महात्मा गांधींना हिंदू आणि मुस्लिम दोघेही का मानत शत्रू?

    • Author, राजीव रंजन गिरी
    • Role, असिस्टंट प्रोफेसर, राजधानी कॉलेज, दिल्ली विद्यापीठ

लवकरच एखादी सकाळ 'स्वातंत्र्य' घेऊन उजाडेल, याचे संकेत 15 ऑगस्ट 1947 पूर्वी काही महिन्यांपासून मिळू लागले होते.

अनेक वर्षांपासूनची ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली. कुठल्याही स्वातंत्र्यावेळी जो आनंद असतो, तो भारताच्या स्वातंत्र्यावेळी फारसा दिसला नाही. याचं कारण होतं फाळणीच्या वेदना. फाळणीनं अनेकाना वेदना दिल्या. सीमेच्या इकडच्या अन् सीमेच्या तिकडच्यांनाही.

सत्ता हस्तांतरणानंतर काही लोकांना आनंद झाला होता, अनेकांना दिलासा मिळाला होता. पण महत्मा गांधींना वेदना होत होत्या. अनेक दु:ख झेललेल्या, स्वातंत्र्य संग्रामादरम्यान आंदोलनं केलेल्या गांधींना फाळणीनं वेदना झाल्या होत्या.

गांधींबाबत सगळ्यांच्याच तक्रारी

मनातल्या दृढ इच्छाशक्तीला गांधींचं शरीर साथ देत नव्हतं. एकीकडे शरीराच्या तक्रारी सुरू असताना, समोर डोंगराएवढी आव्हानं आ वासून उभी होती. ही आव्हानं नाकारण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळेच ऑगस्ट 1947 च्या काही महिने आधीपासून जानेवारी 1948 पर्यंत ते सातत्यानं भारतभर प्रवास करत होते.

जिथं कुठं थोडी झटापट होई, तिथं गांधी पोहोचत. लोकांचे दु:ख-वेदना ते स्वत:सोबत वाटून घेत. प्रार्थनांद्वारे ते द्वेषाची आग विझवण्याचा प्रयत्न करत. भविष्यात आपलेपणा कायम राहावा यासाठी मार्गदर्शन करत. कट्टरतेचा मार्ग सोडून माणूसपणाच्या मार्गाचा अवलंब करा, असं ते जीवाच्या आंकातानं सांगत असत.

परिस्थिती मात्र विसंगत आणि गुंतागुंतीची बनत होती. अखंड भारताचा व्यास मोठा होता. त्यामुळे कराचीचे पडसाद बिहारमध्ये, तर नोआखालीचे पडसाद कोलकात्यात दिसत. सर्वत्र उद्ध्वस्त होत होतं. आग सर्वत्र धगधगत होती. गांधींबाबत सर्वत्र तक्रार होती. आग लावणाऱ्या आणि आगीत जळणाऱ्यांसह या आगीवर आपली पोळी भाजून घेणाऱ्यांनाही गांधींबाबत नाराजी होती.

कारण गांधींकडूनच अपेक्षा होत्या. भले हिंदूंच्या हत्या होत असोत, मुस्लिमांच्या वा शिखांच्या. प्रत्येकाच्या वेदना गांधींना स्वत:च्या वेदना असल्यासारखं वाटत होतं. या हिंसेला गांधी स्वत:ची चूक असल्यासारखं मानत असत. त्यांना या घटना त्रासदायक वाटत होत्या. ते व्यथित होत असत.

दिल्ली आनंदोत्सवात बुडालेली असताना गांधी कुठे होते?

15 ऑगस्टच्या रात्री आनंदोत्सवात बुडालेली दिल्ली देशाचं भविष्य़ ठरवत होती, तेव्हा आधीच्या तीन दशकांपासून देशाचा संघर्ष, धोरण आणि नियती ठरवणारे महात्मा गांधी या आनंदोत्सवात कुठेच नव्हते. देशाची धुरा ज्यांच्या खांद्यावर देण्यात आली होती, त्या वारसदारांना आशीर्वाद देण्याच्या सोहळ्यात गांधी नव्हतेच, पण ते दिल्लीच्या सीमेजवळही नव्हते. ते होते कोलकात्याच्या हैदरी महलमध्ये.

गांधी त्यावेळी नोआखालीच्या प्रवासाला निघाले होते. तिथं अल्पसंख्यांक हिंदूंचं भीषण हत्यांकाड झालं होतं. दोन ते दीन दिवस कोलकाता ठप्प झालं होतं. कारण तिथं मुस्लिम भयभीत झाले होते. नोआखालाची आग विझवण्यासाठी गांधीना कोलकात्याची आग शांत करणं आवश्यक होतं.

गांधींनी विचार केला की, कोलकात्याच्या मुस्लिमांना असुरक्षित ठेवून, कुठल्या तोंडानं हिंदूंच्या संरक्षणाचा दावा करू शकू. गांधी इथं अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा आपला धर्म मानत होते.

कोलकात्यात गांधींनी राहण्यासाठीही असं ठिकाण निवडलं, ज्यातून बरेच संकेत मिळतात. ते हैदरी महलमध्ये राहत होते. या भागात हिंदू समाज मोठ्या संख्येत होता.

या हैदरी महलमध्ये राहण्याआधी गांधींची अट एकच होती की, सुहारावर्दीही इथेच सोबत राहावेत. सुहारावर्दींनी वर्षभर आधी 'थेट कारवाई'द्वारे शेकडो हिंदूंना मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवलं होतं आणि हजारोंना बेघर केलं होतं. हिंदूंबाबत द्वेषासाठी जबाबदार सुहारावर्दी आपली चूक कबूल करून आता शांततेसाठी पुढे आला होता.

गांधींची आणखी एक अट होती की, कोलकात्यतील मुस्लिम लीगशी संबंधित कट्टर नेत्यांनी नोआखालीच्या मुस्लिमांना पत्र पाठवून हिंदूंच्या सुरक्षिततेची खात्री द्यावी आणि आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून तिथं शांततेसाठी स्थिती तयार करावी.

गांधी हिंदूंचे शत्रू होते का?

गांधींच्या अटी मान्य झाल्या. कोलकातावासियांना ते आपला विचार सांगत राहिले. मात्र, हिंदू महासभेच्या लोकांचा त्यांच्यावर राग कायम राहिला. हिंदू महासभेचे लोक गांधींना मुस्लिमांच्या बाजूचे मानत असत आणि म्हणत की, आम्ही संकटात असताना तुम्ही का आला नाहीत? जिथं हिंदू पलायन करतात, तिथं तुम्ही का जात नाहीत?

हे लोक गांधींना 'हिंदूंचे शत्रू' म्हणून ओरडत होते. मात्र, गांधींची जीवनशैली, संस्कार, आस्था आणि श्रद्धा सर्व हिंदू होतं. त्यांना उत्तरात गांधी म्हणत की, हिंदूंचा शत्रू म्हणणं मला वेदनादायी वाटतं.

गांधी '15 ऑगस्ट'ला महान घटना मानत होते आणि त्यांच्या अनुयायांना उपवास, प्रार्थना आणि प्रायश्चित करून या दिवसाचं स्वागत करण्याचं आवाहन करत होते. त्यांनी या महान दिवसाचं स्वागत असंच केलं.

कोलकात्यात गांधी यशस्वी सिद्ध झाले. शांततेचं वातावरण बनू लागलं. महात्मा गांधींच्या आदर्शाचा परिणाम दिसू लागला. लष्करापेक्षा जास्त गांधींच्या विचारांचा परिणाम दिसत होता. म्हणूनच तर अखेरचे व्हॉईसराय आणि पहिले गव्हर्नर जनरल माऊंटबॅटनने पत्र पाठवून अभिनंदन केलं, पंजाबमध्ये आमचे 55 हजार सैनिक आहेत, तरी दंगलींवर नियंत्रण मिळवता येतन ही, बंगालमध्ये आमच्या सैन्यात केवळ एक व्यक्ती आहे आणि तिथे शांतता आहे.

गांधी नोआखालीच्या दौऱ्यातून वेळ काढून काही दिवस कोलकात्यात थांबले होते. मात्र, तिथं त्यांना महिनाभर राहावं लागलं. गांधींनी तिथल्या हिंसेला शांत केलं, तिथल्या सर्व ठिणग्या विझवल्या.

वर्षभरआधीच्या सुहरावर्दीची नवी प्रतिज्ञा लोकांना आता आश्चर्याचा धक्का देत होती. दंगलीत सहभागी झालेल्या हिंदू तरुणांनी प्रायश्चित्त केलं.

दिल्लीला गांधींची गरज

गांधींना दिल्ली बोलावत होती. आनंदोत्सवत आता थांबला होता. दिल्लीला आता गांधींची गरज होती. मोठ्या अधिरतेनं दिल्ली गांधींच्या प्रतिक्षेत होती.

9 सप्टेंबरच्या सकाळी गांधी दिल्लीला पोहोचले. बेलूरमार्गे ते रेल्वेनं आले. गांधींना लक्षात आलं की, सप्टेंबरमधल्या एरवीच्या सकाळसारखी ही सकाळ नाहीय. चहूबाजूंना मुडदे पडले होते. सर्व औपचारिकातांमध्येही गोंधळ स्पष्टपणे दिसत होता.

रेल्वे स्टेशनवर गांधींना नेण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल आले होते. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब होते. जे सरदार पटेल कठीण काळातही निडर आणि धाडसी दिसायचे, ते चिंतेत होते. स्टेशनवर आणखीही काही लोक होते. गांधींची चिंता वाढवायला एवढं कारण पुरे होतं.

कारमध्ये बसताना सरदार पटेलांनी मौन सोडलं आणि म्हटलं, "गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीत दंगली होतायेत. दिल्ली मुडद्यांची नगरी बनलीय."

गांधींना त्यांच्या आवडत्या वाल्मिकी झोपडपट्टीत नेलं गेलं नाही. त्यांच्या थांबण्याची व्यवस्था बिर्ला भवनमध्ये करण्यात आली होती. गांधींची गाडी तिथं पोहोचल्यानंतर पंतप्रधान नेहरू तिथं पोहोचले. हा काही योगायोग नव्हता. नेहरूंच्या चेहऱ्यावरील तेज गायब होतं. चेहऱ्यावरील सुरकुत्या वाढल्या होत्या.

ते रागानं फणफणत होते. एका श्वासात त्यांनी बापूंना सर्व घटनाक्रम सांगितला. लुटालूट, खून, कर्फ्यू… अशी सर्व माहिती दिली. खाण्या-पिण्याच्या गोष्टी मिळत नाहीत, सर्वसामान्य नागरिकांची दुरावस्था, पाकिस्तानला कसं सांगायचं की त्यांनी आपल्या नागरिकांची सुरक्षा करावी, कुठल्याशा प्रसिद्ध डॉ. जोशींचा त्यांनी उल्लेख केला की ते कसे भेदाविना लोकांची सेवा करतायेत, त्यांना मुस्लीम घरातून गोळी लागली, ते वाचले नाहीत.

भारत-पाकिस्तानला वचनांची आठवण करून देत गांधी

शांततेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न सूरू होते. गांधींची माणसंही आणि सरकारही हे प्रयत्न करत होते. गांधींचा दिनक्रमही सुरू होता. ते रोज प्रार्थनेसाठी जात, तिथं त्यांचे विचार मांडत. रेडिओवरून प्रसारण होत असे. मात्र, हे प्रयत्न पुरेशे नव्हते.

पाकिस्तानातून येणाऱ्या हिंदू आणि शिखांची संख्या कमी होत नव्हती. हे लोक रक्ताचा बदला रक्तानं इच्छित होते. गांधींना हीच गोष्ट मान्य नव्हती. त्यांना हेही कळत नव्हतं की, गांधी पाकिस्तानवर नैतिक दबाव आणू पाहत आहेत. जिन्नांना त्यांच्या वचनांची आठवण करून देत आहेत की, त्यांनी आपल्या नागरिकांचं संरक्षण करावं.

गांधी भारतालाही वचनांची आठवण करून देत होते. वचनांच्या पूर्ततेत गांधींना नैतिक शक्तीची वाढ दिसत होती. ते रोज योजना बनवत आणि त्यावर अंमलबजावणी करत होते.

जानेवारीत कडाक्याची थंडी होती. भारत किंवा पाकिस्ताननं आपला विश्वास तोडावा असं त्यांना वाटत नव्हतं. ते 55 कोटी रुपयांना विश्वासाचा एक धागा मानत होते. विश्वास आणि वचन यांच्या रक्षणासाठी ते कुणाही विरोधात जायला तयार होते. अगदी स्वत:विरोधातही.

गांधी याच आत्मबळानं नैतिक शक्ती मिळवत असत. त्यांच्या नजीकच्या योजनांमध्ये पाकिस्तान दौऱ्याचाही समावेश होता. ते जिन्ना आणि त्यांच्या सरकारला याच्या पलिकडचे मानत असत. हिंदू महासभेच्या विचारांना शांततेचे प्रयत्न आवडत नव्हते.

या कट्टर लोकांना गांधींच्या उपोषणात आत्मशुद्धीचा प्रयत्न दिसत नव्हता. जेव्हा पूर्ण जग गांधींचा जयजयकार करत होतं, तेव्हा हे लोक गांधी मुर्दाबाद म्हणून ओरडत असत.

जगातील सर्वात बुद्धिवान माणूस गांधींना सर्वश्रेष्ठ मानत होता, गांधींच्या आथ्मकि पवित्रतेचं कौतुक करत होता, तेव्हा नथुराम गोडसेचा वैचारिक संप्रदाय या गोष्टीला समजून घेत नव्हता, त्यात आश्चर्य काय!!

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)