You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संतोष जाधव : सिद्धू मुसेवाला हत्याकांडातला आरोपी जेव्हा वेटरचं काम करू लागला...
सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या संतोष जाधवच्या अनेक कहाण्या आता समोर येत आहेत. लॉरेन्स बिष्णोई गँगच्या तो संपर्कात आल्यानंतर त्याने कसं गुन्हेगारी विश्वात नाव कमावलं, असं बरंच काही पोलिसांच्या हवाल्याने सांगितलं जातंय.
पुणे पोलिसांनी शार्पशूटर संतोष जाधवला गुजरातमधून 12 जून रोजी अटक केली, तेव्हा तो मांडवी तालुक्यातील नागोर या गावात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. ओंकार बाणखेले हत्याकांडात नाव आल्यापासून तो फरार होता, आणि अधून मधून बिष्णोई गँगसाठी काम करत होता.
पण यादरम्यान त्याचं आयुष्य एखाद्या डॉनसारखं ऐशोआरामात नव्हतंच. तो रोजचं आयुष्य जगायलासुद्धा दुसऱ्यांवर बऱ्यापैकी अवलंबून होता. पोलिसांनी त्याला नागोर गावातल्या एका साधारण हॉटेलमधून उचललं होतं. तो इथेच राहत होता, दोन वेळच्या जेवणासाठी वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये जात होता, आणि अगदीच सामान्य तरुणासारखा राहत होता.
काही वृत्तांनुसार तर संतोष हा अगदी हाताला मिळेल ते काम करत होता. कधी कधी तो ज्या खानावळीत जेवायचा, तिथेच हॉटेल बॉय म्हणूनही छोटीमोठी कामं करायचा, आणि तिथेच राहायचासुद्धा. तिथेच कुणीतरी त्याला त्याचा मोबाईलसुद्धा रिचार्ज करून द्यायचं.
पण जर एवढं खडतर आयुष्य जगायचं असेल तर हे तरुण असे गुन्हे का करत आहेत? या प्रश्नावर एका पत्रकार परिषदेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, "निश्चतपणे आपण हे म्हणू शकतो की हे आरोपी अत्यंत किरकोळ गोष्टींसाठी, किरकोळ पैशांसाठी असे गुन्हे करत आहेत. किरकोळ गुन्हे करणाऱ्या आरोपीला आश्रय देणे, त्यांना लपवून ठेवणे, त्यांची मदत करणे, अशा गोष्टी हे करत आहेत. याचा सोशल मीडियावर फोटो टाकून, रील्स बनवून ते या गोष्टींचं उदात्तीकरणं करू पाहतायत, जेणेकरून त्यांना अधिकाधिक प्रसिद्धी मिळावी. त्याचा वापर करून बिष्णोईसारख्या गँग मोठी खंडणी मागण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न यामधून दिसतो."
खंडणीचं प्रकरण झालं उघड
एवढंच नव्हे तर पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधवच्या आणखी काही प्रकरणांची माहितीसुद्धा उघड केलीय.
संतोषने पुण्याच्या एका वॉटर प्लांट व्यावसायिकाला गेल्या 6 महिन्यांपूर्वी 50 हजारांचा हप्ता व्हॉट्सॲपवर कॉल करून मागितला होता. हफ्ता दिला नाही तर गोळ्या घालून मारून टाकू, अशी धमकीसुद्धा दिली होती. पण घाबरलेल्या त्या व्यावसायिकाने याबद्दल कुठेही तक्रार केली नाही वा हफ्ता दिला नाही.
त्यानंतर काही दिवसांनी संतोषने एक माणूस त्याच वॉटर प्लांटवर पाठवून त्या व्यावसायिकाला पुन्हा एकदा धमकी दिली.
काही दिवसांपूर्वी जेव्हा पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधवला अटक केल्याच्या बातम्या येऊ लागल्या, तेव्हा त्या व्यावसायिकाने धाडस दाखवत या खंडणीच्या कॉलची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी संतोष जाधववर एक वेगळा गुन्हा दाखल केला, आणि ताब्यात असलेल्या संतोषची कसून चौकशी केली. तेव्हा त्याच्या गँगमधल्या आणखी दोन-तीन साथीदारांना अटक केली. याच साथीदारांकडून आतापर्यंत 13 गावटी पिस्टल, एक बुलेट कॅरियर आणि एक मॅक्झिन पोलिसांनी जप्त केली आहे.
अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितलं की, "आम्ही आधी दोघांना अटक करून पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत ठेवलंय. आतापर्यंत 13 हत्यारं जप्त करण्यात आली आहेत, जी त्यांनी मध्य प्रदेशातून आणली होती. संतोषने जूनच्या पहिल्या आठवड्यात दोघांना मध्य प्रदेशात पाठवलं होतं. या सगळ्यांचा संतोष जाधवशी आण संतोषचा बिष्णोई गँगशी थेट संबंध असल्याचं आतापर्यंत स्पष्ट झालं आहे."
कसा पकडला गेला संतोष जाधव?
मुसेवाला हत्या प्रकरणात पंजाब पोलिसांनी 8 संशयित शार्पशूटर्सची नावं दिली होती. त्यामध्ये सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळचाही समावेश आहे. याच सौरभ महाकाळवर फरार असताना संतोष जाधवला आश्रय दिल्याचा आरोप आहे.
पुणे पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा त्याने सांगितलं की संतोषला त्याने. कुठे लपवून ठेवलंय. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "सौरभ महाकाळने पोलीस चौकशीत सांगितलं की संतोष जाधव त्याचा मित्र नवनाथ सूर्यवंशीकडे गुजरातच्या कच्छमध्ये लपून बसला आहे."
नवनाथ आणि संतोष एकमेकांना चांगले ओळखतात. त्यामुळे नवनाथने संतोषला लपण्यास मदत केली. अखेर पोलिसांनी एका फरार गुन्हेगाराला आसरा देणाच्या आरोपांवरून नवनाथलाही अटक केली. त्याच कसून चौकशी केल्यानंतर अखेर नवनाथ बोलला आणि त्याने तोंड उघडलं - त्याने संतोषला आपल्या ओळखीच्या ठिकाणी ठेवल्याचं, त्याच्या खाण्यापिण्याची सोय आणि त्याला वापरण्यासाठी सीमकार्ड दिल्याचं चौकशीत कबूल केलं. आणि अशा प्रकारे पोलिसांना सापळा रचून संतोष जाधवला 12 जून रोजी अटक केली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)