You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिलीप कुमार यांच्या घराचा वादः सायरा बानोंची पंतप्रधानांकडे मदतीची मागणी
- Author, प्रदीप सरदाना
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
प्रॉपर्टी विवादावर तोडगा काढण्यासाठी हजारो लोक कोर्ट-कचेऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे फेऱ्या घालत असतात. मात्र प्रश्न जेव्हा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित अभिनेते दिलीप कुमार यांचा असतो, तेव्हा थेट सर्वोच्च यंत्रणेलाच मदतीचं आवाहन केलं जातं. दिलीप कुमार यांच्या घरासंबंधी सुरु असलेल्या वादात अभिनेत्री आणि दिलीपकुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी ट्वीट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे भेटीची वेळ मागितली आहे.
दिलीप कुमार यांच्या बंगल्यावरुन सुरु असलेल्या विवादामध्ये पंतप्रधानांनी मदत करावी अशी मागणी सायरा बानो यांनी या ट्वीटमधून केली आहे. सायरा बानो यांनी 16 डिसेंबरला हे ट्वीट केलं आहे. 18 डिसेंबरला पंतप्रधान मुंबईत होते, मात्र सायरा बानो यांची त्यांच्यासोबत भेट होऊ शकली नाही.
गेल्या दहा वर्षांपासून सुरु असलेला दिलीप कुमार यांच्या घराचा वाद अधिकच चिघळला आहे. सायरा बानो यांनी बिल्डर समीर भोजवानी यांची तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही केली होती.
बीबीसीने बिल्डर समीर भोजवानी आणि त्यांचे वकील अमित देसाई यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
मुंबई पोलिसांचे प्रवक्ते मंजुनाथ सिंग यांनी पत्रकारांना सांगितले, की या प्रकरणी लवकरात लवकर कायदेशीर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही सायरा बानो यांना संपूर्ण सहकार्य करु.
दिलीप कुमार यांची प्रकृती गेल्या 10 वर्षांपासून खालावली आहे. आपल्या प्रॉपर्टीसाठी संघर्ष करण्याच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीमध्ये ते नाहीत. त्यामुळेच त्यांच्या पत्नी सायरा बानो जागेची ही लढाई लढत आहेत.
सायरा बानो यांचं नेमकं काय म्हणणं आहे, यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद
बंगल्याच्या संदर्भात तुमचा वाद गेल्या दहा वर्षांपासून सुरु आहे. मग आता नेमकं असं काय झालं की तुम्हाला ट्वीट करुन थेट पंतप्रधानांकडे मदत मागण्याची वेळ आली?
-दहा वर्षांपासून हा लढा लढताना मी थकून गेले आहे. ज्या घरात दिलीप साहेबांनी इतकी वर्षे घालवली त्या वास्तूमध्ये त्यांच्या आठवणींचे एक संग्रहालय उभारण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या वस्तूंसह त्यांना मिळालेले पुरस्कार ठेवण्यात येतील.
परदेशात अनेक ज्येष्ठ कलाकारांच्या वास्तू अशाप्रकारे जतन करण्यात आल्या आहेत. या संग्रहालयाचे उद्घाटन दिलीप कुमारांनी स्वतःच्या हस्ते करावं, अशीही माझी इच्छा आहे.
मात्र बिल्डर समीर भोजवानी आम्हाला सतत त्रास देत आहेत. त्यामुळे आमचं स्वप्न पूर्ण होण्यात अडचणी येत आहेत.
18 तारखेला मुंबईमध्ये पंतप्रधानांसोबत तुमची भेट होऊ शकली नाही. मात्र त्यानंतर त्यांच्यावतीने पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात तुमच्याशी संपर्क साधला?
-नाही. आतापर्यंत कोणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही. जर याबाबतीत पंतप्रधान कार्यालयाने काही उत्तर दिले तर मी नक्की तुम्हाला त्याबाबत माहिती देईन. मात्र पंतप्रधानांनी याबाबतीत कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना केली आहे. आता पाहू काय होतं ते. गरज पडल्यास मी स्वतः पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्लीला जाईन.
तुम्ही याबाबत अमिताभ बच्चन यांच्याशी बोलला आहात का? ते दिलीप साहेबांना खूप मानतात. त्यांचा आदर करतात. तुमचीही त्यांच्याशी चांगली मैत्री आहे. अमिताभ यांचे मोदींसोबतचे संबंध चांगले आहेत. कदाचित ते मोदींसोबत तुमची भेट घालून देतील.
- ही गोष्ट सांगून मी अमिताभ यांना त्रास का देऊ? मी स्वतः दिलीप कुमार यांच्यासारख्या महान व्यक्तिच्या वतीने माननीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्याची तसेच मदतीची मागणी करत आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं.
आता तुम्ही नेमकी काय पावलं उचलणार आणि याप्रकरणी काय तोडगा निघेल अशी आशा वाटते?
-मी काही दिवसांपासून वकिलांसोबत बोलणी करत आहे, त्यांचा सल्ला घेत आहे. न्यायालयाला ख्रिसमस आणि नवीन वर्षाची सुट्टी लागण्याआधी काहीतरी तोडगा काढण्याचा माझा प्रयत्न आहे. मी फिल्म इंडस्ट्री आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरही दिलीप कुमार यांच्या अधिकारांसाठी आवाज उठवतील, अशी आशा मी करते. दिलीप साहेबांना यश मिळवून देण्यासाठी सरकारने आम्हाला सहकार्य करायला हवं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)