You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका : माणसाला बसवली डुकराची किडनी
अमेरिकेतील डॉक्टरांनी एका व्यक्तिला डुकराची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात यश मिळाल्याची माहिती दिली आहे. या यशामुळं अवयवदानाची कमतरता पूर्ण करण्यासाठी एक मोठा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
ज्या व्यक्तीला डुकराची किडनी ट्रान्सप्लान्ट करण्यात आली आहे, तो ब्रेन डेड होता. म्हणजेच तो आधीच जीवन रक्षक प्रणाली (व्हेंटिलटर) वर होता आणि तो ठिक होण्याची काहीही शक्यता नव्हती.
मानवी शरिरानं किडनीला बाह्य अवयव म्हणून नाकारू नये, म्हणून जेनेटिकली मॉडीफाय केलेल्या डुकराची किडनी या व्यक्तीला लावण्यात आली.
मात्र अद्याप या प्रत्यारोपणाबाबत माहिती घेण्यात आलेली नाही, किंवा त्याबाबत माहिती प्रकाशितही करण्यात आलेली नाही.
मात्र हा आतापर्यंतचा सर्वांत विकसित प्रयोग असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
अशा प्रकारच्या चाचण्या आधीही घेण्यात आल्या होत्या मात्र मानवावर अशी चाचणी झाली नव्हती.
अवयव प्रत्यारोपणासाठी डुकराचा वापर करणं ही काही अगदीच नवी कल्पना नाही. डुकरांच्या हृदयातील वॉल्व्हचा वापर पूर्वीपासूनच मानवांसाठी करण्यात आलेला आहे.
आकाराचा विचार करता, डुकरांचे अवयव मानवी अवयवांशी मिळते-जुळते असतात.
न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी लॅन्गोन हेल्थ मेडिकल सेंटरमध्ये डॉक्टरांनी डुकराची किडनी काम करते की मानवी शरिर ती नाकारतं हे पाहण्यासाठी आजारी व्यक्तीच्या रक्तवाहिन्यांना जोडून पाहिली.
त्यानंतर अडीच दिवस त्यावर बारकाईनं लक्ष ठेवलं आणि अनेक प्रकारच्या तपासण्या केल्या.
गरज
"ही किडनी मानवी किडनी ट्रान्सप्लान्टसारखीच काम करत असल्याचं आमच्या लक्षात आलं. ही किडनी अगदी व्यवस्थित काम करत होती, आणि शरिर ती नाकारेल असं वाटलंच नाही," असं प्रमुख संशोधक डॉक्टर रॉबर्ट माँटगोमेरी यांनी बीबीसी वर्ल्ड टूनाइट कार्यक्रमात सांगितलं .
डॉक्टर माँटगोमेरी यांचंही ट्रान्सप्लांट झालं आहे. अवयवांसाठी वाट पाहणाऱ्या लोकांसाठी अधिकाधिक अवयवांची गरज आहे. मात्र असं असलं तरी हे काम वादग्रस्त असल्याचंही, त्यांनी मान्य केलंय.
"मला काळजी समजू शकते. सध्या ट्रान्सप्लान्टसाठी वाट पाहणारे सुमारे 40 टक्के रुग्ण हे अवयव मिळेपर्यंत मृत पावलेले असतील, असं मला वाटतं. आपण अन्न म्हणून डुकराचं मांस वापरतो, औषधांमध्ये डुकरांचा वापर होतो. वॉल्व्हदेखील वापरतो, त्यामुळे यात काही वाईट आहे, असं मला वाटत नाही," असंही ते म्हणाले.
हा शोध अजूनही प्राथमिक पातळीवर आहे. त्यासाठी अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र, त्याचवेळी यामुळं याची वैद्यकीय चाचणी घेण्यासंदर्भात एक विश्वास निर्माण झाला आहे, असं डॉक्टर माँटगोमरी म्हणाले.
प्रगती
"आम्ही अनेक दशकं प्राण्यांचे अवयव मानवी शरिरात ट्रान्सप्लान्ट करण्याबाबत अभ्यास केला आहे. या गटानं ते काम पुढं नेलं आहे," असं ब्रिटनमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) साठी काम करणारे किडनी आणि आईसीयू डॉक्टर मरियम खोसरावी यांनी सांगितलं.
"आपण करू शकतो म्हणून आपण करायला हवं, असा याचा अर्थ होत नाही. लोकांनी याबाबतच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी असं मला वाटतं," असं ते नैतिकतेच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले.
"सध्या तरी मानवी दात्यांकडून अवयव मिळणं ही प्राथमिकता आहे. अशा प्रकारचा प्रयोग दैनंदिन वापरात येण्यासाठी अजून बराच पल्ला गाठावा लागणार आहे," असं एनएचएसमध्ये ब्लड अँड ट्रासप्लांटच्या प्रवक्त्यांनी म्हटलं.
अवयवांची गरज असलेल्या रुग्णांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवण्यासाठी काम करत राहणं गरजेचं आहे. सर्व लोकांनी देहदान करावं आणि अवयव दान शक्य असेल तर ते करावं आणि त्याची कल्पना कुटुंबीयांना देऊन ठेवावी असंही, त्यानी म्हटलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)