्याच्या जॉर्जियात झाला होता. तेव्हा जॉर्जिया झारच्या रशियन साम्राज्याचा भाग होता.

स्टॅलिन

फोटो स्रोत, Getty Images

स्टॅलिन यांचं मूळ नाव जोसेफ विसारियोनोविच जुगाशविली. स्टॅलिनचे वडील चप्पल दुरुस्तीचा व्यवसाय करायचे आणि आई कपडे धुण्याचं काम करायची. स्टॅलिनच्या वडिलांना दारूचं प्रचंड व्यसन होतं आणि बऱ्याचदा लहानग्या स्टॅलिनला ते बदडून काढायचे.

सातव्या वर्षी स्टॅलिनला देवी आजार झाला होताय. त्याच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण होते, शिवाय डाव्या हातावरही या आजाराचा परिणाम झाला होता. स्टॅलिनची प्रकृतीही अशक्त होती. त्यामुळे खूपदा इतर मुलं त्याला खूप त्रास द्यायची.

स्टॅलिन मोठा होत असतानाच जॉर्जियामध्ये झारविरोधातला असंतोष वाढत होता. त्याकाळात स्टॅलिन जॉर्जियातल्या लोककथा आणि रशियाविरोधी विचारांनी प्रभावित झाले होते.

हळूहळू स्टॅलिन झारविरोधातल्या आंदोलनात सहभागी व्हायला लागले. झारच्या गुप्त पोलिसांना जेव्हा स्टॅलिनचा संशय आला, तेव्हा ते भूमिगत झाले. याच काळात ते बोल्शेव्हिक पक्षात सहभागी झाले.

रशियातील बोल्शेव्हिक क्रांतीचे प्रणेते व्लादिमिर लेनिन आणि स्टॅलिन यांची पहिली भेट फिनलँडमध्ये झाली. स्टॅलिन लेनिनच्या विचारांनी प्रचंड प्रभावित झाले.

1917 साली लेनिनच्या नेतृत्वाखाली रशियामध्ये कम्युनिस्ट क्रांती यशस्वी झाली. या क्रांतीमध्ये स्टॅलिन यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. सत्तेवर आल्यानंतर लेनिन यांनी स्टॅलिन यांची नियुक्ती कम्युनिस्ट पार्टीच्या सरचिटणीसपदी केली.

1924 साली लेनिनच्या मृत्यूनंतर स्टॅलिननं स्वतःला त्यांचा वारसदार घोषित केलं.

स्टॅलिन आपण देशभक्त आणि कनवाळू नेता आहोत असं भासवायचे. पण आपल्या विरोधकांचा काटा काढण्यात त्यांनी अनेकदा मागेपुढं पाहिलं नव्हतं...मग ते विरोधक लष्करातील असो की कम्युनिस्ट पार्टीतले.

स्टॅलिन

फोटो स्रोत, Getty Images

स्टॅलिन यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल कमिटीतील 139 पैकी 93 लोकांना ठार केल्याचाही आरोप होता. त्याखेरीज त्यांनी लष्करातील 103 जनरल आणि नौसेनतल्या 81 अॅडमिरल्सची हत्या केली होतं असंही म्हटलं जातं.

आपल्या अखेरच्या दिवसांत स्टॅलिन प्रचंड संशयी झाले होते. पक्षातल्या अनेकांना ते आपला शत्रू मानायचे आणि त्यांना मार्गातून दूर करायलाही मागेपुढे पाहत नव्हते.

अर्थात, स्टॅलिनच्या या दिवसांबद्दल आपण आता बोलणार नाहीये. ही गोष्ट स्टॅलिनच्या शेवटच्या चार दिवसांबद्दल...

Presentational grey line

28 फेब्रुवारीच्या रात्री स्टॅलिनने त्यांच्या डाचामधील घरी आपल्या चार वरिष्ठ सहकाऱ्यांना एक चित्रपट पाहायला बोलावलं होतं. हे सहकारी होते- जॉर्जी मेलेनकोव्ह, निकिता ख्रुश्चेव्ह, निकोलाय बुल्गानिन आणि लाव्हरेन्ट बेरिया.

चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्यांना जेवण आणि उंची मद्य देण्यात आलं.

वातावरण खेळीमेळीचं असावं यासाठी सगळ्यांचा प्रयत्न सुरू होता. पार्टी प्रेसीडियमच्या सदस्यांनी स्टॅलिनला आवडणार नाही असा कोणताही विषय काढला नाही.

ख्रुश्चेव्ह यांनी 'ख्रुश्चेव रिबेंबर्स' या आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, "ते आमची चेष्टामस्करी करत होते. माझ्या पोटात बोटं खुपसून गुदगुल्या करत होते. ते जाणूनबुजून युक्रेनियन लहेजात मला 'मिकिता' म्हणून बोलावत होते.

ही पार्टी पहाटे 4 वाजता संपली...1 मार्चचा दिवस उजाडला होता.

स्टॅलिनने आपल्या अंगरक्षकांना सूचना केली की, ते आता झोपायला जात आहेत.

स्टॅलिन यांच्या अंगरक्षकांपैकी एक असलेल्या पॉवेल लोजगाचेव्ह यांनी लेखक एडवर्ड रादजिन्स्की यांना सांगितलं की, मी जोपर्यंत बोलावत नाही, तोपर्यंत कोणीही माझ्या खोलीत येऊ नका अशी सूचना आम्हाला स्टॅलिन यांनी दिली होती.

स्टॅलिन यांचे अजून एक चरित्रकार रॉबर्ट सर्व्हिस लिहितात, "1 मार्चला संपूर्ण दिवसभर स्टॅलिनच्या खोलीतून काहीच आवाज आला नाही. प्रत्येक अंगरक्षकाची शिफ्ट ही दोन तासांची असायची. त्यानंतर तो दोन तास आराम करायचा आणि मग पुन्हा शिफ्टवर रुजू व्हायचा. हे सगळे गार्ड कायम ताजेतवाने राहतील, सुस्तावणार नाहीत यासाठी ही खबरदारी घेतली जायची."

स्टॅलिन

फोटो स्रोत, Getty Images

मी बोलावल्याशिवाय खोलीत येऊ नका असं सांगितल्याने दिवसभर स्टॅलिन बाहेर आले नाहीत तरीही कोणी त्यांच्या खोलीमध्ये जाण्याचं धाडस केलं नाही. मात्र, रात्री दहा वाजता मॉस्कोहून आलेलं पार्सल देण्यासाठी पॉवेलवर स्टॅलिन यांच्या खोलीत जाण्याची वेळ आली.

पॉवेलला स्टॅलिन यांच्या खोलीत जे दृश्य पाहायला मिळालं ते सुरुवातीलाच नमूद केलं आहे.

स्टॅलिन यांची अवस्था पाहिल्यानंतर त्यांच्या अंगरक्षकांनी तातडीने मॉस्कोला गृहमंत्री सर्गेई इग्नातिएव्ह यांना फोन केला. इग्नातिएव्ह यांनी मेलेनकोव्ह आणि बेरिया यांना कळवलं. बेरिया त्यावेळेस त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत होते.

स्टॅलिनच्या दोन्ही चरित्रकारांनी लिहिलं आहे की, बेरिया यांनी कॉम्रेड स्टॅलिन यांच्या आजारपणाबद्दल कोणाला काहीही न सांगण्याचे आदेश दिले.

दरम्यान स्टॅलिनसोबत असलेले लोक वरिष्ठांच्या सूचनांची वाट पाहात होते. या दरम्यान त्यांनी एकच गोष्ट केली होती...स्टॅलिन यांना जमिनीवरून उचलून दिवाणवर झोपवलं आणि अंगावर पांघरूण घातलं. थोड्यावेळाने स्टॅलिनना उचलून डायनिंग हॉलमधल्या दुसऱ्या एका पलंगावर हलवण्यात आलं.

डॉक्टरांना बोलवायला उशीर

स्टॅलिन 'ट्रायंफ अँड ट्रॅजेडी' या पुस्तकात दिमित्री वॉल्कोगोनोव्ह यांनी लिहिलं आहे, "मेलेनकोव्ह आणि बेरिया स्टॅलिनसमोर उभे होते, तेव्हाच स्टॅलिन जोरजोरात घोरायला लागले. डॉक्टरांना बोलवायच्या ऐवजी बेरिया गार्ड्सना तिथून हाकलताना म्हणाले, की कॉम्रेड स्टॅलिन गाढ झोपले आहेत. तुम्ही सगळे बाहेर जा."

ख्रुश्चेव्ह यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, "सर्व नेते 2 मार्चच्या सकाळी स्टॅलिन यांच्या निवासस्थानात पोहोचायला लागले. मात्र तोपर्यंत कोणीही स्टॅलिन यांना पाहण्यासाठी डॉक्टरांना बोलावलं नव्हतं."

स्टॅलिन यांची मुलगी स्वेतलाना यांना सकाळी दहा वाजता ही बातमी समजली. त्यावेळी ती फ्रेंच भाषेच्या क्लासमध्ये होती.

स्टॅलिन त्यांची मुलगी स्वेतलानासोबत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टॅलिन त्यांची मुलगी स्वेतलानासोबत

रॉबर्ट सर्व्हिस लिहितात की, "या सगळ्यामुळेच स्टॅलिन यांची प्रकृती जाणीवपूर्वक बिघडू दिली या संशयाला बळकटी मिळते. अर्थात, याला दुसरी बाजूही होती. स्टॅलिन बरे झाले आणि आपण त्यांच्या अनुपस्थितीत कार्यभार स्वीकारल्याचं त्यांना कळलं तर काय होईल याची धास्ती असल्यानेही त्यांचे सहकारी कोणताही निर्णय घ्यायला कचरत असावेत."

यामागे अजून एक कारण असल्याचं सांगितलं जातं.

वॉल्कोगोनोव्ह लिहितात, "1953ची सुरूवात होतानाच स्टॅलिन अनेकदा बेशुद्ध पडले होते आणि त्यांचा रक्तदाबही वाढायचा. त्यांनी सिगारेट ओढणे बंद केलं होतं. त्यांचा डॉक्टरांवर अजिबात विश्वास नव्हता. त्यांनी डॉक्टरांना आपल्या घरापासून दूरच ठेवलं होतं.

रक्ताची उलटी झाली आणि...

जेव्हा डॉक्टर पोहोचले तेव्हा स्टॅलिन यांची तब्येत खराब होऊन 12 तास उलटून गेले होते.

डॉक्टर आले तेव्हाही स्टॅलिन यांना कपड्यांतच मूत्र विसर्जन झालं होतं. डॉक्टरांनी त्यांचे कपडे काढून आधी त्यांचं अंग पुसून घेतलं. त्याचवेळी स्टॅलिन यांना रक्ताची उलटी झाली. तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्या फुफ्फुसांचा एक्स-रे घेतला.

जोनाथन ब्रेंट आणि व्लादिमीर नाउमोव्ह आपल्या 'स्टालिंस डॉक्टर्स प्लॉट' या पुस्तकात लिहिलं आहे, " स्टॅलिनची प्रकृती गंभीर झाल्याचा अंदाज डॉक्टरांना आला होता. त्यांच्या शरीराची उजवी बाजू लुळी पडली होती. दुपारनंतर त्यांनी स्टॅलिन यांना एनिमा देण्याचा प्रयत्न केला. पण याचा फारसा सकारात्मक परिणाम होणार नाही याची त्यांना खात्री होती."

बेरिया

फोटो स्रोत, Getty Images

स्टॅलिन सलग तीन दिवस बेशुद्धावस्थेत होते. या दरम्यान पक्षाचे दोन नेते कायम त्यांच्या जवळ बसून असायचे.

बेरिया आणि मेलेन्कोव्ह त्यांच्यासोबत दिवसा असायचे. ख्रुश्चेव्ह आणि बुल्गानिन रात्री असायचे.

3 तारखेला डॉक्टरांनी स्टॅलिन यांची प्रकृती गंभीर असून काहीही होऊ शकतं हे सांगितलं.

वरिष्ठ नेत्यांची बैठक

या दरम्यान 4 मार्चला सोव्हिएत युनियनच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. कारण डॉक्टरांनी स्टॅलिन यांच्या प्रकृतीबद्दल फारसं आशादायक वृत्त सांगितलं नव्हतं.

बुल्गानिन सोडून बाकी सर्व नेते या बैठकीला उपस्थित होते. बुल्गानिन यांना तेव्हा स्टॅलिन यांच्या उशाशी बसून राहायची 'ड्युटी' होती.

स्टॅलिन यांची प्रकृती गंभीर असल्याचं मेलेन्कोव्ह यांनी सांगितलं.

मेलेन्कोव्ह यांनी तातडीने स्टॅलिन यांची जागा घ्यावी, असा प्रस्ताव बेरिया यांनी मांडला. त्यावर सर्व सहमती होऊन बैठक संपली.

स्टॅलिनसोबत मेलेन्कोव्ह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टॅलिनसोबत मेलेन्कोव्ह

एकीकडे स्टॅलिन यांचा उत्तराधिकारी शोधण्याचं काम सुरू होतं, दुसरीकडे स्टॅलिनची प्रकृती ढासळतच होती.

स्टॅलिन यांचे जवळचे सहकारी विचार करत होते की, स्टॅलिन आता या दुखण्यातून उठणार की नाही. जो मनुष्य अर्धवट शुद्धीत होता आणि शेवटच्या घटका मोजत होता त्याची धास्ती अजूनही सगळ्यांच्या मनात होती.

जोनाथन ब्रेंट आणि नाउमोव्ह यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, "'5 मार्चला स्टॅलिनला रक्ताची उलटी झाली आणि पोटात अंतर्गत रक्तस्राव व्हायला लागला."

स्टॅलिन यांचे शेवटचे क्षण

या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वांचं लक्ष होतं बेरिया यांच्यावर. ते स्टॅलिनचा हात हातात घेऊन बसले होते. आपणच स्टॅलिन यांच्या किती जवळचे आहोत, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

नंतर स्टॅलिन यांची मुलगी स्वेतलाना यांनी आपल्या 'ट्वेंटी लेटर्स टू अ फ्रेंड'मध्ये लिहिलं आहे, "त्यांचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. ओठ काळे पडले होते आणि चेहरा ओळखूही येत नव्हता. शेवटच्या क्षणी त्यांनी अचानक आपले डोळे उघडले आणि खोलीत असलेल्या प्रत्येकावरून नजर फिरवली. आपला हात उचलून ते कोणाकडे तरी इशारा करत होते, जणूकाही शाप देण्याचा प्रयत्न करत होते. पुढच्याच क्षणी त्यांचे प्राण गेले."

तारीख होती 5 मार्च 1953... वेळ सकाळी 9 वाजून 50 मिनिटं

सर्व नेते एकमेकांना मिठी मारून रडायला लागले. ख्रुश्चेव्ह यांनी स्वेतलानाला जवळ घेऊन आपली सहानुभूती व्यक्त केली.

स्टॅलिनचे शेवटचे क्षण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टॅलिनचे शेवटचे क्षण

दोन दशकं रशियात स्टॅलिनकडे महान व्यक्ती म्हणून पाहिलं जात होतं. त्यामुळे सोव्हिएत संघातील नेत्यांनी ठरवलं की, त्यांच्या पार्थिवासोबत तेच करायचं जे स्टॅलिननं लेनिनच्या पार्थिवासोबत केलं होतं.

स्टॅलिनचं पार्थिव सुरक्षित ठेवण्यासाठी लेप लावण्याचा निर्णय घेतला गेला. 9 मार्च 1953ला स्टॅलिनवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कम्युनिस्ट देशातील वर्तमानपत्रांनी स्टॅलिनबद्दल एका सुरात लिहिलं होतं- 'इतिहासातील एक महापुरूष आपल्यात राहिला नाही.'

पाश्चिमात्य देशातून उमटलेल्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. त्यांनी स्टॅलिन यांनी मानवतेविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांना उजाळा देतानाच सोव्हिएत संघाच्या आर्थिक कायापालटाचं आणि हिटलरविरोधात रशियानं मिळवलेल्या विजयाचं श्रेय स्टॅलिनलाच दिलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)