You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाड दुर्घटना ग्राउंड रिपोर्ट: आईनेच आपल्या सहा मुलांना विहिरीत ढकलून का मारलं, गावात गेल्यावर काय दिसलं?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी, महाडहून
"मी माझ्या मुलांना तुमच्या विहीरीमध्ये टाकलंय."
अंगावर काटा आणणारे हे शब्द आहेत रायगड जिल्ह्यातील महाडच्या ढालकाठी गावच्या महादेव शिर्के यांचे. शिर्के यांच्याच विहिरीत रुना सहानीने सोमवारी (30 मे) सहा लहान मुलांना ढकलून त्यांची हत्या केली होती.
पोलिसांनी रूनावर हत्याचा गुन्हा दाखल केलाय. कोर्टाने तिला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. तर, तिच्या पतीवर पत्नीला मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलीये.
ही घटना घडल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये रूनाने मुलांना विहीरीत ढकलून दिल्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. मुलांच्या हत्येमागे रूनासोबत आणखी कोणाचा हात आहे का? याची पोलीस चौकशी करत आहेत.
कुठे घडली ही घटना?
तीन बाजूंनी डोंगर…विस्तीर्ण पसरलेलं भाताचं शेत..आणि शेतात एक विहीर..एखाद्या चित्रपटात दिसेल असं आहे रायगडच्या महाड तालुक्यातील ढालकाठी गाव.
पण गेल्या दोन दिवसांपासून हे गाव चर्चेत आहे एका वेगळ्या कारणासाठी. या गावात घडलीये काळीज पिळवटून टाकणारी घटना.
जी ऐकून अंगावर काटा उभा राहील. या छोट्याशा गावात एका आईने पोटच्या सहा मुलांना विहीरीत ढकलून त्यांचा जीव घेतलाय. मुलांच्या हत्येप्रकरणी महाड पोलिसांनी 30 वर्षीय रूना सहानीला अटक केलीये. तिच्या पतीवरही पत्नीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ढालकाठी गावात या घटनेबाबत कोणीच बोलण्यास तयार नाही. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.
कशी घडली घटना?
त्या दिवशी नक्की काय झालं? हे शोधण्यासाठी या विहिरीच्या शोधात आम्ही ढालकाठी गावात पोहोचलो. गावात ही विहीर चर्चेचा विषय असल्यामुळे शोधण्यास फार वेळ लागला नाही.
गावकऱ्यांनी आम्हाला या विहिरीचा रस्ता दाखवला. शेतातही ही विहीर सोमवारच्या धक्कादायक घटनेची साक्षीदार आहे.
विहीर मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत शेतात आहे. विहीरीपर्यंत पोहोचण्यासाठी चालत जावं लागतं. आजूबाजूला शेतं आहेत. शेतात सद्यस्थितीत काम सुरू नाहीये. त्यामुळे हा परिसर पूर्णत: सुनसान आहे.
जवळच्याच आदिवासी पाड्यातून मुख्य रस्त्याकडे जाणारे हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत लोक या परिसरात ये-जा करताना दिसून आले. शेताच्या मधोमध असलेल्या या विहीरीत सहा मुलांना ढकलून त्यांची हत्या केल्याचा आरोप 30 वर्षीय रूना सहानीवर आहे.
महाडचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश तांबे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "रूना सहानीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोर्टाने तिला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. सोमवारी या महिलेने सहा मुलांना विहीरीत ढकलून त्यांची हत्या केली होती."
ही घटना घडली सोमवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास. स्थानिक गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. एकीकडे पोलीस रूनाची चौकशी करत होते. तर दुसरीकडे विहिरीत मुलांचा जीव वाचवण्यासाठी शोधमोहिम सुरू होती. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. पाण्यात बुडल्यामुळे सहा मुलांचा मृत्यू झाला.
पण रूनाने असं का केलं? रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे सांगतात, "पतीसोबत झालेल्या भांडणानंतर या महिलेने हे टोकाचं पाउल उचलल्याची माहिती आहे."
'मी मुलांना तुमच्या विहिरीत टाकलंय'
ज्या विहिरीत रुनाने मुलांना ढकलून दिलं. ती विहीर 70 वर्षांच्या महादेव शिर्के यांच्या शेतात आहे.
आम्ही विहिरीजवळ माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतानाच, शेताजवळ आम्हाला महादेव शिर्के भेटले. म्हशींना नदीवर घेऊन गेलेले शिर्के शेतात असलेल्या वाड्यात म्हशींना बांधत होते. हे शेत महादेव शिर्के यांच्या मालकीचं आहे. सोमवारी नक्की काय झालं याची माहिती त्यांनी बीबीसीशी बोलताना दिली.
ते म्हणाले, "संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे गुरांना बांधण्यासाठी शेतातील वाड्यात गेलो. संध्याकाळचे सहा वाजले असतील. गुरांना बांधल्यानंतर बाहेर आलो. मला दाराबाहेर ही महिला दिसली."
"मी विचारलं इथे काय करतेस? ती म्हणाली, मी तुमच्या विहिरीत मुलांना टाकलंय. ऐकून धक्काच बसला," महादेव शिर्के सांगत होते.
सोमवारी ही घटना घडल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये या महिलेने मुलांना विहिरीत ढकलल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली होती. स्थानिक ग्रामस्थांनी या महिलेला वाचवल्याचं समोर आलं होतं.
याबाबत बोलताना सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश तांबे पुढे सांगतात, "विहिरीच्या मालकांनी FIR मध्ये याबाबत माहिती दिली आहे. तिच्यासोबत आणखी कोणी होतं का? याचा तपास आम्ही करत आहोत."
महादेव शिर्के पुढे म्हणतात, "मला वाटलं ती पळून जाईल. मग, मी तिला सांगितलं, पोलीस तूला पकडतील. तू माझ्यासोबत चल. मी तुला सुरक्षित ठेवतो. मी तिला माझ्या घरी घेऊन गेलो." त्यानंतर पोलीस पाटलांशी संपर्क करून तिला थेट पोलिसांकडे घेऊन गेलो.
ही विहीर निर्मनुष्य ठिकाणी असल्यामुळे घटना घडताना आसपास कोणीच नव्हतं. महादेव शिर्केंचा या प्रकरणी पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे. त्यांच्याच जबाबावरून रूनाच्या विरोधात FIR दाखल करून घेतली आहे.
ज्यावेळी रूनाने मुलांना विहीरीत ढकललं त्यावेळी तिचा पती चिरखु कामावर गेला असल्याची माहिती आहे.
ढालकाठी गावात कशी पोहोचली रुना सहानी?
रूना सहानी गेले वर्षभर महादेव शिर्के यांच्याघरी ढालकाठी गावात भाडेकरू म्हणून राहत होती. मात्र तीन महिन्यांपूर्वी सहानी कुटुंब जवळच्याच शेलटोली गावात रहाण्यासाठी गेलं.
शिलटोली गाव ढालकाठीपासून 6 किलोमीटरवर आहे. पोलिसांना संशय आहे की ढालकाठी गाव माहीत असल्यामुळे रुना या गावात पोहोचली होती. शेलटोली गावात रूना आणि चिखरूबाबत लोकांना जास्त माहिती नाही. तीन महिन्यांपूर्वीच ते या गावात आले होते.
गावातील लोक या घडलेल्या घटनेबाबत काहीच बोलण्यास तयार नाहीत.
महादेव शिर्के सांगतात, "रूना चांगली होती. ती आणि तिचा पती माझ्याकडे वर्षभर भाडेकरू होते. दोघंही चांगले होते. कष्ट करत होते आणि मुलांचा सांभाळ करत होते."
आमच्याकडे असताना त्यांची काही तक्रार ऐकू आली नाही, ते पुढे सांगत होते.
प्राथमिक माहितीनुसार पतीसोबत भांडण झालं. पती दाऊन पिऊन येतो, वारंवार मारहाण करतो, चारित्र्यावर संशय घेतो या रागातून रूनाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं रुनाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे.
"रूनाच्या पतीविरोधात पत्नीला मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आम्ही चिखरूला अटक करत आहोत. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने जास्त काही बोलता येणार नाही," सहाय्य पोलीस अधीक्षक निलेश तांबे पुढे माहिती देताना म्हणाले.
सोमवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर चार तास शोधमोहिम सुरू होती. पण मुलांना वाचवण्यात यश आलं नाही.
मुलांच्या शोधमोहिमेत सहभागी स्थानिक रहिवासी स्वप्नील ढवन सांगतात, "ग्रामस्थांनी पोलीस आणि बचाव टीम येण्याआघी मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. दोम मृतदेह काढण्यात आले होते. पण पाणी जास्त असल्याने इतर काढता आले नाहीत." बचावपथकाने चार तासांनंतर सर्व मृतदेह बाहेर काढले.
मृत मुलांमध्ये पाच मुली आणि एक मुलगा आहे. सर्वात लहान मुलाचं वय दीड वर्ष तर, मोठ्या मुलीचं वय 10 वर्ष असल्याची माहिती आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)