SYL: सिद्धू मुसेवालाचं शेवटचं गाणं, पंजाबच्या सार्वभौमत्वाबद्दल काय म्हटलंय?

सुप्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर त्यांचं अखेरचं गाणं SYL गुरूवारी यूट्यूबवर रीलिज झालं. ही बातमी करेपर्यंत यूट्यूबवर हे गाणं 1 कोटी 80 लाख वेळा बघितलं गेलं. गाण्याचे बोल आणि गाण्यात मांडलेल्या मुद्द्यांमुळे हे गाणं चर्चेत आहे.

या गाण्यात पंजाब राज्याशी संबंधित काही मुद्द्यांचाही समावेश आहे. बीबीसी पंजाबीने तोच भाग समजून घेण्याचा प्रयत्न केला.

पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यात पाणी वाटपासाठी सतलज-यमुना लिंक कालवा म्हणजेच SYL कालवा उभारण्यात येणार होता. भाक्रा-नांगल धरणाचं पाणी हरियाणातून वाहणाऱ्या यमुना नदीपर्यंत पोहोचण्यासाठी हा कालवा बांधला जाणार होता. मात्र, कालवा तयार होण्याआधीच वाद सुरू झाला.

1976 साली आणीबाणीदरम्यान केंद्र सरकारने दोन्ही राज्यांना 35-35 लाख एकर फूट पाणी देण्यासंबंधीची अधिसूचना जारी केली होती. यात 2 लाख एकर फूट पाणी दिल्लीला देण्याचीही सूचना करण्यात आली होती.

सतलज-यमुना कालव्याची एकूण लांबी 214 किमी आहे. यापैकी 122 किमीचं बांधकाम पंजाब सरकारला तर 92 किमी काम हरियाणा सरकारला पूर्ण करायचं होतं.

हरियाणाने त्यांच्या वाटचं काम पूर्ण केलं आहे. मात्र, पंजाबमधलं काम अजूनही अपूर्ण आहे.

कालव्याच्या बांधकामावरुन तब्बल 5 दशकांपासून वाद सुरू आहे आणि या दोन्ही राज्यात वेळोवेळी आलेल्या वेगवेगळ्या सरकारांनी न्यायालयांमध्ये पाण्यासंबंधी आपापली बाजू मांडलेली आहे.

सुशील गुप्ता यांचं वक्तव्य

सुशील गुप्ता आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार आहेत. हरियाणात आम आदमी पक्षाचं सरकार आलं तर सतलज आणि यमुनेला जोडणाऱ्या कालव्याचं काम पूर्ण होईल आणि कालव्यातलं पाणी हरियाणातल्या प्रत्येक शेतात पोहोचेल, असं गुप्ता यांनी म्हटल्याचं वृत्त याचवर्षी एप्रिलमध्ये हिंदुस्तान टाईम्स या वर्तमानपत्राने दिलं होतं.

सिद्धू मुसेवाला यांच्या गाण्याची सुरुवात सुशील गुप्ता यांच्या याच वक्तव्यापासून होते.

गुप्ता म्हणाले होते, "2025 पर्यंत SYL कालव्याचं पाणी हरियाणातल्या शेतांमध्ये पोहोचेल. हे आमचं आश्वासन नाही आमची गॅरंटी आहे."

सोव्हेर्निटी (सार्वभौमत्व)

सिद्धू मुसेवाला आपल्या गाण्यात म्हणतात, "जोवर तुम्ही आम्हाला सार्वभौमत्वाचा मार्ग दाखवत नाहीत तोवर पाणी तर सोडा, एक थेंबही देणार नाही."

सोव्हेर्निटी म्हणजे सार्वभौमत्व आणि राजकारणात सार्वभौमत्व हे स्वतंत्र राष्ट्राचं वैशिष्ट्य असतं.

एखादा प्रदेश तेव्हाच स्वतंत्र मानला जातो जेव्हा त्याचं सरकार एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात असतं आणि ते सरकार कुठल्याही बाह्य दबावाविना शासन करतं.

कैदेत असलेल्या शीखांची सुटका

या गाण्यात सिद्धू मुसेवाला 1980 च्या दशकात पंजाबमध्ये सुरू झालेल्या बंडखोरीदरम्यान हिंसक आणि दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली तुरुंगात डांबून ठेवलेल्या खलिस्तान समर्थक कैद्यांविषयीही भाष्य करतात.

पंजाबमध्ये त्यांना 'बंदी सीख' असंही म्हणतात. गाण्यात सिद्धू मूसेवाला यांनी कैदेत असणाऱ्या या शीखांची सुटका करण्याचीही मागणी केली आहे. यातले अनेकजण गेल्या 25-30 वर्षांपासून तुरुंगात आहेत.

2019 साली केंद्र सरकारने यातल्या 8 शीख कैद्यांना मुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रकरण अजूनही प्रलंबित आहे.

हे बंदी शीख आहेत -

जगतार सिं हावरा : पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांच्या हत्येप्रकरणी त्यांना जन्मकैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1995 मध्ये पंजाब सिव्हिल सेक्रेटरिएटबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात बेअंत सिंह यांची हत्या झाली होती. या बॉम्बस्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला होता.

दविंदर पाल सिं भुल्लर : 1995 पासून तुरुंगात आहे. 1993 मध्ये दिल्ली युवक काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटातला तो मुख्य आरोपी आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

गुरदीप सिं खैरा : 1995 पासून तुरुंगात आहे. खैराने सर्वाधिक काळ तुरुंगात घालवला आहे. त्याला 2001 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याचं रुपांतर जन्मठेपेत केलं.

बलवंत सिं राजोआना : पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

लखविंदर सिंह, गुरमीत सिंह आणि समशेर सिंह यांनाही 25 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2013 सालापासून तिघेही पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहेत.

जगतार सिं तारा : याने बेअंत सिंह हत्या प्रकरणात आपली भूमिका असल्याचं लिहून देत गुन्हा स्वीकारला होता.

लाल किल्ल्यावर 'निशाण साहिब' फडकवणे

केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत पंजाब, हरियाणासह देशातल्या अनेक राज्यांतले शेतकरी अनेक महिने दिल्लीच्या सीमेवर धरणं देत बसून होते.

दरम्यान, 26 जानेवारीला शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली. या आंदोलनादरम्यान काही तरुणांनी लाल किल्ल्यावरच्या एका रिकाम्या खांबावर 'निशाण साहिब' फडकवला.

सिद्धू मुसेवालाने आपल्या शेवटच्या गाण्यात या घटनेचाही उल्लेख केला आहे.

विशेष म्हणजे, या घटनेनंतर पंजाबी गायक बब्बू मान यांनी या घटनेचा निषेध करत मी माझ्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही इतकं रडलो नाही, जेवढं या घटनेनंतर रडलो, असं म्हटलं होतं.

वर्षभराहून अधिक काळ चालेलल्या या आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.

बलविंदर जटाना

गाण्यात शेवटी सिद्धू मुसेवालाने जटाना गावातील बलविंदर सिंग यांचा उल्लेख केला आहे.

बलविंदर सिंगची पार्श्वभूमी पंजाबमधल्या रोपर जिल्ह्यातल्या चमकौर साहिबची होती. त्याच्या गावाचं नाव जटाना असल्याने खलिस्तानी चळवळीत त्याला बलविंदर सिंग जटाना या नावाने ओळखलं जाई.

1990 साली त्याने काही साथीदारांसोबत चंदिगढमधल्या सेक्टर 26 इथल्या एसवायएलच्या कार्यालयात या कालव्याच्या बांधकाम प्रकल्पात सहभागी मुख्य अभियंता एमएस सिक्री आणि अधीक्षक अवतार सिंह औलख यांच्यावर गोळीबार केला.

गोळीबारात दोघांचाही मृत्यू झाला आणि तेव्हापासून कालव्याचं बांधकाम बंद करण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)