You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीडः एका एकरातली विहीर पाहिली आहे का कधी
- Author, राहुल रणसुभे,
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.
मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून भीषण पाणी टंचाई जाणवत आहे पण सध्या मात्र बीड जिल्हातील एका विहीरीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. याचं कारण म्हणजे ही विहीर तब्बल एका एकरात बनवण्यात आली असून त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च आल्याचं सांगितलं जातंय.
बीड जवळील पाडळशिंगी गावातील शेतकरी मारुती बजगुडे यांनी ही विहीर बनवली आहे. बजगुडे यांच्याकडे साडेबारा एकर जमीन होती. मात्र सततच्या दुष्काळामुळे त्यांना त्यातून काही फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. त्यांचा लग्नमंडपाचा व्यवसाय आहे. त्यातूनच त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह चालतो. मात्र आता या विहिरीमुळे त्यांची कोरडवाहू शेती ही बागाईत झालीये.
बजगुडे सांगतात, "आमचा बीड जिल्हा दुष्काळी आहे. जमीनीला उन्हाळ्यात पाणी पाहिजे असं मला सारखं वाटायचं. त्यामुळे एखादं छोटं मोठं शेततळं करण्यापेक्षा आपण एखादी मोठी विहीर बांधू ज्यामुळे 12 महिने जमीनीला पाणी मिळालं पाहिजे असा विचार माझ्या डोक्यात आला. आता मी बांधलेली ही विहीर 202 फुट रुंद, 41 फुट खोल तर यामध्ये 10 कोटी लिटर पाणी सध्याच्या घडीला आहे. आता इथून पुढं दोन-तीन वर्ष जरी दुष्काळ पडला तरी माझी साडेबारा एकर जमिनीला 3 वर्ष पुरेल एवढं पाणी या विहिरीत आहे."
विहीर तर बनवली पण त्यातली माती टाकायची कुठे?
एक एकर एवढा खड्डा करायचा म्हणजे त्यातली माती टाकायची कुठे? कारण जर त्या मातीची नीट विल्हेवाट लावली नाही तर 5-10 एकरावर नुसते मातीचे ढिगारे लागून ती जमीन अडकून पडते. त्यामुळे अशा प्रकारच्या विहिरीचं नियोजन करण्याआधी त्यातली माती, मुरूम कुठे टाकायचा याचं नियोजन असणं गरजेचं आहे.
परंतु बजगुडे यांनी हे कसं शक्य केलं याबद्दल ते सांगतात, "माझ्या विहिरीजवळूनच धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. जेव्हा त्या महामार्गाचं काम सुरू होतं, तेव्हा मला या विहिरीची युक्ती सुचली. असं वाटलं की आपण एक मोठी विहिर खणू आणि त्यातली माती, मुरूम जे काही निघल ते या रस्त्याच्या बांधकामासाठी देऊन टाकू. मी विहिरीचं काम सुरू केलं आणि रस्तेबांधकामासाठी यातला मुरूम विकला. खोदकाम करताना जे काही पाषाण निघालं, ते मी खडी क्रशरवाल्यांना विकलं. त्या व्यतिरिक्त जे काही मटेरियल निघालं ते मी इतरांना बेसमेंट भरण्यासाठी दिलं. विहिरीच्या खोदकामात निघालेलं काहीच मटेरियल मी इथं पडू दिलं नाही."
या विहीरीचं काम जेव्हा सुरू होतं तेव्हा अनेकांना उत्सुकता होती की, हे नेमकं कशाचं काम सुरू आहे. पण जेव्हा त्यांना कळायचं की हे विहिरीचं काम सुरू आहे तेव्हा लोकं नाव ठेवायचे. आता ही विहीर पाहून तेच लोकं मारुती यांचं कौतुक करत आहेत.
या बद्दल बजगुडे सांगतात, "खोदकाम करताना लोक बघायला येत. हे सर्व काय सुरू आहे विचारत. तर काही जण माझ्यावर हसलेसुद्धा. मात्र तेव्हा त्यांच्या लक्षात नाही आलं. परंतु आता काठोकाठ पाण्याने भरलेली विहीर पाहिल्यानंतर ते म्हणतात खरंच या माणसाने काही तरी वेगळं डोकं लावलंय."
'बायकोचे बोलणे खावे लागले'
विहीर बांधली इथ पर्यंत ठीक आहे मात्र एका शेतकऱ्यानं एवढा पैसा आणला कुठून हा प्रश्न अनेकांना सतावतोय. अनेकांनी याबद्दल बजगुडे यांना विचारलेही. बजगुडे यांनी या प्रत्येक रुपया-रुपयाचा हिशेब ठेवला आहे. ते म्हणतात, उद्या कोणी माझ्याकडे विचारपूसही करायला आलं तर मी त्यांना सर्व पावत्या दाखवेन.
हे पैसे जमावण्यासाठी बजगुडे यांची बरीच तारांबळ उडाली. एवढंच नाही तर घरच्यांचा ओरडाही त्यांना खावा लागला.
असे जमवले दीड कोटी रुपये
याबाबत ते सांगतात, "माझा लग्नमंडपाचा व्यवसाय आहे. तर माझी काही जमीन हायवे रोडमध्ये गेली आहे. त्याचे मला पैसे मिळाले. तेव्हा मी विचार केला की, हे पैसे इकडे तिकडे न खर्च करता मी एक मोठी विहिरच का बांधू नये. मग हे सर्व पैसे आणि माझ्या व्यवसायातून मिळालेले पैसे हे सर्व मी या विहिरीच्या बांधकामासाठी लावले. अक्षरशः माझ्या संपूर्ण आयुष्याची पुंजी मी या विहिरीसाठी लावली आहे. एवढंच नाही तर बायकोचे दागिने देखील या विहिरीच्या बांधकामासाठी विकावे लागले. माझी बायको अजूनही मला ओरडते, कशाला केलाय खड्डा ह्यो... "
या गोष्टीची भीती वाटते
बजगुडे यांची विहीर पाहायला महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यातूनही लोक येत आहेत. त्यामुळे या ठिकाणाला सध्या पर्यटन स्थळासारखं स्वरूप प्राप्त झालंय. परंतु हीच बाब आता बजगुडे यांना चिंतेत टाकत आहे. याबद्दल सांगताना ते म्हणतात, "बीड हे दोन गोष्टींसाठी ओळखलं जातं.
एक म्हणजे कंकालेश्वराचं मंदिर आणि दुसरं म्हणजे खजिना बारव. मात्र आता पाडळशींगीमधली माझी ही एका एकरातील विहीर एक प्रकारे बीडची ओळखंच बानली आहे. अनेक लोक माझ्या विहिरीला भेट देण्यासाठी येतात. मात्र त्यांना विहिरीपर्यंत पोहचण्यासाठी चांगला रस्ता नाही. तसंच या विहिरीला कंपाऊंडवॉल सुद्धा नाही. लोक येतात या विहिरीच्या कठड्यावरती उभे राहातात, सेल्फी काढतात. तेव्हा मनाला भीती वाटते की, एखादा विहिरीत पडला तर. मला या विहिरीला संरक्षण भिंत बांधायची आहेत. पण त्यासाठी माझ्याकडे आता पैसे नाहीत."
कोरडवाहू शेती झाला बागाईत
या विहिरीमुळे मारुती यांना त्यांच्या शेतीला हवं तेवढं पाणी देणं शक्य होतंय. तसंच हवं ते पीक घ्यायला आता ते तयार आहेत. शिवाय त्यांनी या विहिरीत मत्स्यशेती करण्यासही सुरुवात केलीये.
तर भविष्यात मोत्यांची शेती करण्याचाही त्यांचा मानस आहे. बजगुडे म्हणतात, "पूर्वी माझी जमीन कोरडवाहूमध्ये मोडायची. उन्हाळ्यात तर शेतीला पाणीच नव्हतं. मात्र आता विहीर बनल्यापासून मी आता सर्व शेत फळबागीचा करणार आहे. आता मी 8 एकरात मोसंबी लावलीये. टरबूज लावलाय. आता या फळबगिच्याला दोन महिने पाणी पुरेल एवढं पाणी माझ्याकडे आहे. तसंच या विहिरीमध्ये मी 30,000 मासे टाकले आहेत. आता एक एक मासा पाच-सहा किलोचा झाला आहे. तसेच मी या विहिरीला कड्या बसवल्या आहेत. जेणे करुन भविष्यात मी मोत्याची शेतीही करू शकेन."
अशी प्रकारची विहीर इतर शेतकऱ्यांनीही बांधावी असं मत बजगुडे व्यक्त करतात. "शेतकऱ्याला पाण्याशिवाय उन्हाळी पीक घेणं शक्यच होत नाही. कधी पाऊस पडतो तर कधी पडत नाही. आता ही विहीर जशी मी एकट्याने बांधली आहे. जर अशाच प्रकारची विहीर कोणाला बांधायची असल्यास त्यांनी 8-12 जणांमध्ये 1 मोठी विहिर बांधली तर त्यांना शेतीला पाणी मिळेल. शिवाय शेतीला पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येणार नाही," असा विश्वास मारुती बजगुडे व्यक्त करतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)