You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कन्हय्या कुमारनं इस्लाम धर्म स्वीकारला होता का?
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
आपण मुस्लीम असल्याचा स्वीकार JNU विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हय्या कुमारनं केल्याचा एक व्हीडिओ उजव्या विचारसरणीच्या फेसबुक पेजवर फिरत आहे.
या व्हीडिओचे कॅप्शन पुढीलप्रमाणे आहे;
"कन्हय्या कुमारचं खरं रूप समोर आलं आहे. तो मुस्लीम आहे आण हिंदू धर्मातील नाव वापरून लोकांना मूर्ख बनवत आहे. एका बंद खोलीतल्या बैठकीत त्यानं त्याच्या धर्माविषयी सांगितलं आहे. पण सत्य हे आहे की, तो मुस्लीम आहे. हा व्हीडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्याचं पितळ उघडं पाडा."
उजव्या विचारसरणीच्या जवळपास 10 फेसबुक पेजेसवर हेच कॅप्शन वापरून हा व्हीडिओ शेयर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरही शेयर करण्यात आलं आहे.
तर मग सत्य काय आहे? व्हीडिओत कन्हैय्या काय म्हणत आहे हे पाहा.
"आमचा इतिहास या मातीशी संलग्न आहे. आम्ही सर्वच मुस्लीम अरब जगतातून आलेलो नाहीत. आम्ही इथे लहानाचे मोठे झालो, आम्ही इथं शिक्षण घेतलं. लोकांनी हा धर्म स्वीकारला कारण हा धर्म शांतताप्रिय आहे, या धर्मात समानतेला महत्त्व आहे. या धर्मात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही म्हणूनच आम्ही हा धर्म स्वीकारला आहे. इतर धर्मांमध्ये मात्र जातीपाती आहेत आणि काही लोक अस्पृश्यता पाळतात. आम्ही आमचा धर्म कधीच सोडणार नाही. आम्ही स्वत:चा बचाव करू, समुदायाचा बचाव करू तसंच देशाचाही बचाव करू. अल्ला खूप शक्तिशाली आहे आणि तो आमचं रक्षण करेल."
हा व्हीडिओ पाहिल्यानंतर कन्हैय्यानं इस्लाम धर्म का स्वीकारला, या बाबीशी कुणीही सहमत होईल.
पण व्हायरल व्हीडिओमधील सर्वच गोष्टी सत्य नाहीत, हे आमच्या तपासात समोर आलं. "Dialogue with Kanhaiya Kumar" या एका कार्यक्रमातील संवादाचा एक भाग या व्हीडिओत दाखवण्यात आला आहे.
सत्य काय?
अल्पसंख्याकांविषयीचा हा कार्यक्रम 25 ऑगस्ट 2018ला पार पडला होता.
या कार्यक्रमात कन्हैय्या धर्माचं राजकारण आणि भारत देश सर्वांचा का आहे, यावर बोलला होता. या संदर्भात बोलताना त्यानं भारताचे पहिले शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद यांच्या विचारांचा दाखला दिला होता.
कन्हैयानं स्वत:चं म्हणणं पटवून देण्यासाठी आझाद यांच्या विचारांचा या व्हीडिओत दाखला दिला आहे. मात्र हा व्हीडिओ हातचलाखीनं एडिट करण्यात आला आहे, जेणेकरून ते शब्द आझाद यांचे नाही तर कन्हैयाचेच आहेत, असं दिसतं.
आझाद यांनी नेहमीच हिंदू-मुस्लीम एकतेचा पुरस्कार केला. ते भारताच्या फाळणीच्या विरोधात होते. मात्र 1947ला फाळणी झाली. हिंदू आणि मुस्लीम गेल्या कित्येक शतकांपासून एकत्र राहत होते आणि यात काही करून बदल व्हायला नको, असं आझाद यांना वाटत होतं.
1946मध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी मोहम्मद अली जिना यांची मुस्लिमांसाठीची स्वतंत्र देशाची मागणी धुडकावून लावली होती.
कन्हैय्या कुमारचा एडिट केलेला व्हीडिओ गेल्या वर्षीसुद्धा अनेक प्लॅटफॉर्मवर शेयर करण्यात आला होता. पण गेल्या काही दिवसांपासून त्यानं वेग पकडला आहे.
सरकारवरील टीकेमुळे चर्चेत
कन्हैया हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित सरकारवर टीका करत आला आहे. तसंच तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवरही टीका करत आला आहे.
भाजप हिंदुत्वाचा अजेंडा फॉलो करत आहे आणि अल्पसंख्याकांकडे दुर्लक्ष करत आहे, असा त्याचा आरोप आहे. पण मोदींच्या पक्षानं हा आरोप नेहमी फेटाळला आहे.
कन्हैय्यावर फेब्रुवारी 2016च्या मार्च महिन्यात JNU विद्यापीठात 'देशविरोधी' घोषणा केल्याचा आरोप आहे.
दिल्ली पोलिसांनी नुकतीच कन्हैय्या कुमारविरोधात देशद्रोहाच्या गुन्ह्याची चार्जशीट दाखल केली आहे. या केसची पुढील सुनावणी 6 फेब्रुवारीला आहे.
कन्हैयानं त्याच्याविरोधातील आरोप फेटाळले आहेत. पोलीस या केसमध्ये आपल्याला अडकवत आहे, असा त्याचा आरोप केला आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)