सिद्धू मुसेवालांचे चाहते का म्हणत आहेत की 'त्याने त्याचा मृ्त्यू आधीच पाहिला होता?'

"या तरुणाच्या चेहऱ्यावरचं तेजच सांगतंय की याची अंत्ययात्रा तरुणपणीच निघणार आहे... माझ्या दरवाजावर मृत्यूची कधीही थाप पडू शकते..."

या ओळी आहेत सिद्धू मुसेवालाच्या शेवटच्या गाण्याच्या. रविवारी दुपारी सिद्धू मुसेवाला या पंजाबी गायकाची मनसा येथे गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

सिद्धू मुसेवालाच्या कारवर गोळ्यांच्या तीस राउंडचे फायरिंग झाले. त्याच्या कारची अक्षरशः चाळणी झाली.

अवघ्या 28 वर्षांच्या सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूने पंजाब हादरले आहे. त्याच्या चाहत्यांना तर ही गोष्टच मान्य होत नाहीये की त्याचा मृत्यू झाला आहे. सर्वांत चटका लावणारी गोष्ट कोणती असेल तर सिद्धू मुसेवालाने काही दिवसांपूर्वीच 'द लास्ट राइड' नावाचे गाणे रिलीज केले होते. या गाण्याचे गीत त्याने स्वतःच लिहिले होते.

या गाण्यात त्याने ज्या काही गोष्टी बोलल्या आहेत जणू त्याच खऱ्या झाल्या असाव्यात अशी भावना त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.

तो त्याच्या गाण्यात म्हणतो, 'ओह चोबर दे चेहरे दा नूर दसदा, नी एदा उठूगा जवानीच जनाजा मिठिये...' म्हणजे... चेहऱ्यावरील तेजच सांगतंय का माणसाची अंत्ययात्रा तरुणपणीच निघणार आहे...

'ओह मर्द माशूका वंगू उडिकदा, खौरे कडो खडकाऊ दरवाजा मिठिये..'

'जशी एक प्रेमी आपल्या प्रेमिकेची वाट पाहतो तशी मी मृत्यूची माझ्या दरवाजावर कधीही थाप पडू शकते....'

15 मे रोजी रिलीज झालेल्या या गाण्याला युट्युबवर एक कोटी हून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

त्याच्या अनेक चाहत्यांना या गाण्यातल्या दुर्दैवी योगायोगाकडे लक्ष्य वेधले आहे.

असं म्हटलं जात आहे की हे गाणं सिद्धू मुसेवालाने टुपॅक शाकुर या रॅपरला श्रद्धांजली म्हणून लिहिले होते.

टुपॅक शाकुरची देखील तरुण वयातच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवालाच्या गाण्यात शाकुरच्या मृत्यूचा संदर्भ देण्यात आला आहे. शाकुरचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला होता ती जागा या गाण्यात दाखवण्यात आली आहे.

एका चाहत्याने म्हटले आहे की, सिद्धू मुसेवालाला त्याच्या मृत्यूचा अंदाज आधीच आला होता.

एका चाहत्याने लिहिले आहे की सिद्धूने त्याच्या गाण्यात शाकुरच्या कारचा वापरलेला फोटो जणू हेच सुचवत आहे की त्याने त्याच्या मृत्यूचे भाकीत केले होते.

सिद्धू मुसेवालांचा प्रवास

साधारण चार वर्षांपूर्वी पंजाबी करमणूक दुनियेत शुभदीप सिंह सिद्धू अल्पावधीतच सिद्धू मुसेवाला या नावाने प्रसिद्ध झाले.

एकदा एका चॅनलचे अँकर कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांशी बोलत होते. तेव्हा शुभदीप सिंह सिद्धू मुसेवाला गर्दीतून समोर आले आणि गाण्याची संधी मागितली.

त्यांनी गाणं गायलं आणि सगळ्यांना आवडलं. एक काळ होता जेव्हा सिद्धूंना स्वतःची ओळख सांगावी लागायची आणि एक काळ असा आला जेव्हा ते सिद्धू मुसेवाला या नावाने संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले. ते मानसा जिल्ह्यातल्या मूसा गावाचे राहाणारे होते.

सिद्धू मुसेवालांची लोकप्रियता 2018 साली एकदम वाढली जेव्हा त्यांनी गन कल्चरशी संबंधित अनेक गाणी म्हटली. त्यांच्या गाण्यात बंदुकांचा नेहमीच उल्लेख असायचा.

त्यांची आई चरणजीत कौर मूसा गावाच्या सरपंच आहेत. सरपंच निवडणुकीदरम्यान त्यांनी आपल्या आईसाठी जोमाने प्रचार केला होता.

सिद्ध मुसेवाला यांनी सरदार चेतन सिंह सर्वहितकारी विद्यामंदिर, मानसाहून बारावीपर्यंत शिक्षण घेतलं. यानंतर त्यांनी पदवी घेतली आणि नंतर कॅनडात एका वर्षाचा डिप्लोमाही केला.

मुसेवालांची गाणी आणि चित्रपट

सिद्धू मुसेवालांची अनेक गाणी आणि चित्रपट हिट झाले. युट्यूबवर त्यांच्या 'हाय', 'धक्का', 'ओल्ड स्कूल' आणि 'संजू' सारखी गाणी लाखो वेळा पाहिली गेली.

या गाण्यांच्या माध्यमांतून कथितरित्या बंदूक संस्कृती (गन कल्चर) ला प्रोत्साहन देण्यासाठी मुसेवाला यांच्यावर अनेकदा टीका झाली आणि त्यांच्यावर खटलाही भरला गेला.

गायक म्हणून यशस्वी झाल्यानंतर सिद्धू मुसेवालांनी चित्रपटातही अभिनय केला.

त्यांनी, 'आय अॅम स्टुडंट', 'तेरी मेरी जोडी', 'गुनाह', 'मूसा जट्ट', 'जट्टं दा मुंडा गौन लगा' अशा चित्रपटात काम केलं.

त्यांच्या गाण्यांना बॉलिवूडमध्येही प्रसिद्धी मिळत होती. फिल्मस्टार रणवीर सिंह आणि विकी कौशल यांनीही सिद्धू यांची गाणी सोशल मीडियावर शेअर केली होती.

गुन्हे, खटले आणि वाद

सिद्धू मुसेवाला यांचं नाव वादातही अनेकदा अडकलं. गोळीबार करतानाचे त्यांचे दोन व्हीडिओ व्हायरल झाले होते. यातल्या एका व्हीडिओत ते बर्नालाच्या बडबर फायरिंग रेंजमध्ये कथितरित्या रायफलने गोळीबार करताना दिसतात.

मे 2020 मध्ये संगरूर आणि बर्नालामध्ये सिद्धू आणि आणखी नऊ लोकांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

दुसऱ्या व्हीडिओत सिद्धू मुसेवालाच्या संगरूरच्या लड्डा कोठी रेंजमध्ये पिस्तुलाने गोळ्या चालवताना दिसत आहे. दोन्ही व्हीडिओ लॉकडाऊनच्या काळातले आहेत.

पोलिसांनी आधी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत सिद्धू मुसेवालांवर गुन्हे दाखल केले आणि नंतर हे दोन्ही गुन्ह्यांमध्ये आर्म अॅक्टची कलमं जोडली गेली.

याआधी फेब्रुवारी 2020 मध्ये मानसा पोलिसांनी हत्यारांच्या वापराला उत्तेजन दिल्याच्या आरोपखाली मूसेवाला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)