उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर कंगना राणावत काय म्हणाली?

"1975 नंतर भारताच्या लोकशाहीसाठी हा अतिशय महत्त्वाचा काळ आहे. 1975 मध्ये जेपी नारायण यांच्या एका हाकेवर सिंहासन छोडो म्हणत जनता आली आणि शासनकर्त्यांना सिंहासन सोडावं लागलं. 2020 मध्ये मी असं म्हटलं होतं की लोकशाही म्हणजे एक विश्वास आहे, हा विश्वास गर्वाच्या आधारे तोडण्याचा प्रयत्न करतात, ते लोकच उद्धवस्त होतात." असं कंगना राणावत म्हणाली.

दुसरं असं की हनुमानाला शिवाचा बारावा अवतार मानलं जातं. या हनुमानचालिसेवर शिवसेनेने बंदी आणली. त्यामुळे त्यांना हनुमान काय शिव सुद्धा वाचवू शकणार नाही असंही ती म्हणाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री आपला राजीनामा दिला. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यानंतर कुणाची सत्ता स्थापन होणार, कधी होणार असे अनेक प्रश्न पडले आहेत.

सोशल माध्यमांवर तर या चर्चांना इतके उधाण आले आहे की नेटकऱ्यांनी शिंदे गटाला खातीच वाटून टाकली आहेत. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून अशा अफवा पसरवू नका असे आवाहन केले आहे.

"भाजपा आणि आपली अजून कोणतीही चर्चा झालेली नाही. मंत्रिपदाच्या याद्या वगैरे यांच्या बातम्या खोट्या आहेत," असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

लवकरच भाजपा आणि आपली चर्चा होईल असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.

'वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस', असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने

एकनाथ शिंदे यांच्या गटाने आज गोव्यात बैठक घेतली. जवळपास तासभर झालेल्या बैठकीत शिंदे यांनी आमदारांची मतं जाणून घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज ते मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. शिंदे यांनी गोवा विमानतळावर बोलताना आपली 50 आमदारांनी नेता म्हणून निवड केल्याचं स्पष्ट केलं. मुंबईत आपण राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं.

राऊत जेवढं कमी बोलतील तेवढं चांगलं - केसरकर

उद्धव ठाकरेंना पदावरुन काढणं हा आमचा हेतू नव्हता, त्यांचं मन दुखावण्याचा हेतू नव्हता. आम्ही त्यांच्या राजीनाम्याचं कोणतंही सेलिब्रेशन केलेलं नाही. आम्ही सांगितलेली भूमिका शेवटपर्यंत न ऐकल्यामुळे हा संघर्ष झाला. असं मत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी गोव्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.

आमच्या मनात संभ्रम निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. मंत्रिपदाच्या आशेने इथं कोणीही आलेलं नाही, असंही केसरकर म्हणाले. संजय राऊत जेवढं कमी बोलतील तेवढं चांगलं आहे असंही केसरकर यावेळेस म्हणाले.

आम्ही कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसलेला नाही, चुकीचे सल्ले देऊन, भाजपाशी युती तोडून तुम्हीच खंजीर खुपसला आहे अशा शब्दांत केसरकर यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.

आता आम्ही विरोधी पक्षात- थोरात

लोकशाहीत जी भूमिका येईल ती घेण्याची आमची पद्धत आहे असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

काँग्रेसच्या विधानसभा सदस्यांची बैठक मुंबईत झाल्यावर थोरात यांनी आपण आता विरोधी पक्षात बसण्यास तयार आहोत असं सांगितलं. महाविकास आघाडीतील समन्वयाबद्दल बैठकीत चर्चा झाली असं बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

आपण आता उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार आहोत असं या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं.

बंडखोरांना पश्चाताप होईल

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर आगपाखड केली आहे.

"शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी मी प्रयत्न केले, तुम्ही करणार का," असा प्रश्न त्यांनी शिंदे गटाला विचारला आहे.

"अडीच वर्षांपूर्वी आमचं म्हणणं ऐकलं असतं, चर्चा झाली असती, तर पुढचा प्रयोग झाला नसता," असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

"आता आपले मार्ग वेगळे झाले आहेत, दोष देण्यात अर्थ नाही, बंडखोरांना पश्चाताप होईल," असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

सरकार कोसळण्याचा दोष मुख्यत्वे संजय राऊत यांचा आहे असं काल दीपक केसरकर म्हणाले होते. संजय राऊत यांच्याबद्दल सर्वांच्या मनात राग आहे असं ते म्हणाले होते. त्याला राऊत यांनी आज उत्तर दिलं.

"एक दिवस आधी केसरकर आमच्याबरोबर चहा पित होते, मग ते बंडखोरांना जाऊन मिळाले," असं राऊत यावेळेस म्हणाले.

"उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर सर्वांचा विश्वास होता. सर्व जातीपंथांच्या लोकांचा त्यांच्यावर अगाढ विश्वास होता. पण हे सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून सुरू होते, पण ते कसेही वागले, ज्यापद्धतीने सरकार पाडण्यासाठी यंत्रणाच्या माध्यमातून आमदारांवर दबाव आणला असला तरी आम्ही विधायक विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत. येणाऱ्या नव्या सरकारने महाराष्ट्राच्या हितासाठी काम करावं ही इच्छा," असं राऊत म्हणाले.

"मी उद्या ईडीसमोर हजर होणार आहे, माझी भूमिका स्पष्ट करेन, मला महाराष्ट्रात पक्षाचं काम करण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तरी मी त्याला सामोरा जाईन," अशा शब्दांत त्यांनी निर्धार व्यक्त केला.

केसरकर काय म्हणाले होते?

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याला शिवसेनेचे नेते संजय राऊत जबाबदार आहेत," असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून बोलताना केसरकर यांनी आपल्या भावना मांडल्या. संजय राऊत यांच्याबद्दल आमदारांच्या मनात असलेली नाराजी केसरकर यांनी काल माध्यमांमध्ये उघडपणे व्यक्त केली.

दीपक केसरकर म्हणाले, "हा राजीनामा आमच्यासाठी आनंदाची गोष्ट नाही. ही आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. जो संघर्ष आम्हाला करावा लागला याला पूर्णपणे जबाबदार काँग्रेस, राष्ट्रवादी आहे आणि त्यापेक्षा जास्त जबाबदार हे संजय राऊत आहेत. रोज उठायचं आणि काहीतरी टीका करायची. असं करून त्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एक दुरावा निर्माण केला. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर झाला."

शिंदे गट कोणत्या पक्षात विलिन होणार का असा प्रश्न विचारताच दीपक केसरकर म्हणाले, "सरकार स्थापन झाल्यानंतर विेधानसभेचा कारभार सुरळीत होईल. यासाठीच अध्यक्ष निवड व्हावी लागेल. याबाबत शिंदे आणि फडणवीस यांच्यात चर्चा होईल. विलीन म्हणू नका. आम्ही मूळ शिवसेना आहोत. कोर्टाच्या अनेक निर्णयांमध्ये म्हटलंय का पक्षाची घटना महत्त्वाची नाही राज्यघटना काय सांगते हे महत्त्वाचं. त्यामुळे सर्व गोष्टी तपासून पहात आहोत. त्यावर आता काहीच बोलता येणार नाही. जे काही होईल त्याप्रमाणे पुढचा निर्णय होईल."

राजीनामा देताना उद्धव ठाकरे काय म्हणाले?

बुधवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आता दुसरा अंक सुरू होणार आहे.

बुधवारी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.

फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून निर्णय सांगताना ते म्हणाले, 'मी आश्वस्त केले होत जे सुरू केलंय ते सुरू राहील. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने केली आहे. सरकार म्हणून अनेक कामे रायगड, बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण विसरणार नाही. मला समाधान आयुष्य सार्थकी लागले संभाजीनगर नामकरण आज दिले शिवाय उस्मानाबादचे धाराशिव. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा. एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली. पवारसाहेब, सोनियाजी सहकार्याना धन्यवाद. चारच शिवसेनेची मंत्री आज होते कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होये ते नामानिराळे ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन केलं आहे."

यावेळी त्यांनी शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे आभार मानले.

ते पुढे म्हणाले, "माणसं मोठी झाली. ज्याने मोठं केलं त्यांनाच विसरायला लागली. सत्ता आल्यानंतर सगळं दिलं. ती लोकं नाराज झाली. मी मातोश्रीला आल्यानंतर साधी साधी लोक माझ्याकडे येत आहेत. ज्यांना दिले ते नाराज, ज्यांना दिलं नाही ते सोबत आहे.

आज सुद्धा न्यायदेवतेने निकाल दिला आहे. तरीसुद्धा उद्या बहुमत चाचणी करण्याचा आदेश दिला आहे. राज्यपाल महोदयांना ही धन्यवाद द्यायचे आहेत."

"आम्हाला फ्लोर टेस्ट करायला सांगितली.विधान परिषदेच्या आमदारांची यादीला मंजुरी दिली तर फार बरं होईल" असा टोमणाही त्यांनी हाणला.

काल मी आवाहन केलं. जे नाराज आहे ती नेमकी आहे कोणावर? आपली जी नाराजी आहे ती आपल्या हक्काच्या घरात का सांगितली नाही.? तुमच्या भावनांचा मी आदर करत आलो आहे.

ज्यांना आपलं मानलं त्यांच्याशी काय लढाया करायच्या. अनेक सैनिकांना स्थानबद्ध केलं आहे. चीन सीमेवरचं संरक्षण सुद्धा काढून इथे आणण्यात येईल जो गुलाल उधळला तिथे रक्ताचे पाट उधळणार का

तुमच्या मार्गात कोणीही येणार नाही. उद्या बहुमत चाचणी आहे. माझ्या बाजूने किती आहे किती विरोधात आहे याने मला फरक पडत नाही.

मला तो खेळच खेळायचा नाहीये. ज्यांना शिवसेनेने जन्म दिला त्या शिवसेना पुत्राला पदावरून खाली खेचण्याचं पुण्य पदरात पडत असेल तर पडू द्या.

मला मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत अजिबात नाही. आम्ही अजिबात हपापत नाही. आम्ही सगळं हिंदूसाठी करतो. आज मी सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आहे."

शिवसेना आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मी माझ्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत आहे.

मी शिवसैनिकांना सांगतोय त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला सत्तेवरून खेचलं याचे पेढे त्यांना वाटू द्या. त्यांचा गोडवा त्यांना लखलाभ...मला तुमच्या प्रेमाचा गोडवा हवा आहे.

सीएए-एनआरसीच्या वेळेस देशभरात दंगली झाल्या. पण महाराष्ट्रात झाल्या नाहीत. मुस्लिम बांधवही सोबत आले. या सगळ्याला कारण तुम्ही आहात. पण हे चांगलंही कोणाला बघवलं नाही. असं ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)