You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याला संजय राऊत जबाबदार- दीपक केसरकर #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याला संजय राऊत जबाबदार- केसरकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याला शिवसेनेचे नेते संजय राऊत जबाबदार आहेत असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून बोलताना केसरकर यांनी आपल्या भावना मांडल्या. संजय राऊत यांच्याबद्दल आमदारांच्या मनात असलेली नाराजी केसरकर यांनी काल माध्यमांमध्ये उघडपणे व्यक्त केली.
दीपक केसरकर म्हणाले, "हा राजीनामा आमच्यासाठी आनंदाची गोष्ट नाही. ही आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. जो संघर्ष आम्हाला करावा लागला याला पूर्णपणे जबाबदार काँग्रेस, राष्ट्रवादी आहे आणि त्यापेक्षा जास्त जबाबदार हे संजय राऊत आहेत. रोज उठायचं आणि काहीतरी टीका करायची. असं करून त्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एक दुरावा निर्माण केला. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर झाला," ही बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केली आहे.
2. काँग्रेसच्या लोकांनी औरंगाबादला येऊन दाखवावं- इम्तियाज जलील
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने जाताजाता राज्यात उस्मानाबाद आणि औरंगाबादचं नामांतर केल्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी या ठरावाला विरोध केला नाही याचं त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रचंड आगपाखड केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आता औरंगाबादला येऊन दाखवावं, तुमचं कसं स्वागत करतो पाहा असा इशाराच त्यांनी दिला आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आता नाचत राहावं कारण त्यांना तेवढंच काम शिल्लक राहिलं आहे अशा शब्दांमध्ये जलील यांनी संताप व्यक्त केला आहे. ही बातमी टीव्ही9 मराठी ने प्रसिद्ध केली आहे.
3. द्वेषाचं मूळ मदरसे- केरळचे राज्यपाल
उदयपूर येथे कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जातोय. केरळचे राज्यपाल आणि माजी मंत्री आरिफ मोहम्मद खान यांनीही या प्रकरणावर खेद व्यक्त केला आहे.
'मदरसे हे द्वेषाचं मूळ आहेत. आमच्या मुलांना निंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद करायला का शिकवले जात आहे?' असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मुस्लीम कायदा काही कुराणातून आलेला नाही, तो काही लोकांनी लिहिला आहे. त्यात त्यांनी शिरच्छेदाचा कायदा लिहिला, तो मदरसांमध्ये शिकवला जातो असे आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटलं आहे. लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
4. उपराष्ट्रपतिपदाची 6 ऑगस्टला निवडणूक
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सकाळने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पाच जुलैला औपचारिक अधिसूचना निघेल. 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. त्यानंतर 20 जुलैला अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 22 जुलै असेल. सहा ऑगस्टला निवडणूक होईल. त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे.
5. मुंबईत कोरोनाचे 1504 नवे रुग्ण
मुंबईत बुधवारी 1504 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर 1645 रुग्ण करोनामुक्त झाले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मंगळवारी शहरात 1290 रुग्ण आढळले होते. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
मृत्यू झालेल्या तीन रुग्णांपैकी 84 वर्षीय रुग्ण पुरुष असून त्याला दीर्घकालीन मूत्रविकार होता. दुसरा रुग्ण 64 वर्षीय महिला असून तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे दीर्घकालीन आजार होते. तर तिसऱ्या 37 वर्षीय रुग्णास यकृताचा दीर्घकालीन आजार होता.
बुधवारी बाधित आढळलेल्या रुग्णांपैकी 60 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून त्यापैकी18 जणांना प्राणवायूची आवश्यकता आहे. सध्या 681 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून एकूण 11हजार 844 उपचाराधीन आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)