किम जोंग उनच्या आजोबांपासून उत्तर कोरियात कशी झाली हुकूमशाहीची सुरूवात?

उत्तर कोरिया, किम इल संग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किम इल संग
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

14 ऑक्टोबर 1945 रोजी उत्तर कोरियातील प्योंगयांग शहरातल्या स्टेडियममध्ये रेड आर्मीचं स्वागत करण्यासाठी एक मोठी सभा आयोजित करण्यात आली होती.

सोव्हिएत अधिकाऱ्यांच्या गराड्यात किम इल संग यांनी त्या दिवशी पहिल्यांदा भाषण केलं. त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त 33 वर्षं.

दोन्ही हातांनी भाषणाचा कागद पकडून असलेले किम इल संग आतून घाबरल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. त्यांचे केस अगदी बारीक कापलेले होते आणि त्यांनी निळ्या रंगाचा सूट घातला होता. सूट इतका घट्ट होता की त्यांनी तो कुणकडून तरी मागितला असावा, हे स्पष्ट जाणवत होतं. तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीला ते 'एखाद्या चिनी ढाब्यावरचा डिलिव्हरी बॉय' वाटले.

किम

फोटो स्रोत, Getty Images

भरीस भर म्हणजे त्यांना कोरियन भाषाही नीट बोलता येत नव्हती. कारण 33 वर्षांच्या आयुष्यातली 26 वर्ष त्यांनी विजनवासात घालवली होती आणि कोरियाचं नेतृत्त्व करण्यासाठी सोव्हिएतची त्यावेळी पहिली पसंती चो मान सिक यांना होती.

किम इल संग यांचं पहिलं भाषण फ्लॉप ठरलं. मात्र, किमच्या भाग्याने त्यांची साथ सोडली नाही. कारण स्टॅलिनला हे लवकरच कळून चुकलं की चो कम्युनिस्टही नव्हते आणि त्यांना कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचवताही येणार नव्हतं.

चो यांनी कोरियाचा राज्यकारभार चालवण्यासाठी रशियाकडे अनेक अशा मागण्या केल्या ज्या रशियाला पसंत पडल्या नाही. त्यामुळे किम इल संग आपल्यासाठी कितीतरी जास्त फायदेशीर आणि म्हणणं ऐकणारे आहे, असं रशियाला वाटू लागलं.

अशाप्रकारे 9 सप्टेंबर 1948 रोजी डेमोक्रेटिक पिपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाची स्थापना झाली आणि किम इल संग यांच्या हाती नेतृत्त्वाची कमान देण्यात आली.

दक्षिण कोरियावर आक्रमण

किम इल संग यांनी देशाची सूत्रं हाती येताच जपानविरोधी संघर्षात सहभागी झालेल्यांना घेऊन कोरियन पिपल्स आर्मीची स्थापना केली. मॉस्कोला जाऊन त्यांनी दक्षिण कोरियावर आक्रमण करण्यासाठी रशियाची मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, उत्तर कोरियावर हल्ला झाला तरच प्रतिहल्ला करावा, असं स्टॅलिन यांनी स्पष्ट केलं.

उत्तर कोरिया, किम इल संग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोविएत संघाचे जोसेफ स्टॅलिन

'Under the Loving Care of the Fatherly Leader' या पुस्तकात लेखक ब्रॅडली मार्टिन लिहितात, "किम यांनी प्रस्ताव सादर केल्यावर जवळपास वर्षभरानंतर स्टॅलिन आक्रमणासाठी राजी झाले. मात्र, माओने होकार दिलाच तरच आपण होकार देऊ, अशी त्यांची अट होती."

"किम 1950 साली बीजिंगला गेले आणि हल्ल्यासाठी माओंना तयार केलं. 25 जून 1950 रोजी पहाटे उत्तर कोरियाचे जवान दीडशे T-34 रशियन टँक घेऊन दक्षिण कोरियात घुसले. काही दिवसातच उत्तर कोरियाच्या सैन्याने बुसान जवळचा काही भाग सोडून संपूर्ण दक्षिण कोरियावर कब्जा केला."

उत्तर कोरिया, किम इल संग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे जपानमधील कमांडर जनरल डग्लस मेकार्थर

अमेरिकेकडून भयंकर बॉम्बहल्ला

जपानमध्ये अमेरिकी सैन्याचे कमांडर जनरल डग्लस मॅकार्थर यांना या हल्ल्यामुळे जरा आश्चर्य जरूर वाटलं. मात्र, त्यांनी तात्काळ प्रत्युत्तरादाखल कारवाई करत सेऊलच्या पश्चिमेला इंचियानमध्ये अमेरिकी जवान तैनात केले. सहा महिने युद्ध सुरू होतं आणि सहा महिन्यांनंतर उत्तर कोरियाच्या सैन्याला त्यांनी सुरुवात केली त्या ठिकाणापर्यंत मागे ढकलण्यात आलं.

उत्तर कोरिया, किम इल संग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हवाई युद्ध

पुढची अडीच वर्षं दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ले सुरू होते. मात्र, कुणाचाही निर्णायक विजय झाला नाही.'The Korean War : A History' या पुस्तकात लेखक ब्रूस क्युमिंग्ज लिहितात, "हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्‌वस्त केल्यानंतर पाच वर्षांनी मॅकार्थर यांनी अत्यंत गांभीर्याने उत्तर कोरियावर अणुबॉम्ब हल्ला करण्यावर विचार केला. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नाही.

मात्र, त्यानंतर अमेरिकेने उत्तर कोरियाावर 6 लाख 35 हजार टन वजनाचे बॉम्ब टाकले. यातले 2 लाख बॉम्ब एकट्या पियाँगयाँग शहरावर टाकण्यात आले. म्हणजे प्रत्येक माणसासाठी एक बॉम्ब."

एवढ्या मोठ्या विध्वंसानंतरही दक्षिण कोरिया किंवा उत्तर कोरिया दोघांपैकी कुणा एकाचाही निर्णायक विजय होत नाही, हे लक्षात आल्यावर दोन्ही पक्षांनी 27 जुलै 1953 साली युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

सामान्य नागरिकांवर पाळत

युद्ध संपल्यानंतर किम इल संग यांनी युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या उत्तर कोरियाला पुन्हा सावरलं. पुढची दहा वर्षं एकाच पक्षाच्या सरकारने आपल्या लोकांवर इतकं नियंत्रण ठेवलं की कुणी काय शिकावं, कुणी काय बोलावं, कुणी कुठे रहावं आणि कुणी कुठे प्रवास करावा, या सर्वांचा निर्णय सरकारच घ्यायचं.

किम

फोटो स्रोत, Getty Images

आंद्रे नालकोव्ह 'The Real North Korea : Life and Politics in Failed Stalinist Utopia' या पुस्तकात लिहितात, "गुप्तहेर प्रत्येक नागरिकावर पाळत ठेवून असायचे. विरोध करणाऱ्याला उत्तरेकडच्या दुर्गम डोंगराळ भागात उभारलेल्या कामगार शिबिरांमध्ये काम करायला पाठवलं जायचं. उत्तर कोरिया 'सैनिकी नजरबंदीची मानसिकता' असणारा देश बनला. सरकारी सैनिक कुठल्याही व्यक्तीच्या खाजगी जीवनावर अतिक्रमण करू शकतात, याची कायम भीती असायची."

व्यक्तिपूजेचा कळस

1955 साली उत्तर कोरियात मोठा दुष्काळ पडला. अनेक मुलं बर्फाच्या पावसात अनवाणी भीक मागत. खरंतर उत्तर कोरिया आर्थिक मदतीसाठी पूर्णपणे चीन आणि सोव्हिएत युनियनवर अवलंबून होता. मात्र, तरीही हळूहळू मार्क्स, लेनिन आणि स्टॅलिन यांची चित्रं सार्वजनिक ठिकाणांवरून काढली जाऊ लागली.

किम

फोटो स्रोत, Getty Images

15 ऑगस्ट 1954 रोजी राष्ट्रीय दिनानिमित्ताने आयोजित संचलनात या नेत्यांचं एकही चित्रं नव्हतं. याउलट प्रत्येक रेल्वे स्टेशन, मंत्रालय आणि हॉटेलमध्ये किम इल संग यांची मोठी मोठी चित्रं लावली होती.

उत्तर कोरियातील सोव्हिएत राजदूत व्ही. इव्हानोव्ह यांनी आपल्या डायरीत लिहिलंय, "व्यक्तीपूजेचा कळस म्हणजे किम इल संग यांचा पदस्पर्श झालेल्या ठिकाणांवर डॉक्युमेंट्री तयार करण्यात आल्या. इतकंच नाही तर किम इल संग यांनी ज्या-ज्या डोंगरावर आराम केला त्या ठिकाणांना प्रेक्षणीय स्थळ बनवण्यात आलं. त्या काळी सर्वत्र किम इल संग दिसायचे. मधमाशा कशा पाळायच्या, फळबागांची देखभाल कशी करायची, सिंचनात कसे बदल करायचे हेसुद्धा किम इल संग सांगायचे."

छोट्या चुकांसाठीही मोठी शिक्षा

या प्रपोगांडासोबतच सर्वत्र भीतीचं वातवरणही होतं. महान नेते किम इल संग यांच्या प्रति अनादराची भावना अजिबात सहन केली जायची नाही.

कोल्ड वॉर इंटरनॅशनल हिस्ट्री प्रोजेक्ट बुलेटिनमध्ये प्रकाशित 'New Evidnce on North Korea in 1956' या लेखात म्हटलं होतं, "एका व्यक्तीला केवळ या कारणासाठी 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली कारण त्याने त्याच्या पुस्तकावर किम इल संग यांचा फोटो असलेल्या वृत्तपत्राचं कव्हर लावलं होतं. एक शेतकरी किम इल संग यांच्या फोटोकडे बोट दाखवून तुम्ही लोकांना यातना देता असं ओरडला म्हणून त्याला 7 वर्षांसाठी कामगार शिबिरात पाठवण्यात आलं."

तीन प्रकारात लोकांची विभागणी

1957 साली उत्तर कोरियातल्या लोकांची तीन प्रकारात विभागणी करण्यात आली आणि या विभागणीचा निकष काय? - किम इल संग यांच्याप्रतीची निष्ठा. पहिल्या प्रकारातल्या लोकांना 'मूळ वर्ग' म्हणण्यात आलं. दुसरा 'अस्थिर वर्ग' आणि तिसरा 'विरोधी वर्ग'. हा विरोधी वर्ग एकूण लोकसंख्येच्या जवळपास 20% होता.

आंद्रे लानकोव्ह 'Crises in North Korea' या आपल्या पुस्तकात लिहितात, "या वर्ग व्यवस्थेच्या आधारावरच सर्व गोष्टी ठरायच्या. एका कुटुंबाला किती धान्य द्यायचं इथपासून ते त्या कुटुंबातली मुलं कुठपर्यंत शिकतील, कुठला व्यवसाय करतील इथपर्यंत. ज्यांचं कुणी नातलग उत्तर कोरियातून पळून दक्षिण कोरियात गेला असेल त्या लोकांना शहरातून गावात धाडलं जाई."

पियाँगयाँमधल्या जवळपास 3 लाख रहिवाशांना ते राजकीयदृष्ट्या विश्वासू नव्हते, केवळ या कारणामुळे शहर सोडून गावात पाठवण्यात आलं. संपूर्ण देशात प्रेमगीतं आणि प्रेमकथांवर बंदी घालण्यात आली. 1968 साली संपूर्ण देशातली परदेशी पुस्तकं जप्त करण्यात आली.

किम इल संग यांची 20 मीटर उंच मूर्ती

1956 साली पियाँगयाँगमध्ये एक मोठं संग्रहालय उभारण्यात आलं. यापैकी 5000 चौरस मीटरवर किम इल संग यांनी जपानविरोधी केलेल्या कारवायांचं प्रदर्शन होतं. या एका संग्रहालयात किम इल संग यांच्या माणसाच्या उंचीच्या 12 मूर्ती होत्या.

किम

फोटो स्रोत, Getty Images

15 वर्षांनंतर हा परिसर 50 हजार चौरस फूट करण्यात आला. संग्रहालयाबाहेर किम इल संग यांची 20 मीटर उंच मूर्ती बसवण्यात आली. रात्री दूरवरूनही मूर्ती दिसावी, यासाठी मूर्तीवर फ्लड लाईट लावले जायचे.

या संग्रहालयात किम इल यांच्या हातमोजे, शूज, बेल्ट, टोप्या, स्वेटर, लेखणी अशा अनेक वस्तू ठेवण्यात आल्या. काही वर्ष किम लोकांसमोर खूप कमी यायचे. मात्र, त्यांची वक्तव्यं प्रत्येक वृत्तपत्रात छापली जायची. प्रत्येक पुस्तकात मग ते इंजीनिअरिंगचं असो किंवा मॉलिक्युलर बायोलॉजीचं त्यात किम इल संग यांच्या कार्याचा आढावा देणं बंधनकारक होतं.

किम

फोटो स्रोत, Getty Images

डे सूक सूह यांनी 'Kim Il Sung : The North Korean Leader' पुस्तकात लिहिलं आहे, "1968 साली तर हद्दच झाली. किम इल संग यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क चुंग ही यांची हत्या करण्यासाठी एक पथक दक्षिण कोरियाला पाठवलं. मात्र, त्यात त्यांना यश मिळालं नाही आणि काही कमांडो घटनास्थळीच मारले गेले. काही दिवसांनंतर पेबलो नावाचं अमेरिकी गुप्तचर जहाज त्यांनी ताब्यात घेतलं. चालक दलाच्या 80 सदस्यांना 11 महिने तुरुंगात ठेवून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. किम इल संग यांनी या मोहिमेत सहभागी जवानांचं सार्वजनिकरित्या अभिनंदन केलं. मात्र, दिर्घ चर्चेनंतर या कैद्यांना सोडण्यात आलं तेव्हा किम यांनी या मोहिमेत सहभागी 12 वरिष्ठ जनरलना पदावरून काढून टाकलं. कुठल्याही हुकूमशहाला ताकतवान जनरलपासून असुरक्षित वाटत असतं."

किम यांच्या चित्रांनाही आदर देण्याची प्रथा

1972 साली किम इल संग यांना पक्षाध्यक्ष या पदाव्यतिरिक्त देशाचे राष्ट्राध्यक्षही घोषित करण्यात आलं. त्यांच्या सन्मानार्थ बॅज काढण्यात आले आणि हे बॅज देशातल्या प्रत्येकाने आपल्या छातीवर लावणं बंधनकारक करण्यात आलं. किम यांच्या 60 व्या वाढदिवसानंतर टीव्हीवरून कारखान्यात शिफ्ट सुरू होण्याआधी कामगार किम इल संग यांच्या चित्राला अभिवादन करताना दाखवणं सुरू झालं. शिफ्ट संपल्यानंतर घरी जाताना पुन्हा एकदा अभिवादन करावं, अशी अपेक्षा असायची.

किम

फोटो स्रोत, Getty Images

हळू-हळू लोकांनी किम इल संग यांचे चिरंजीव किम जोंग इल यांच्याप्रतीही तोच आदर दाखवायला सुरुवात केली. किम इल संग यांनी किम जोंग इल हेच आपले उत्तराधिकारी असतील, अशी घोषणाही केली.

लेप लावून कायमस्वरुपी जतन करण्यात आला मृतदेह

8 जुलै 1994 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी किम इल संग यांचं निधन झालं. तब्बल 34 तास ही बातमी लपवण्यात आली. त्यानंतर रेडियोवरून घोषणा करण्यात आली - 'महान हृदयाची धडधड थांबली.'

यानंतर उत्तर कोरियातील प्रत्येत कार्यालय, शाळा आणि कारखान्यांमध्ये किम इल संग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेकजण ओक्साबोक्शी रडले. किम इल संग यांच्या निधनाच्या धक्क्याने बेशुद्ध पडणाऱ्या लोकांसाठी ठिकठिकाणी डॉक्टर्स आणि नर्स तैनात करण्यात आले. पुढचे काही दिवस किम इल संग यांच्या 20 मीटर उंच मूर्तीसमोर फुलं ठेवणाऱ्यांची प्रचंड गर्दी दिसायची.

टीव्हीवर विमानातल्या कॉकपिटमध्ये बसलेले पायलट, जहाजावरचे खलाशी रडताना दाखवले जायचे. संपूर्ण देशात 10 दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला. या संपूर्ण दिवसात पोलीस गुप्तपणे लोकांचं दुःख बनावट तर नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी लोकांवर लक्ष ठेवून होते.

किम

फोटो स्रोत, Getty Images

किम इल संग यांच्या जागी सत्तेवर आलेले त्यांचे चिरंजीव किम जोंग इल यांनी वडिलांचं पार्थिव कायमस्वरूपी जतन करण्यासाठी त्यावर लेप केला आणि एका मोठ्या मकबऱ्यात तो ठेवला. यानंतर उत्तर कोरियातल्या प्रत्येक शहरात 'इटरनल लाईफ टॉवर' उभारून त्यावर 'महान नेते कायम जिवंत राहतील', असं कोरण्यात आलं.

आज किम इल संग यांचे नातू किम जोंग उन दक्षिण कोरियाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या हुकूमशाहीचे किस्सेही जगभर प्रसिद्ध आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)