You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉरेन्स बिश्नोई कोण आहे, तो गॅंगस्टर कसा बनला?
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी
अभिनेता सलमान खान आणि सिद्धू मोसेवालाचा मॅनेजर हिटलिस्टवर असल्याचं लॉरेन्स बिश्नोईनं सांगितल्याचं एनआयएनं म्हटलं आहे.
बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे. एनआयएकडून सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी एबीपी या वृत्तवाहिनीला बिश्नोईने तुरुंगातून इंटरव्यू दिला. त्यात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाची जबाबदारी त्याने स्वीकारली.
तसेच जर सलमान खानने काळवीट शिकार प्रकरणी माफी मागितली नाही तर त्याला परिणामांना सामोरे जावे लागेल, असंही त्यानं म्हटलं होतं.
या निमित्ताने लॉरेन्स बिश्नोई कोण आहे आणि त्याने आपली गॅंग कशी उभारली, महाराष्ट्रातही ही गॅंग कशी कार्यरत होती याचा हा घेतलेला आढावा.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या आरोपात महाराष्ट्रातील संतोष जाधवचे नाव शार्पशूटर म्हणून समोर आलं होतं. संतोष जाधव हा लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा सदस्य होता. महाराष्ट्रात राहणारा तरुण पंजाबमधून चालणाऱ्या गॅंगचा सदस्य कसा बनला अशी चर्चा सुरू झाली आणि एक एक गोष्टींचा उलगडा होत गेला.
लॉरेन्स बिश्नोईला दिल्ली पोलिसांकडून पंजाब पोलिसांकडे देण्याची परवानगी दिल्ली कोर्टाने दिली. 54 पोलिसांच्या तैनातीत बिश्नोईला पंजाबमध्ये नेण्यात आले.
लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा सदस्य असलेल्या गोल्डी बराडने सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे. गोल्डी बराड हा लॉरेन्सचा निकटवर्तीय आहे. संतोष जाधवला पुणे पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत.
या प्रकरणात सौरभ महाकाळ, संतोष जाधव, लॉरेन्स बिश्नोई, नवनाथ सूर्यवंशी, गोल्डी बराड ही नावे सातत्याने येत आहेत. तेव्हा यांचा परस्पर संबंध काय, बिश्नोई गॅंग कशी चालते, पंजाब-राजस्थानच्या गॅंगचे महाराष्ट्रीयन सदस्य कसे असे अनेक प्रश्न समोर येत आहे.
लॉरेन्स बिश्नोईच्या पार्श्वभूमीत या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
- सिद्धू मुसेवाला : स्वतःची संजय दत्तशी तुलना, बंदुका मिरवणं ते 30 गोळ्या झाडल्याने मृत्यूपर्यंत...
- पुण्याचा शार्पशूटर संतोष जाधवला सिद्धू मुसेवाला प्रकरणी गुजरातमध्ये अटक
- सिद्धू मुसेवालांच्या हत्येचं पुणे कनेक्शन?
- 'सूर्य उगवायच्या आत तुला संपवतो' असं स्टेटस ठेऊन संतोष जाधवने राण्याला असं 'संपवलं'
- ओळख लपवण्यासाठी संतोषनं पेहराव बदलला, तरीही पोलिसांनी त्याचा असा छडा लावला
पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात 29 मे 2022 रोजी सायंकाळी जवाहरके गावात झालेल्या हल्ल्यामध्ये मुसेवालांचा मृत्यू झाला.
लॉरेन्स बिश्नोई या कुख्यात गुन्हेगाराच्या टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. बिश्नोई सध्या अटकेत असून त्याचे साथीदारही पकडले जात आहेत. यामध्ये सर्वात लक्षणीय बाब म्हणजे या टोळीत महाराष्ट्रातली त्यातही पुण्यातली मुले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लॉरेन्स बिश्नोईची टोळी राजस्थान, पंजाब, हरियाणामधून थेट महाराष्ट्रातही कार्यरत असल्याचे आणि त्याच्या टोळीत मराठी मुले शार्प शूटर म्हणून गुन्हे करत असल्याची माहिती धक्कादायक आहे.
लॉरेन्स बिश्नोई कोण आहे?
लॉरेन्स बिश्नोई हा एक राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील कुख्यात गँगस्टर आहे. त्याचं गाव अबोहरजवळ दुतारवाली हे आहे. हे गाव पंजाबमधल्या फाजिल्का जिल्ह्यात आहे.
फाजिल्का जिल्ह्यात हे गाव असलं तरी या गावाबद्द्ल एक विशेष माहिती लक्षात घेणं आवश्यक आहे. इथून हरियाणा, राजस्थानच्या सीमा अत्यंत जवळ आहेतच त्यातून भारत-पाकिस्तानची सीमा फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे.
इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने लॉरेन्सच्या लहानपणाची आणि गावाची माहिती दिली आहे. लॉरेन्सच्या रंगरुपामुळे त्याला गावात मिल्की असं म्हटलं जाई. त्याचे आई-वडील लविंदर आणि सुनिता यांना पाश्चिमात्य नावांची आवड होती म्हणून त्यांनी आपल्या पहिल्या मुलाचं नाव लॉरेन्स असं ठेवलं.
जमीनदार कुटुंबाची पार्श्वभूमी
लॉरेन्सचं हे कुटुंब पंजाबातलं एक प्रसिद्ध आणि श्रीमंतर जमीनदार कुटुंब आहे. त्याच्या कुटुंबाची एकेकाळी शेकडो एकर जमीन होती.
त्याच्या कुटुंबाच्या श्रीमंतीबद्दल सांगताना लविंदर यांचे सहाध्यायी आर. डी बिश्नोई सांगतात, "ते एक श्रीमंत कुटुंब आहे. आजही त्यांची शंभर एकरच्या आसपास जमीन आहे. ती ते स्वतः कसू शकत नसल्यामुळे त्यांनी बाहेर कसायला दिली आहे."
लविंदर यांचे काका न्यायाधीश, पोलीस अशा अधिकारपदांच्या जागांवर असल्यामुळे त्यांनाही आपण सरकारी नोकरी करावी अशे वाटे. पण त्यांना पोलीस हवालदारपदावर समाधान मानावे लागले. पण ते काही फारकाळ नोकरी करू शकले नाहीत. असं इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटलंय.
लॉरेन्स आणि त्याचा भाऊ अनमोल यांचं त्यांच्या गावाजवळच्या अबोहर येथे सचखंड कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण झालं, लॉरेन्स भगत सिंहांचा मोठा चाहता होता असं त्याच्या गावातल्या लोकांना स्मरतं.
चंदीगडमध्ये शिक्षणासाठी गेल्यावर लॉरेन्सने गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. लॉरेन्स विरोधात पंजाब, दिल्ली, राजस्थान इथे त्याच्याविरोधात गुन्हे नोंद केले गेलेत.
भरतपूर जेलनंतर त्याला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलंय.
पंजाब पोलिसांच्या मते लॉरेन्सने गोल्डी बराडच्या मदतीने सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याच कट कारागृहातच रचला. गोल्डी बरार सध्या कॅनडात आहे.
लॉरेन्सचं नाव आणखी एका प्रकरणात येतं ते म्हणजे 'सलमान खान काळविट शिकार प्रकरण'. बिश्नोई समाज निसर्गाला, हरिणाला पवित्र समजतात.
बिश्नोई टोळीच्या संपत नेहराने अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
'अ' वर्ग गँगस्टर
लॉरेन्स बिश्नोई कायद्याचा पदवीधर असून त्याने पंजाब विद्यापीठातून पदवी घेतली आहे. त्याने विद्यार्थी संघटनांच्या निवडणूका लढवल्या आणि एका लढाईत गोळीबाराचाही त्याच्यावर आरोप आहे.
त्यानंतर तो खंडणी, टोळीयुद्ध, अंमली पदार्थ तस्करी, पोलीस कोठडीतून पळून जाणे अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे. त्याला पंजाब पोलिसांनी अ वर्ग गँगस्टर यादीत टाकलं आहे. या यादीमध्ये अधिक गंभीर गुन्हे करणाऱ्या लोकांचा समावेश होतो.
तुरुंगातून काम
लॉरेन्स कारागृहातून सूत्रं हलवतो. तसेच आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांनाजीवे मारण्याची धमकी देतो. सोशल मीडियावरही तो अक्टिव्ह आहे. खंडणी, भाडोत्री मारेकऱ्यांच्या आणि त्याच्या हुकुमावरुन गुन्हे करणाऱ्या लोकांच्या तो सतत संपर्कात आहे, असं पोलीस अधिकारी सांगतात.
पंजाबातले एक माजी पोलीस अधिकारी बीबीसी पंजाबीशी बोलताना म्हणाले, "कारागृहात असूनही सोशल मीडियात असणे आणि अपुरी कायदेशीर कारवाई यामुळे त्याचा उत्कर्ष झालाय."
खोट्या एन्काऊंटरची भीती
लॉरेन्स बिश्नोईने दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात याचिका दाखल केली आहे. बीबीसीचे सहयोगी पत्रकार सुचित्र मोहंती यांनी या याचिकेबद्दल माहिती दिली.
पंजाब पोलीस आपलं खोटं एन्काऊंटर करू शकतं अशी भीती त्याने आपल्या याचिकेत मांडली आहे.
प्रॉडक्शन वॉरंटच्या माध्यमातून एका जागेवरुन दुसरीकडे नेताना त्याची हत्या होऊ शकते असं बिश्नोईचे वकील विशाल चोप्रा याचिकेत म्हणतात.
आपण विद्यार्थी नेता होतो आणि पंजाब-चंदीगढच्या राजकीय पक्षांनी आपल्याविरोधात खोटे खटले दाखल केले असून पोलीस आपलं खोटं एन्काऊंटर करू शकतात असं तो या याचिकेत म्हणतो.
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणानंतर बिश्नोईचे महाराष्ट्रापर्यंत संबंध असल्याचं स्पष्ट झालं आहे.
सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ
मुसेवाला हत्या प्रकरणात पंजाब पोलिसांनी 8 शार्पशूटर्सची नावं संशयित म्हणून दिलेली आहेत. त्यामध्ये सिद्धेश कांबळेचाही समावेश आहे.
19 वयाचा सिद्धेश हा नारायणगावचा राहणार आहे. पोलिसांनी त्याला पुणे-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरून ताब्यात घेतलं.
संतोष जाधवला मदत करण्याशिवाय त्याच्यावरच्या आणखी काही गुन्ह्यांची पुणे ग्रामीण पोलिसांकडे सध्या तरी नाही.
उपलब्ध माहितीनुसार सिद्धेशच्या आईचं तो लहान असतानाच मृत्यू झाला. तो त्याचे मोठे भावंडं आणि नातेवाईक यांच्याकडे वाढला.
त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर असल्याने बऱ्याच वेळा घरापासून दूर असायचे.
"पुणे जिल्ह्यातल्या खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांत अल्पवयातच गुन्हेगारीकडे वळलेल्या मुलांचं प्रमाण लक्षणीय आहे. यातूनच यांच्या गँग तयार होतात. बेकायदेशीर कामांमधून सहज मिळणाऱ्या पैशांची त्यांना चटक लागते. त्यातून छोटे गुन्हे करता करता मोठे गुन्हे करायला सुरुवात करतात," असं मंचर भागातल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं.
संतोष जाधव
मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष जाधव हा शार्पशूटर आहे, असा तपास यंत्रणांचा कयास आहे. संतोष जाधवला 12 जून रोजी पुणे पोलिसांनी गुजरातमधून अटक केलीय.
संतोष जाधवचं कुटुंब आधी आंबेगाव तालुक्यातल्या पोखरी या गावात राहायचं. साधारणपणे 10 वर्षांच्या आधी संतोषचे वडील वारले आणि उदरनिर्वाह करण्यासाठी त्याची आई सिता जाधव त्याला आणि त्याची लहान बहिणीला घेऊन मंचर इथे आली.
तिथेच हे कुटुंब राहू लागलं. अल्पवयीन असल्यापासूनच संतोषचं नाव गुन्हेगार म्हणून पुढे येऊ लागलं.
2017 साली संतोषने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
त्यानंतर बाललैंगिक अत्याचार कायदा (पॉस्को) अंतर्गत त्याच्यावर मंचरमध्येच 2019 साली गुन्हा दाखल आहे.
"या दोन्ही केसमध्ये जामिनावर तो बाहेर आल्यावर, 2021 साली परत एका गंभीर स्वरूपातल्या गुन्ह्यात त्याचं नाव पुढे आलं. ओंकार बाणखेलेचा गोळीबार करुन खून झाला आणि त्याचा मास्टरमाईंड संतोष जाधव होता असं म्हणावं लागेल कारण त्या खुनाच्या आधी सोशल मीडियावर पोस्ट टाकून तसे इशारे त्याने दिले होते," असं मंचर भागातल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं.
नवनाथ सूर्यवंशी
कुख्यात गुन्हेगार राण्या बालखेले हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी संतोष जाधव गेल्या वर्षभरापासून फरार होता.
संतोष गुजरातमध्ये लपून बसला असल्याची माहिती पुणे पोलिसांना सौरभ महाकाळकडून मिळाली. पुणे ग्रामीण पोलिसांनी 7 जूनला सौरभला पुण्यातून अटक केली होती. त्याच्यावर फरार असताना संतोष जाधवला आसरा दिल्याचा आरोप आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "सौरभ महाकाळने पोलीस चौकशीत संतोष जाधव त्याचा मित्र नवनाथ सूर्यवंशीकडे गुजरातच्या कच्छमध्ये लपून बसला असल्याची माहिती दिली."
संतोष गुजरातच्या मांडवी तालुक्यातील नागोरमध्ये असल्याची खबर पक्की होती. पोलिसांनी सर्वप्रथम नवनाथ सूर्यवंशीला ताब्यात घेतलं. नवनाथने संतोषची माहिती सहज दिली नाही. पण, अखेर संतोषला आपल्या ओळखीच्या ठिकाणी ठेवल्याचं, त्याच्या खाण्यापिण्याची सोय आणि त्याला वापरण्यासाठी सीमकार्ड दिल्याचं चौकशीत कबूल केलं.
पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पुढे म्हणाले, "संतोषने आपला पूर्ण पेहराव बदलला होता. सिद्धू मुसेवाला प्रकरणी संतोषचा फोटो मीडिया आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे ओळख लपवण्यासाठी त्याने आपले केस कापले होते."
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथचे वडील गेल्या बऱ्याच वर्षापासून कामानिमित्त गुजरातमध्ये असतात. नवनाथ आणि संतोष एकमेकांना चांगले ओळखतात. त्यामुळे नवनाथने संतोषला लपण्यास मदत केली. पोलिसांनी आरोपीला आसरा दिल्याच्या आरोपावरून नवनाथला अटक केलीये.
सिद्धू मुसेवाला हत्येशी संतोषचा काय संबंध आहे?
प्रसिद्ध पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष जाधव लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आहे. मुसेवालाच्या हत्येनंतर शूटर म्हणून संतोषचं नाव पुढे आलं होतं.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) कुलवंत कुमार सारंगल सांगतात, "सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी संतोष आणि सौरभ महाकाळचा नक्की रोल काय याची आम्ही चौकशी करत आहोत. पण, बिश्नोई गँगचे सदस्य असल्याने त्यांना मुसेवाला खूनाची माहिती आहे." या हत्येप्रकरणी त्यांची लिंक काय? हे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करतायत.
बिश्नोई गँगचा पसारा
लॉरेन्स बिश्नोई गँग पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये अॅक्टिव्ह आहे. या गँगचे सदस्य देशभरात ऑपरेट करतात. महाराष्ट्र पोलिसांच्या माहितीनुसार, "राज्यातही लॉरेन्स बिश्नोई गँगचे काही सदस्य काम करत आहेत.
मुसेवाला हत्येनंतर दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्र पोलीस याप्रकरणी तपास करत होते. अतिरिक्त पोलीस महासंचालक पुढे म्हणाले, "मुसेवाला हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुढे आलं. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ बिष्णोईच्या कसे संपर्कात आले याची माहिती आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतोय."
दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी मुसेवाला प्रकरणी सौरभ महाकाळची चौकशी केली होती.
कुलवंत कुमार सारंगल पुढे म्हणाले, "लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य विक्रम बराड कॅनडामध्ये असल्याची माहिती आहे. त्याचं नक्की लोकेशन माहिती नाही. सौरभ महाकाळ बराडसोबत सातत्याने संपर्कात होता."
पोलिसांच्या माहितीनुसार, सौरभ महाकाळ संतोषच्या संपर्कात होता. त्याच्याच मार्फत तो पंजाब आणि हरियाणाला गेला होता. विक्रम बरारसोबत सौरभ महाकाळचा संपर्क संतोषमुळे झाला. महाकाळला बिष्णोई गॅंगमध्ये का घेण्यात आलं, त्याचा रोल काय होता याची माहिती पोलीस गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सौरभ महाकाळ 2021 पासून संतोष जाधवच्या संपर्कात आला. तो राजस्थान, पंजाब, हरियाणा, आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यात गेला आहे. कुलवंत कुमार सारंगल पुढे म्हणाले, "महाकाळने बिश्नोई गँगसाठी काही टार्गेटची रेकी पंजाब आणि हरियाणामध्ये केली होती."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)