You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमातील खादीवरच आक्षेप, काय आहे वाद?
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात तयार होणाऱ्या खादीवर नागपूर येथील खादी ग्रामोदयोग आयोगाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'खादी' नावाच्या ब्रँडचा वापर करून अवैधरित्या अप्रमाणित खादी कापडाची विक्री सेवाग्राम आश्रमात होत असल्याचा आरोप खादी आयोगाने केलाय.
ही विक्री ताबडतोब बंद करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा खादी आयोगाने आश्रमाला दिला आहे. मात्र सेवाग्राम आश्रमात गेल्या कित्येक वर्षापासून ही खादी विक्री सुरु असल्यामुळे सेवाग्राम आश्रम संस्थेने या कारवाईला विरोध केला आहे. महत्वाचे सेवाग्राम आश्रमाला भेट देणारे देशविदेशातील अनेक लोक आवर्जून इथल्या खादीचे कपडे खरेदी करतात.
'खादी मार्कच्या' सक्तीला सेवाग्राम आश्रम व्यवस्थापनाने आपला विरोध दर्शवला आहे. महात्मा गांधी यांच्या स्वावलंबनाच्या तत्वावर चालणाऱ्या खादीला कुठल्याही मार्कची आवश्यकता नाही अस स्पष्टीकरण सेवाग्राम आश्रम संस्थेनी दिले आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने 25 मार्चला सेवाग्राम आश्रमातील 'खादी ग्रामोद्योग भांडारची' पाहणी केली. त्यात आश्रमात विक्रीसाठी ठेवलेल्या खादीच्या कापडावर 'खादी मार्क' नसल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळं हे अवैध असून या खादीची विक्री बंद करावी अस पत्रचं खादी आयोगाने आश्रम व्यवस्थापनाला पाठवलंय. कोणत्याही प्रकारच्या खादी कपड्यांच्या विक्रीसाठी 'खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून' खादी प्रमाणपत्र आणि 'खादी मार्क' आवश्यक असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे.
यावर सेवाग्राम आश्रम संस्थेचे सदस्य अविनाश काकडे प्रतिक्रिया देताना म्हणाले "सरकारनं खादी चळवळ संपवण्याचा घाट रचला आहे. चळवळीला प्रोत्साहन देणारा 'खादी' हा शब्दही केंद्र सरकारने हिरावून घेतला आहे. ग्रामीण भागात तयार होणारी खादी काही भांडवलदारांच्या खिशात टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गांधीजींच्या खादीचा NAMO म्हणजेच 'मोदी ब्रँड' तयार करायचा आहे. हे घृणास्पद आहे
आयोगाच्या पत्रावर सेवाग्राम आश्रमाचं उत्तर
सेवाग्राम आश्रमात खादी आयोग स्थापनेच्या आधीपासून म्हणजेच महात्मा गांधीच्या आश्रमातील वास्तव्यापासून सूतकाम, विणकाम सुरू आहे. याठिकाणी उत्पादित खादी कापड विक्रीसाठी ठेवलं जातं.
याशिवाय सेवाग्राम आश्रम परिसरात इतर काही निवडक, मान्यताप्राप्त खादी संस्थांकडून मागणीनुसार खरेदी करतो आणि स्टोअर्समध्ये विक्री करतात. सोबतच खादी मार्क - रेग्युलेशन - 7 च्या नियमांविरुद्ध सेवाग्राम आश्रम कोणतेही काम करत नाही. त्यामुळं आयोगाने नेमलेला खादी मार्कचे प्रमाण मुळात सेवाग्राम आश्रम व्यवस्थापनाला मान्य नाही. आणि आश्रमावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आयोग स्वतंत्र आहे.
'चळवळ संपवण्याचं कट कारस्थान'
या संपूर्ण प्रकरणावर सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष टी प्रभू म्हणाले "सेवाग्राम आश्रमात 1936 पासून खादी कताईचे आणि विक्रीचे काम सुरू आहे. मात्र आश्रमातील खादी उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही, कारण सूत कताईसाठी आश्रम व्यवस्थापनाकडे हँडलूम्स नाहीत.
पण आम्ही लवकरचं विस्तार करणार आहोत. हल्ली आमचं उत्पादन कमी असल्यामुळे सेवाग्राम आश्रमही खादी इतर सस्थांकडून विकत घेऊन विक्री करत असते. मात्र खादी आयोगाने आमची खादी अवैध ठरवली आहे. त्यांनी कारवाईचा इशारा म्हणजेच अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. सेवाग्राम आश्रम समीतीच्या बैठकीत खादी मार्क वापरणार नाही यावर एकमत होऊन तसा ठरावही घेण्यात आला आहे".
पुढे बोलताना ते म्हणाले "खादी केवळ कापड नसून एक विचार तसेच चळवळ देखील आहे. खादीमुळे स्वदेशीला चालना मिळावी, तसेच रोजगार निर्माण व्हावा हा महात्मा गांधीं यांचा उद्देश होता. देशातील गरिबीचा प्रश्न मिटवायची असेल आणि लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी खादी हा उत्तम मार्ग आहे हा त्या काळचा मूलमंत्र होता. त्यामुळं स्वातंत्र्य लढ्यात खादी हे प्रमुख हत्यार म्हणून पुढे आले. त्याचबरोबर देशातील सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील परिवर्तनाचा मार्गही यातून मिळाला."
शुद्ध खादी लोकांपर्यंत पोहचावी या उद्देशाने खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक खादी कापड विक्रेता हा खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने प्रमाणित केलेल्या खादी कापडाची विक्री करू शकतो असा कायदा 2013 मध्ये अमलात आला. म्हणजेच खादी विक्री करणाऱ्या संस्थेला आयोगाकडून खादी मार्क आणि प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक आहे.
"मात्र आयोगाचं प्रमाणपत्र नसणाऱ्या आणि खादी मार्क न वापरता विक्री करणाऱ्या संस्थांवर खादी आयोग कारवाईचा बडगा उचलते. त्या अंतर्गत सेवाग्राम आश्रमाला आयोगाने इशारा दिला आहे. त्यामुळं आश्रमाने खादी नावाखाली कपडे विक्री करू नये असे आदेश आश्रमाला देण्यात आले," नागपूरचे सहायक ग्रामद्योग अधिकारी राघवेंद्र मिश्रा यांनी बीबीसी मराठीशी बोलतांना सांगितलं.
मिश्रा म्हणाले "सेवाग्राम आश्रमाने खादी नाव हटवलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आम्ही आश्रम व्यवस्थापनाशी बोललो तेव्हा त्यांनी खादी नाव काढून टाकण्यासंदर्भात होकार दर्शवला होता. त्याचबरोबर खादी प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार असल्याचं ते म्हणाले होते. पण प्रमाणपत्राशिवाय खादी विक्री अवैध आहे आणि त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल" असं मिश्रा म्हणाले.
विदर्भात एकुण १२ संस्थानी खादी प्रमाणपत्र मिळवलय तर 6 संस्थाना खादी मार्क मिळालाय. यामध्ये बळवंत ढगे यांनी खादी मार्क आणि खादी प्रमाणपत्र दोन्हीही मिळवले आहेत.
ते म्हणतात "KVIC म्हणजेच खादी आयोगाचा मुळ उद्देश प्रामाणिक आहे. सामान्य जनतेपर्यंत भेसळमुक्त खादी मिळावी हा खादी आयोगाचा हेतू स्पष्ट आहे. मात्र देशात खादीचे जनक असणाऱ्या सेवाग्राम आश्रम उत्पादीत खादीलाचं अवैध ठरवणं, त्यांना कारवाईची धमकी देणे हे सुद्धा चुकीचे आहे. काही निवडक संस्था वगळता हाताने खादी तयार करणाऱ्या संस्था बोटावर मोजण्या इतक्या शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळं खादी आयोगाच्या अटीमुळे भेसळ खादी तयार करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवता येईल आणि गरजूंना काम मिळेल" ढगे म्हणाले.
लॉकडाऊननंतर विक्री घसरली
सेवाग्राम आश्रमात खादी उत्पादन क्षमता कमी असल्यामुळे नागपूर आणि देशातील विविध भागातून शुद्ध खादी खरेदी करून सेवाग्राम आश्रमातल्या स्टोअर्समधून विक्री केली जाते. 2015 पासून सचिन बहाद्दूरे या खादी भांडारात कर्मचारी म्हणून काम करतात.
ते म्हणतात "लॉकडाऊन पूर्वी सेवाग्राम आश्रमातील खादीला भरपूर मागणी होती. जवळपास 60 ते 70 लाख रुपयांची वार्षिक विक्री होत असायची. मात्र लॉकडाऊन लागल्यानंतर विक्री घसरली, पण आता निर्बंध उठवल्यानंतर आम्ही नव्याने खादी विक्रीस सुरवात केली. यंदा खादिला चांगला प्रतिसाद आहे. पण आता खादी आयोगाच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढवली आहे. आमची खादी 100% शुद्ध आहे."
पण सेवाग्राम आश्रमाला अचानक धडकलेल्या पत्रामुळे आश्रमाच्या मुळ तत्वाला हादरा बसला हे निश्चित आहे. खादी आयोगात भ्रष्ट्राचार होत असल्याचा तसेच राजकारण शिरल्याचा आरोप टी प्रभू यांनी केला आहे.
सेवाग्राम आश्रम ही एक स्वायत्त संस्था आहे. आयोगाच्या इशाऱ्यामुळे सेवाग्राम आश्रमाच्या पंरपरा खंडीत होण्याचा मोठा धोका आहे. या नव्या आक्रमणामुळे सेवाग्राम आश्रमातील पदाधिकारी चिंतेत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)