You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नथुराम गोडसे महात्मा गांधींच्या हत्येवेळी संघाशी संबंधित होता का?
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
नथुराम विनायक गोडसेने भारताचे सर्वांत आदरणीय नेते असणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांच्यावर 30 जानेवारी 1948 रोजी काही फुटांच्या अंतरावरून गोळ्या झाडल्या. दिल्लीत प्रार्थनासभेवेळी झालेल्या या हल्ल्यात गांधींचा मृत्यू झाला.
अडतीस वर्षांचा नथुराम हिंदू महासभेचा सदस्य होता. गांधी मुस्लिमांचा अनुनय करत असून पाकिस्तानला झुकतं माप देत आहेत आणि त्यांनी हिंदूंचा विश्वासघात केला आहे, असा आरोप महासभेने केला होता. महासभेने फाळणीमधील रक्तपातासाठीसुद्धा गांधींना दोषी ठरवलं.
गांधीहत्येनंतर वर्षभराने न्यायचौकशी न्यायालयात गोडसेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. उच्च न्यायालयाने हा निकाल कायम ठेवल्यानंतर नोव्हेंबर 1949 मध्ये त्याला देहदंडाची शिक्षा झाली. (या गुन्ह्यातील त्याचा साथीदार नारायण आपटे यालाही देहदंड झाला आणि इतर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली).
हिंदू महासभेत दाखल होण्यापूर्वी गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होता. सध्या केंद्रात सत्ता गाजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असणारा संघपरिवार 95 वर्षं हिंदू राष्ट्रवादाची पताका घेऊन चालतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः संघप्रचारक राहिले आहेत, आणि त्यांच्या सरकारमध्ये व सरकारच्या बाहेरही संघाचा खोलवर प्रभाव आहे.
'राष्ट्रपित्या'ची हत्या करणाऱ्या गोडसेशी आपला काहीही संबंध नाही, अशी भूमिका संघाने अनेक दशकं घेतली. परंतु, अलीकडच्या काही वर्षांमध्ये उजव्या हिंदू गटांनी गोडसेचं गौरवीकरण सुरू केलं आहे आणि गांधीहत्येचीही ते उघडपणे प्रशंसा करतात.
गेल्या वर्षी, भडक भाषणं करणाऱ्या भाजपच्या एका खासदाराने गोडसेचं वर्णन 'देशभक्त' असं केलं होतं. बहुतांश भारतीयांनी याबाबत रोष व्यक्त केला असला, तरी संघाने आपली भूमिका सोडलेली नाही: गांधींची हत्या करण्याच्या कितीतरी आधी गोडसेने संघाला सोडचिठ्ठी दिली होती.
परंतु, संघाचं हे म्हणणं वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा एका नवीन पुस्तकात करण्यात आला आहे.
शाळा सोडलेला, भिडस्त स्वभावाचा नथुराम काही काळ टेलर म्हणून काम करत होता, त्यानंतर त्याने फळं विकण्याचाही व्यवसाय केला, मग तो हिंदू महासभेत दाखल झाला. तिथे तो संघटनेच्या वर्तमानपत्राचं संपादन करत असे.
गांधीहत्येवरील न्यायालयीन सुनावणीदरम्यान त्याने पाच तासांहून अधिक वेळ घेत 150 परिच्छेदांचं निवेदन वाचून दाखवलं होतं.
गांधींना मारण्याचा 'कोणताही कट झालेला नव्हता', असं तो म्हणाला. आपल्या सर्व साथीदारांवरील ठपका पुसण्याचा प्रयत्न त्याने केला. हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते व आपले नेते विनायक दामोदर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे कृत्य केल्याचा आरोपही त्याने नाकारला.
(या खटल्यात सावरकरांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली असली, तरी गांधींचे कट्टर विरोधक असणारे जहाल उजव्या विचारांचे सावरकर या हत्येशी संबंधित होते, असं त्यांचे टीकाकार मानतात).
गांधींची हत्या करण्याच्या कितीतरी आधी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध तोडले होते, असं गोडसेने न्यायालयाला सांगितलं.
'गांधीज् असॅसिन' या पुस्तकाचे लेख धीरेंद्र झा लिहितात की, गोडसेचे वडील टपाल कार्यालयात कर्मचारी होते, तर आई गृहिणी होती. गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक 'महत्त्वाचा स्वयंसेवक' होता. त्याला संघातून काढून टाकल्याचा कोणताही 'पुरावा' नाही. सुनावणीपूर्वी नोंदवण्यात आलेल्या जबानीमध्ये त्याने 'हिंदू महासभेत दाखल होण्यापूर्वी संघापासून फारकत घेतल्याचा कुठेही उल्लेख केला नव्हता.'
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडल्यानंतर आपण हिंदू महासभेचे सभासद झालो' असं त्याने न्यायालयातील निवेदनात म्हटलं असलं, तरी 'हे त्याने नक्की कधी केलं याबद्दल तो काही बोलत नाही.'
"हा दावा गोडसेच्या आयुष्यातील सर्वांत वादग्रस्त पैलूंपैकी एक आहे," असं झा लिहितात. "संघस्नेही लेखकांनी" या दाव्याचा वापर करून "गुपचूप असा समज पसरवला की, गोडसेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सोडचिठ्ठी दिली होती आणि गांधींची हत्या करण्याच्या जवळपास दशकभर आधी तो हिंदू महासभेत दाखल झाला होता."
गोडसे 1930 साली संघात आला आणि चार वर्षांनी त्याने संघ सोडला, असा दावा अमेरिकी संशोधक जे.ए. कुर्रन ज्युनियर यांनी केला आहे. पण या प्रतिपादनासाठी त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. सुनावणी सुरू होण्यापूर्वी पोलिसांसमोर दिलेल्या जबानीत गोडसेने दोन्ही संघटनांसोबत एकाच वेळी काम करत असल्याचं कबूल केलं होतं, असं झा लिहितात.
या संदर्भातील वादात गोडसे कुटुंबियांनीही पूर्वी मतं मांडलेली आहेत. नथुरामचे बंधू (2005 साली मरण पावलेले) गोपाळ गोडसे म्हणाले होते की, त्यांच्या भावाने "संघापासून फारकत घेतली नव्हती."
या शिवाय, नथुराम गोडसेच्या चुलत नातवाने 2015 साली एका पत्रकाराला सांगितल्यानुसार, नथुराम गोडसे 1932 साली संघात दाखल झाला आणि त्याला "कधीही संघातून काढून टाकण्यात आलं नव्हतं आणि त्याने कधीही संघापासून फारकतही घेतली नव्हती."
झा यांनी अभिलेखागारं पालथी घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदू महासभा या दोन संघटनांमधील संबंधांचाही शोध घेतला आहे. हिंदू महासभा व रा. स्व. संघ यांच्यातील संबंध "परस्परव्याप्त व प्रवाही" स्वरूपाचे होते आणि त्यांची विचारसरणी सारखी होती, असं झा लिहितात.
या दोन संघटनांचे "कायमच जवळचे संबंध होते आणि काही वेळा त्यांचे सभासदही सारखे असत", गांधीहत्येपर्यंत ही स्थिती टिकून होती, असं झा नमूद करतात. (गांधीहत्येनंतर वर्षभराहून अधिक काळ रा. स्व. संघावर बंदी घालण्यात आली).
आपण 1930 च्या दशकात संघापासून फारकत घेतली होती, हे गोडसेचं न्यायालयातील विधान संघ कायम उर्द्धृत करत आला आहे आणि संघाचा या हत्येशी काहीच संबंध नसल्याचं न्यायालयीन निकालातही म्हटलं होतं.
"तो संघ स्वयंसेवक होता असं म्हणणं म्हणजे राजकीय हेतूने प्रेरित खोटं बोलणं आहे," असं संघाचे वरिष्ठ नेते राम माधव म्हणाले.
माजी सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी गांधीहत्या ही "अतुलनीय शोकांतिका" असल्याचं म्हटलं होतं. "विशेषतः ही हत्या करणारा अभद्र जीव आपला देशवासी व हिंदू होता, त्यामुळे हे जास्तच खरं ठरतं," असं गोळवलकर म्हणाले होते.
"भारतातील इतक्या महनीय व्यक्तिमत्वाची हत्या करून गोडसेने हिंतुत्वाचा अपमान केला आहे," असं म्हणत संघाचे एक ज्येष्ठ दिवंगत नेते मा. गो. वैद्य यांनी अलीकडेच गोडसेला 'खुनी' संबोधलं होतं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदू महासभा यांच्यातील संबंध वादळी होते, असं विक्रम संपथ यांच्यासारखे लेखक म्हणतात. सावरकरांचं दोन खंडांमधील विस्तृत चरित्र लिहिणारे संपथ म्हणतात की, "हिंदूंच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी गुप्त क्रांतिकारी संघटना" उभारण्याचा हिंदू महासभेचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला "दुखावणारा" ठरला होता.
शिवाय, "हिंदू महासभेचे नेते सावरकर 'नेतृत्वभक्ती व अवाजवी प्रशंसा' यांवर विश्वास ठेवत होते, तर संघाला व्यक्तिपूजेची नावड होती," असंही संपथ लिहितात. 'आरएसएस: अ व्ह्यू टू द इन्साइड' या पुस्तकात लेखक वॉल्टर के. अँडरसन व श्रीधर डी. दामले यांनी असं म्हटलं आहे की, "गांधीहत्येमध्ये एका माजी स्वयंसेवकाचा (नथुराम गोडसे) सहभाग राहिल्यामुळे संघाची प्रतिमा मलीन झाली" आणि "सरकारी पातळीवरून त्यांना फॅसिस्टवादी, एकाधिकारशाही व अनाकलनवादी असं संबोधून कलंकित करण्यात आलं."
गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अविभाज्य भाग होता आणि त्याने संघ कधीच सोडला नव्हता, या शंका कधीच पूर्णतः लोपल्या नाहीत.
गोडसेला 15 नोव्हेंबर 1949 रोजी फाशी देण्यात आली, त्या आधी त्याने संघप्रार्थनेतील चार ओळी म्हटल्या होत्या. "तो सक्रिय संघ स्वयंसेवक होता, ही वस्तुस्थिती यावरून पुन्हा सिद्ध होते," असं झा म्हणतात. "गांधींच्या मारेकऱ्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वेगळं काढणं हा इतिहासाचा विपर्यास आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)