You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आता रानटी डुकरांना शेतातून पळवून लावणार रोबो लांडगे!
- Author, बीबीसी मॉनिटरिंग
- Role, ताए-जन कांग, अलिस्टेर कोलमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार
आपल्याकडे जसं शेतांत पिकांच्या रक्षणासाठी बुजगावणं लावतात, अगदी तसाच प्रयोग जपानमध्ये सुरू आहे. आता जपान म्हटलं की अद्ययावत रोबोंचा देश. मग तिथली बुजगावणं काही साधीसुधी थोडीच असणार.
जपानच्या काही शेतांमध्ये रोबो लांडग्याचा वापर करण्यात येत आहे. आता तुम्ही म्हणाल लांडगे का? कारण तिथे रानटी डुकरांनी शेतांमध्ये हैदोस घातला आहे. पिकांचं असं नुकसान रोखण्यासाठी नुकताच हा प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वीही ठरला.
जपानमधल्या 'असाही टीव्ही'च्या एका वृत्तानुसार हा 'सुपर मॉन्स्टर वुल्फ' 65 सेमी लांब आणि 50 सेमी उंच आहे. त्याचे खरेखुरे वाटणारे केस, मोठे भयानक दात आणि लालभडक डोळ्यांमध्ये चमकणाऱ्या लाइट्समुळे हा लांडगा कुणालाही घाबरवू शकतो.
किसारोझू शहराजवळ भाताच्या शेतांमधून रानटी डुकरांना हुसकावून लावण्यासाठी या रोबो लांडग्यांना तैनात करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हा प्रयोग करण्यात आला.
एखादा प्राणी दिसला की या लांडग्याचे डोळे चमकतात आणि तो मोठ्याने ओरडतो.
या रोबोची बॅटरी सौर ऊर्जेने रिचार्ज होते. पण डुकरं खरंच याला घाबरतात का?
प्रयोग यशस्वी झालाय म्हणजे नक्कीच ही रानटी डुकरं इकडे भरकटत नसतील. आणि रोबो बसवलेल्या ठिकाणी पिकांचं नुकसान कमी झालं आहे. या अगोदर दरवर्षी किसारोझू शहराजवळ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचं, अशी माहिती जपानच्या कृषी सहकारी खात्यानं दिली आहे.
याचं उत्पादन करणाऱ्या कंपनीने सांगितलं की या डुकरांना एकाच आवाजाची सवय होऊ नये म्हणून हा रोबो लांडगा वेगवेगळे आवाजही काढू शकतो.
असा हा एक रोबो लांडगा जवळजवळ एक किमीपर्यंत नजर ठेऊ शकतो. त्यामुळं इलेक्ट्रिक तारेच्या कुंपणापेक्षा हे लांडगे अधिक कार्यक्षम असणार आहेत, असं कृषी सहकारी खात्याचे अधिकारी चिहीको उमेझावा यांनी चिबा निप्पो या वेबसाईटला माहिती देताना सांगितलं.
लवकरच हे रोबो लांडगे मोठ्या प्रमाणात बनवले जाणार आहेत. एक रोबोची किंमत जवळपास 3.1 लाख रुपये असणार आहे. तसंच हे रोबो अत्यंत कमी पैशात भाड्यावरही उपलब्ध होणार आहेत.
(ताए-जन कांग, अलिस्टेर कोलमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार.बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)