संभाजीनगरः औरंगाबादचं आजवर कितीवेळा नाव बदललं गेलंय?

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी

"इस ने कितनी तबाहियाँ देखी, इस के जख्मों का कुछ हिसाब नही, बावजूद इस के जमानें में हैदराबाद का जवाब नही!"

राघवेंद्रराव आलमपुरी यांच्या या ओळींमध्ये घुसखोरी करुन हैदराबादच्या जागी औरंगाबाद केलं तरी चालू शकेल इतकं हैदराबाद आणि औरंगाबादमध्ये साम्य आहे. ही दोन्ही शहरं त्यांच्या बहुरंगी बहुपेडी संस्कृतीमुळे सतत चर्चेत असतात. एकेकाळी संपूर्ण दख्खनवर लक्ष ठेवू शकेल इतकी ताकद औरंगाबादला प्राप्त झाली होती. याच प्रदेशात अनेक राजवटींनी आपापली राजधानी स्थापन केली होती.

1724 ला निजामाने (आसफजाही) राजवट स्थापन केली तेव्हाही औरंगाबादला महत्त्व होतंच. संस्थानाची राजधानी हैदराबादला गेली तरी औरंगाबादला उपराजधानीसारखा दर्जा होताच. संस्थानाच्या टोकावरचं मोठं आणि महत्त्वाचं शहर म्हणून त्याला विशेष स्थान होतं. आता मात्र या दोन्ही शहरांच्या नामांतराने पुन्हा उचल खाल्ली आहे. तिकडे हैदराबादचं भाग्यनगर आणि औरंगाबादचं संभाजीनगर व्हावं अशी मागणी होत होती. त्याला आज 24 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

अकबरुद्दीन ओवेसींनी औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे शहर आणि औरंगजेब चर्चेत आहे.

तसं औरंगाबाद हे त्याच्या राजकारणामुळे अनेकदा चर्चेत असतं. शहराची मतदाररचना पाहिली की त्याला विविध राजकीय पक्ष का महत्त्व देत असावेत आणि शहराच्या नामांतराचा विषय वारंवार का पुढे येत असावा हे लक्षात येईल. औरंगाबादमध्ये हिंदूंप्रमाणेच मुस्लीम लोकसंख्याही तितकीच लक्षणीय असल्यामुळे या मुद्द्याचा राजकीय वापर केला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजतडाग ते औरंगाबाद

"आज औरंगाबादचा इतिहास साधारणतः यादवांच्या काळापासून सांगितला जात असला तरी या परिसरातील मानवी अस्तित्वाच्या खुणा सातवाहन काळापासून दिसतात," असे औरंगाबादमधील इतिहास अभ्यासक आणि निवृत्त प्राध्यापक दुलारी कुरेशी सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "सातवाहनांनी कान्हेरी लेणींमध्ये औरंगाबाद येथील जागेचा राजतडाग असा उल्लेख केला आहे. त्या लेणी औरंगाबादमध्ये विद्यापीठाच्या परिसरात आहेत. राजतडाग हे एका व्यापारी मार्गावरचं केंद्र होतं. उज्जैन-महिष्मती-बुर्हाणपूर-अजंठा-भोकरदन-राजतडाग-प्रतिष्ठान-तेर असा तो मार्ग होता."

त्यानंतर यादवांच्या काळामध्ये देवगिरी म्हणजेच दौलताबादला महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर याच दौलताबाद किल्ल्यावर दिल्लीच्या अल्लाउद्दिन खिलजीने ताबा मिळवला.

त्याच्यानंतर 1327 साली मोहम्मद बिन तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला न्यायचं फर्मान काढलं आणि तसं मोठ्या प्रमाणात स्थलांतरही घडवून आणलं. परंतु 1334 साली हा निर्णय बदलून राजधानी पुन्हा दिल्लीत आणायचं त्यानं ठरवलं. असं असलं तरी दौलताबादचं पर्यायाने या जवळच्या प्रदेशाचं दख्खनवर सत्ता गाजवण्यासाठी असलेलं महत्त्व सिद्ध झालं होतंच. त्यामुळे दौलताबादचं विशेष महत्त्व प्राप्त झालं.

1499 साली दौलताबादचा ताबा अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला. पुढची जवळपास 137 वर्षे हा किल्ला निजामशाहीकडेच राहिला.

तुघलक काळातलं बांधकाम

मोहम्मद बिन तुघलकानी आपली राजधानी आणताना वाटेमध्ये अनेक ठिकाणी ठराविक अंतरावर सराया, विहिरी, मशिदी बांधल्या. तशीच एक जागा आजच्या औरंगाबादमध्ये आहे.

आज औरंगाबादमध्ये 'जुना बाजार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागी त्याने एक मशीद, विहिर आणि सराई बांधली होती असं दुलारी कुरेशी सांगतात. त्या म्हणाल्या, "या बाजाराचं मूळ नाव 'जौना बजार' होतं कारण मोहम्मद तुघलकाचं दुसरं नाव जौना खान असं होतं. त्याचा आता जुना असा अपभ्रंश झाला आहे."

खडकी आणि चिकलठाणा

अहमदनगरच्या निजामाचे प्रधानपद आणि लष्करप्रमुख असणाऱ्या मलिक अंबरने चिकलठाणा येथे झालेल्या लढाईत मुघलांचा पराभव केला.

त्यावेळेस मलिक अंबराला ही जागा अत्यंत आवडली. त्याने इथल्या खडकी गावाचा विकास करायचा ठरवलं आणि आजच्या औरंगाबाद शहराचा पहिला व्यवस्थित पाया घातला गेला. मलिक अंबराने शहरात रस्ते, पूल आणि कालव्याद्वारे (नहर) पाणीयोजना सुरू केली. त्याने नौखंडासारखे राजवाडेही बांधले. पोर्तुगीजांसाठी (त्याचा जंजिऱ्यांमुळे पोर्तुगीजांशी संबंध होता) चर्चही बांधले.

उद्ध्वस्त झालं, पुन्हा उभं राहिलं

या खडकी शहरावर जहांगिर बादशहाने 1616 साली हल्ला केला आणि पुढची 20 वर्षे खडकी उभं राहाणार नाही अशी तजविज केली.

पण मलिक अंबराने 1621 साली पुन्हा खडकी उभं केलं. त्यानंतर खडकीवर पुन्हा हल्ला झाला मलिक अंबराने पुन्हा खडकी दुरुस्त केलं. पण 1626 साली मलिक अंबराचा मृत्यू झाला.

फतेहनगर ते खुजिस्ता बुनियाद

त्यानंतर मलिक अंबरचा मुलगा फतेह खान अल्पकाळासाठी खडकीमध्ये आला.

त्याची माहिती देताना इतिहास अभ्यासक पुष्कर सोहोनी सांगतात, "त्याने या शहराचं नाव फतेहनगर केलं. पण 1636 साली शहाजहान बादशहाने औरंगजेबाला दख्खनचा सुभेदार नेमलं. तेव्हा या शहराचं नाव 'खुजिस्ता बुनियाद' करण्यात आलं".

1657 नंतर या खुजिस्ता बुनियादचं औरंगाबाद झालं. औरंगाबादचं महत्त्व मुघलांच्या इतिहासामध्ये लाहोर, दिल्ली, बुर्हाणपूर इतकंच आहे असं सोहोनी सांगतात.

औरंगजेबाचं आवडतं शहर

औरंगजेब सुरुवातीच्या काळात दौलताबादवर राहिला आणि नंतर तो खुजिस्ता बुनियादमध्ये राहू लागला. ही जागा आवडल्यावर त्याने शहरात मोठ्या प्रमाणात वसाहती निर्माण केली. शहरात बावनपुरे स्थापन झाले. तटबंदी उभी राहिली. नंतर त्याला दख्खनची राजधानीचा दर्जा देण्यात आला. मलिक अंबराप्रमाणे 11 नहरही त्याच्या काळात बांधल्या गेल्या.

हे एक सुंदर शहर असल्याचं वर्णन प्रवासी करु लागले असं दुलारी कुरेशी सांगतात. त्या म्हणाल्या, "ये शहर की हवा में खुशबू है, और पानी मे आब ए हयात है! असं वर्णन औरंगाबादचं होत असे. 1681 साली औरंगजेब औरंगाबादला आला त्यानंतर तो दख्खनमधून परत गेलाच नाही. खुल्ताबादला आपली साधी कबर बांधून वर सब्जाचं रोप लावावं अशी त्याने इच्छा व्यक्त केली होती."

आसफजाही राजवट

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल राजवट दख्खनमध्ये फारशी मजबूत राहिली नाही. सुभेदार म्हणून आलेल्या निझाम असफजाह अव्वल यांनी बंड पुकारुन स्वतंत्र राज्य स्थापन केलं. त्याची राजधानी औरंगाबादच होती.

तिसऱ्या निजामाने आपली राजधानी 1761 साली हैदराबादला स्थापन केली. त्यावेळेपर्यंत औरंगाबाद हे अनेक राजवटींमध्ये महत्त्वाचे केंद्र होते. हैदराबाद राजधानी झाली तरी निजामाच्या संस्थानात उपराजधानीसारखेच या शहराला महत्त्व होते.

अखेर 1948 साली हैदराबाद संस्थान भारतात विलिन झाल्यावर औरंगाबादही मराठवाड्यासह भारतात सामील झाले.

संभाजीनगर नाव कधीपासून चर्चेत येऊ लागलं?

1988ला औरंगाबादेत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभा घेतली. याच सभेत त्यांनी या शहराचं नाव औरंगाबादऐवजी संभाजीनगर ठेवत असल्याची घोषणा केली होती.

त्यानंतर शिवसैनिकांतर्फे औरंगाबादचा उल्लेख आजतागायत संभाजीनगर म्हणूनच केला जातो. सामना या मुखपत्रातही संभाजीनगर असंच लिहून येते. तेव्हापासून महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत औरंगाबाद की संभाजीनगर हा मुख्य मुद्दा असतो.

युतीच्या काळात मंजुरी

खरंतर जून 1995मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या सभेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आला. हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला.

1995ला युतीचं सरकार होते. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे त्यावेळी औरंगाबादचे तर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी नामांतराचा प्रस्ताव मांडला. त्याला मंजुरी देण्यात आली.

"युतीचं सरकार आलं तेव्हा 1995मध्ये आम्ही मंत्रिमंडळात संभाजीनगर नाव केलं. एकानं याचिका टाकली. हायकोर्टानं आमच्या बाजूनं निकाल दिला. सुप्रीम कोर्टात नंतर याचिका निकाली निघाली. पण आमचं सरकार तोपर्यंत सत्तेवरून गेलं होतं," माजी खासदार खैरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं.

या शहराला संभाजीनगरच का नाव हवं? असं विचारल्यावर खासदार खैरे म्हणाले होते,"औरंगजेबसारख्या क्रूर राजाचं नाव या शहराला नको."

"या शहराचं नाव खडकी होतं. औरंगजेबानं या शहराच नाव बदलून औरंगाबाद केलं. सोनेरी महालात त्यानं संभाजी महाराजांना चार महिने डांबून ठेवलं होतं. त्यांचा इथंच छळ करण्यात आला होता. आमच्यासाठी संभाजी महाराज महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच आम्हाला या शहराचं नाव संभाजीनगरच हवं," असं स्पष्टीकरण खैरे यांनी दिलं होतं.

युतीच्या काळात तत्कालीन मंत्रिमंडळानं संभाजीनगर नावाला मंजुरी दिली. या निर्णायाला औरंगाबादचे तत्कालीन नगरसेवक मुश्ताक अहमद यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं.

मुश्ताक अहमद यांनी याबाबत बीबीसी मराठीला 2018 मध्ये माहिती दिली होती. ते म्हणाले होते, "1996मध्ये सरकारनं संभाजीनगर नावावर आक्षेप आणि सूचना मागविणारी अधिसूचना काढली होती. आम्ही या अधिसूचनेलाच हायकोर्टात आव्हान दिलं. पण त्यावेळेस न्यायालयानं हे प्रकरण फक्त अधिसूचनेच्या स्तरावर असल्याचं सांगत प्रीमॅच्युअर याचिका फेटाळली होती."

"त्याविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टानं याचिका दाखल करून घेत सरकारवर ताशेरे ओढले. शहरांची नाव बदलण्यापेक्षा विकासकामं करा असं न्यायमूर्तींनी त्यावेळेस सुनावलं होतं. या प्रकरणावर सुनावणी सुरू होण्याआधीच सत्तेत आघाडीचं सरकार आलं, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी संभाजीनगरची अधिसूचना मागे घेतल्यानं सुप्रीम कोर्टातली याचिका त्यामुळे निकाली निघाली," अहमद सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)