You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'वर्णद्वेष्ट्या' गांधीजींचा पुतळा घानाच्या विद्यापीठातून हटवला
घानाची राजधानी अक्रामधल्या विद्यापीठातला महात्मा गांधींचा पुतळा हटवण्यात आला आहे.
2016मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं.
यानंतर विद्यापीठातल्या प्राध्यापकांनी एक याचिका दाखल करून गांधींना वर्णद्वेषी संबोधलं होतं. तसंच आफ्रिकन नायकांचे पुतळे सर्वांत अगोदर उभारायला हवेत, असं त्यांनी म्हटलं होतं.
हा पुतळा नवीन जागेवर उभारण्यात येईल, असं त्यावेळी घाना सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
"विद्यापीठातल्या चौकात उभारण्यात आलेला गांधींचा पुतळा बुधवारी हटवण्यात आला आहे," असं प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी बीबीसीला सांगितलं.
यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि प्रादेशिक एकता कारणीभूत आहे, असं या घटनेची पुष्टी करताना विद्यापीठानं म्हटलं आहे.
"गांधींची जी मतं होती त्या सर्व मतांशी आम्ही सहमत आहोत, असा अर्थ हा पुतळा असण्यामागे होता. पण जर ते वर्णद्वेषी असतील तर मला वाटतं की हा पुतळा विद्यापीठात नसायला हवा," असं कायद्याची विद्यार्थिनी नॅना अडोमा असॅरे अडेईनी म्हटलं आहे.
20व्या शतकातील जागतिक पातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये गांधींचा समावेश होतो. अहिंसेच्या मार्गाने भारतातील ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा उभारणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
तरुणपणीचा त्यांचा काळ दक्षिण आफ्रिकेत गेला आहे. त्यांनी जगभरातील व्यक्तींना प्रेरणा दिली असली तरी त्यांचे कृष्णवर्णियांबद्दलचे विचार वादग्रस्त ठरले आहेत. सुरुवातीच्या त्यांच्या लिखाणात कृष्ण वर्णियांचा उल्लेख काफीर असा केला आहे. हा उल्लेख अत्यंत वर्णद्वेषी मानला जातो. भारतीय लोक कृष्ण वर्णीय लोकांपेक्षा सदैव श्रेष्ठ आहेत, असं ते म्हणाले होते.
'गांधीजींवरील आरोप अज्ञानातून'
या घटनेसंदर्भात बीबीसी मराठीने गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्याशी चर्चा केली. बीबीसी मराठीसोबत फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडली.
"महात्मा गांधींना वंशद्वेषी म्हणणं हे फक्त भारतीयच नव्हे तर सर्व मानवजातीच्या कल्पनेत येणं असंभव आहे. याचं कारण हे दोन्ही शब्द परस्परविरोधी आहेत. हे आक्षेप त्यांच्या विचारांबद्दल असलेल्या अज्ञानामुळे घेतले जातात. मला ही जाणीवपूर्वक चालवलेली मोहीम वाटते. त्यांच्या जीवनाचे अवलोकन केले तर ते वंशद्वेषी होते असं म्हणता येणार नाही. त्यांनी वापरलेल्या काही शब्दांमुळे असा आरोप होत असेल तर ते न्याय नाही," असं ते म्हणाले.
बापूंनी सुरुवातीच्या काळात जे लेखन केले त्यातील काही शब्द आज बहिष्कृत ठरले आहेत. गुजरातच्या एका लहान शहरातून परदेशात गेले होते. परदेशी संस्कृती आणि भाषेचे संस्कार त्यांच्यावर इंग्लंडमध्ये झाले. दक्षिण अफ्रिकेत गेल्यावर त्यांना तिथल्या संस्कृतीची काहीच कल्पना नव्हती. आफ्रिकेतील मूळनिवासींबद्दल त्यांनी काफिरसारखे जे शब्द वापरले ते तेव्हा प्रचलित आणि सामान्यपणे वापरले जाणारे शब्द होते. हे शब्द नंतर बहिष्कृत झाले. त्यांनी नंतर जे कार्य केले ते पाहिल्यावर त्यांच्यावर केवळ या शब्दांमुळे वंशद्वेषाचा आरोप लावणे चूक ठरेल," असं ते म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)