You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आता दुसरा अंक सुरू होणार आहे.
बुधवारी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.
फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून निर्णय सांगताना ते म्हणाले, 'मी आश्वस्त केले होत जे सुरू केलंय ते सुरू राहील. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने केली आहे. सरकार म्हणून अनेक कामे रायगड, बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण विसरणार नाही. मला समाधान आयुष्य सार्थकी लागले संभाजीनगर नामकरण आज दिले शिवाय उस्मानाबादचे धाराशिव. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा. एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली. पवारसाहेब, सोनियाजी सहकार्याना धन्यवाद. चारच शिवसेनेची मंत्री आज होते कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होये ते नामानिराळे ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन केलं आहे."
यावेळी त्यांनी शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे आभार मानले.
ते पुढे म्हणाले, "माणसं मोठी झाली. ज्याने मोठं केलं त्यांनाच विसरायला लागली. सत्ता आल्यानंतर सगळं दिलं. ती लोकं नाराज झाली. मी मातोश्रीला आल्यानंतर साधी साधी लोक माझ्याकडे येत आहेत. ज्यांना दिले ते नाराज, ज्यांना दिलं नाही ते सोबत आहे.
आज सुद्धा न्यायदेवतेने निकाल दिला आहे. तरीसुद्धा उद्या बहुमत चाचणी करण्याचा आदेश दिला आहे. राज्यपाल महोदयांना ही धन्यवाद द्यायचे आहेत."
"आम्हाला फ्लोर टेस्ट करायला सांगितली.विधान परिषदेच्या आमदारांची यादीला मंजुरी दिली तर फार बरं होईल" असा टोमणाही त्यांनी हाणला.
काल मी आवाहन केलं. जे नाराज आहे ती नेमकी आहे कोणावर? आपली जी नाराजी आहे ती आपल्या हक्काच्या घरात का सांगितली नाही.? तुमच्या भावनांचा मी आदर करत आलो आहे.
ज्यांना आपलं मानलं त्यांच्याशी काय लढाया करायच्या. अनेक सैनिकांना स्थानबद्ध केलं आहे. चीन सीमेवरचं संरक्षण सुद्धा काढून इथे आणण्यात येईल जो गुलाल उधळला तिथे रक्ताचे पाट उधळणार का
तुमच्या मार्गात कोणीही येणार नाही. उद्या बहुमत चाचणी आहे. माझ्या बाजूने किती आहे किती विरोधात आहे याने मला फरक पडत नाही
मला तो खेळच खेळायचा नाहीये. ज्यांना शिवसेनेने जन्म दिला त्या शिवसेना पुत्राला पदावरून खाली खेचण्याचं पुण्य पदरात पडत असेल तर पडू द्या.
मला मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत अजिबात नाही. आम्ही अजिबात हपापत नाही. आम्ही सगळं हिंदूसाठी करतो. आज मी सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आहे."
शिवसेना आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मी माझ्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत आहे.
मी शिवसैनिकांना सांगतोय त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला सत्तेवरून खेचलं याचे पेढे त्यांना वाटू द्या. त्यांचा गोडवा त्यांना लखलाभ...मला तुमच्या प्रेमाचा गोडवा हवा आहे.
सीएए-एनआरसीच्या वेळेस देशभरात दंगली झाल्या. पण महाराष्ट्रात झाल्या नाहीत. मुस्लिम बांधवही सोबत आले. या सगळ्याला कारण तुम्ही आहात. पण हे चांगलंही कोणाला बघवलं नाही. असं ते म्हणाले.
'आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री- रवी राणा'
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटानं जे बंड केलं होतं ते बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी केलं होतं. जे हनुमानभक्त आणि रामभक्त एकनाथ शिंदेंसोबत होते त्यांनी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी व्यक्त केली आहे.
आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता, शेतकरी सगळ्यांचीच ही इच्छा होती. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा हिंदुत्ववादी गट देवेंद्र फडणवीसांना पूर्ण पाठिंबा देईल आणि आम्ही अपक्षही त्यांच्यासोबत असू, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.
'सत्ता येते, सत्ता जाते...सगळ्यांचं सहकार्य विसरणार नाही'
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणतात,
"माझा अडीच वर्षांचा मंत्री म्हणून कार्यकाळ हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझ्या दृष्टीने तरी चांगला गेला. खूप चांगले निर्णय घेता आले. लोकोपयोगी कामे करता आली. मंत्रिपदाची जबाबदारी असताना अधिका-यांच्या सहका-याशिवाय व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय काम करणे हे निव्वळ अशक्य असतं. त्यांचा अनुभव, त्यांचे ज्ञान हे वेळोवेळी उपयोगी पडले. त्यामुळेच जे काही निर्णय घेता आले, ते योग्यरितीने पुढे नेण्यात मी यशस्वी झालो. सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो. कारण यांच्यामुळेच मला सहज काम करता आले, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत."
सत्ता येते, सत्ता जाते पण, ह्या सगळ्यांनी केलेले सहकार्य मी कधीच विसरणार नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
हा सत्याचा विजय आहे. महाराष्ट्राला गेली अडीच वर्षे जे भ्रष्टाचार, अकार्यक्षमतेचं ग्रहण लागलं होतं, ते आता संपेल आणि महाराष्ट्र देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या वाटेवर वेगवान वाटचाल करेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा उशीरा सुचलेलं शहाणपण आहे. बाळासाहेब ज्या रुबाबात जगले त्याच्या एक टक्काही उद्धवजींना जमलं नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं.
महाविकास आघाडी सरकारच्या अशा जाण्यामुळे व्यथित झालो आहे. आमचे वैचारिक मतभेद असले तरी लोकशाहीच्या दृष्टिने भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं. आता या धोक्यानं फॅसिझमचं भीषण रुप घेतलं आहे. देशाला वाचविण्याच्या दृष्टिने आता विरोधकांनी आपला लढा तीव्र करायला हवा, असं ट्वीट काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर केलं.
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि इतर नेते राजभवनावर पोहोचले आहेत..
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या संपूर्ण घटनाक्रमावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत शालीनतेने त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आम्ही एक संवेदनशील मुख्यमंत्री गमावला आहे. कोणत्याही प्रकारचा फसवणुकीचा अंत चांगला होत नाही याचा इतिहास साक्षीदार आहे. ठाकरे यांचा हा विजय आहे. ही शिवसेनेच्या विजयाची सुरुवात आहे. लाठ्या खाऊ, तुरुंगात जाऊ मात्र बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवू असं ते म्हणाले.
'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा'
सरकारं येतात आणि जातात, पण ते ज्यापद्धतीनं गेलं त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला देशभरात तडा गेला, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं. हे महाराष्ट्राच्या मनातलं सरकार होतं. कोरोना काळात जे काम केलं त्याचा आदर्श भारतासमोर ठेवला गेला. आता उद्धव ठाकरे पायउतार झाले असले तरी महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून कायम मनात राहतील. उद्धव यांना मुख्यमंत्रिपदावर बसवल्यापासून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत त्यांच्या पाठिशी राहिले. आता भविष्यातल्या गोष्टींबाबत पुढच्या काळात एकत्र बसून निर्णय घेऊ, असं जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "'सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संभ्रमात टाकणारा होता, त्यात अनिश्चितता आहे. अशा निर्णयाची सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा नव्हती. माझ्या मताप्रमाणे त्यांनी विधानसभेत यायला हवं होतं, त्यांची बाजू मांडायला हवी होती आणि त्यानंतर निर्णय घ्यायला हवा होता,' अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. 'उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत लढायला होतं. शेवटी फेसबुक लाइव्ह आणि विधीमंडळात बोलणं यात फरक असतो. ते रेकॉर्डवर राहतं,'
'हा साजरा करण्याचा विषय नाही'
मी भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, यश नम्रतेनं घ्यायचं असतं. उद्धवजींचा राजीनामा ही सेलिब्रेट करण्याचा विषय नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)