You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राम मंदिर ते तालिबान: श्री श्री रविशंकर यांच्याशी संबंधित 5 मोठे वाद
अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी तीन मध्यस्थांची नियक्ती केली आहे. निवृत्त न्यायाधीश खफीफुल्लाह यांच्या अध्यक्षतेखाल नेमलेल्या या समितीमध्ये श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचाही समावेश आहे.
गरज भासल्यास या समितीमध्ये आणखी सदस्यांचा समावेश करता येऊ शकतो, असंह सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी या आधीही अयोध्या प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली होती. अयोध्या प्रश्न सुटला नाही तर भारताचा सीरिया होईल, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी आधी केलं होतं.
मार्च 2018 मध्ये NDTVशी बोलताना ते म्हणाले होते, "जर न्यायालयानं सांगितलं की या जागेवर बाबरी मशीद होती, तर लोक ते मान्य करतील का? 500 वर्षांपासून मंदिराची लढाई लढणाऱ्या बहुसंख्यासाठी ही कडू गोळी सारखं असेल. अशा परिस्थितीमध्ये हिंसाचार होऊ शकतो. मुस्लिमांसाठी हे श्रद्धास्थळ नाही. मुस्लिमांनी सद्भावनेतून ही जागा सोडून द्यावी."
पण वादग्रस्त विधान करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नव्हती. याआधीही ते काही न काही कारणास्तव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
1. यमुनेच्या काठी कार्यक्रम
त्यांच्याबद्दलचा पहिला मोठा वाद झाला तो दिल्लीत यमुनेच्या काठावर त्यांनी आयोजित केलेल्या वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमुळे. राष्ट्रीय हरित लवादानं या कार्यक्रमामुळे यमुनेच्या काठाचं नुकसान झाल्याचा निवाडा देत आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेला दंड ठोठवला.
मार्च 2016मध्ये राष्ट्रीय हरित लवादानं अटींसह या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. पण आर्ट ऑफ लिव्हिंगने हा दंड भरला नाही.
राष्ट्रीय हरीत लवादाच्या तज्ज्ञांच्या अहवालात पर्यावरणाचं न भरून येणारं नुकसान झाल्याचं म्हटलं होतं.
2. 'तालिबानशी बातचीत व्हावी'
सहा वर्षांपूर्वी त्यांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं आश्रमाचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी बीबीसीशी बोलताना ते तालिबान आणि इतर जहालवादी संघटनांशी चर्चा करण्याची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
ते म्हणाले होते, "कोणत्या ना कोणत्या मार्गानं लोकांमधलं अंतर कमी झाला पाहिजे, अशीच माझी इच्छा आहे. मला शांती आणि सुखाची नवी लाट यावी असं वाटतं."
3. समलैंगिकतेवर विधान
श्री श्री रविशंकर यांनी समलैंगिकतेवर केलेल्या विधानामुळे ही वाद झाला होता. समलैंगिकता ही अशी प्रवृत्ती आहे जी नंतर बदलता येते, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
4. 'अध्यत्माच्या अभावाने आत्महत्या'
एप्रिल 2017मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर वक्तव्य केलं होतं. आध्यात्माच्या कमतरतेमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं ते बोलले होते.
5. मलालाबाबत वादग्रस्त विधान
पाकिस्तानातील विद्यार्थिनी मलाला युसफझाई यांना मिळालेल्या नोबेल शांती पुरस्कारावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मलाला यांनी शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळावा असं कोणतंही काम केलेलं नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)