गांधी स्मृती समितीच्या मासिकात सावरकरांचं 'कौतुक', त्यावरून वाद का?

    • Author, प्रियंका झा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

महात्मा गांधींचं आयुष्य आणि त्यांच्या विचारांच्या प्रचारासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणारी गांधी स्मृती आणि दर्शन समिती काम करते. समिती 'अंतिम जन' हे मासिक प्रकाशित करते. या मासिकाचा नवा अंक सध्या वादात आहे. हा अंक विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आधारित आहे आणि यात गांधी आणि सावरकर यांची तुलना करण्यात आली आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सावरकरांचं योगदान गांधींच्या बरोबरीचं असल्याचं यात म्हटलं आहे.

अनेक विचारवंत आणि गांधीवादी यावर टीका करत आहेत. विनायक दामोदर सावरकरांचं नाव नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादात राहिलं आहे. देशातला एक वर्ग त्यांना स्वातंत्र्यसैनिक मानतो, तर काही लोक त्यांना कट्टर हिंदुत्वाचे जनक मानतात.

'अंतिम जन'च्या नव्या अंकावरून महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी गांधी स्मृती आणि दर्शन समितीवर टीका केली आहे. "गांधीजींच्या हत्येच्या कटात ज्यांचं नाव पुढे आलं आहे त्यांचा गौरव केला जात आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे," असं ते म्हणाले.

1948 मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर सहा दिवसांनी गांधी हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून सावरकरांना मुंबईतून अटक करण्यात आली होती. मात्र, 1949 च्या फेब्रुवारीमध्ये त्यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

मासिकात समितीच्या उपाध्यक्षांनी 'इतिहासात सावरकरांचे स्थान आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सन्मान महात्मा गांधींपेक्षा कमी नाही,' असा संदेश लिहिला आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या दिल्ली युनिटचे माजी अध्यक्ष विजय गोयल गांधी स्मृती आणि दर्शन समितीचे उपाध्यक्ष आहेत. स्वतः पंतप्रधान या समितीचे अध्यक्ष असतात आणि तेच उपाध्यक्षांची निवड करतात.

अंतिम जनच्या ताज्या अंकात गांधी स्मृती आणि दर्शन समितीचे उपाध्यक्ष विजय गोयल यांचा लेख

"जे एक दिवसही तुरुंगात गेले नाही, छळ सहन केला नाही, देश-समाजासाठी काहीही केलं नाही ते सावरकरांवर टीका करतात."

"देशाच्या स्वांतत्र्य लढ्यात वीर सावरकर यांचं योगदान अमूल्य आहे. देशाच्या आत आणि बाहेर राहून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी पावलं उचलली. इंग्रजांविरोधात मोहिमा राबवत त्यांनी ब्रिटिशांच्या नाकी नऊ आणले. त्यांना अटक करण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, ते अपयशी ठरले. सावरकरांना घाबरलेल्या इंग्रज सरकारने 1910 साली त्यांना जन्मठेप सुनावली आणि 1911 साली पुन्हा एकदा जन्मठेप सुनावली. एखाद्याला दोनदा जन्मठेप सुनावण्याची जगाच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे."

या लेखाच्या शेवटी गोयल लिहितात की, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि यानिमित्ताने सावरकरांसारख्या महान स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मृतीही जागवायला हव्या. या लेखात गोयल यांनी नाशिकच्या तत्कालीन कलेक्टरच्या हत्येसाठी सावरकरांना झालेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेचाही उल्लेख केला आहे.

मासिकात 'एक चिंगारी थे सावरकर', 'गांधी और सावरकर का संबंध', 'वीर सावरकर और महात्मा गांधी', 'देशभक्त सावरकर' यासह एकूण 12 लेख आहेत.

या अंकाविषयी बोलण्यासाठी बीबीसीने विजय गोयल यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे वृत्त लिहेपर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मासिकात सावरकरांवर लेख लिहिणारे डॉ. कन्हैया त्रिपाठी बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाले, "या देशात बऱ्याच गोष्टींवर टीका होत आहे. त्यामुळे सावरकर किंवा इतर कुठल्याही महान व्यक्तीकडे आपण तटस्थपणे बघायला हवं, असं मला वाटतं. टीका करणाऱ्यांचंही स्वागत करायला हवं."

सावरकरांवर विशेषांक काढण्यासाठी गांधी विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी असलेल्या व्यासपीठाची निवड का केली, या प्रश्नाचं उत्तर देताना त्रिपाठी म्हणाले, "अंतिम जन या मासिकात गांधींविषयी बरंच साहित्य प्रकाशित होतं. सावरकरांवरूनही वाद होत असल्याने हा अंक गांधीवादी गटालाही सावरकर समजून घेण्यासाठी गरजेचा आहे. गांधी आणि सावरकर दोन ध्रुव नाही. दोघांचाही हेतू राष्ट्रवाद होता आणि दोघेही देशासाठीच लढत होते."

गांधीजींच्या हत्येच्या आरोपींमध्ये सावरकरांचंही नाव होतं, यावर त्रिपाठी म्हणतात, "यात तथ्य असतं तर त्यांना फासावर चढवण्यात आलं असतं. गांधी हत्येत आपला हात होता, हे सावरकरांनी कधीही मान्य केलेलं नाही आणि कुणीही हे आजवर सिद्धही करू शकलेलं नाही. स्वातंत्र्याबाबत गांधीजी आणि सावरकर दोघांचंही ध्येय एकच होतं. आम्ही त्यांना धर्माच्या कप्प्यात ठेवत नाही."

या अंकाविषयी गांधीजींचे पणतू तुषार गांधी 'यात काहीही आश्चर्य नाही', असं म्हणतात.

तुषार गांधी यांची प्रतिक्रिया

"गांधींसंबंधी संस्थांवर सत्तेत असलेल्या सरकारचं नियंत्रण आलं आहे. हे अपेक्षितच होतं. संस्थांमध्ये आता सरकारचे विचार दिसत आहेत."

"संस्थांमध्ये आता बहुतांश व्यक्ती या सरकारच्या विचारसरणीच्या आहेत आणि त्यामुळे सरकारचं संपूर्ण नियंत्रण आहे. त्यामुळे यात मला काहीही आश्चर्य वाटत नाही. दुर्दैव असं की बापूंशी संबंधित स्मारकाचा कारभार सांभाळणाऱ्या संस्थेच्या मासिकात बापूंच्या हत्येतील आरोपीचा गौरव करावा लागतोय. म्हणजेच त्यांना बापूंशिवाय पर्याय नाही. सावरकरांना मोठं करण्यासाठीसुद्धा त्यांना बापूच्या प्रमाणपत्राची गरज आहे."

"मला वाटतं असे प्रयत्न आणखी वाढतील. ती संपूर्ण संस्था, तिचे विचार त्यांच्या रंगात रंगत नाही, तोवर हे होत राहील आणि हे खूप दुःखद आहे. म्हणूनच इतर संस्था टिकवून ठेवणं गरजेचं आहे."

"याविषयावर प्रतिक्रिया नक्कीच देईल आणि आतापर्यंत सरकारच्या प्रभावापासून दूर राहिलेल्या इतर गांधीवादी व्यासपीठांवर हे विचार ठसठशीतपणे मांडायलाच हवेत. मी असं मानतो की प्रत्येकालाच विचार आणि मत मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे आणि मी ते थांबवण्याच्या बाजूने नाही. मात्र, जे घडत आहे त्याचा विरोध आणि प्रतिकार व्हायलाच हवा आणि ते करणार."

"सावरकरांचं सत्यही समोर आणणं गरजेचं आहे. त्यांना असं वाटत असेल की, सावरकर स्वातंत्र्य लढ्यात बापूंएवढेच महान नेते होते तर त्यांनी हेसुद्धा सांगावं की तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी इंग्रज सरकारला इतके माफीनामे का लिहिले आणि तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी इंग्रज सरकारकडून आयुष्यभर पेन्शन का घेतली. इतर कुठल्याही स्वातंत्र्य सैनिकाने, क्रांतीकारकाने, जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबाने कुणीही पेंशन घेतली नाही. मग इतके महान देशभक्त असूनही सावरकरांना इंग्रज सरकारपुढे गुडघे का टेकावे लागले."

टीकाकारांचा आक्षेप

राष्ट्रीय जनता दल म्हणजेच राजदचे राष्ट्रीय प्रवक्ते प्राध्यापक सुबोध कुमार मेहता लिहितात, "आज गांधीजींच्या आत्म्याला स्वर्गात दुःख होत असेल. गांधींचा अहिंसावादी वारसा जपण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या गांधी दर्शन आणि स्मृती समितीने 'अंतिम जन' मासिकात सावरकरांवर केंद्रीत विशेषांक प्रकाशित करून गांधीजींच्या अहिंसेसारख्या मूल्यांची निश्‍चितच क्रूर थट्टा केली आहे."

आपल्या ट्वीटमध्ये ते पुढे लिहितात, "थोडीही लाज शिल्लक असेल, थोडाही खेद वाटत असेल तर समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. नाहीतर या मासिकाचा पुढील अंक गांधींचा मारेकरी गोडसे यावर निघाला किंवा हिटलर, मुसोलिनीचा गौरव करणारा निघाला तर त्यात आश्चर्य वाटणार नाही."

ज्येष्ठ पत्रकार ओम थानवी यांनी मासिकातील काही पानं ट्वीट करत लिहिलं आहे, "गांधी हत्येच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या कपूर आयोगाने त्यांच्या अंतिम निष्कर्षात 'सावरकर आणि त्यांच्या मंडलीला (गट)' गांधी हत्येच्या षडयंत्रात दोषी ठरवलं होतं आणि आता तमाशा बघा गांधी स्मृती आणि दर्शन समिती गांधींचाच वापर करत सावरकरांना आदर मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे."

महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'गांधी पीस फाउंडेशन'चे अध्यक्ष कुमार प्रशांत यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "प्रत्येकाला खोटं बोलण्याचा आणि इतिहासाचा गैरवापर करण्याचा अधिकार आहे. भाजप आणि त्यांचं सरकार दोघंही या अधिकाराचा पुरेपूर वापर करतात. ज्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अंतिम जनचा हा ताजा अंक."

या अंकाविषयी काँग्रेस नेते पवन खेरा यांनी बीबीसीशी बोलताना सांगतिलं, "विजय गोयल यांना त्यांचा राजकीय वनवास संपवायचा आहे. हे चांगलंच आहे. पण त्यासाठी ते सत्याला का वनवास देत आहेत? सावरकर यांच्या दृष्टीने पहिला आणि अंतिम संघर्ष धार्मिक संघर्ष होता. भारताला इंग्रजांपासून स्वतंत्र्य करणं, त्यांच्यासाठी अजिबात महत्त्वाचं नव्हतं."

सावरकरांवर पुस्तक लिहिणारे लेखक अशोक कुमार पांडे बीबीसीशी बोलताना म्हणाले, "सावरकरांवर अंक काढण्यासाठी महात्मा गांधींच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला निवडण्यात आलं, हे गमतीशीर आहे. यावरून सावरकरांना व्हॅलिडेट करण्यासाठी गांधींची गरज पडत असल्याचं स्पष्ट होतं. कधीकाळी भावाच्या सुटकेची विनंती करण्यासाठी गणेश सावरकर गांधीजींकडे गेले होते, त्यावेळीसुद्धा बापूंनी त्यांना उपकृत केलं होतं."

ते पुढे म्हणाले, "ज्या मासिकाच्या पहिल्या पानावर उपाध्यक्ष विजय गोयल पाचशे शब्दांच्या लेखात इतक्या चुका करतात की 1906 साली त्यांनी सावरकरांची भेट श्यामा प्रसाद मुखर्जींशी घालून दिली, जे त्यावेळी फक्त 5 वर्षांचे होते, त्या अंकाच्या गुणवत्तेविषयी बोलणं वेळ वाया घालवणं आहे.

गांधी हत्येविषयी बोलताना हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना सबळ साक्षींअभावी सोडण्यात आलं. पुढे कपूर आयोगाच्या तपासात हे उघड झालं होतं की सावरकर यांचे सचिव आणि अंगरक्षक यांच्या साक्षी उपलब्ध होत्या, मात्र त्या न्यायालयात कधीच सादर करण्यात आल्या नाही."

याचवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सावरकरांच्या जयंतीदिनी ट्वट करत त्यांना 'मा भारती का कर्मठ सपूत' (भारतमातेचा कर्मठ पुत्र) म्हटलं होतं. वीर सावरकर ओजस्वी कवी आणि समाज-सुधारक होते, असंही ते म्हणाले होते.

मागच्या वर्षी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सावरकर यांच्या 'दयायाचिका' दाखल करण्याच्या मुद्द्याला एका विशेष वर्गाने चुकीच्या पद्धती पसरवलं, असं म्हटलं होतं. सावरकर यांनी तुरुंगात असताना महात्मा गांधींच्या सांगण्यावरून इंग्रजांकडे दयायाचिका दाखल केली होती, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला होता. या दाव्यावर बराच काळ वाद झाला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)