You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुतळे फो़डण्याची मालिका सुरूच, लेनिननंतर आंबेडकर आणि गांधीही निशाण्यावर!
त्रिपुरामध्ये लेनिनचा पुतळा फोडल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी पुतळ्यांना नुकसान पोहोचवण्याची मालिका सुरू झाली.
आज केरळच्या तालिपरंबामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं काही अज्ञात व्यक्तींनी गुरुवारी सकाळी 8.30 च्या सुमारास नुकसान केल्याचं काही प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं आहे.
कोन्नूर जिल्ह्यातल्या असलेल्या तालिपरंबात एका तालुका कार्यालय परिसरात हा पुतळा आहे. भगवी लुंगी घातलेल्या काही लोकांनी पुतळ्याचा चष्मा फोडला. त्यांनी पुतळ्याचा हार काढला आणि ते निघून गेले, असं सांगण्यात येत आहे.
प्रत्यक्षदर्शीने काढलेल्या एका फोटोवरून पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहे.
ईशान्य भारतातल्या त्रिपुरामध्ये भाजपनं डाव्या पक्षाचा पराभव केला. त्यानंतर राजधानी अगरताळाहून 90 किमी दूर बेलोनियाच्या एका कॉलेजमध्ये रशियन क्रांतीचे नायक आणि डाव्या विचारधारेचे प्रतीक मानले जाणारे व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा 'भारत माता की जय'च्या घोषणा देत पाडण्यात आला.
या घटनेनंतर देशाच्या अनेक भागात पुतळ्यांचं नुकसान करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या एका घटनेत उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं नुकसान केल्याची बातमी आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार ही घटना रात्रीच्या वेळी झाल्याची शक्यता आहे.
त्याचवेळी CNN न्यूज 18 च्या वृत्तानुसार स्थानिक प्रशासनाने परिसरात तणाव रोखण्यासाठी लगेच कारवाई सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाने तोडलेल्या पुतळ्यांच्या जागी नवे पुतळे उभारले आहेत.
त्रिपुरामध्ये आणखी एक पुतळा तोडला
पुतळा तोडण्याची पहिली घटना जेव्हा त्रिपुरामध्ये झाली तेव्हा डाव्या पक्षांचा पराभव करून भाजपाला विजय मिळवून फक्त 48 तासच उलटले होते.
प्रसारमाध्यमांच्या बातम्यांनुसार 2013 साली जेव्हा त्रिपुरात डाव्यांची सत्ता आली, तेव्हा त्यांनी हा पुतळा उभारला होता.
या घटनेनंतर दक्षिण त्रिपुरामध्ये लेनिनचा आणखी एक पुतळा पाडला. दुसरी घटना सबरूम या ठिकाणी झाली, जिथे जमावाने लेनिनचा एक छोटा पुतळा पाडला.
पेरियार यांच्या पुतळ्याला नुकसान
त्यानंतर तामिळनाडूत सामाजिक कार्यकर्ते आणि द्राविडी चळवळीचे प्रणेते पेरियार यांच्या पुतळ्याला नुकसान केल्याचं वृत्त आहे.
मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की वेल्लूरच्या तिरुपत्तूर तालुक्यात दोन लोक पेरियार यांच्या पुतळ्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत, तसंच पुतळ्याला हातोडीने तोडण्याचा प्रयत्न करण्यात करत आहेत, असं पोलीस अधीक्षक पगलवन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली की दोन जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. एकाचं नाव मुरुगानंदम असून ते वेल्लूरमध्ये भाजपचे शहर महासचिव आहेत. दुसऱ्या व्यक्तीचं नाव फ्रांसिस आहे आणि ते कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहे.
श्यामाप्रसाद यांचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न
त्यानंतर बुधवारी कोलकातामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या एका पुतळ्याबरोबर छेडछाड करण्यात आली आहे.
हिंदुत्ववादी विचारसरणीचे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा पुतळा केयोरतालामध्ये आहे. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सत्तारूढ भाजप नाराज
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या लागोपाठ होणाऱ्या घटनांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
अमित शहा यांनी अनेक ट्वीटस केले आणि लिहिलं, "पुतळे तोडण्याच्या सध्याच्या घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहेत. आणि आम्ही एक पक्ष म्हणून कोणताच पुतळा तोडण्याचं समर्थन करत नाही."
"आमचा मुख्य उद्देश हा लोकांच्या आयुष्यात परिवर्तन आणण्याचा आहे. आमचं काम संपूर्ण भारतात पसरलं आहे याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही 20 पेक्षा अधिक राज्यात सेवा करत आहोत."
ते पुढे म्हणाले, "मी तामिळनाडू आणि त्रिपुराच्या मित्रपक्षांशी चर्चा केली आहे. जर पुतळे तोडण्याच्या घटनांमध्ये भाजपाशी निगडीत एकही व्यक्ती जर आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)