निकोलस चाचेस्कू : दिवसातून वीस वेळा अल्कोहोलनं हात धुणाऱ्या 'या' क्रूर हुकूमशहाबद्दल माहितीये?

निकोलस चाचेस्कू

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

रोमानियामध्ये निकोलस चाचेस्कू यांनी 60 च्या दशकामध्ये केलेल्या अत्याचाराच्या बातम्यांवर अनेकांना आजच्या काळात विश्वासही बसणार नाही.

चाचेस्कूनं 25 वर्षं देशातील माध्यमं पूर्णपणे निर्बंधांखाली ठेवली. एवढंच नाही तर त्यानं देशामध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तू, तेल आणि पाण्याबरोबरच औषधांवरही निर्बंध लादले होते.

या सर्वांचा परिणाम म्हणजे हजारो लोक विविध आजार आणि उपासमारीला बळी पडले. त्यातच चाचेस्कू यांच्या गुप्त पोलिसांनी म्हणजे 'सेक्योरिटेट' नं लोकांच्या खासगी जीवनात ते काय करत आहेत, याची हेरगिरीही करायला सुरुवात केली होती.

चाचेस्कू यांना संपूर्ण रोमानियामध्ये 'कंडूकेडर' म्हणून ओळखलं जात होतं. याचा अर्थ 'नेता' असा होतो, तर त्यांच्या पत्नी एलिना यांना 'राष्ट्रमाते'चा किताब देण्यात आला होता.

सावलीलाही घाबरायचे रोमानियाचे लोक

रोमानियामध्ये भारताचे राजदूत राहिलेले राजीव डोगरा यांनीदेखिल रोमानियातील चाचेस्कू यांच्या दहशतीबद्दल सांगितलं. राजीव रोमानियाला गेले होते तेव्हा चाचेस्कूच्या काळाला दहा वर्षं होऊन गेली होती. तरीही लोकांमध्ये त्याची दहशत होती, असं ते म्हणाले.

"मी जेव्हा पदभार स्वीकारण्यासाठी रोमानियाला पोहोचलो तेव्हा लोक अक्षरशः सावलीलाही घाबरत होते, अशी परिस्थिती होती. लोक रस्त्यावर चालतानाही वारंवार मागं फिरून पाहायचे, कोणी आपला पाठलाग तर करत नाही, अशी भीती कायम लोकांना असायची," असं डोगरा सांगतात.

"नागरिक पार्कमध्ये असायचे तेव्हा कोणी आपल्यावर पाळत तर ठेवत नाही ना, याची काळजी लोकांना असायची. चाचेस्कूच्या काळात वृत्तपत्राला छिद्र करून गुप्तहेर लोकांकडे नजर ठेवत असायचे," असंही ते म्हणाले.

घराच्या खिडक्या उघड्या ठेवण्याचा आदेश

रोमानियातील महिला कार्मेन बुगान यांचे वडील चाचेस्कूचे विरोधक होते. गोपनीय पोलीस सिक्युरिटेटने 10 मार्च 1982 ला त्यांच्या गावातील घरी छापा मारला होता. त्यानंतर पाच वर्षं त्या कुटुंबानं जे काही केलं त्यावर त्यांनी पाळत ठेवली. एवढंच नाही तर घरात बोललेला शब्दन् शब्ददेखील रेकॉर्ड करण्यात आला होता.

चाचेस्कू

फोटो स्रोत, Getty Images

"मी शाळेतून घरी आले तेव्हा, माझ्या घरात सगळीकडं पोलीस होते. ते आमच्या घरात सगळीकडं मायक्रोफोन लपवत होते. माझ्या आई-वडिलांच्या सिगारेट ते पित होते आणि कोणालाही न विचारता कॉफी तयार करत होते," असं कार्मेन बुगान यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

"त्यावेळी मला माहिती नव्हतं पण नंतर समजलं की, माझ्या वडिलांनी बुखारेस्टमध्ये चाचेस्कूच्या विरोधात पत्रकं वाटली होती. माझे वडील तेव्हा अंडरग्राऊंड होते आणि माझी आई रुग्णालयात."

"ते आमच्या घरातलं सर्व अन्न घेऊन गेले आणि आठवडाभर आम्हाला केवळ पाण्यावर जगावं लागलं."

"बाहेर कितीही थंडी असली तरी घराच्या खिडक्या कायम उघड्याच ठेवायच्या असा आदेश आम्हाला देण्यात आला होता. त्यामुळे त्यांना आमच्यावर पाळत ठेवता येणार होती. मी शाळेत जायचे तेव्हा एक गुप्तहेर आमच्या मागे असायचा. मला अजूनही त्याचा ब्राऊन कोट आणि टोपी आठवते. शाळा सुटेपर्यंत तो शाळेच्या गेटवर वाट पाहत असायचा," असं कार्मेन सांगतात.

उंच दिसेल असे फोटो काढण्याच्या सूचना

चाचेस्कू यांची उंची कमी होती. ते केवळ 5 फूट 4 इंचांचे होते. मात्र, त्यांनी सर्व फोटोग्राफरला सूचना दिल्या होत्या की, त्यांची उंची जास्त दिसेल असेच फोटो काढायचे.

70 वर्षांच्या वयानंतरही त्यांचे वयाच्या 40 व्या वर्षांत काढलेले फोटो प्रकाशित होत होते. त्याच्या शेजारी सुंदर महिलेनं उभं राहून फोटो काढलेलं मात्र, एलिना यांना आवडत नव्हतं.

चाचेस्कू यांची पत्नी एलिना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चाचेस्कू यांची पत्नी एलिना

एलिना यांनी अनेक विषयांमध्ये नापास झाल्यानंतर 14 व्या वर्षी शिक्षण सोडलं होतं. पण रोमानियाच्या 'फर्स्ट लेडी' बनल्यानंतर त्यांनी रसायनशास्त्रात 'पीएचडी' केली असल्याचं जाहीर केलं. त्यामुळं ही पदवी खोटी होती हे स्पष्टच आहे.

अब्जावधी डॉलर खर्चून बनवली जगातील दुसरी सर्वात मोठी इमारत

चाचेस्कू रोमानियाला जागतिक महासत्ता बनवू इच्छित होते. त्यासाठी लोकसंख्या जास्त असणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी गर्भपातावर बंदी लादली होती.

याच कारणामुळं संपूर्ण रोमानियामध्ये घटस्फोट घेणंही कठीण बनलं होतं. चाचेस्कूची उंची कमी असल्याने त्यांना मात्र प्रत्येक मोठी वस्तू आवडत होती.

त्यांनी बुखारेस्टमध्येही अब्जावधी डॉलरचा खर्च करून 'पीपल्स हाऊस' तयार केलं होतं. त्याच्या हिटिंग आणि वीजेचा खर्च आजच्या काळात लाखो डॉलरवर पोहोचला आहे. ही इमारत तयार केल्यानंतर 25 वर्षांनंतरही त्यातील 70 टक्के खोल्या अजूनही रिकाम्या आहेत.

हाउस ऑफ पीपल्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हाउस ऑफ पीपल्स

सुमारे 15,000 मजुरांनी तीन शिफ्टमध्ये काम करत ही इमारत तयार केली होती. चाचेस्कू नेहमी या इमारतीची पाहणी करण्यासाठी येत. डिसेंबर 1989 च्या दरम्यान तर ते आठवड्यात तीन-चार वेळा तिथं जाऊ लागले होते.

"15000 मजुरांसाठी तिथं एकही 'टॉयलेट' तयार करण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे मजूर त्यांना शक्य तिथंच स्वतःची व्यवस्था करत होते, " चाचेस्कूंचं आत्मचरित्र 'द लाइफ अँड एव्हिल टाइम्स ऑफ निकोलाई चाचेस्कू' यात जॉन स्विनी यांनी लिहिलं आहे.

"संपूर्ण इमारतीमध्ये यामुळे दुर्गंधी पसरली होती. चाचेस्कू येणार अशी माहिती मिळताच मजुरांचा एक गट चाचेस्कू पाहणी करणार असलेल्या भागात जाऊन स्वच्छता करत होता. एक दिवस चाचेस्कू ठरलेल्या (स्वच्छ केलेल्या) जागेशिवाय दुसरीकडं वळले, त्याठिकाणी थोडा अंधार होता. अंधारात त्याचा पाय घाणीवर पडला आणि बूट पूर्णपणे भरले."

दिवसातून वीस वेळा अल्कोहोलने धुवायचे हात

"हे पाहून काही मजुरांना हसू आलं. पण 'सेक्युरिटेट' चे पोलीस त्यांना रागानं पाहू लागल्यानंतर ते मजूर दुसरीकडं पाहायला लागले होते."

"सेक्युरिटेटमधील एक जण चाचेस्कूंच्या बुटावर लागलेली घाण स्वच्छ करू लागला. चाचेस्कू घाणेरडे बूट घेऊन कारकडे वळले. ते जिथं-जिथं पाय ठेवत होते, त्याठिकाणी बुटाला लागलेल्या घाणीचे ठसे उमटत होते. पण कुणाचीही हसायची हिम्मतही झाली नाही. कुठंतरी स्फोट झाला असावा अशी शांतता पसरली होती."

"चाचेस्कू स्वच्छतेसाठी जणू वेडे होते. इन्फेक्शन व्हायला नको म्हणून तो दिवसातून वीस-वीस वेळा अल्कोहोलनं हात धुवायचे. त्यामुळे या प्रकारामुळे चाचेस्कूची काय अवस्था झाली असावी याची कल्पना न केलेलीच बरी."

"नंतर 'सेक्युरिटेट' नं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. पण यासाठी जबाबदार कोण हेच कळू शकलं नाही. त्यामुळे या घटनेचा उल्लेख कुठंही न करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आला."

सोव्हिएत संघाला थेट विरोध

चाचेस्कू सोव्हिएतच्या शिबिरात राहिले होते. पण तरीही चाचेस्कूंना सोव्हिएत संघाला त्रास देण्यात मजा येत होती. त्यामुळे ते नेहमी सोव्हीएत संघावर टीका करणाऱ्या जागतिक नेत्यांना आमंत्रण देत.

1966 मध्ये त्यानं चीनचे पंतप्रधान शाओ एन लाय यांना रोमानियाला बोलावलं. त्यानंतर 1967 मध्ये अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन त्यांच्या भेटीसाठी गेले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्यासोबत चाचेस्कू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्यासोबत चाचेस्कू

"सोव्हिएत संघानं साम्यवादाच्या विरोधातील बंड मोडीत काढण्यासाठी झेकोस्लोव्हाकियावर हल्ला केला. हा चाचेस्कू यांच्या जीवनातील मोठा क्षण होता," असं काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालेल्या 'हाऊ टू बी अ डिक्टेटर' लिहिणारे फ्रँक डिकोटेर यांनी लिहिलं आहे.

बुल्गारिया, पोलंड आणि हंगेरीनं सोव्हिएत संघाच्या समर्थनार्थ सैनिक पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं. पण रोमानिया मात्र सोव्हिएत संघाच्या बाजूनं उभा राहिला नाही.

"त्यानंतर जेव्हा हल्ल्यासाठी प्रागमध्ये सोव्हिएत संघाच्या रणगाड्यांनी प्रवेश केला, त्यावेळी चाचेस्कूंनी पॅलेस स्क्वेअरमध्ये एक मोठी सभा घेतली. या सभेत बोलताना त्यानं लियोनिद ब्रेझनेव्हच्या या पावलाची टीका केली. ही सर्वांत मोठी चूक असल्याचंही चाचेस्कूंनी म्हटलं. या पावलामुळे युरोपातील शांततेला धोका निर्माण झाला असल्याचं, चाचेस्कूंनी म्हटलं. तसं म्हटल्यानं ते जणू एका रात्रीत हिरो बनले होते."

चाचेस्कू चीनला गेले तेव्हा त्याठिकाणच्या सर्व प्रमुख नेत्यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. रस्त्याच्या दोन्ही कडेनं बीजिंगमधील हजारो नागरिक हात दाखवून त्यांच्याबाबत आदर व्यक्त करत होते.

बीजिंगच्या तिआनानमेन चौकात त्यांच्यासाठी एक मोठा जिम्नॅस्टिक शोदेखील आयोजित करण्यात आला होता. पण हिटलरच्या पहिल्या दौऱ्याप्रमाणंच चीनमधील हा सर्व प्रकार केवळ एक दिखावा होता, हे चाचेस्कूंच्या लक्षातच आलं नाही.

चीनमधून परतल्यानंतर चाचेस्कूंनी त्याच्या देशात जणू नवी सांस्कृतिक क्रांती सुरू केली होती. त्यांनी माध्यमांवरची निर्बंध जरा कमी केली होती. त्यानंतर टीव्हीवरही काही विदेशी कार्यक्रम दाखवले जाऊ लागले होते. पण ही सूट अगदी नाममात्र होती, कारण त्यांच्या समाजवादी विचारसरणीच्या सरकारमध्ये लेनिनवाद आणि मार्क्सवाद यालाच प्राधान्य राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

मोठ्या अक्षरांमधील नावं

चाचेस्कूंनी स्वतःबद्दल अनेक अफवा पसरवलेल्या होत्या. त्यांचं आत्मचरित्र लिहिणारे फ्रेंच लेखक मायकल पियर हेल्मेट यांनी ते अत्यंत गरीब कुटुंबात जन्मला होते असं लिहिलं होतं. ते अनवाणी पायांनी शाळेत जात होते, अशा काही अफवा पसरवल्या होत्या.

1972 मध्ये डोनाल्ड चॅचलोव्ह यांनी लंडनमध्ये त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित केलं होतं. त्यामुळे चाचेस्कू यांना अफवा पसरवण्यात आणखी मदत झाली. त्यांनी पुस्तकात लिहिलेल्या काही गोष्टींना अनुमोदनही दिलं. तसंच त्याच्या किती प्रति छापायच्या हेही सांगितलं.

पुस्तकाचं कव्हर

काही माध्यमं चाचेस्कूंची प्रचंड खुशामत करू लागले होते. रोमानियातील प्रमुख वृत्तपत्र 'सिनतिया' मध्ये तर चाचेस्कूंना रोमानियाचा ज्युलियस सीझर, नेपोलियन, ग्रेट पीटर आणि लिंकनदेखील म्हटलं जाऊ लागलं होतं.

त्यांच्या 60 व्या वाढदिवसाला कौंसटानटिन पिरवुलेस्कू या रोमानियातील दुसऱ्या एका राजकीय नेत्यांनं तर त्यांना इतिहासातील सर्वांत लोकप्रिय नेता असा किताबच देऊन टाकला होता.

त्यांची व्यक्ती पूजा करून घेण्याचं प्रमाण एवढं वाढलं होतं की, त्याॆची नावं मोठ्या-मोठ्या अक्षरांमध्ये लिहायला सुरुवात झाली होती. त्यांना दोन वेळा रोमानियातील सर्वोच्च नागरी पुरस्कार 'हिरो ऑफ द सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ रोमानिया'नं गौरवण्यात आलं होतं.

युगोस्लोव्हाकियानं त्यांना 'हिरो ऑफ सोशलिस्ट लेबर' चा किताब दिला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी त्यांना सपत्किन व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करून त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं होतं.

महाराणीबरोबर बग्गीतून प्रवास

1979 मध्ये चाचेस्कू इंग्लंडच्याला गेले होते. त्याठिकाणी महाराणी एलिझाबेथ यांच्या बग्गीमध्ये बसून लंडनच्या रस्त्यांवर त्यांनी फेरफटका मारला होता. बकिंगहॅम पॅलेसमध्ये त्यांचा पाहुणचार करण्यात आला होता.

पण त्याठिकाणी चाचेस्कूंना वाढलेले अन्नपदार्थ 'सेक्युरिटेट'चे सदस्य आधी स्वतः खाऊन पाहत होते. त्यामुळं काहीशी विचित्र स्थिती निर्माण झाली होती.

चाचेस्कू ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्यासोबत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चाचेस्कू ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्यासोबत

"वरवर पाहता चाचेस्कूंची ही भेट यशस्वी ठरली होती. कारण इंग्लंडच्या महाराणीनं त्यांना पॉइंट 270 बोअरची एक टेलिस्कोपिक रायफल भेट दिली आणि एलिना यांना सोन्याचा आणि हिऱ्याचा एक 'ब्रोच' भेट म्हणून दिला होता," असं जॉन स्विनीनं त्याच्या 'द लाईफ अँड एव्हिल टाइम्स ऑफ निकोलाई चासेस्कू'मध्ये लिहिलं आहे.

"बकिंगहॅम पॅलेस त्या काळापासून आजपर्यंत उत्तम पाहुणचारासाठी प्रसिद्ध आहे. पण तिथंही चाचेस्कू प्रत्येकाशी हात मिळवल्यानंतर अल्कोहोलनं हात धुवायचो, हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं."

"त्यासाठी चाचेस्कूंच्या 'स्विट'च्या तिन्ही बाथरूममध्ये अल्कोहोलची एक एक बाटली ठेवण्यात आली होती."

इंग्लंडच्या महाराणीची नाराजी

"महाराणी एलिझाबेथ यांनाही लवकरच लक्षात आलं होतं की, आपण एका वेगळ्याच व्यक्तिचा पाहुणचार करत आहोत," असंही स्विनी यांनी लिहिलं आहे.

चाचेस्कू

फोटो स्रोत, Getty Images

"एक दिवस सकाळी चाचेस्कू पथकासह बकिंगहॅम पॅलेसच्या गार्डनमध्ये फिरायला गेले होते. पॅलेसच्या खोलीतील प्रत्येक शब्द टॅप केला जात असावा असा संशय त्यांना आला होता. त्यामुळं सहकाऱ्यांशी बोलण्यासाठी ते गार्डनमध्ये गेले होते.

योगायोग म्हणजे, त्यावेळी महाराणीही गार्डनमध्ये फिरत होत्या. चाचेस्कूंना पाहून त्या एका झाडाच्या आडोशाला लपल्या. त्याचवेळी महाराणीनं रोमानियाच्या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला होता."

अन्नावर निर्बंध आणि हिटिंगवर बंदी

चाचेस्कूंचा शासनकाळ हा संपूर्ण रोमानियाच्या जनतेसाठी अत्यंत कठीण होता. लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी मोठ्या रांगा लावाव्या लागत होत्या. कसायाच्या दुकानावर कोंबडीच्या पायांशिवाय दुसरं काहीही मिळत नव्हतं.

दुकानांमध्ये फळं नसल्यासारखीच होती. कधी-कधी सफरचंद आणि पीच दिसत होते. 'वाइन' तर सामान्य लोकांना मिळणं कठीण होतं. मोजक्या काही रेस्तराँमध्ये ती मिळायची.

"सर्वांत मोठी अडचण वीजेची होती. तीनमधला केवळ एक बल्ब सुरू असायचा. सार्वजनिक वाहनं चालवण्यास रविवारी बंदी होती. औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीसाठी चाचेस्कू यांनी पाश्चिमात्य देशांतून मोठ्या प्रमाणावर कच्चा माल आणि यंत्र आयात केली होती. पण 1979 मध्ये तेलाच्या किमती वाढल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर व्याज भरून कर्ज घ्यावं लागलं होतं," असं फ्रँक डिकोटेर यांनी त्यांच्या 'हाऊ टू बी अ डिक्टेटर' मध्ये लिहिलं आहे.

"अचानकच त्यांनी सर्व कर्ज एकाचवेळी फेडण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम म्हणजे आर्थिक सूट मिळू लागली. आयात कमी करण्यात आली आणि निर्यात वाढली."

चाचेस्कू

फोटो स्रोत, Getty Images

"सोव्हिएत संघाला जाणारी मांसाची निर्यात दोन वर्षांत तिप्पट करण्यात आली. फळं, भाज्या आणि वाईन सर्व विदेशी बाजारात पाठवल्या जाऊ लागल्या."

"खाण्या-पिण्यावरही निर्बंध लादण्यात आले. वीजेच्या वापरातही कपात करण्यात आली. लोक कडाक्याच्या थंडीत अंधारात हिटिंग न करता थंडीनं कुडकुडत राहण्याशिवाय लोकांकडं दुसरा पर्याय नव्हता."

"त्यातही चाचेस्कूंमुळे ज्या लोकांचं जीवन नरकासमान बनलं होतं, त्या लोकांनीच आपले उपकार मानावे अशी चाचेस्कूंची अपेक्षा होती."

पाठीमागे दूषणं देत होते लोक

चाचेस्कूंच्या व्यक्तीपूजेचं प्रमाण एवढं वाढलं होतं की, शाळेच्या अभ्यासक्रमाच्या प्रत्येक पुस्तकामध्ये पहिल्या पानावर त्याचा फोटो असावा, असा कायदाच करण्यात आला होता.

टीव्हीवर केवळ एक चॅनल चालायचं. त्यावरही चाचेस्कूंशी संबंधित घडामोडी आणि त्याच्या यशाचं गुणगाण असायचं.

पुस्तकांची दुकानं आणि म्युझिक स्टोर्समध्ये त्याच्या भाषणांचा संग्रह असणं अनिवार्य होतं. अगदी लहान सहान निर्णयांसाठीही चाचेस्कूंची परवानगी घ्यावी लागत होती.

चाचेस्कू

फोटो स्रोत, Getty Images

अगदी रस्त्यांची नावं बदलण्यासाठीही त्यांची परवानगी घ्यावी लागत होती. दोन फुटबॉल टीममध्ये सामना असेल तेव्हा जिंकणार कोण हे चाचेस्कूंची बायको ठरवत होती. शिवाय हा सामना टीव्हीवरही दाखवला जात नव्हता.

"वरवर तर सगळे चाचेस्कूंचं गुणगाण करत होते. पण मनातून सगळे त्यांना दूषणं देत होते. चाचेस्कू एखाद्या कार्यक्रमात उद्घाटनासाठी किंवा फिरण्यासाठी आले असतील तर लोक त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचे. पण ते जाताच त्याच्याबद्दल वाईट-साईट बोलायलाही सुरुवात होत होती," असं डिकोटर म्हणतात.

21 डिसेंबर 1989 चं अंतिम भाषण

17 डिसेंबर 1979 ला रोमानियाच्या सैनिकांनी तिमिस्वाराच्या आंदोलकांवर गोळीबार केला. त्यानंतर संपूर्ण देशात आंदोलनांचं सत्र सुरू झालं होतं.

21 डिसेंबर 1989 ला निकोलाई चाचेस्कू यांनी बुखारेस्टमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पक्षाच्या मुख्यालयाच्या बाल्कनीतून एका सभेला संबोधित केलं. पण भाषण सुरू झाल्यानंतर काही वेळातच मागून शिट्या आणि घोषणांचे आवाज येऊ लागले होते.

चाचेस्कूंनी हात वर केला आणि माईकला 'टॅप' करून लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण मागचा गोंधळ सुरुच होता.

चाचेस्कू

फोटो स्रोत, Getty Images

चाचेस्कूंनादेखील हे पाहून आश्चर्य वाटलं. त्यांची पत्नी एलिनानंही गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. 'शांत व्हा, तुम्हाला काय झालंय?' असं त्या ओरडत होत्या.

पण गर्दीवर त्याचा फारसा काही परिणाम झाला नाही. रूक्ष आवाजामध्येच त्यांनी चाचेस्कूंना किमान वेतनामध्ये वाढ करण्याची घोषणा करण्याचा सल्ला दिला.

त्यांनी तसं केलंही, पण लोकावंर त्याचाही काही परिणाम झाला नाही. थोड्या वेळात सभेच्या ठिकाणी दंगली सुरू झाल्या.

क्रांतीची सुरुवात

हे भाषण टीव्हीवर लाइव्ह दाखवलं जात होतं. हे दृश्य संपताच लोकांना क्रांतीची सुरुवात झाल्याची जाणीव झाली होती.

त्यानंतर संपूण देशातले लोक आंदोलनात सहभागी झाले. सगळीकडं सरकारी इमारती, कार्यालयांवर हल्ले सुरू झाले. चाचेस्कूंचे फोटो फाडले जाऊ लागले होते.

चाचेस्कूंनी 'सेक्युरिटेट' ला बंड मोडून काढण्याचे आदेश दिले. रात्रभर बंडखोरांवर गोळीबार सुरू होता, पण बंड शमवण्यात त्यांना यश आलं नाही.

पळताना लिफ्टमध्ये अडकले

दुसऱ्या दिवशी या बंडामध्ये लष्करही सहभागी झालं. संतप्त आंदोलकांनी पक्षाच्या मुख्यालयाला घेराव घालण्यास सुरुवात केली. एलिना आणि चाचेस्कूंना हेलिकॉप्टरमधून पळून जावं लागलं. पण त्याआधी बरंच मोठं नाट्य घडलं.

चाचेस्कू लिफ्टमधून इमारतीच्या छतावर गेले. त्याठिकाणी त्याचं हेलिकॉप्टर होतं. ते लिफ्टमध्ये जाताच त्यांचे लष्करप्रमुख जनरल स्टॅनकुलुस्कू कारमधून संरक्षण मंत्रालयाकडे रवाना झाल्याचं स्विनी यांनी म्हटलं आहे.

"कारमधूनच त्यांनी सुरक्षा पथकांना इमारतींचं संरक्षण करू नका असे आदेश दिले. सैनिक इमारतींमधून हटताच आंदोलक घुसले. पण चाचेस्कू इमारतीतच असल्याचं आंदोलकांना माहिती नव्हतं. कारण चाचेस्कू असलेल्या लिफ्टचा दरवाजा अडकला होता.

चाचेस्कू

फोटो स्रोत, Getty Images

अनेक प्रयत्नांनंतर दरवाजे तोडून चाचेस्कू बाहेर पडले. आंदोलक छतावर पोहोचताच, सहा लोकांना घेऊन 'इकुरिऊ' हेलिकॉप्टरनं तिथून उड्डाण घेतलं. पण हेलिकॉप्टरमध्ये एवढी कमी जागा होती की, पायलटच्या सहकाऱ्याला चाचेस्कूंच्या मांडीवर बसून जावं लागलं."

क्रूर अंत

पायलटनं राजधानी बुखारेस्टच्या बाहेर एका शेतात हेलिकॉप्टर उतरवलं. चाचेस्कू दाम्पत्याला त्यांच्या अंगरक्षकासह तिथं सोडून हेलिकॉप्टर निघून गेलं.

चाचेस्कू

फोटो स्रोत, Getty Images

त्यादिवशी चाचेस्कू आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली होती. ख्रिसमसच्या दिवशी दोघांवर लष्करी न्यायालयात खटला चालवण्यात आला आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

दोघांचे हात बांधून एका भिंतीसमोर त्यांना उभं करण्यात आलं. आधी दोघांना वेग-वेगळी गोळी मारली जाणार होती. पण एलिना यांनी सोबत मरण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यानंतर सैनिकांनी निशाणा लावला आणि 25 वर्षांपर्यंत रोमानियावर राज्य करणाऱ्या निर्दयी हुकूमशहा निकोलाई चाचेस्कूचा अंत झाला.

मार्क्सवादाचे प्रणेते कार्ल मार्क्स यांनी अगदी योग्यच म्हटलं आहे, "व्यक्ती आपला इतिहास स्वत: निर्माण करतात, पण इतिहास हा कधीही त्यांच्या मनाप्रमाणे निर्माण होत नसतो."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)