शर्यतीच्या बैलांची किंमत कशी ठरते? काही बैलांची किंमत लाखो रुपये का असते?

    • Author, सरफराज मुसा सनदी
    • Role, बीबीसी मराठीसाठी, सांगलीहून

'आपल्या पुढे कोणी गेलेले हरण्याला आवडत नाही, त्यामुळे हरण्या कधी पहिला नंबर सोडत नाही,' अशी त्याची ख्याती आहे.

कोल्हापूरच्या एका बैलाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. ही चर्चा त्याच्या कामगिरीनं सुरू आहेच, सोबत त्याच्या किंमतीचीही आहे. तब्बल 35 लाख रुपये किमतीचा हा बैल असल्याचा दावा मालकानं केलाय. 'हरण्या' असं या बैलाचं नाव आहे.

सांगलीतल्या कवठेमहाकाळमध्ये नुकत्याच झालेल्या स्पर्धेत या बैलानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कवठेमहांकाळमध्ये नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत जवळपास 45 बैलगाड्यांनी भाग घेतला होता.

मात्र, हरण्या बैलाने जेव्हा या शर्यतीत पाऊल ठेवलं, तेव्हा स्पर्धेत हरण्याच धुरळा उडवणार याची जोरदार चर्चा झाली. आणि तेच झालं.

पहिली शर्यत, पहिला क्रमांक

बैलगाडी शर्यतीचा आता महाराष्ट्रात धुरळा उडू लागला आहे. सुप्रीम कोर्टानं अटी-शर्ती ठेवत विनालाठी-काठी बैलगाडी शर्यतीला परवानगी दिली आहे.

शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या परवानगी नुसार महाराष्ट्रातील पहिली बैलगाडी शर्यत सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावात पार पडली.

चार जानेवारी रोजी पार पडलेल्या बैलगाडी शर्यतीसाठी बैलगाडा शर्यत शौकीनांची जत्रा भरली होती. एक लाखांचं पाहिलं बक्षीस आणि महाराष्ट्रातील पहिलीच शर्यत यामुळे जवळपास 35 एक बैलगाडा मालक आपल्या बैलांसह शर्यती मध्ये सहभागी झाले होते.

यामध्ये कोल्हापूरच्या संदीप पाटलांचा 'हरण्या' बैलदेखील सहभागी झाला होता. त्यामुळे स्पर्धेचा निकाल शर्यत पार पाडण्या आधीच बैलगाडी शर्यत शौकिनांना माहिती होता. तो म्हणजे मैदान 'हरण्या'च मारणार.

'आपल्या पुढे कोणी गेलेले हरण्याला आवडत नाही, त्यामुळे हरण्या कधी पहिला नंबर सोडत नाही,' अशी ख्याती हरण्या बैलाची आहे.

आतापर्यंत शंभर-एक मैदान हरण्याने मारली आहेत. सलग 40 वेळा पहिला येण्याचा बहुमान हरण्या बैलानं पटकावला असून नांगोळयाचे महाराष्ट्रातील पाहिले मैदान मारत सलग 41 वेळा प्रथम क्रमांक पटकवण्याचा विक्रम हरण्या बैलानं केलाय.

"कवठेमहांकाळमधल्या शर्यतीच्या विजयानंतर हरण्या बैलाची किंमत 35 लाखांपर्यंत गेली आहे," असा दावा बैलाचे मालक सचिन आणि संदीप पाटील करतात.

"बैल जितक्या शर्यती जिंकतो तितकी त्याची किंमत वाढत जाते आणि शेतकऱ्याचाही भाव वाढतो," असं हे गणित असल्याचं पाटील सांगतात.

'6 लाखाला खरेदी केलं, आज 35 लाख किंमत'

हरण्या बैलाच्या किमतीबद्दल अधिक सांगताना सचिन पाटील सांगतात की, "25 लाखांपर्यंत हरण्या बैलाला मागणी आली होती. द्यायचंच झालं तर 35-40 लाखांपर्यंत कुणीही घ्यायला तयार आहे. पण द्यायचं नाही, त्यामुळे त्याची किंमत कशाला करायची? तो अनमोल आहे."

"व्यापारी किंवा उद्योजकांकडे बीएमडब्ल्यू वगैरे गाड्या असतात, तसं शौकीन आणि घरंदाज लोकांना असा बैल आपल्याकडे असण्याची इच्छा असते. आपल्याकडे असा बैल असणं म्हणजे मानसन्मान आणि प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. ज्याच्या दावणीला चांगला बैल आहे, त्याचं नाव कधीही निघतं," असं सचिन पाटील सांगतात.

पाटलांनी या हरण्या बैलाला तो 4 वर्षांचा असताना विकत घेतलं होतं, तेव्हा त्याची किंमत सहा लाख रुपये होती. आज त्याचं वय सहा वर्षं आहे आणि हरण्याने आतापर्यंत 41 शर्यती जिंकल्यानंतर त्याची ही 35 लाख किंमत झालीय, असा ते दावा करतात.

हरण्याची खासियत सांगताना बैल मालक सांगतात की, "हरण्या थोडा रागीट आहे आणि त्याला इर्ष्या जास्त आहे."

"इतर बैलांप्रमाणे हरण्या शर्यतीदरम्यान आपली गती कमी करत नाही. शर्यत सुरू झाल्यापासून संपेपर्यंत एकाच गतीने पळतो. इतर जनावरं जमतात, शर्यतीच्या ट्रॅकवरुन बाजूला जाणं, प्रेक्षक पाहून बुजून जाणं. असं हरण्याचं होत नाही. तो बुजला तरी सरळ रेषेत पळतो. इकडं तिकडं पाहिलं तरी तो धावण्याचा वेग कमी करत नाही," असं सचिन पाटील सांगतात.

'हरण्या'ला सांभाळण्यासाठी रोज एक हजाराचा खर्च

हरण्या बैलाला सांभाळण्याचा थाट मात्र एकदम राजेशाही आहे. त्याचा रोजचा खर्च एक हजार रुपये आहे.

त्याला रोज सकाळी दोन लिटर म्हशीचे दूध आणि तीन लिटर गायीचे दूध दिलं जातं. शिवाय हरभरा, बाजरी, मटकी, सातू याचा दिवसभरात 5 किलो भरडा आणि ओलं सुकं शाळू वैरण दिलं जातं.

पण हरण्याला व्यायाम फारसा नाहीच. शेतीत जेमतेम 15 मिनिटं कामाला जुंपतो. पण ऐट इतकी की त्याला रोज गरम पाण्याने आंघोळ घातली जातेय आणि शर्यत जिंकून आल्यावर लोण्याचं मालिश केलं जातं, तर बसायला रबरी चटई.

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींवर बंदी होती, तेव्हाही हरण्या बैलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आलं नाही. आज ना उद्या शर्यत सुरू होईल, या आशेनं त्याची देखभाल सुरू ठेवली गेली आणि शर्यतीस परवानगी मिळाल्यानंतर पहिल्याच स्पर्धेत हरण्या बैलानं पहिला क्रमांक पटकावलाय.

शर्यतीआधी उपाशी का ठेवलं जातं?

हरण्याला शर्यतीच्या आधी थोडं उपाशी ठेवलं जातं. सचिन पाटील सांगतात की, "शर्यतीआधी बैलाला थोडा काळ उपाशी ठेवावं लागतं. कारण जेवल्या जेवल्या आपण जसं काम करू शकत नाही, किंवा एखादा खेळ खेळू शकत नाही, तसं बैलाचंही असतं. त्यामुळे बैलाला थोडा काळ उपाशी ठेवावं लागतं."

पण हरण्याचं वैरण बंद करावं लागत नाही. शर्यतीआधी आणि शर्यतीनंकरही लगेच वैरण खातो. आज शर्यतीत पळाला, तरी उद्याही पळू शकतो. हा त्याचा अंगभूत गुण आहे. हा गुण सगळ्यात नसतो. शंभरात एखादाच असा बैल होतो, असंही ते पुढे सांगतात.

बैलांच्या शर्यतीतले जाणकार सांगतात की, बैल धावला नाही, तर त्याला कत्तलखान्यात दोन-पाच हजार किंमत देखील मिळत नाही. त्यामुळे धावत्या बैलाला चांगला भाव मिळतो.

कुठले बैल शर्यतीत धावतात?

विजय जाधव हे बैल आणि शर्यतीच्या एकूण अर्थकारणाचे अभ्यासक आहेत. बीबीसी मराठीनं त्यांच्याशी बातचित केली.

ते सांगतात की, "महाराष्ट्रात किंबहुना देशात सगळ्याच प्रकारचे बैल धावतात असं नाही. केवळ खिलार जातीचे बैल शर्यतीमध्ये धावतात, यामध्येही काजळी खिलार,कोळसा खिलार आणि म्हैसूर खिलार या तीन खिलार जातीचे बैल शर्यतीमध्ये धावतात. या बैलांचे गुणधर्म म्हणा किंवा शारीरिक वैशिष्ट्य असं की, ज्याप्रमाणे घोडा धावतो, त्याप्रमाणे खिलार जातीच्या बैलांची धावण्याची क्षमता असून हे वैद्यकीय अहवालनुसार सिद्ध झाले आहे," असं जाधव सांगतात.

"बैलाची शारीरिक क्षमता ही धावण्याची आहे. त्यामुळे शर्यतीत धावल्यामुळे बैलाला बाजारात किंमत आहे. जर बैल धावला नाही, तर त्याला दोनपाच हजार किंमत कत्तलखान्यात देखील मिळत नाही. पण धावण्यामुळे आज एका बैलाची किंमत एका लाखांपासून 25 लाखांपर्यंत मिळत आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या घरात हा पैसा येतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो," असं जाधव सांगतात.

बैल आणि अर्थकारण

बैल आणि शर्यतींबाबतच्या अर्थकारणावर विजय जाधव अधिक सविस्तर सांगतात.

महाराष्ट्राची परंपरा आणि शर्यतीमुळे निर्माण होणारा आर्थिक गणिताकडे पाहिलं तर हे लक्षात येतं की, बैल शर्यतीत धावतो. त्यावेळी त्याची किंमत वाढते. त्याचा एक खरेरीदार वर्ग निर्माण होतो.

शर्यतीची परंपरा फक्त हौस आणि मौज म्हणून नाही. शेतकऱ्यांचे एक पारंपारिक साधन आहे, शेतीची कामं संपली की उन्हाळ्याचा हंगाम चालू होतो, त्यावेळी गावागावात जत्रा-यात्रा भरतात. त्यामध्ये कुस्त्यांची मैदाने देखील भरतात, तशाच पद्धतीने बैलांची मैदानं पारंपरिक आहेत.

पूर्वी बैलांची मैदानं ही मर्यादित असायची आता त्याला व्यावसायिक रूप आलं आहे. व्यावसायिक स्वरूपात बैलाची किंमत वाढली जाऊ लागली. त्यामुळे आज बैलाचं स्वतंत्र अर्थकारण निर्माण झालंय.

शेतकऱ्याच्या घरात जर एखादा बकरा विकला तर हजार-दोन हजार मिळतात, कोंबडी विकली तर शे-पाचशे मिळतात. पण तोच धावणारा बैल असेल तर त्याची किंमत लाखांच्या घरात जाते.

बैलगाडा शर्यत असेल तर त्या ठिकाणी जत्रा-यात्रेचे स्वरूप येते, मग छोटे-छोटे व्यवसायिक जसे हातगाडी, भेळ विक्रेते, जनावरांचे साहित्य, अवजार विक्री करणाऱ्यांचा अर्थकारण चालतं.

तसंच, आपल्याकडे दिवाळी किंवा इतर धार्मिक सणांच्या माध्यमातून जशी बाजारपेठ चालते, तसे बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांची बाजारपेठ आहे.

तर अशी आहे बैल आणि बैलगाडा शर्यतीचं अर्थकारण.

शेवटी पुन्हा हरण्या बैलाकडे यायचं झाल्यास, हरण्या बैलाला 35 लाखांएवढी चांगली किंमत आली असली तरी पाटलांना तो विकायचा नाहीय. बैलांचा नाद करत त्यांना शर्यतीतला मान आणि समाधान महत्त्वाचं वाटतंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)