त्यानं माझ्या दिशेने पिस्तुल रोखलं होतं आणि... : उमर खालीद

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थी नेता उमर खालीद याच्यावर दिल्लीत गोळीबार झाला आहे. या गोळीबारमधून उमर खालीद थोडक्यात बचावल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यामागील कारण समजू शकले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत. दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडियाच्या बाहेर हा प्रकार घडला आहे.

प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी या घटनेबद्दल माहिती माध्यमांना दिली. उमर खालीद रफी मार्ग इथं चहाच्या दुकानवर थांबला होता. त्यावेळी पांढरा शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने उमरला धक्का दिला आणि उमरच्या दिशेने गोळी चालवली. उमर खाली पडला असल्याने गोळीचा नेम चुकला, अशी माहिती प्रत्यक्ष घटना पाहिलेल्या एका व्यक्तीने माध्यमांना दिली.

उमरने 'द क्विंट'ला या संदर्भात माहिती दिली आहे. "त्यानं माझ्या दिशेनं पिस्तुल रोखलं होती. मी फार घाबरलो होतो. गौरी लंकेश यांचं जसं झालं तसं माझं होणार, असे विचार माझ्या मनात आले," असं त्यांनं सांगितलं.

संसदेपासून काही किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. सहपोलीस आयुक्त अजय चौधरी म्हणाले,"या हल्ल्यातील पिस्तुल घटनास्थळावरून सापडले आहे." खालीद सुरक्षित असून त्याला तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. एकूण किती गोळ्या झाडण्यात आल्या याबद्दल खातरजमा केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

खालीद बरोबर असलेला युवक खालीद सैफ याने अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्याची माहिती दिली.

ज्या भागात ही घटना घडली तो भाग दिल्लीतील अत्यंत सुरक्षित भाग मानला जातो. उमर खालीद या भागात "खौफ़ से आज़ादी" या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आला होता.

2016साली JNUमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून कन्हैय्या कुमार, उमर खालीद आणि इतर काही विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे खटले दाखल करण्यात आले होते.

31 डिसेंबर 2017ला शनिवार वाड्यावर दलित नेत्यांनी आणि संघटनांनी एल्गार परिषदेचं आयोजन केलं होतं. यात प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांनी भाग घेतला होता.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)