महात्मा गांधी : नथुराम गोडसेला पकडल्यावर पुढं कशा घडल्या घटना?

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

30 जानेवारी 1948. दिल्लीतल्या बिर्ला भवनमध्ये संध्याकाळी 5.10 वाजता महात्मा गांधी त्यांच्या खोली बाहेर पडले. महात्म्याला पाहायला, भेटायला, गाऱ्हाणं मांडायला, चर्चा करायला त्या दिवशी जरा जास्तच लोक आले होते.

काही वेळातच पिस्तुलातून सुटलेल्या गोळ्यांचा आवाज आला आणि सगळेच काही क्षण थबकले. कानठळ्या बसवणारी ती शांतता संपल्यावर लोक भानावर आले.

महात्मा गांधी खाली कोसळले होते आणि नथुरामच्या पिस्तुलातून अजूनही धूर येतच होता..

नथुरामला तात्काळ पकडण्यात आलं आणि लोकक्षोभापासून दूर ठेवण्यासाठी एका बाजूला नेण्यात आलं. पोलिसांना दिलेल्या जबानीत 'माझं पिस्तुल लोकांमध्ये फिरत असताना मला दिसलं म्हणून ते पिस्तुल ताब्यात घ्या, त्याचं सेफ्टी कॅच उघडा आहे, लोक कदाचित एकमेकांवर गोळ्या झाडतील,' असं नथुरामनं सांगितल्याची नोंद आहे.

त्यानंतर त्याला तुघलक रोड पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. तिथं डीएसपी सरदार जसवंत सिंह यांनी एफआयआर नोंदवून घेतला.

महात्मा गांधी यांच्या हत्येचे पडसाद देशातच नव्हे तर जगभरात उमटत होते. नथुरामला पकडल्यानंतर इतर आरोपींची धरपकड करण्याची धावपळ सुरू झाली.

या खटल्यातील बहुतांश आरोपी पुणे-नगर आणि मुंबईशी संबंधित असल्यामुळे तपासात दिल्लीइतकंच मुंबई प्रांताला महत्त्व आलं होतं.

सुरुवातीच्या काळामध्ये बॉम्बे सिटी पोलीस, बॉम्बे प्रॉव्हिन्शिअल पोलीस आणि दिल्ली पोलीस अशा तीन पोलीस दलांनी हा तपास सुरू केला.

त्यानंतर तपासामध्ये सुसूत्रता येण्यासाठी जे. डी. नगरवाला यांना सुपरिटेंडंट ऑन स्पेशल ड्युटी या पदावर नेमण्यात आलं. नगरवाला यांना जिमी नावानंही ओळखलं जायचं. मुंबईमध्ये ते डेप्युटी कमिश्नर या पदावर कार्यरत होते.

जे. डी. नगरवाला यांच्याकडे सगळी सूत्रं देण्याचं कारण म्हणजे, त्यांचा मुंबई-पुण्याचा त्यांचा पक्का असलेला अभ्यास. महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या दीपक राव यांनी नगरवाला यांच्याबद्दल बीबीसीला माहिती दिली.

नगरवाला यांच्याकडे तपासाची सूत्र आल्यामुळं त्यांच्याकडे सर्व अधिकार आले. गांधीहत्येनंतर नथुरामचे सहकारी नारायण आणि विष्णू करकरे फरार झाले होते.

स्पेशल ब्रँचचे अधिकारी भालचंद्र हळदीपूर यांना या दोघांचा माग काढण्यास सांगितले होते. मुंबईत रिगल सिनेमाजवळ आपटे आणि करकरे येताच नगरवाला आणि हळदीपूर यांनी दोघांनाही पकडले. याबाबत प्रसिद्ध लेखक मनोहर माळगांवकर यांनी 'द मेन हू किल्ड गांधी' या पुस्तकात लिहून ठेवले आहे.

मुंबईत नथुरामला कोठे ठेवलं?

महात्मा गांधी यांची हत्या केल्यानंतर लोक अत्यंत प्रक्षुब्ध झाले होते. मध्य प्रांतात आणि तत्कालीन बाँबे प्रांतात त्याची प्रतिक्रिया उमटलीही होती.

त्यामुळे नथुरामला मुंबईत नेल्यावर विशेष काळजी घेण्याची गरज होती असं दीपक राव सांगतात.

नगरवाला यांनी नथुरामला त्यांच्या ऑफिसच्याच म्हणजे मुंबई स्पेशल ब्रँचच्या इमारतीमध्ये एका खोलीत ठेवलं.

मुंबई किंवा आसपासच्या कोणत्याही कारागृहात नथुरामला ठेवलं असतं तर लोकांचा किंवा कैद्यांकडून हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळं अत्यंत गुप्तता पाळून त्यांनी नथुरामला तिथं ठेवलं होतं.

जमशेदजी दोराबजी नगरवाला

जमशेदजी दोराबजी नगरवाला हे अहमदनगरच्या एका श्रीमंत पारशी कुटुंबातील होते. सहा फुटांहून अधिक उंची, भारदस्त शरीराच्या नगरवाला यांनी 1936 साली इम्पिरियल पोलीस सेवेची परीक्षा दिली होती.

लंडनमध्ये होणाऱ्या या परीक्षेमध्ये यशस्वी झाल्यावर त्यांना 1937मध्ये त्यांनी सिंध आणि बलुचिस्तानच्या सीमेवर कामाला सुरुवात केली.

17 फेब्रुवारी 1948 रोजी त्यांच्याकडे गांधीहत्या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला. त्यानंतर गुजरात राज्याची स्थापना झाल्यानंतर ते गुजरातचे पहिले आयजीपी झाले.

नगरावाला यांच्याबद्दल दीपक राव सांगतात, "नगरवाला यांचं मराठी नाशिक, नगर, पुण्यातल्या मराठी लोकांसारखं होतं. बलुचिस्तानात काम केल्यामुळं त्यांना पुश्तु यायचं तसंच सिंधी भाषाही त्यांना यायची. हॉकी, वेटलिफ्टिंग, घोडेस्वारीची आवड होती. 1993 साली त्यांचं निधन झालं."

गांधीहत्येनंतरचा घटनाक्रम

30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींची हत्या झाल्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी नारायण आपटे आणि विष्णू करकरे मुंबईला पोहोचले, त्यांना 13 फेब्रुवारी रोजी पकडण्यात आले.

5 फेब्रुवारी रोजी नथुरामचा भाऊ गोपाळ गोडसेलाही पकडण्यात आलं. 22 जून रोजी लाल किल्ल्यातील विशेष न्यायालयात न्यायाधीश आत्माचरण यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली. 10 फेब्रुवारी 1949 रोजी न्यायालयाने निकाल दिला.

यामध्ये नथुराम गोडसे व नारायण आपटेला फाशी सुनावली गेली. तर विष्णू करकरे, मदनलाल पहावा, गोपाळ गोडसे, दत्तात्रय परचुरे, शंकर किस्तय्या यांना जन्मठेप ठोठावली गेली.

2 मे 1949 रोजी न्यायाधीश जे. डी. खोसला यांच्या न्यायालयात अपिलावर सुनावणी सुरू झाली. 2 जून रोजी येथेही फाशीची शिक्षा कायम ठेवली गेली आणि 15 नोव्हेंबर रोजी गोडसे, आपटेला फाशी देण्यात आली.

ही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)