You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लेनिनचा पुतळा पाडणं 'लोकांची नैसर्गिक प्रतिक्रिया' की 'राजकीय उन्मादाचा नमुना'?
त्रिपुरामध्ये 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांना नमवत भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडी सत्तेत आली आहे. यानंतर त्रिपुराची राजधानी आगरतळामध्ये दोन गटांमध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण झालं आहे.
रशियन विचारवंत आणि कम्युनिस्ट नेते लेनिन यांचा पुतळा बुलडोझर लावून पाडण्यात आला. हा पुतळा पाडतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर सर्वत्र पसरल्याने या घटनेची चर्चा दिल्लीसह देशभरात होत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा पाडला, असे आरोप होत आहेत. तर भाजपने हे आरोप फेटाळले आहेत.
भाजपच्या काही बड्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं की, "जे एक लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार करू शकतं, तेच दुसरं लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार होत्याचं नव्हतं करू शकतं."
ज्येष्ठ भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी ANI शी बोलताना म्हणाले, "लेनिन तर विदेशी आहे, एका प्रकारे अतिरेकी आहे. अशा व्यक्तीचा पुतळा आपल्या देशात कशाला हवा? कम्युनिस्ट पक्षाला म्हणा की त्यांच्या मुख्य कार्यालयात त्यांचा पुतळा लावा आणि त्याची पूजा करा."
'द्वेषाचं, दुहीचं राजकारण'
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव भालचंद्र कानगो यांनी अशी टीका केली की ही घटना सांगते की भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वेषाचं राजकारण करत आहे. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "भाजप जसं द्वेषाचं राजकारण करत आहे, तसंच एखाद्या समूहाला वेगळे पाडण्याचंही राजकारण करत आहे. ईशान्य भारतात असं राजकारण नव्या संघर्षाला जन्म देण्याचा धोका आहे."
भारतीय जनता पक्ष दुहीचं राजकारण करत आहेत, असं कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. भारतीय महिला फेडरशेनच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. मेघा पानसरे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्या म्हणाल्या, "त्रिपुरातील सत्ताबदल लोकशाही मार्गाने झाला असल्याने अशा पद्धतीने व्यक्त होण्याचं काहीचं कारण नाही. भाजप नेहमीच दुहीचं राजकारण करत आलं आहे. लेनिनचा पुतळा पाडला गेला त्यामागे हीच विचारसरणी आहे. पुतळे पाडून माणसांचे विचार पुसले जात नाहीत."
भारतीय जनता पक्षाने कम्युनिस्ट नेत्यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. ही लोकांची दडपशाही विरोधातली प्रतिक्रिया असल्याचं भाजप नेते माधव भांडारी यांचं म्हणणं आहे.
महाराष्ट्र भाजपचे प्रमुख प्रवक्ते असलेले भांडारी म्हणतात, "त्रिपुरामध्ये जे घडलं ती तिथल्या दडपशाही विरोधातील लोकांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. लेनिन यांचा पुतळा क्रेमलिन इथंही पाडण्यात आला तसेच युक्रेनमध्ये लेनिन यांचे अनेक पुतळे हटवण्यात आले आहेत. तिथं काही भाजप नाही."
गेली 3 दशक काश्मीरमध्ये मंदिरं पाडली जात आहेत. त्यावर कुणी अश्रू ढाळले नाहीत, असंही ते म्हणाले.
'राजकीय उन्मादाचा नमुना'
ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी बीबीसीशी बोलताना म्हणाले, "आगरतळामध्ये जे घडलं तो राजकीय उन्मादाचा नमुना होता. इतक्या वर्षांनंतर हे यश मिळाल्यामुळं 'अँटी-मार्क्सिस्ट' लोकांकडून अशी प्रतिक्रिया येणं साहजिकच आहे. यातून जमावाची मानसिकता (mass psychology) दिसते."
"यामध्ये मोठा राजकीय हात आहे, असं मी मानत नाही. पण असं मतप्रदर्शन करणं योग्य नाही. यामध्ये देशातील राजकीय संस्कृती कोणत्या दिशेनं चाललेली आहे हे दिसून येतं," असं ते पुढे म्हणाले.
"जगात ज्या ठिकाणी डाव्यांनी आधीच्या राजवटी बदलल्या त्याठिकाणी या लोकांनीही असाच प्रकार केला. उदाहरणार्थ, रशियातील झार राजवट उलथून टाकल्यानंतर भर रस्त्यात आधीच्या राजवटीतील पुतळे पाडण्यात आले. पण देशात लोकशाही जर नांदवायची असेल तर राजकीय परिपक्वता आणि सहिष्णुतेची संस्कृती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या घटना परत घडू नये यासाठी नव्या सरकारनं ताबडतोब पावलं उचलायला हवी. पुतळ्यांची विटंबना करणं हे काही आपल्याकडे नवीन नाही. पण जे काही घडलं ते अत्यंत दुर्देवी आहे," असं राऊत पुढे म्हणाले.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)