You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुरुंगात असताना हवालदाराने संजय दत्तला दिला 'हा' सल्ला जो त्याच्यासाठी ठरला मोलाचा
संजय दत्त बॉलिवुडमधील अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याने आतापर्यंत मानमरातब पैसा वगैरे सर्वकाही कमावले आहे, पण तितकंच त्याचं नाव वादात देखील अडकलं आहे. सुनील दत्त आणि नर्गिसचा मुलगा, इतकीच ओळख न राहता पुढे संजय दत्त 'संजूबाबा' बनला आणि प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला.
एका बाजूने त्याचं फिल्मी करिअर सुरू होतं त्याच वेळी तो काही मोठ्या वादात अडकला. 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी त्याचं नाव हत्यार बाळगण्याच्या प्रकरणात आलं आणि त्याची काही वर्षं तुरुंगात गेली.
या प्रकरणात संजय दत्तने पूर्ण शिक्षा भोगली. आणि आता त्याने त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. एकानंतर एक, अशा अनेक चित्रपटात तो दिसत आहे. नुकताच त्याने केजीएफ-2 मध्ये काम केले आहे. हा चित्रपट तर ब्लॉकबस्टर ठरला आहे.
संजय दत्तने बीबीसी हिंदीचे सहकारी पत्रकार नयनदीप रक्षित यांच्याशी बातचीत केली आणि अनेक विषयांवर त्याने त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या.
तुरुंगात कमावलेल्या पैशांचे संजय दत्तने काय केले?
1993 मध्ये 12 मार्च रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात संजय दत्तचे नाव समोर आले होते. त्यानंतर संजय दत्तला अबू सालेम आणि रियाज सिद्दिकी यांच्याकडून बेकायदा बंदूक घेऊन बाळगल्याप्रकरणी तसेच पुरावे नष्ट करण्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आणि तो सिद्ध झाला.
2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने टाडा न्यायालयाचा निर्णय योग्य होता असा निर्वाळा दिला. याच प्रकरणात संजय दत्तला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आणि संजय दत्तने ही वर्षं तुरुंगात काढली.
संजय दत्तला विचारण्यात आले की अशा कठीण काळात त्यांचे मनोधैर्य खचले का, त्यावर संजय दत्तने सांगितले की 'असं कधी झालं नाही की तो पूर्णपणे खचला.'
या काळात एका हवालदाराने त्याला सल्ला दिला आणि तो सल्ला खूप कामी आल्याचं संजय दत्तने सांगितलं, "जेव्हा मी तुरुंगात गेलो तेव्हा एक हवालदार मला म्हणाला संजूबाबा, जर तुम्ही आशा सोडून दिली तर तुरुंगातला वेळ चुटकीसरशी निघून जातील.
"मी त्यांना म्हटलं असं कसं होईल की मी आशाच सोडून देईन? मग ते म्हणाले प्रयत्न करून तर पाहा. मग मी त्यांचा सल्ला गांभीर्याने घेतला. मला दोन तीन आठवडे लागले. पण बाहेर निघण्याची आशा मग मी सोडून दिली आणि माझा तुरुंगातला वेळ चटकन निघून गेला.
संजय दत्तने सांगितले की, तुरुंगात असताना रेडिओ जॉकीचे काम करून, पिशव्या बनवून त्याने पाच-सहा हजार रुपये कमावले होते.
तो सांगतो, "ते पैसे मी सांभाळून ठेवले आहे. मी ते माझ्या पत्नीकडे सुरक्षितपणे ठेवले आहे. पिशव्या बनवणे, गार्डनचे काम करणे, रेडिओचे काम करने या सर्व शिकण्यासारख्या गोष्टी होत्या आणि तो काळ देखील शिकण्याचा होता."
बॉलिवुडमधील नातेसंबंधाबद्दल तो सांगतो, "काही लोकांसोबत माझे नाते खूप घट्ट आहे आणि त्यांच्यात कुठल्याही प्रकारचे वैर किंवा स्पर्धा नाही, तो सांगतो, आम्ही सर्व जण आपआपलं काम करतो. आम्ही सर्व भावासारखे आहोत. सलमान, शाहरुख, अक्षय, अजय, सुनिल यांचे चित्रपट चालले की मला चांगलं वाटतं. आम्ही एकाच इंडस्ट्रीचा भाग आहोत आणि हे कुटुंबाप्रमाणे आहे. आमच्यात चांगले बॉंडिंग आहे."
सलमान खानसोबतचा एक किस्सा संजय दत्तने सांगितला, "मी कधीकाळी हार्लेचे बूट वापरत होतो. हार्लेवर एक पट्टी असते. ती सलमानने ती पट्टीच कापून टाकली. मी त्याला म्हटलं की आता दुसरीचं काय काम आहे ती पण कापून टाक. सांगायची गोष्ट ही की आमच्यात असं खेळीमेळीचं वातावरण आहे."
संजय दत्त सांगतो की तो त्याच्या करिअरवर समाधानी आहे. तो सांगतो की त्याने चांगल्या वाईट सर्व प्रकारचे चित्रपट केले आहेत. सध्या हातात काही चित्रपट देखील असल्याचे त्याने सांगितलं.
आपल्या कुटुंबाबद्दल संजय दत्तने सांगितले, "कुटुंबाकडून मला खूप प्रेम मिळालं, आई खूप लवकर सोडून गेली. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करत होती. वडील देखील. ती गेली तेव्हा मी खूप लहान होतो, या गोष्टीचं वाईट वाटतं की तिच्यासमोर मी मोठा नाही झालो. त्यांनी माझी मुलं पाहिली नाहीत. माझ्या वडिलांनी देखील माझी मुलं पाहिली नाहीत. त्यांनी ज्या गोष्टी मला शिकवल्या त्या नेहमीच माझ्यासोबत राहतील."
संजय दत्तने सांगितलं की त्याचे वडील एखाद्या पर्वताप्रमाणे महाकाय होते. त्यांची साथ सुटली तर काही वर्षं खूप कठीण गेली.
पत्नी मान्यता ही आयुष्यातला खूप मोठा आधार आहे. 'कठीण काळातही तिने घर सांभाळलं,' असं संजय दत्त सांगतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)