You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'महात्मा गांधींवर वर्णद्वेषाचे आरोप त्यांच्याबाबतच्या अज्ञानातून लावले जातात'
घानाची राजधानी अक्रामधल्या विद्यापीठातला महात्मा गांधींचा पुतळा हटवण्यात आला आहे. 2016मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं.
यानंतर विद्यापीठातल्या प्राध्यापकांनी एक याचिका दाखल करून गांधींना वर्णद्वेषी संबोधलं होतं. तसंच आफ्रिकन नायकांचे पुतळे सर्वांत आधी उभारायला हवेत, असं त्यांनी म्हटलं होतं.
यावर त्यांचे पणतू तुषार गांधी यांनी आपले विचार बीबीसी मराठीकडे व्यक्त केले आहेत. ते सांगतात,
'बापूंवर वर्णद्वेषाचा आरोप लावणे चूक'
महात्मा गांधींना वर्णद्वेषी म्हणणं हे फक्त भारतीयच नव्हे तर सर्व मानवजातीच्या कल्पनेत येणं असंभव आहे. याचं कारण हे दोन्ही शब्द परस्परविरोधी आहेत. बापूंवर हे आक्षेप त्यांच्या विचारांबद्दल असलेल्या अज्ञानामुळे घेतले जातात. मला ही जाणीवपूर्वक चालवलेली मोहीम वाटते. त्यांच्या जीवनाचे अवलोकन केले तर ते वर्णद्वेषी होते असं म्हणता येणार नाही. त्यांनी वापरलेल्या काही शब्दांमुळे असा आरोप होत असेल तर ते न्याय्य नाही असं मला वाटते.
बापूंनी सुरुवातीच्या काळात जे लेखन केलं त्यातील काही शब्द आज बहिष्कृत झाले आहेत. पण हे शब्द त्यांच्यापर्यंत कसे आले याचा विचार व्हायला हवा. बापू गुजरातच्या एका लहान शहरातून परदेशात गेले होते. परदेशी संस्कृती आणि भाषेचे संस्कार त्यंच्यावर इंग्लंडमध्ये झाले.
नंतर दक्षिण अफ्रिकेत गेल्यावर त्यांना तेथिल संस्कृतीची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे अफ्रिकेतील मूळनिवासींबद्दल त्यांनी काफिरसारखे जे शब्द वापरले ते तेव्हा प्रचलित शब्द होते, ते सामान्यपणे वापरले जायचे.
त्या शब्दांमागे भावना द्वेषाची असल्यामुळे ते शब्द नंतर बहिष्कृत झाले आहेत. मात्र बापूंनी नंतर जे कार्य केलं ते पाहिल्यावर त्यांच्यावर केवळ या शब्दांमुळे वंर्णद्वेषाचा आरोप लावणं चूक ठरेल.
'बापुंचे विचार जातीद्वेष्टे, वर्णद्वेष्टे नव्हते'
अफ्रिकेत जेव्हा झुलू लोकांनी बंड केलं तेव्हा इंग्रजांनी त्यांच्यांवर अत्याचार केले. झुलू लोकांवर उपचार करण्यास डॉक्टर आणि मिशनरींनीही नकार दिल्याचं पाहिल्यावर बापूंनी स्वतः मदतकार्यात सहभाग घेतला. ब्रिटिशांच्या न्याय्य आणि उदारमतवादी भूमिकेबाबत याचवेळेस प्रथम त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. अशा प्रकारे पाशवी अत्याचार करणारं सरकार न्यायी असू शकत नाही याची त्यांना जाणिव झाली.
त्यामुळे गांधीजींवर आरोप करताना लोकांनी काहीच विचार केला नाही, असं मला वाटतं. हा सगळा प्रकार मला सॉफ्ट टारगेट शोधून आरोप करण्याचा प्रयत्न वाटतो.
बापूंनी मी सनातनी हिंदू आहे असं स्वतः जाहीर केलं होतं. पण त्यावेळच्या प्रभावानुसार त्यांचे विचार घडत गेले. पण सनातनी म्हणजे त्यांचे विचार जातीद्वेष्टे, वर्णद्वेष्टे नव्हते.
एकेकाळी त्यांनी वर्णव्यवस्था चांगली आहे, असंही म्हटलं होतं अर्थात त्यांचा उर्ध्वगामी वर्णव्यवस्थेला त्यांनी विरोध केला, वर्णव्यवस्था आडवी असावी असं त्यांचं मत होतं. नंतर वर्णव्यवस्थेचा दुरुपयोग होत असल्याचे दिसल्यावर ते पाप आहे हे त्यांच्या लक्षात आलं.
गांधीजी कसे जगले, त्यांचे नंतर विचार कसे होते हे पाहणं आवश्यक आहे. त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये वापरलेल्या काही शब्दांवरून टीका करणं ही मला टीकाकारांची मर्यादाच वाटते.
कारागृहातील एकत्र शौचालय स्वच्छ केल्यानंतर स्थानिक लोकांच्या अस्वच्छतेवर टीका त्यांनी केली होती. पण एखाद्या व्यक्तीच्या सवयीवर टीका केली म्हणजे वर्णवादी होत नाही. सध्याचं एकूणच राजकारण वर्तमान नेतृत्त्वावर बोलण्याऐवजी सॉफ्ट टार्गेट शोधण्याचं आहे.
इतिहासाचं पुनर्लेखन स्वतःच्या सोयीसाठी करण्याची वृत्ती जगभरात दिसते. स्वतःला मोठं होता आलं नाही तर पूर्वीच्या लोकांना आपल्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला जातो.
या जगात हिटलर, मुसोलिनी, जपानचे सत्ताप्रमुख उदयाला आले तेव्हा ते काही एकटे नव्हते. त्यांना तेव्हा मान्यता मिळाली होती. ते काही वंशपरंपरेने सत्तेत आले नव्हते, बहुमतानेच सत्तेत आले होते. कट्टरवाद आणि उदारमतवाद हे चक्र सुरू राहातं.
घानामधील पुतळ्याची बातमी ऐकल्यावर मी माझ्या वडिलांशी बोललो. तेव्हा ते गंमतीने म्हणाले, बरं झालं घानातल्या पक्ष्यांची बसायची एक जागा कमी झाली. ते असं म्हणाले कारण पुतळा उभारणी आणि पुतळा तोडणे हे त्या व्यक्तीशी संबंधित राहिलेलं नाही. तो कोण उभारतं आणि कोण तोडतं याला महत्त्व आहे. हा पुतळा काढण्याचा अधिकार घानाला आहे. तो दुसरीकडे बसवणार असं सांगितलं जात आहे.
पण माझ्या मते हा पुतळा तिथं नकाराचं प्रतीक झाला आहे. त्यामुळे त्याकडे नकाराचे प्रतीक म्हणून पाहिले जाईल. हा पुतळा सन्मानपूर्वक भारतात आणला पाहिजे अशी माझी पंतप्रधान आणि विरोधी पक्षांना विनंती आहे. पुतळ्यांची निर्यात थांबवली पाहिजे. स्थानिक लोकांची इच्छा असेल तर पुतळा बसवावा, भारत सरकारची इच्छा आहे म्हणून पुतळे बसवले जाऊ नयेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)