धार अपघात: इंदूर-अमळनेर एसटी अपघातात 13 जणांचा मृत्यू; नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत

फोटो स्रोत, ANI
इंदूरहून अमळनेरला येणारी एसटी नदीत पडून झालेल्या अपघातात 13जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात खालघाट संजय सेतू इथून ही बस नदीत कोसळली.
एसटी मंहामंडळाचे संचालक शेखर चन्ने यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, "इंदूर ते अमळनेर एसटी बसचा धार जिल्ह्यात नर्मदा नदीजवळ अपघात झाला आहे. नर्मदा नदीच्या पात्रात बस कोसळली. आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. बाकी बचावकार्य सुरू आहे. साधारण साडेनऊ वाजता अपघात झाला. सकाळी साडेसात वाजता इंदूरहून निघाली. अमळनेर आगारात दुपारी 1-2 पर्यंत पोहचणं अपेक्षित होतं. बसमध्ये 30 ते 40 प्रवासी असण्याची शक्यता. बसची क्षमता 42 प्रवाशांची आहे."
मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही याबाबत माहिती दिली आहे. या अपघातातून 15 जणांना वाचवण्यात आलं आहे. 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून यामध्ये 8 पुरुष, 4 महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. MH40 N9848 या क्रमांकाची राज्य परिवहन महामंडळाची बस सकाळी 7.30 वाजता इंदूर इथून सुटली होती.

फोटो स्रोत, ST DEPO AMALNER
13 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली आहे. जयपूरच्या नांगल कला गोविंदगढ येथील राहिवासी चेतन राम गोपाल, उदयपूर येथील मल्हारगढचे रहिवासी 70 वर्षीय जगन्नाथ हेमराज जोशी, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील शारदा कॉलनीतले रहिवासी 40 वर्षीय प्रकाश श्रवण चौधरी, अमळनेर येथे राहणारे 60 वर्षीय नीबाजी आनंद पाटील, पाटोदा येथील 55 वर्षीय रहिवासी कमलाबाई नीबाजी पाटील, अमळनेरचे 45 वर्षीय चंद्रकांत एकनाथ पाटील, अमळनेरचे 40 वर्षीय प्रकाश पाटील आणि अकोल्याचा 27 वर्षीय अरवा मुर्तजा बोरा, इंदूरचे सैफुद्दीन अब्बास अशा 8 जणांची ओळख पटली आहे.
चंद्रकांत एकनाथ पाटील (18603) या बसचे चालक तर प्रकाश श्रावण चौधरी (8755) वाहक आहेत. चंद्रकांत पाटील 2011 पासून एसटीमध्ये कार्यरत आहेत तर प्रकाश चौधरी 2003 पासून एसटीमध्ये काम करतात.
अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने 022/23023940 हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे.

फोटो स्रोत, ST DEPO AMALNER
हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळ मदतीसाठी 09555899091 तसंच जळगाव नियंत्रण कक्ष 02572223180 02572217193 कक्षाचे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे आणि जखमींवर उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन आणि धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

फोटो स्रोत, EKNATH SHINDE/BBC
तसंच मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताची घटना दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं आहे असंही ते म्हणाले.
खलघाट संजय सेतू दोन लेनच्या पुलावर दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटून बस नदीत कोसळली. स्थानिकांनी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. इंदूर आणि धार इथून NDRFच्या तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. बचाव आणि सुटकेचं कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"खलघाट इथे झालेली दुर्घटना अतिशय दु:खद अशी आहे. ज्यांनी आप्तस्वकीय गमावले आहेत त्यांच्या दु:खात सहभागी आहे. जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना. प्रशासन घटनास्थळी पोहोचलं आहे. बस नदीतून बाहेर काढण्यात आली आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. जखमींवर त्वरित उपचार सुरू व्हावेत असे आदेश दिले आहेत", असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे.
एसटी महामंडळाचे संचालक शेखर चन्ने यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, "इंदूर ते अमळनेर एसटी बसचा धार जिल्ह्यात नर्मदा नदीजवळ अपघात झाला आहे. नर्मदा नदीच्या पात्रात बस कोसळली. आतापर्यंत 12 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. बाकी बचावकार्य सुरू आहे. साधारण साडेनऊ वाजता अपघात झाला. सकाळी साडेसात वाजता इंदूरहून निघाली. अमळनेर आगारात दुपारी 1-2 पर्यंत पोहचणं अपेक्षित होतं. बसमध्ये 30 ते 40 प्रवासी असण्याची शक्यता. बसची क्षमता 42 प्रवाशांची आहे".
"इंदोर-अमळनेर ही एसटी बस मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे.

फोटो स्रोत, ANI
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे", असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत. मी सुद्धा धार जिल्हाधिकारी आणि एसटी प्रशासनाशी संपर्कात आहे.
शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे. जखमींना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना करतो".
दरम्यान इंदोरहून येणाऱ्या बस अपघाताची माहिती मुख्यमंत्री यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी आहोत. मुख्यमंत्री याबाबात अधिक माहिती घेत आहेत असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
(ही बातमी सतत अपडेट होत आहे)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








