You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सिद्धू मुसेवालांच्या हत्येचं पुणे कनेक्शन?
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येसंदर्भात पुण्याचं कनेक्शन असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या मात्र पुणे पोलिसांनी याचा इन्कार केला आहे.
पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात २९ मे २०२२ रोजी सायंकाळी जवाहरके गावात झालेल्या हल्ल्यामध्ये मुसेवालांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सुरु असणाऱ्या पोलीस चौकशीत रोज नवनवे खुलासे होत आहेत.
मुसेवालांवर गोळ्या झाडणाऱ्या आठ जणांपैकी दोघे जण पुण्याचे असल्याची माहिती समोर आली होती.
परंतु पुणे पोलिसांनी यासंदर्भात स्वतंत्र खुलासा केला आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, पंजाब पोलिसांची कुठलीही टीम राज्यात आलेली नाही. आली असेल तर त्यांनी आपली मदत घेतलेली नाही. संतोष जाधव हा आमच्यासाठी मर्डर केसमध्ये वाँटेड आहे. तो राजस्थान, पंजाब बार्डवर पळून गेला होता आणि अजूनही फरार आहे, एवढीच माहिती आमच्याकडे आहे".
"मुसेवाला मर्डर केसमध्ये त्याचा काही रोल आहे का किंवा त्याचा काही रोल निष्पन्न झाला आहे का याच्याविषयी आमच्याकडे कोणतंही ऑफिशियल कम्युनिकेशन नाहीये. त्याची माहिती पंजाब पोलिसच देऊ शकतील. मला वाटतं या तपासाठी त्यांच्याकडे SIT आहे. ते डिटेल सांगू शकतील. आपल्याकडे त्यांनी काही मदत मागितलेली नाही किंवा त्यांची टीमही इथे आलेली नाही", असं त्यांनी सांगितलं.
"तो आपल्याकडे वाँटेड आहे. आम्ही त्याच्या शोधात आहोत. त्याचे फोटो त्यांच्याशी शेअर केले होते. पण त्यांना आम्ही कोणतं सीसीटीव्ही फुटेज व्हेरिफाय करुन दिलेलं नाही. या केसशी संबंधित काही कम्युनिकेशन नाही.
"सौरव महांकाळ हा तळेगाव दाभाडे भागातला वाँटेड आहे. संतोष जाधव हा ३०२, मोक्का केसमधला वाँटेड आरोपी आहे. तो ७-८ महिन्यांपासून फरार आहे. वाँटेड आरोपीच्या शोधासाठी त्या भागातून आपण माहिती घेतच असतो. पण मुसेवाला केसच्या संदर्भात त्याच्या सहभागाविषयीचं व्हेरिफेकेशन आम्ही केलेलं नाहीये", असं पोलिसांनी स्पष्ट केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुसेवालांच्या वाहनावर बंदुकीच्या गोळ्यांचे तीस राऊंड फायर करण्यात आले. मुसेवाला सुरक्षा रक्षकांशिवाय घराबाहेर पडले होते.
मुसेवाला यांना गोळीबारानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.
पंजाब सरकारने शनिवारी 424 धार्मिक, राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांची सुरक्षा कमी केली होती. यामध्ये सिद्धू मुसेवालांचंही नाव होतं.
काही वर्षांपूर्वी पंजाबच्या मनोरंजन क्षेत्रात शुभदीप सिंहचं सिद्धू मुसेवाला असं नामकरण झालं. गन कल्चरशी संबंधित त्याची गाणी लोकप्रिय झाली. सिद्धू मुसेवालांची आई सरपंच आहे. निवडणुकीच्या काळात मुसेवालांनी आईसाठी जोरदार प्रचारही केला होता.
त्यानंतर मुसेवालांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा विधानसभेची निवडणूक लढवली. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
बीबीसी पंजाबीचे प्रतिनिधी सुरिंदर मान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला यांनी चेतन सिंह सर्वहितकारी विद्या मंदिर शाळेतून बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर पदवीचं शिक्षण घेतलं. कॅनडात एक वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रमाचं शिक्षणही घेतलं.
"काँग्रेस नेते, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या आकस्मिक निधनाने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत", असं काँग्रेस पक्षाने म्हटलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्वीट करत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. उभरते नेतृत्व आणि प्रतिभावान कलाकाराच्या जाण्याने अतिशय दुःख झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
मुसेवाला यांच्या मृत्यूनंतर युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनी आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान-मुसेवाला यांच्या खूनाचं रक्त तुमच्या हातांना लागलं आहे. थोडी लाज बाळगा आणि पदाचा राजीनामा द्या असं श्रीनिवास यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)